मी एक “हॅम्लेट’

टू बी ऑर नॉट टू बी’…हा चिंरतन प्रश्‍न शेक्‍सपिअर नामक नाटककाराच्या “हॅम्लेट’ या नाटकात आहे. केवळ या नाटकात आहे, असे नव्हे तर नाटकाचा नायक असलेला डेन्मार्कचा राजकुमार हॅम्लेट याच्याच तोंडी तो घातला आहे. स्वतःच्या अस्तित्वाबाबत ही प्रश्‍न पडण्याची सवय सर्वच मोठ्या माणसांना असते. तशी ती मलाही आहे. त्यामुळेच मलाही प्रश्‍न पडला आहे. पण तो जगावं की नाही, असा प्रश्‍न नाही. मी अशा किरकोळ प्रश्‍नांचा विचार करत नसतो. मला पडलेला प्रश्‍न अगदी वेगळाच आहे…”अक्षरशः’ वेगळा!

लिहावं की लिहू नये…हाच तो शाश्‍वत प्रश्‍न. हा प्रश्‍न पडण्याची कारणंही आहेत. लिहिलं तर अनेकजण दुखावतील, न लिहिलं तर अनेक दुखणी जागच्या जागी राहतील.लिहिलं तर लिहावं लागंल राम गोपाल वर्माच्या “शोले’वर आणि त्याने केलेल्या या चित्रपटाच्या विटंबनावर. अमिताभ आणि धर्मेद्रचं त्यानं काही केलं असतं, तरी चाललं असतं. पण संजीवकुमारच्या भूमिकेत मोहनलालला उभा करून दोघांचेही “कार्टून’ करण्याची कला केवळ वर्माच जाणे. हात तोडलेला ठाकूर पाहण्याऐवजी आता केवळ बोटे छाटलेला “एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ पाहावा लागेल…तेही दाढीवाला. चार राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा आणि आजपर्यंत एकाही “रिमेक’मध्ये काम केलेला मोहनलाल आता राम गोपालाच्या “काल्यात’ दिसणार.

न लिहावं तर हिमेश रेशमियाची गाणी सगळीच लोक ऐकतात म्हणून मीही ऐकत असावा, अशी लोकांची समजूत व्हायची. सानुनासिक आवाजाद्वारे कानांवर अत्याचार करण्याची किमया एकेकाळी कुमार सानू या अतिलोकप्रिय गायक महाशयांकडे होती. मात्र त्यावेळी किमान मोबाईल नामे संपर्कयंत्रावर आसमंत चिरणाऱ्या आवाजात वाद्यांचा जमेल तेवढा गोंगाट करणारे गाणे वाजविण्याची सोय नव्हती. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यांवर आणि वाहनांमध्ये तरी “सायलेंस झोन’ असायचे. मात्र सानू यांना समोर दिसत असलेली मात्र त्यांचा सूर न लागलेली, “बेसूर’तेची पातळी ओलांडून “भेसूर’ते कडे झुकलेली पट्टी लावण्याचा मान रेशमिया यांच्याकडे जातो. संगीतप्रेमी भारतात रेशमिया यांच्यामुळे संगीत कसे नसावे, याचे नवे वस्तुपाठ दिले जात आहेत.

लिहिलं तर लिहावं लागंल मराठीत दररोज प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांवर आणि न खपल्यामुळे त्यांच्या पडून असलेल्या गठ्ठ्यावर. लोकांना न परवडणाऱ्या किंमतींमध्ये पुस्तकं काढायची आणि ती कोणी घेत नाही म्हणून रडत बसायचं, ही प्रकाशकांची “स्ट्रॅटेजी’ काही औरच. मजकुराच्या दर्जाकडे न पाहता केवळ प्रसिद्ध झालेल्या नावांवर विसंबून पुस्तकं काढण्यात त्यांचा हात कोण धरणार? नव्या पुस्तकांची केवळ पाच हजारांची आवृत्ती काढून, त्याचा प्रकाशन समारंभ करण्याची हातोटी केवळ मराठी प्रकाशकांकडेच कशी काय बुवा? पुस्तकांच्या जाहिरातीही पुणे-मुंबईच्या वृत्तपत्रांमध्ये छापून मराठी वाचकं पुस्तकच वाचत नाहीत, हा “अभ्यासपूर्ण’ निष्कर्ष कोण काढणार?

न लिहावं तर मराठी वृत्तवाहिन्यांच्या गमती जमती कशा कळणार कोणाला. “डोंबिवली फास्ट’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्यावर निशिकांत कामत यांची मुलाखत घेऊन, “आता मराठी सिनेमा जागतिक पातळीवर जायला हवा,’ अशी मुलाखतीची जुनी टेप लावणारा “माझा’ चॅनेल कोणी पाहिला नाही ना? हैदराबादमध्ये घडलेल्या घटनेचे चित्रण आणि बातमी थेट हिंदी भावंड वाहिनीवरून प्रक्षेपित करणारे “24 तास’ मराठीपण जपल्याचे लोकांना कसं कळणार? दिवसभर काय घडलं यापेक्षा दिवसभरात काय घडणार, हे ग्रह-ताऱ्यांच्या गणितावरून उपग्रह वाहिन्या लोकांपर्यंत किती तत्परतेने पोचवितात, हे लिहिल्याशिवाय लोकं जाणणार तरी कसं?

लिहिलं तर लिहावं लागंल भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंड दौऱ्यात मिळालेल्या यशाबद्दल आणि त्यातून निघणाऱ्या निष्कर्षाबद्दल. देशी-परदेशी प्रशिक्षकांच्या हाताखाली खेळताना धुळधाण उडवून घेणारा हा संघ विलायतेतील दमट वातावरणात दमदारपणे खेळतोय ही आनंदाचीच गोष्ट आहे. पण प्रशिक्षक नसतानाच त्याला हा सूर का गवसावा? संघाच्या यशासाठी “कोच’ नकोच, असा गुरुपाठ तर संघ देत नाही ना?

न लिहिलं तर लपून जाईल मॉलमुळे येणारी बाजार संस्कृती आणि त्यामुळे ग्राहकांना “डिमोरलाईज’ करण्याचा दुकानदारांचा हिरावणारा हक्क. मॉल आले तर ग्राहक स्वतःच माल पाहून घेईल. “किती पाहिजे,’ म्हणून पायरी चढायच्या आतच त्याला क्षुल्लक असल्याची जाणीव करून देणाऱ्यांची ती उदात्त भूमिका जगापुढे कशी येणार? मॉलमध्ये हजार-बाराशे रुपयांची नोकरी मिळते, दुकानात सामानाची पोते उचलण्यापासून पुड्या बांधण्यापर्यंत राबवून घेऊन, आठशे-नऊशे रुपयांचा पगार देण्याची सामाजिक दानत असणाऱ्यांची बाजू पुढे कशी येणार? मॉलमध्ये एकावेळेस अनेक वस्तू असतात, दुकानात केवळ एकाच कंपनीच्या वस्तू भरून ठेवून “घ्यायती तर घ्या नाही तर जा,’ असं म्हणण्याची पारंपरिक शैली कशी जपली जाणार…
असं लिहिण्यासारखंही भरपूर आहे, अन्‌ न लिहिण्यासारखंही भरपूर आहे…पण अलिकडे भावना दुखावण्याचं प्रमाण वाढल्यामुळे काय लिहावं अन्‌ काय लिहू नये, या विवंचनेत मी पडलो आहे. त्यामुळे माझा झाला आहे “हॅम्लेट’…लिहावं की लिहू नये, हा माझा संभ्रम आहे. वाचावं की वाचू नये, हा संभ्रम तुम्हाला पडू नये, हीच अपेक्षा आहे.

मोरूचा तुरुंगवास…अन्‌ अज्ञातवासही

प्राथमिक सूचना ः सत्यघटनेवर आधारित

मोरू नेहमीप्रमाणे सकाळी झोपेतून उठला आणि आंघोळ करून तयार झाला. आज त्याला न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेप्रमाणे तुरुंगात जायचे होते. घरच्या लोकांनी त्याला निरोप देण्याची जय्यत तयारी केली होती. सोसायटीतलं एक उनाड कार्टं म्हणून त्याची शहरात ओळख होती. त्याच्या घरच्या लोकांना त्याचा कोण अभिमान! खासकरून सोसायटीचे सेक्रेटरी असलेले त्याचे बाबा तर त्याच्यावरून जीव ओवाळून टाकत असत. इतका की ते स्वतः बाबा असून ते मोरुलाच बाबा म्हणत. त्यामुळे पुढे दादा झाला तरी मोरूला सर्वजण मोरूबाबाच म्हणत.आजपर्यंत मोरूला कधी “आत” जावं लागलं नव्हतं. नाही म्हणायला “डिपार्टमेंट’नं एक दोनदा “राडा’ केल्याबद्दल त्याला उचललं होतं आणि रात्रभर “लॉक अप’मध्येही ठेवलं होते. त्यावेळी “मामू’ लोकांनी त्याची केलेली धुलाई त्याला अजून आठवत होती. एकदा तर त्याला पाकिटमारीबद्दल सात दिवस कस्टडीतही ठेवलं होतं. त्याच्या बाबा, आई आणि बहिणीने त्यावेळी आकाशपाताळ एक करून त्याला ठाण्याबाहेर (आणि माणसांतही) आणलं होतं. आई-बाबांची परवानगी न घेता तेव्हा महाग असलेली कॅडबरी खाण्याबद्दल आणि कॅडबरी विकत घेण्यासाठी बाबांचे पैसे चोरल्याबद्दल त्याला एक दोनदा शिक्षा झाली होती. त्याची चॉकलेटची सवय सुटण्यासाठी त्याला काही दिवस दवाखान्यातही ठेवलं होतं.

त्यानंतर काही दिवस मोरूबाबा सुधारला. शहरातल्या त्याच्यासारख्याच लोकांनी चालविलेल्या नाटकमंडळीत तो काम करत होता. त्याला कामेही मिळत गेली. त्यामुळे तो लोकप्रिय असल्याचे मानण्यात येत असे. असा हा मोरूबाबा आज तुरुंगात खडी फोडायला पहिल्यांदाच जात होता. नाटकमंडळीतले काही दोस्त आणि त्याच्या सोसायटीतील टोळीतील काही मित्र यांच्या सौजन्याने त्याने काही फटाके आणले होते. त्यातील सुतळी बॉंब, रॉकेट वगैरे त्याने बिचाऱ्याने उदार मनाने मित्रांना वाटली आणि एक पिस्तूल तेवढे स्वतःजवळ ठेवले. नेमके त्याच्या मित्रांनी उडविलेल्या फटाक्‍यांनी सोसायटीतल्याच काही लोकांना इजा झाली, काही जणांच्या घरातील पडदे जळाले. त्यांनी दुष्टपणे मोरूला त्यात गोवून न्यायालयात गोवले. न्यायालयानेही फारशी दयाबुद्धी न दाखवता त्याला तुरुंगात धाडण्याचा निर्णय दिला. तो निकाल लागता लागताच मोरूचे बाबा ही कालवश झाले.

तुरुंगाच्या मोहिमेवर निघालेल्या मोरूच्या हातावर त्याच्या बहिणीने साखर ठेवली. बाबांच्या तसविरीजवळ जाऊन त्याने तसविरीला नमस्कार केला. पोलिसांच्या गाडीतून मोरू रवाना झाला तेव्हा त्याच्या जीवलगांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. मोरूच्या जीवनातील इथपर्यंतच्या घटना कायद्याच्या आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने सामान्य आहेत. त्याने गुन्हा केला आणि त्याची शिक्षा त्याला व्हायलाच हवी, याबाबत सर्वांचे एकमत होते. मात्र खरी मजा पुढेच आहे. मोरूला तुरुंगात ठेवले मात्र त्याला कोणत्या तुरुंगात ठेवले, त्याने दरवाजातून कोणता पाय आधी पुढे ठेवला याची कोणीही बातमी दिली नाही. जाताना तुरुंगाच्या रखवालदाराला त्याने बिडी मागितली की नाही, याची चर्चाच झाली नाही. तुरुंगात मोरूला त्याच्यासारख्याच एका सच्छील चारित्र्याच्या सज्जन पुरुषाच्या संगतीत ठेवले होते. त्याबद्दल कोणीही चकार शब्द काढला नाही. तुरुंगात जाताना मोरूने आपल्या चाहत्यांकडे (आणि त्याला पैसे पुरविणाऱ्यांकडे) पाहून हातही हलविला नाही. (त्यामुळे त्यांना हात हलवत परत यावे लागले.) मोरूला मुख्य तुरुंगातून केवळ महनीय व्यक्तींना ठेवण्यात येणाऱ्या “पुण्यनगरीत’ पाठविण्यात आले. त्यावेळी त्याच्यामागे शिकारी कुत्र्यांप्रमाणे एकही वार्ताहर, माध्यम प्रतिनिधी किंवा कॅमेरामन गेला नाही. मोरू ज्या किरकोळ कॅटॅगिरीतला गुन्हेगार होता, त्या कॅटॅगिरीच्या मानाने ही वस्तुस्थिती भयंकर होती.

पुण्यक्षेत्रातल्या तुरुंगात आल्यानंतरही मोरूकडे होणारी अक्षम्य हेळसांड चालूच होती. इथे आल्यानंतर त्याने किती वाजून किती मिनिटांनी कोठडीचे दार उघडले, फरशीवर बसताना त्याच्या तोंडातून कण्हण्याचा आवाज कसा येत होता, याची दखल कोणीही घेत नव्हतं. त्याने काय खाल्लं, पोळीचे किती तुकडे करून त्याने किती घास खाल्ले याचीही गणनाच कोणीच करत नव्हतं. भावी पिढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी ही ऐतिहासिक माहिती देण्याची तसदी घ्यायला कोणीही तयार नव्हतं. हीच ती भारतीय लोकांची मागास मानसिकता.

आता मोरूला याच तुरुंगात काही दिवस काढायचेत. पण इतके दिवस रात्रीच्या रात्री नाटकं करून त्याच्या प्रकृतीवर परिणाम झालेला अन्‌ त्यात हा तुरुंगवास, त्यामुळे त्याचा रक्तदाब वाढला. याची कोणीतरी नोंद घ्यायची? तर तेही नाही. मोरूला तुरुंगातल्याच डॉक्‍टरकडून उपचार चालू आहेत. हे वृत्त बाहेरच्या लोकांना समजायला नको? आता मोरूकडे होणाऱ्या या अमानवी दुर्लक्षामुळे त्याच्या नाजूक जिवाला किती यातना होतायत, याची तुम्ही कल्पना करू शकता. तरीही तुम्हाला म्हणून सांगतो, तो आल्यावर याचा जाब विचारणार नाही. कारण आता तो तुरुंगात महात्मा गांधींच्या साहित्याचे परिविलोकन करतोय. हेही लोकांना कळायलाच हवं. त्याशिवाय त्याचा गुन्हा किती “मामू’ली होता, हे स्पष्ट होणार नाही. तो परत येणार. आतापर्यंत त्याने अनेक खोड्या केल्या. शाळेत, कॉलेजमध्ये (होता तितके दिवस), सोसायटीत…प्रत्येक खोडीनंतर त्याने मनापासून सर्वांची माफी मागितली आणि “जादू की झप्पी’ देऊन सर्वांना खूषही केले. आताही तो असेच करणार आहे. फक्त त्याच्याकडे अगदी ढुंकूनही न पाहणाऱ्या या लोकांकडे पाहून तो म्हणेल, “”हे राम!”

दिग्दर्शनाचा ‘नायक’

सेट मॅक्स वाहिनीच्या कृपेने अनिल कपूरचा नायक हा चित्रपट अलिकडे दर दोन दिवसांनी पहायला मिळत आहे. एका साध्या टीव्ही पत्रकाराचा मुख्यमंत्रीपदापर्यंत होणारा प्रवास या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. गेल्या महिन्यात प्रत्येक वृत्तवाहिनी आणि वर्तमानपत्राच्या रकान्यांची शोभा वाढविणाऱया ‘शिवाजी-द बॉस’ या चित्रपटाचा दिग्दर्शक एस. शंकर हाच या चित्रपटाचा दिग्दर्शक. तमिळमधील ‘मुदलवन’ आणि तेलुगुमधील ‘ओक्के ओक्कुडु’ या चित्रपटांचा हा रिमेक. मूळ चित्रपटात अर्जून आणि मनिषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका आहेत. शंकर या दिग्दर्शकाच्या चित्रपटांची काही वैशिष्ट्ये आहेत.

एक, त्याच्या चित्रपटांमध्ये सामाजिक संदेश काही तरी असतोच. त्याच्या पहिल्या ‘जंटलमन’ चित्रपटात शिक्षणाचे बाजारीकरण आणि त्यामुळे गरिब विद्यार्थ्यांची होणारी वंचना त्याने दर्शविली होती. या चित्रपटाचा हिंदीतील दुर्दैवी रिमेक पाहून (त्याचा नायक चिरंजीवी असलातरी) मूळ चित्रपटाची कल्पना येणार नाही. हिंदुस्तानी (तमिळमधील इंदियन) या चित्रपटात देशातील भ्रष्टाचाराच्या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला होता. नायक (मुदलवन) मध्ये सडलेल्या सरकारी यंत्रणेवर भाष्य केले आहे. गेल्या वर्षीच्या ‘अन्नियन’ (हिंदीतील अपरिचित) मध्ये त्याने नागरिकांचा छोट्या मोठ्या गुन्ह्यांकडे, कायदेभंगाकडे गांभीर्याने न पाहण्याकडे नजर टाकली होती. ‘चांगले सरकार हवे म्हणतो, आधी चांगले
नागरिक बना,’ हा त्याने त्या चित्रपटात दिलेला संदेश होता. आता ‘शिवाजी’त तर त्याने काळा पैसा, हवाला, शिक्षण संस्थांमधील नफेखोरी अशा अनेक मुद्द्यांना हात घातला आहे.
दोन, शंकरच्या चित्रपटात कॉम्प्युटर ग्राफिक्सचा मोठा वापर केलेला असतो. ‘जंटलमन’मध्ये हा वापर केवळ ‘चिक बुक रयिले’ या गाण्यापुरता होता. त्यानंतर कादलन (हम से है मुकाबला) या चित्रपटात त्याने ग्राफिक्सचा सडाच टाकला. प्रभु देवाची नृत्ये, ए. आर. रहमानचे संगीत यांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेल्या या चित्रपटातील सात पैकी तीन गाण्यांमध्ये ग्राफिक्सचा वापर केला होता. त्यातील ‘मुक्काला मुकाबला’मध्ये तर थेट माईकेल जॅक्सनच्या ‘डेंजरस’ या गाण्याच्या धर्तीवर ग्राफिक्स वापरल्या होत्या.
त्यानंतरच्या ‘जीन्स’मध्ये त्याने ग्राफिक्सच्या सहायाने स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण करण्याची अफलातून शक्कल लढविली होती. ‘हिंदुस्तानी’त त्याने ग्राफिक्सच्या माध्यमातून कमल हासन याला सुभाषचंद्र बोस यांच्याशी हस्तांदोलन करताना दाखविला होता. ‘अन्नियन’मध्ये कम्प्युटर आणि वेबसाईट हा कथेचाच भाग दाखविल्याने त्यातही ग्राफिक्स होतेच. त्यात हाणामारीची दृश्ये ‘मॅट्रिक्स’च्या धर्तीवर दाखविली आहेत. ती प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय त्यातील गंमत कळणार नाही. ग्राफिक्स आणि कॉम्प्युटर हा ‘शिवाजी’तलाही एक महत्त्वाचा भाग आहेच.
तीन, चित्रपटांची व्यावसायिकता. मुख्यतः सामाजिक मुद्द्यांवर आधारलेले असले तरी शंकरच्या चित्रपटात प्रचारकीपणा अजिबात नसतो. किंबहुना त्याचा चित्रपट पाहताना अमुक मुद्दा यात ठळक आहे, हे अर्धा-अधिक चित्रपट पाहिल्याशिवाय कळत नाही. आपल्याला सवय असलेल्या व्यावसायिक चित्रपटांच्या मार्गानेच त्याचा चित्रपट धावत असतो. अचानक एखादे वळण येते आणि मग आपल्याला जाणवते, की अमुक बाब शंकरला जाणवून द्यायची आहे. ‘जंटलमन’ पाहताना ही एका चोराची प्रेमकथा असल्याचे वाटत राहते. ‘हिंदुस्तानी’ ही चंद्रू आणि त्याच्या दोन मैत्रिणींची कथा असल्याचा आधी समज होतो, तर ‘अन्नियन’मध्ये अंबी आणि रेमोच्याच द्वंद्वात प्रेक्षक पडलेला असतो. त्यामुळे शंकरचा चित्रपट मनोरंजनाच्या आघाडीवर कधीही फसत नाही. सादरीकरणावर एवढी हुकुमत असणारा दुसरा दिग्दर्शक सध्याच्या घडीला तरी दुर्मिळ आहे. चार, संगीत. शंकरच्या चित्रपटातील संगीताने रसिकांना मोहिनी घातली नाही, असं क्वचितच झालंय. ‘रोजा’द्वारे संगीत क्षेत्रात उपस्थिती नोंदविली असली तरी ए. आर. रहमानला खरी ऒळख शंकरच्या चित्रपटांनीच दिली (विशेषतः उत्तर भारतात). ‘जंटलमन’ प्रदर्शित झाला तेव्हा ‘एमटीव्ही’ भारतात नुकताच आला होता. त्याद्वारे हे गाणे हिंदी भाषक राज्यांतही हिट झाले. ‘राजा बाबू’ या चित्रपटात या गाण्याची नक्क्ल करण्यात आली. मात्र त्यात गंमत नव्हती. ‘जंटलमन’च्या रिमेकमध्येही हे गाणे वापरण्यात आले. मात्र त्यातही चिरंजीवीचे नृत्यही फिकेच पडले. मूळ चित्रपटात प्रभु देवाचे नृत्य हे चित्रपटाइतकेच प्रेक्षकांच्या आकर्षणाचा भाग होते. (चित्रपटाच्या पडद्यावरील प्रभु देवाचे हे पदार्पण.) याच चित्रपटातील ‘वट्ट वट्ट पुचक्कु’ (रूप सुहाना लगता है) आणि ‘उसलमपट्टी पेणकुट्टी’ (आशिकी में ह्द से) याही गाण्यांच्या हिंदी आवृत्तींनी मोठी लोकप्रियता मिळविली. बाकीची तीन गाणी तमिळमध्येही आजही हिट आहेत. त्यानंतरच्या ‘हम से है मुकाबला,’ ‘जीन्स,’ ‘हिंदुस्तानी,’ ‘नायक’ या हिंदी प्रेक्षकांना ऒळखीच्या
चित्रपटांतील संगीतानेही त्यांचा काळ गाजविला आहे. ‘बॉयज’ची गाणी तमिळ आणि तेलुगुत अत्यंत लोकप्रिय झाली. ‘अन्नियन’चे संगीत हरिश जयराजचे होते. तरीही त्यावर शंकरची छाप होतीच. ‘शिवाजी’ला पुन्हा रहमानचे संगीत आहे. त्यात त्याची पूर्वीची जादू आहेच.
केवळ संगीत आणि गाणीच नव्हे तर त्यांचे चित्रीकरण हीही शंकरच्या चित्रपटांची खासियत आहे. भव्य, देखणी आणि काहीतरी वेगळ्या कल्पना असलेली गाणी पहावीत तर ती शंकरच्याच चित्रपटात. मग ती जगातील सात आश्चर्यांच्या पार्श्वभूमीवर चित्रीत केलेले ‘पूवुक्कुळ अतिशयम’ (जीन्स) असो, की तंजावरच्या प्रसिद्ध बाहुल्यांचे रूप दिलेल्या व्यक्तींसह चित्रीत केलेले ‘अऴगान राक्षसीये,’ असो! ‘अन्नियन’मध्ये ‘अंडक्काका कोंडक्कारी’ हे गाणे आहे. या गाण्यात केवळ दोन ते तीन मिनिटांच्या एका तुकड्यासाठी
तेनकासी या गावातील ५०० घरांना वेगवेगळ्या रंगांनी रंगविले होते. ‘हिंदुस्तानी’त त्याने ऑस्ट्रेलिया, तर ‘शिवाजी’त स्पेनमध्ये गाण्यांचे चित्रीकरण केले. ‘नायक’मधील ‘सैया पडू पय्या,’ हे गाणे आठवते. त्यात त्याने कॉम्प्युटर ग्राफिक्सचा हातचे काही राखून न ठेवता उपयोग केला आहे. ‘कादलन’मधील ‘उर्वशी उर्वशी’साठी त्याने एक खास बस तयार केली होती.
शंकरच्या चित्रपटातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ठळक न जाणवणारी मात्र अगदी अविभाज्य असलेली भारतीय पुराण-इतिहासांची उपस्थिती. दक्षिण भारतातील सर्वच दिग्दर्शकांप्रमाणे शंकरच्या चित्रपटांतही भारतीय संस्कृतीला अनुसरूनच कथा असतात. ‘कादलन’मध्ये भरतनाट्यम आणि अन्य नृत्यकलांचे दर्शन आहे, तर ‘हिंदुस्तानी’त केरळम्धील ….या कलेची माहिती येते. तेही अगदी कथेच्या ऒघात! ‘अन्नियन’मध्ये तर तमिळनाडुतील अय्यर आणि अय्यंगार ब्राम्हण, त्यांचे ज्ञानाराधन आदींची माहिती अगदी सांगोपांग येते. याच चित्रपटात ‘गरुड पुराणा’चा अगदी खुबीने केलेला उपयोग प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळायचा नाही. ‘शिवाजी’त ‘शिवाजीशी लग्न केल्यास त्याचा मृत्यु होईल, हे भविष्य बदलणे शक्य नाही,’ असं नायिकेला ज्योतिषाने सांगणे आणि अगदी वेगळ्या प्रकारे शिवाजीची मृत्यू होणे, ही कथेतली गंमत त्याशिवाय कळायची नाही. एकामागोमाग आठ हिट चित्रपट देणाऱ्या शंकरने स्वतःची एक शैली विकसित केली आहे. त्याच्या जंटलमन वगळता अन्य कृती (बॉयज) सुदैवाने हिंदीत डब झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याला यश मिळाले आहे. ‘अन्नियन’ हा फ्रेंच भाषेत ड्ब झालेला आतापर्यंतचा एकमेव भारतीय चित्रपट आहे. शिवाजी एकीकडे विक्रमामागोमाग विक्रम करत असताना आता हिंदीतही येऊ घालत आहे. आता शंकर शाहरूख खान सोबत ‘रोबोट’ नावाचा चित्रपट काढणार आहे. असो. मात्र माझ्यासारख्याला त्याच्या तमिळ चित्रपटाचीच अधिक प्रतिक्षा असणार आहे.