एक डायरी गरजेची

दिवस एक, सकाळी नऊ
सकाळी उठलो. चांगल्या तब्येतीसाठी प्रत्येक माणसाने सकाळी उठणे गरजेचे आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आंघोळ वगैरै उरकून वर्तमानपत्रे चाळायला सुरवात केली. जगाचे भान यायचे असेल, तर वर्तमानपत्राचे वाचन आवश्‍यक ठरते. वर्तमानपत्रात त्याच त्या बातम्या होत्या. हे लोक काही चांगलं, संदेशात्मक का छापत नाहीत? काय त्या आयटी का फायटीतल्या लोकांना भरपूर पगार मिळतो म्हणतात. काय उपयोग आहे त्याचा…त्या पैशाचा का चांगला उपयोग होतो? उधळपट्टी करतात लेकाचे! कपडे काय घेतात, बूटं काय घेतात! आमच्याकाळी नव्हतं असं!सूनबाईनं चहा दिला. पहिला घोट घेतला न्‌ काहीतरी खटकल्यासारखं झालं…””सूनबाई, चहात केशर नाही का टाकलं परवा ते आणलेलं…,” तिला म्हणालो..””हां, ते प्रतीकनं परवा आणलेलंच नं…हिमाचलला गेला होता तेव्हा…” तिनंही उत्तर देताना प्रश्‍नच टाकला.आता ते केसर कोण आणलं, हा प्रश्‍न निरर्थकच नव्हता का? ते चहात टाकायला हवं होतं. तसं सांगितलं तिला मी, तेव्हा कुठं पुन्हा केसर टाकलेला चहा देते म्हणाली.त्यानंतर दुपारपर्यंत काहीच काम नव्हतं. काही वेळ टीव्ही पाहत बसलो. त्यावरही चांगले कार्यक्रम नेमके आपल्याला वेळ नसतानाच लागतात ना…त्यामुळं आलमारीतून काढून पुस्तकं चाळायला सुरवात केली. कॉलेजमध्ये शिकवत होतो तेव्हा काय लोकांनी एक एक पुस्तकं भेट दिली होती…वा! आता लोकं पुस्तक प्रकाशनाला बोलावतात आणि नवी पुस्तके देतात…ती वाचवत नाहीत. काय करणार? आज रविवार, त्यामुळं संध्याकाळी दोन तीन कार्यक्रम आहेत. तिथे भाषणं होतीलच. त्यामुळं आता झोपतो.
दुपारी चार
दुपारची वामकुक्षी घेतली की कसं ताजतवानं वाटतं. झोपेतून उठलो तेव्हा नात (मुलीची मुलगी) भेटायला आली होती. कुठल्याशा कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. महिन्याला अठरा-एकोणीस (आवंढा) हजार पगार आहे. म्हणजे आमच्या प्रतीकसारखंच. त्याच्यासारखंच हीही खरेदी, वगैरे हूंऽऽ…तिला म्हणालो, “”बाई गं, बचत कर. चांगली पुस्तके वाच…”तर ती म्हणाली, “”आजोबा, दर महिन्याला दोन हजार रुपये म्युच्युअल फंडात टाकते. दोन हजार प्रॉविडंड फंडात जातात. महिन्याला एखादं तरी पुस्तक घेतेच…आता परवाच “जावा अँड एचटीएमएल’ घेतलं. बाकी “गुगल बुक्‍स’वर वाचते…आणखी काय हवं…'”मला काही सांगता आलं नाही…हातात पैसा खळखळू लागल्यानं तरुण पिढी मोठ्यांचा आदर ठेवेनासी झाली आहे. तरुण पिढीत संस्कार रुजविणे ही आता काळाची गरज झाली आहे. त्यानंतर माझ्या कार्यक्रमाला निघण्याची वेळ झाली. नातीकडे कार आहेच. तिला म्हणालो, “”मला सोड कार्यक्रमाला…’तर ती म्हणाली, “”आजोबा, मला जायचंय एका ठिकाणी.”शेवटी सुनेनं आग्रह केला म्हणून मला सोडायला तयार झाली…
रात्री दहा
एक पुस्तक प्रकाशन होतं. कुठल्याशा लेखकानं म्हाताऱ्यांसाठी (हल्ली त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणतात) लिहिलं आहे…मी गेलो तेव्हा कार्यक्रमस्थळी मोजकीच मंडळी होती…कार्यक्रमासाठी मला मानधनाचा चेक देणारे श्री. हसरे, मानधन देण्यासाठी माझ्याशी घासाघीस करणारे श्री. रडके…अशी आयोजकांपैकी मंडळी होती. कार्यक्रमाला वेळ होता त्यामुळं त्यांना जाऊन म्हणालो, “”प्रवासखर्चाचं पाकिट?”त्यांनीही दिलं. मात्र त्यातही दहा रुपये कमी असल्याचं घरी किट फोडल्यावर कळालं. हल्ली हे नेहमीचंच झालं आहे…त्यानंतक एक एक पाहुणेमंडळी येऊ लागली. गेल्या महिन्यात कुठल्याशा संस्थेचं पारितोषिक मिळाल्यानं अचानक प्रकाशात आलेला एक जण दीपप्रज्वलनासाठी होता. (सूत्रसंचालन करणाऱ्याचा गॅरेजचा धंदा असल्यानं कार्यक्रमात गंमतच झाली. त्याने ऐनवेळी दीपप्रज्ज्वलनाऐवजी “जीपप्रज्ज्वलन’ असा शब्द वापरला.) मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही.कार्यक्रम यथातथाच झाला. मी भाषण केलं. आपलं भाषण म्हणजे नेहमी रंगणारा वीडाच! मी म्हणालो, “”बदलत्या काळात जागतिकीकरण हे वास्तव असून, त्यानुसार परिस्थिती बदलत आहे. या वस्तुस्थितीचा स्वीकार करून ज्येष्ठ नागरिकांनी कुटुंबीयांशी जोडून घ्यावे. स्वस्थ कुटुंबासाठी परस्परांतील संवाद गरजेचा असून, ज्येष्ठ नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे.” ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांच्या आशा-आकांक्षा समजून घ्याव्यात, असंही मी म्हणालो. त्याला खूप प्रतिसाद मिळाला, असं टाळ्यांवरून तेव्हा वाटलं. (सभागृहात मुद्दाम “इको इफेक्‍ट’ची यंत्रणा लावण्यात आली होती, असं मला नंतर समजलं!)अशा रितीने दिवस छान गेला…आता झोपावे…सकाळी लवकर उठायचे असेल, तर लवकर झोपणे आवश्‍यक आहे……..