युरेका…युरेका! असू दे इंडिया!

युरेका…युरेका! फॉर्म्युला सापडला…! यशाचा हमखास फॉर्म्युला मिळाला आहे. आता या देशात कुठल्याही क्षेत्रात हमखास काही कामगिरी करणे बिल्कुल अशक्‍य नाही. भरघोस काही करायचं असलं, की फक्त एकच करायचं…चित्रपट काढायचा! सत्यघटनेवर असला तर दुधात साखर. मात्र नसला तरी बिघडत नाही. एक स्टार घ्यायचा, बाकी “चांदण्या’ घ्यायच्या…तो रिलीज करायचा आणि घ्या…आपल्या पदरात प्रत्यक्ष घबाड पडणारच!

आशिया चषक हॉकी स्पर्धेत कोरियाला हरवून भारताने विजय मिळविला. त्यामागे संघाला खरी प्रेरणा प्रशिक्षक किंवा खेळाडूची होती का? तुमची जीभ रेटते कशी हो म्हणायला…प्रशिक्षक काय यापूर्वी घसा खरवडून शिकवत नव्हते? खेळाडू त्यांच्या हॉकीचे पाणी मैदानावर दाखवत नव्हते? होते…मात्र “चक दे इंडिया’ आला आणि या खेळाडूंनी हम भी कुछ कम नहीं, हे प्रत्यक्ष दाखवून देण्याची संधी साधली. त्यामुळे आता भारत मार खात असलेल्या अन्य क्षेत्रांत (अन्‌ त्यांची जंत्री केवढी मोठी आहे!) हेच सूत्र वापरून देशाला प्रगतिपथावर नेणे शक्‍य नाही का?
आता हेच बघा ना! अणु कराराच्या मुद्द्यावरून सरकार आणि डाव्यांची केवढी रस्सीखेच चालू आहे? तडजोडी, वाटाघाटी आणि चर्चा करता-करता अनेक युवा कम्युनिस्ट नेते अकाली प्रौढ आणि अकाली वृद्ध होताहेत. त्यांच्यासाठी एखादा चित्रपट काढता येईल. एक नेता परदेशात करार करायला जातो. त्याच्यावर देशात प्रचंड टीका होते. मात्र तो नेता स्तब्ध असतो. (गंभीर किंवा खंबीर नव्हे!) काही दिवसांनी भारतावर शत्रू आक्रमण करत येतो. त्यावेळी आपला नेता शत्रूला कराराचे बाड फेकून मारतो. शत्रू पळून जातो…अन्‌ भारतात करारासाठी देशभक्तीची लाट उसळते…पार्श्‍वभूमीवर गाणं वाजतंय…”साईन कर इंडिया!’ असा एखादा सिनेमा काढायला हवा. त्यामुळे गेले काही दिवस कुंद झालेले राजकीय वातावरण झटक्‍यात मोकळे होईल नाही…?

जे राजकारणात तेच साहित्याच्या बाबतीतही. एक प्रसिद्ध लेखक गेले काही दिवस पडेल कादंबऱ्या लिहित असल्यामुळे टीकेचा धनी झालाय. त्याला प्रकाशकांनीही आता वाळीत टाकलंय. तितक्‍यात या लेखकाला भेटण्यासाठी काही तरुण मुली येतात. त्या लेखकाला नवीन काही तरी लिहिण्याची गळ घालतात. लेखक महाशयही त्या प्रेमळ विनंतीला मान देतात आणि एक नवीन महाकादंबरी लिहितात. पुढे त्याच कादंबरीला नोबेल पारितोषिक मिळते. चित्रपट संपताना पार्श्‍वभूमीवर गाणं वाजतं…”लिहू दे इंडिया..लिहू दे!’
अशा रीतीने विविध क्षेत्रांमध्ये नवीन काही घडामोड घडवून आणण्यासाठी आता हे हुकमी हत्यार हातात आले आहे. त्यासाठी आपण “चक दे इंडिया’ आणि त्यांच्या “टीम’लाच धन्यवाद द्यायला नको का?