भागो…मोहन प्यारे!

प्रिय मोहनलाल,
मल्याळम चित्रसृष्टीतील सुपरस्टार आणि प्रियदर्शनच्या भाषेत भारतातला सर्वांत नैसर्गिक अभिनय करणारा अभिनेता, अशी तुझी आतापर्यंत ख्याती ऐकून होतो. तू तीन वेळचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अशीही त्याला एक किनार होती. मात्र मुंबईच्या टोळीयुद्धावर स्वतःची उपजीविका चालविणारे राम गोपाल वर्मा यांच्या “शोले’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये तू काम करणार, ही घोषणा झाली आणि पोटात गोळा आला. ही गोष्ट माहीत झाल्यापासूनच तुझ्याविषयी सहानुभूती वाटायला लागली.

याआधी रामूच्याच “कंपनी’ नामे सिनेमात अधूनमधून बंदुकीच्या गोळ्या सुटत नाहीत, अशा तुकड्यांमध्ये तू झळकला होतास. भलेही ती भूमिका तू (नेहमी च्याच) सहजतेने जिवंत केलीस. पण यावेळी प्रकरण वेगळे होते.
तुझ्या कारकिर्दीत आजवर एकाही रिमेकमध्ये तू काम केलेले नाही, म्हणजे आता नव्हते म्हणावे लागेल. “किलुक्कम,’ “काला पानी’, “मुकुंदेट्टा सुमित्रा विळुक्कुन्नु,’ किंवा “तलवाट्टम,’ “उदयोन’ अशा चित्रपटांमध्ये एकाहून एक सरस भूमिका करणारा तू, तुझ्यावर कोणता सूड घेण्यासाठी रामूने तुला “बळीचा ठाकूर’ केले काय माहीत? अन्‌ तुलाही कोणती दुर्बुद्धी सुचली काय माहीत, तूही ती भूमिका स्वीकारली. ओणमच्या निमित्ताने “एशियानेट’वर तुझी मुलाखत चालू होती. हिंदी चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग असल्याने, त्यातून अधिक “रिस्पॉंस’ मिळत असल्याचे तू त्या मुलाखतीत सांगितले. अशा पडेल चित्रपटांमध्ये फडतूस भूमिका केल्यावर कोणता चांगला प्रेक्षक तुला अनुकूल होणार आहे, हे स्वामी अय्यप्पाच जाणो!

अरे, ती ठाकूरची भूमिका एव्हढी सोपी नव्हतीच. मुळात तू संजीवकुमारच्या तोडीस तोड अभिनय केलाही असतास, मात्र उत्तरेतील “जाणकार’ प्रेक्षकांचे त्याने समाधान झाले असते का? न्यू जर्सी किंवा टेक्‍सासच्या “ऍसेंट’मध्ये बोलणारे हिरो आम्हाला चालतात, पण आपल्याच देशातील मराठी किंवा दक्षिणी ढंगात हिंदी बोललेले चालत नाही आम्हाला. त्यामुळे तू कधीही ठाकूर होऊ शकला नसतास, याबद्दल आमच्या मनात शंका नव्हती.

त्यानंतर रामूने कधीतरी “राम गोपाल वर्मा के शोले’ नावाच्या चित्रपटाचा मुहूर्त केला. त्यावेळी अमिताभ बच्चन याच्या घेतलेल्या पहिल्या दृश्‍याचे छायाचित्र पाहिल्यावरच या “प्रोजेक्‍ट’मध्ये रामू हात पोळून घेणार हे पक्के झाले होते. त्यानंतर चित्रपटाचे नाव “आग’ करण्यात आले आणि या आगीची झळ सर्वांनाच पोचणार, याची खूणगाठ पटली. अमिताभचं काही नाही, तो अशा कित्येक आगींचे रिंगण त्याने पार केले आहे. आपण काय करत आहोत, याचं भान न ठेवता, केवळ कॅमेऱ्यासमोर येण्याचे पैसे घेऊन “डाबर अनारदाना’ पासून “रिड अँड टेलर’पर्यंत; मुलायमसिंहांच्या प्रचारसभांपासून “आयफा ऍवॉर्ड’ समारंभापर्यंत, कुठलाही प्रसंग अथवा जाहिरातची कहाणी “साठा सुफळ’ करण्यात त्याची हयात गेली. तुझं काय?

हिंदी (अन्‌ मराठीही, ते फारसे वेगळे काढणे शक्‍य नाही ) प्रेक्षकांना तुझे नाव आणि क्षमता माहितीही नाही. आता प्रियदर्शनचे चित्रपट पाहून लोकांची हसून हसून पुरेवाट होते. त्यांना काय माहीत, एकेकाळच्या तुझ्याच चित्रपटांचे हे अधिक चकचकीत रिमेकस्‌ आहेत ते? तू केलेल्या करामतीच आज अक्षयकुमार, सुनील शेट्टी आणि प्रियदर्शन कॅंपची अन्य मंडळी करतात व दुनियाभरातली तारीफ मिळवितात. तू तरी इकडच्या प्रेक्षकांपर्यंत येताना काळजी घ्यायला हवी. एकेकाळी रजनीकांतनेही मोठ्या एक्‍स्पोजरसाठी हिंदीत बाष्कळ भूमिका केल्या. त्यानंतर त्याने इथला नाद सोडला. आज तो स्वतःच्या मनाप्रमाणे काम करतो आणि इकडच्या लोकांना त्याच्या तमिळ चित्रपटाचीही दखल घ्यावी लागते.

तुझं काम अधिक अवघड करून ठेवण्यास रामू समर्थ आहेच. त्याने “शोले’चा खून, शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार एकाच वेळी करण्याची अद्‌भूत कामगिरी केलीच आहे. त्यात तुझ्यासारख्या एका चांगल्या अभिनेत्याची झालेली गोची आणि मुखभंग आमच्यासारख्यांना वेदना देतो.

त्यामुळे, आता तुला एकच सांगणे आहे…

अलम्‌ दुनियेला तू माहित झाला नाहीस, तरी चालेल. मल्याळममध्ये मनासार ख्या भूमिका कर…यशस्वी हो..अन्‌ चुकूनही मुंबईला येवू नकोस…
भागो, मोहन प्यारे…
तुझ्या अनेक प्रेक्षकांपैकी एक