मी एक “हॅम्लेट’

टू बी ऑर नॉट टू बी’…हा चिंरतन प्रश्‍न शेक्‍सपिअर नामक नाटककाराच्या “हॅम्लेट’ या नाटकात आहे. केवळ या नाटकात आहे, असे नव्हे तर नाटकाचा नायक असलेला डेन्मार्कचा राजकुमार हॅम्लेट याच्याच तोंडी तो घातला आहे. स्वतःच्या अस्तित्वाबाबत ही प्रश्‍न पडण्याची सवय सर्वच मोठ्या माणसांना असते. तशी ती मलाही आहे. त्यामुळेच मलाही प्रश्‍न पडला आहे. पण तो जगावं की नाही, असा प्रश्‍न नाही. मी अशा किरकोळ प्रश्‍नांचा विचार करत नसतो. मला पडलेला प्रश्‍न अगदी वेगळाच आहे…”अक्षरशः’ वेगळा!

लिहावं की लिहू नये…हाच तो शाश्‍वत प्रश्‍न. हा प्रश्‍न पडण्याची कारणंही आहेत. लिहिलं तर अनेकजण दुखावतील, न लिहिलं तर अनेक दुखणी जागच्या जागी राहतील.लिहिलं तर लिहावं लागंल राम गोपाल वर्माच्या “शोले’वर आणि त्याने केलेल्या या चित्रपटाच्या विटंबनावर. अमिताभ आणि धर्मेद्रचं त्यानं काही केलं असतं, तरी चाललं असतं. पण संजीवकुमारच्या भूमिकेत मोहनलालला उभा करून दोघांचेही “कार्टून’ करण्याची कला केवळ वर्माच जाणे. हात तोडलेला ठाकूर पाहण्याऐवजी आता केवळ बोटे छाटलेला “एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ पाहावा लागेल…तेही दाढीवाला. चार राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा आणि आजपर्यंत एकाही “रिमेक’मध्ये काम केलेला मोहनलाल आता राम गोपालाच्या “काल्यात’ दिसणार.

न लिहावं तर हिमेश रेशमियाची गाणी सगळीच लोक ऐकतात म्हणून मीही ऐकत असावा, अशी लोकांची समजूत व्हायची. सानुनासिक आवाजाद्वारे कानांवर अत्याचार करण्याची किमया एकेकाळी कुमार सानू या अतिलोकप्रिय गायक महाशयांकडे होती. मात्र त्यावेळी किमान मोबाईल नामे संपर्कयंत्रावर आसमंत चिरणाऱ्या आवाजात वाद्यांचा जमेल तेवढा गोंगाट करणारे गाणे वाजविण्याची सोय नव्हती. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यांवर आणि वाहनांमध्ये तरी “सायलेंस झोन’ असायचे. मात्र सानू यांना समोर दिसत असलेली मात्र त्यांचा सूर न लागलेली, “बेसूर’तेची पातळी ओलांडून “भेसूर’ते कडे झुकलेली पट्टी लावण्याचा मान रेशमिया यांच्याकडे जातो. संगीतप्रेमी भारतात रेशमिया यांच्यामुळे संगीत कसे नसावे, याचे नवे वस्तुपाठ दिले जात आहेत.

लिहिलं तर लिहावं लागंल मराठीत दररोज प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांवर आणि न खपल्यामुळे त्यांच्या पडून असलेल्या गठ्ठ्यावर. लोकांना न परवडणाऱ्या किंमतींमध्ये पुस्तकं काढायची आणि ती कोणी घेत नाही म्हणून रडत बसायचं, ही प्रकाशकांची “स्ट्रॅटेजी’ काही औरच. मजकुराच्या दर्जाकडे न पाहता केवळ प्रसिद्ध झालेल्या नावांवर विसंबून पुस्तकं काढण्यात त्यांचा हात कोण धरणार? नव्या पुस्तकांची केवळ पाच हजारांची आवृत्ती काढून, त्याचा प्रकाशन समारंभ करण्याची हातोटी केवळ मराठी प्रकाशकांकडेच कशी काय बुवा? पुस्तकांच्या जाहिरातीही पुणे-मुंबईच्या वृत्तपत्रांमध्ये छापून मराठी वाचकं पुस्तकच वाचत नाहीत, हा “अभ्यासपूर्ण’ निष्कर्ष कोण काढणार?

न लिहावं तर मराठी वृत्तवाहिन्यांच्या गमती जमती कशा कळणार कोणाला. “डोंबिवली फास्ट’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्यावर निशिकांत कामत यांची मुलाखत घेऊन, “आता मराठी सिनेमा जागतिक पातळीवर जायला हवा,’ अशी मुलाखतीची जुनी टेप लावणारा “माझा’ चॅनेल कोणी पाहिला नाही ना? हैदराबादमध्ये घडलेल्या घटनेचे चित्रण आणि बातमी थेट हिंदी भावंड वाहिनीवरून प्रक्षेपित करणारे “24 तास’ मराठीपण जपल्याचे लोकांना कसं कळणार? दिवसभर काय घडलं यापेक्षा दिवसभरात काय घडणार, हे ग्रह-ताऱ्यांच्या गणितावरून उपग्रह वाहिन्या लोकांपर्यंत किती तत्परतेने पोचवितात, हे लिहिल्याशिवाय लोकं जाणणार तरी कसं?

लिहिलं तर लिहावं लागंल भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंड दौऱ्यात मिळालेल्या यशाबद्दल आणि त्यातून निघणाऱ्या निष्कर्षाबद्दल. देशी-परदेशी प्रशिक्षकांच्या हाताखाली खेळताना धुळधाण उडवून घेणारा हा संघ विलायतेतील दमट वातावरणात दमदारपणे खेळतोय ही आनंदाचीच गोष्ट आहे. पण प्रशिक्षक नसतानाच त्याला हा सूर का गवसावा? संघाच्या यशासाठी “कोच’ नकोच, असा गुरुपाठ तर संघ देत नाही ना?

न लिहिलं तर लपून जाईल मॉलमुळे येणारी बाजार संस्कृती आणि त्यामुळे ग्राहकांना “डिमोरलाईज’ करण्याचा दुकानदारांचा हिरावणारा हक्क. मॉल आले तर ग्राहक स्वतःच माल पाहून घेईल. “किती पाहिजे,’ म्हणून पायरी चढायच्या आतच त्याला क्षुल्लक असल्याची जाणीव करून देणाऱ्यांची ती उदात्त भूमिका जगापुढे कशी येणार? मॉलमध्ये हजार-बाराशे रुपयांची नोकरी मिळते, दुकानात सामानाची पोते उचलण्यापासून पुड्या बांधण्यापर्यंत राबवून घेऊन, आठशे-नऊशे रुपयांचा पगार देण्याची सामाजिक दानत असणाऱ्यांची बाजू पुढे कशी येणार? मॉलमध्ये एकावेळेस अनेक वस्तू असतात, दुकानात केवळ एकाच कंपनीच्या वस्तू भरून ठेवून “घ्यायती तर घ्या नाही तर जा,’ असं म्हणण्याची पारंपरिक शैली कशी जपली जाणार…
असं लिहिण्यासारखंही भरपूर आहे, अन्‌ न लिहिण्यासारखंही भरपूर आहे…पण अलिकडे भावना दुखावण्याचं प्रमाण वाढल्यामुळे काय लिहावं अन्‌ काय लिहू नये, या विवंचनेत मी पडलो आहे. त्यामुळे माझा झाला आहे “हॅम्लेट’…लिहावं की लिहू नये, हा माझा संभ्रम आहे. वाचावं की वाचू नये, हा संभ्रम तुम्हाला पडू नये, हीच अपेक्षा आहे.