फॉर सिक्रेट आयज ओन्ली…अन आपण

जगात काही कुठं खुट्ट वाजलं, की अमेरिकेच्या नावाने खडे फोडायचा हा आपल्याकडच्या “आंतरराष्ट्रीय तज्ज्ञां’चा आवडता छंद. त्यातही “सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ (सीआयए) म्हणजे टीकाकारांचे आवडते लक्ष्य. “सीआयएने’ही विविध निमित्ताने आपल्या टीकाकारांना चांगलाच रोजगार पुरविला आहे. गेल्याच आठवड्यात “सीआयए’ने जाहीर केलेली कागदपत्रे ही यांपैकीच एक. क्‍यूबाचे अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांची 1960 च्या दशकात हत्या करण्यासाठी “सीआयए’ने तीन गुंडांची मदत घेतल्याचे या कागदपत्रांतील माहितीवरून उघडकीस आले. या कागदपत्रांतील काही माहिती या ना त्यानिमित्ताने पूर्वीच उघडकीस आली असली, तरी बरीचशी माहिती नव्यानेच समोर आली आहे. कॅस्ट्रो यांनी 1959 मध्ये क्‍यूबात क्रांतीद्वारे सत्ता हस्तगत केली. त्यांच्या साम्यवादी विचारसरणीमुळे आणि रशियाशी असलेल्या सख्यामुळे कॅस्ट्रो यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. त्यासाठी “सीआयए’ने प्रथम लास वेगासमधील माफिया जोस रोझेलीशी संपर्क साधला. त्यानंतर मोमो साव्हातोर गियान्काना ऊर्फ सॅम गोल्ड आणि सांतोस ट्राफिकांत यांच्याशी संपर्क साधला गेला. मोमो आणि सांतोस हे तेव्हा अमरिकेला हवे असलेलेच गुन्हेगार होते. कॅस्ट्रो यांच्या हत्येशी अमेरिका किंवा “सीआयए’चा संबंध असणार नाही, असेही त्यांना स्पष्ट करण्यात आले होते.कॅस्ट्रोंना जेवणातून विष देऊन मारण्याची योजना मोमोने आखली होती. नंतर क्‍यूबातील ज्यआन ओर्ता या अधिकाऱ्याच्या मदतीने कॅस्ट्रोंना मारण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यात अपयश आल्याने ओर्ताने माघार घेतली, असे हे एकूण प्रकरण आहे.ही माहिती उघड झाली आणि लगेच “सीआयए’ कृष्णकृत्यांत कशी गुंतलेली आहे, हे सांगणारे तज्ज्ञ सरसावले. “अमेरिका जगावर साम्राज्य स्थापू पाहत असून, त्यासाठी मार्गात येणाऱ्यांचा काटा काढण्याची तिची नेहमीच तयारी असते,’ असे ठेवणीतले नेहमीची वाक्‍य फेकणारे अर्थातच त्यात होते. जणू काही ही माहिती यांनीच उघड केली आहे. मुळात चाळीस वर्षांपूर्वीच्या “सीआयए’च्या कारवायांचे हे कागदपत्र उघड झाल्यानंतर “न्यूयॉर्क टाइम्स’ने एक मालिका चालवून ते लोकांसमोर आणले. आताच नव्हे, तर ही कागदपत्रे गोपनीय असतानाच सेमूर हर्ष यांनी “न्यूयॉर्क टाइम्स’मधूनच 1974 मध्ये त्यातील अनेक भाग लोकांसमोर आणले. एवढेच नव्हे, तर त्यानंर “सीआयए’ने त्यांच्यावरच पाळत ठेवण्यास सुरवात केली, हेही त्यांनी जगासमोर आणले. आजही ग्वांटॅनॅमो बे किंवा इराकमधील अमेरिकी सैन्यांच्या अत्याचारी कृत्यांविरूद्ध हर्ष यांनीच सातत्याने लेखन केले आहे. आता उघड झालेल्या माहितीवरून त्यातील काही भाग केवळ अफवा किंवा खोटा असल्याचेही सिद्ध झाले आहे. त्यानंतर “सीआयए’चे प्रमुख इतिहासकार डेव्हिड रोबार्ज यांनी “न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये लिहिलेल्या ब्लॉगमधून याविषयी “सीआयए’ची भूमिका मांडली आहे. ती खालील ठिकाणी उपलब्ध आहेः
ही कागदपत्रे म्हणजे “फॅमिली जेवेल्स’ नावाच्या दस्तऐवजांचा संग्रह आहे. खरं तर, “सीआयए’ते तत्कालीन प्रमुख होवार्ड जे. ओस्बोर्न यांनी अमेरिकेच्या “नॅशनल सिक्‍युरिटी ऍक्‍ट 1947′ अंतर्गत “सीआयए’च्या नीतीनियमांत न बसणाऱ्या कारवायांची माहिती आपल्या संघटनेच्या गुप्तचरांकडून मागितली होती. त्या माहितीचा हा संग्रह आहे. त्यातील अनेक कागदपत्रे पुन्हा-पुन्हा आली आहेत, काही केवळ कोरे कागद आहेत. याच “फॅमिली ज्वेल्स’च्या बरोबरीने प्रकाशित झालेले “सिझर-पोलो-एसाऊ’ कागदपत्रे ही अभ्यासकांच्या दृष्टीने अधिक कुतुहलाची आहेत. “सिझर-पोलो’ कागदपत्रांमध्ये 1953 ते 1973 पर्यंतच्या रशिया आणि चीनमधील राजकीय नेतृत्वाची माहिती आहे; तर “एसाऊ’ कागदपत्रांमध्ये चीन-रशिया संबंधांची माहिती आहे. मात्र त्यात “सीआयए’वर ताशेरे मारण्याजोगे काही नसल्याने त्याकडे कोणी पाहिले नाही. मुख्य मुद्दा हा आहे, की ही सर्व कागदपत्रे काहीही फेरफार न करता अमेरिकेच्या सरकारने जगभरातील लोकांसाठी इंटरनेटवर मोकळा केला आहे. अगदी या कागदपत्रांवरील “फॉर सिक्रेट आयज्‌ ओन्ली’ हा शिक्काही त्यात पाहायला मिळतो. आता प्रश्‍न हा आहे, की आपल्या देशात माहितीची ही मुक्तता कधी येणार? “तुला वाटते म्हणून नव्हे; तर मी सांगतो म्हणून हे कर,’ असं सांगणारी संस्कृती आपली. स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षांमध्ये एवढे गैरव्यवहार झाले, कोणाची टाप आहे एकातरी गैरव्यवहाराच्या चौकशीचे खरे कागदपत्रे पहाण्याची? त्यामुळेच अमेरिकेचे कौतुक हेच, की स्वतःच्या दोषास्पद बाबींकडेही डोळेझाक न करता त्याला अभ्यासकांच्या नजरांसाठी मोकळं ठेवण्याची वृत्ती त्या देशात आहे.