गणेश‘खाद्य’उत्सव

णेशोत्सव म्हणजे (साऊंडसिस्टिमवाल्यांच्या) उत्साहाचा उत्सव! गणेशोत्सव म्हणजे चैतन्याचा (दुकानदारांच्या…यात शॉपपासून मंदिरांपर्यंत सर्व आले) काळ. गणेशोत्सव म्हणजे मांगल्याची पर्वणी (दहा दिवसांत दोन सुट्या…शिवाय शनिवार, रविवारे वेगळे…याहू!) अशा या काळात पोट आणि जीभ या दोन्ही अवयवांना सुस्थितीत ठेवण्यासाठी तसेच आनंद द्विगुणित ठेवण्यासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ करण्यात येतात. मात्र आहे त्याच पदार्थांची पारंपरिक चव घेण्यात काय “चीज’ नाही. त्यासाठी उत्सवाला येणाऱ्या आधुनिक स्वरूपाप्रमाणे काही पदार्थांची वेगळी मांडणी करावी लागणार आहे. अशाच काही “रिमिक्‍स’ पदार्थांची ही वेगळी झलक.
  • अंगाची कडबोळी

हा खास पुण्यासाठी तयार करण्यात येणारा पदार्थ. इतर शहरात लोकांना हा पदार्थ “रुततो,’ पुणेकरांना मात्र हा पदार्थ जरा जास्तच रुचतो. गणेशोत्सवाच्या काळात पुण्याच्या गल्लीबोळांमधून खास या पदार्थाचे अनेक प्रात्यक्षिके चालू असतात. खास करून रात्रीनंतर हा पदार्थ अधिक “आस्वाद्य’ असल्याची “दंतकथा’ आहे. गणेशोत्सवाशी या पदार्थाचा तसा “उत्सवी’ संबंध असला, तरी वर्षभर रस्त्यावर या ना त्या प्रकारे हा पदार्थ उपलब्ध असल्याचा फायदा या शहरातील लोकांना मिळतो.

हा पदार्थ तसा खेडेगावात दुर्मिळ. गर्दीच्या वेळेत आणि गर्दीच्या संगतीतच याची खुमारी वाढते. अन्य ठिकाणीही हा पदार्थ करण्याचे प्रयत्न झाले असले, तरी पुण्यनगरीतच हा पदार्थ खऱ्या अर्थाने खुलतो. त्यासाठी पुण्याची खास भौगोलिक रचना कारणीभूत आहे. या पदार्थामुळे शरीर अगदी लवचिक होते, असे म्हणतात.अरुंद गल्लीबोळ, बेशिस्त वाहनचालक, हेकेखोर फेरीवाले असे अनेक प्रकारचे वाणसामान या पदार्थासाठी लागते.

  • कानाची शंकरपाळी
हाही तसा मूळचा पुण्याचाच, मात्र हळूहळू “अख्ख्या’ महाराष्ट्रात “फेमस’ होत असलेला पदार्थ. शंकरपाळ्याचं जसं वैशिष्ठ्य हे, की ते कितीही दिवस पुरवून खाता येतात, त्याचप्रमाणे हाही पदार्थ! अगदी तीस तीस वर्षांची जुनीच गाणी वाजवून वाजवून या पदार्थाला “साग्रसंगीत’ स्वरूप देता येते. प्रत्येक गणेश मंडळांच्या अध्यक्षाच्या मर्जीनुसार या पदार्थाची चवही बदलते. त्यामुळे कॉलनी-कॉलनी नुसार हा पदार्थ वेगळा लागतो. अलीकडे पुण्यात दिवसभर “इटस हॉट’ करत दिवस व रात्रभर, अन्‌ तेही बारा महिने याच्या अनाहूत विक्रीची व्यवस्था सुरू असते. महाराष्ट्राच्या अन्य शहरातही तो पदार्थ पोचविण्याचे प्रयत्न चालू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कानाच्या पाळ्या गरम होतात, असा अनुभव आहे.
शंकरपाळे हे जसे सपकपासून गोडपर्यंत सर्व चवींमध्ये “ऍडजस्ट’ होऊ शकतात, तसे हा पदार्थही कुठल्याही म्हणजे फिल्मी, पॉप (कॉंटिनेंटल), रिमिक्‍स (ए भाऊ..ते ब्राझील लाव रे जरा!!), पंजाबी (दलेर लाव दलेर!)अशा विविध पद्धतीने मिळू शकतो. या पदार्थाची रेसिपीही तशी सोपी आहे. कुठल्याही कंपनीचा थोडासा “डल’ झालेला “डेक’ कार्यकर्त्याच्या घरून आणायचा. त्यात “कॅसेट’ टाकून तारस्वरात लावायची आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे पाहून फिदीफिदी हसत बसायचं. नंतर दोन “तार सुटल्या’ की झाला “कानाच्या शंकरपाळी’ तयार.

  • गाण्यांचा म्हैसूरपाक
हा खास विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी होणार पदार्थ. अलीकडे नवरात्रात “तोरण’ नावाच्या कार्यक्रमामुळे त्याचा पुनःप्रत्यय येत असतो. म्हैसूरपाक जसा जुना झाल्यावर खाल्यास मजा येते, तसंच या पदार्थाचेही असते, असे जाणकार सांगतात. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक अशा “ओ की ठो’ न कळणाऱ्या भाषेतील कोणत्याही एका गाण्याचे दळण घालायचे, त्याला फक्त ठेक्‍याच्या आचेवर परतायचं की झाला गाण्यांचा म्हैसूरपाक तयार. याचा “बार’ भरल्यानंतर ते सहन झालं नाही, तर काहीजण पेटके आल्यासारखे हात-पाय झाडतात असं काही वरिष्ठांचं म्हणणं आहे. मात्र ज्यांनी एकदा का या पदार्थाची चव घेतली, ते पुन्हा दुसऱ्या पदार्थांकडे वळत नाहीत, असं या पदार्थांची विक्री करणारे सांगतात.
या पदार्थाचं वैशिष्ठ्य असं, की याला गोड, तिखट, कडू अशी कोणतीही चव असण्याचे कारण नसते. खाण्याऱ्यांचाही त्यासाठी काही आग्रह नसतो. हा पदार्थ कशाचा केलेला असतो, याच्याशीही अनेकांना देणे-घेणे नसते. तो विंध्याचलाच्या खालच्या प्रदेशातला असावा आणि फक्त तोंडात टाकला की “किक्‌’ बसली पाहिजे, एव्हढीच माफक अपेक्षा खाण्याऱ्यांची असते. या पदार्थाच्या धर्तीवर काही जिन्नस पाडण्याचे प्रयोग महाराष्ट्र देशातही होत आहेत. मात्र अद्याप तरी त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही, एव्हढे खरे.

  • आराशींचे अनारसे
पुण्यात सुमारे सत्तर-पंचाहत्तर वर्षांपूर्वी जन्माला आलेला आणि महाराष्ट्रात लोणच्याप्रमाणे मुरलेला हा अत्यंत ज्वलज्जहाल पदार्थ. सुग्रास अन्नपदार्थांनी भरलेल्या ताटात चटणीचे जे स्थान, तेच आरास आणि सजावटींचे गणेशोत्सवाच्या “मेनू’त स्थान. थोडक्‍यात म्हणजे अन्न पदार्थांऐवजी सर्वाधिक खपाचा जिन्नस हाच. गणेशोत्सवाचा भटारखाना “मॅनेज’ करणाऱ्या सर्व मंडळांना याच पदार्थावर ध्यान द्यावे लागते. पंचतारांकित हॉटेल्समध्ये ज्याप्रमाणे अधूनमधून “एथनिक फूड फेस्टिव्हल’ असतो, त्याप्रमाणे अपार लोकप्रिय असलेल्या गणेश मंडळांना दरवर्षी विविध भागांतील मंदिरे उभा करावी लागतात, इमारती खड्या कराव्या लागतात. त्याशिवाय या पदार्थाची भट्टी जमत नाही. लोकल टेस्ट येत नाही.

या भटारखान्यांचा धंदा “आराशींचे अनारसे’ नामक पदार्थावर अवलंबून असतो. मात्र या पदार्थाची रेसिपी एव्हढी क्‍लिष्ट आणि महागडी आहे, की त्या भागातील लोकांना आराशीचे अनारसे म्हणजे त्यांच्या राशीला आलेला मंगळच वाटतो. ते काहीही असले तरी आराशींचे अनारसे नामक पदार्थ जमला, तर गणेशोत्सवाच्या मेजवानीला एक वेगळीच रंगत चढते हे नक्की!

  • शिस्तीचे खोबरे

अस्सल लोकांचा पदार्थ. हा पदार्थ केवळ भारतासारख्या लोकशाही देशामध्येच जन्म घेऊ शकतो. कोणताही ठराविक घटक पदार्थ नसलेला, करण्याची पद्धत नसलेला असा हा स्वयंभू पदार्थ आहे. शहरी वातावरणात याची चव जास्त रेंगाळते. चार पादचारी, दोन दुचाकीचालक, एक कार, एक पीएमटी (मुंबई वगळता अन्य शहरांत स्थानिक बसेस चालतील, मुंबईत हा पदार्थ क्वचितच मिळतो) या सर्वांचे एक वाटण करायचे. त्याला बंद ट्रॅफिक सिग्नलच्या मंद आचेवर काही वेळ ठेवावे. त्यात कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये वाद झाला, की कुठल्याही रस्त्यावर अगदी “इन्स्टंटातल्या इन्स्टंट’ फूडपेक्षाही तडकाफडकी असा हा पदार्थ तयार होतो. सायंकाळी करायचा झाल्यास, “आराशींचे अनारसे’ या पदार्थासह तयार होतो. शिवाय भारनियमन, दंगल, मोर्चे अशा प्रसंगीही हा पदार्थ तयार होऊ शकतो. त्यादृष्टीने सर्वात सोपा! थंड हवामान या पदार्थाला अजिबात मानवत नाही, त्याचप्रमाणे खाणाराही थंड डोक्‍याचा असून चालत नाही.

  • देणगीचे मोदक

जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी…कोणत्याही स्थळी न चुकता “दर्शन’ देणारा हा पदार्थ. गणेशाला मोदक जरा जास्तच आवडत असल्याने तर गणेशोत्सवात या पदार्थाला काहीसा जास्तच वाव मिळतो. बहुतांश ठिकाणी हा गणेश मंडपातच असतो, मात्र गणपतीच्या आधीच तो नजरेला पडतो. हा स्वभावाने काहीसा “सामिष’ पदार्थ असल्याने एक फार मोठा वर्ग या पदार्थापासून हात राखूनच असतो. याचा एक विशेष असा, की खाणारा आणि खाऊ घालणारा यांतील भेदच हा पदार्थ मिटवून टाकतो.

या पदार्थाला काही चवच नसून, चवीचा केवळ आभास आहे, असं सांगणार एक वर्ग आहे. याउलट जगात खाण्यासारखा असा हा एकच पदार्थ असून, बाकी केवळ “तोंडी लावण्या’साठी आहे, असं मानून चालणारा एक वर्ग आहे. हे दोन्ही वर्ग गणेशोत्सवात एकत्र येतात, त्यामुळे या दहा दिवसांत हा पदार्थ विशेषत्वाने खपतो. बाजाराच्या नियमानुसार ज्याचं दुकान अधिक चकचकीत, त्याच्याकडे हा पदार्थ अधिक खपतो. तरीही हा पदार्थ तयार होण्यास काहीसा वेळ लागतो. गणेशोत्सवासाठी हा पदार्थ तयार करायचा झाल्यास सुमारे एक ते दीड आधीपासून तयारी करावी लागते. तयार करतानाही मिश्रण सारखे “हलवावे’ लागते. सातत्याने चव बघावी लागते. हा पदार्थ दिसायला सर्वत्र दिसला तरी त्याची चव मात्र फार कमी जणांना मिळते. अगदी अल्प स्वल्प संख्येतील काही जण हे वर्गणीचे मोदक पोटभर खातात. पण त्यामुळे त्यांची प्रकृती जी काही सुधारते म्हणता, पोट असे तरारून येते…पुढल्या वर्षी त्यांचा देह साक्षात गणेशमूर्तीशीच स्पर्धा करायला लागतो. अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असे हे खाद्य असल्याचे खाणारे सांगतात.

ही झाली काही वानगीदाखल मांडलेल्या पदार्थांची नावे. खरं तर गणेशोत्सवासारखा उत्सव अशा विविध पदार्थां आणि रंगाढंगांनी भरला आहे. त्याची लज्जत काही औरच आहे. ते सर्व इथे देणे शक्य नाही. तरी ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणून हेच गोड घ्यावे. इत्यलम!