मृत्यूदूत मांजर…एक सत्यकथा

मांजर हा प्राणी आपल्याकडे काहीसा भीतीदायक मानला जातो. मार्जारवर्गातील वाघ, सिंह बिबट्या अशा प्राण्यांचं सोडा, अगदी घरातील मांजरीकडेसुद्धा संशयाने पाहिलं जातं. त्यात आत्मा, भूत अशा रहस्यात्मक गोष्टींशी त्याची सांगड घातल्या गेल्याने तर समस्त मार्जारवर्गच गूढतेत गुरफटला गेला आहे. अनेक तथाकथित रहस्यपटांमध्ये मांजरीचे दर्शन (तेही काळ्या) ‘बाय डिफॉल्ट’ आवश्यक मानल्या गेल्याने तर त्यात भरच पडली आहे. मात्र एखाद्या रुग्णालयातील मांजर आजारी रुग्णांजवळ जाऊन त्यांच्या मृत्यूचे भाकित करत असल्याचे सांगितल्यास कसे वाटेल. ही प्रत्यक्षात घडलेली कथा आहे आणि विशेष म्हणजे पाश्चिमात्य देशात सध्या घडत आहे. नुकतीच ही कथा मी रेडियो नेदरलँडसच्या साईटवर वाचली.

ही मांजर आहे अमेरिकेतील. ऱहोड आयलंड येथील प्रोव्हिडंस या शहरात स्टीर हाऊस नर्सिंग अँड रिहॅबिटेशन सेटर आहे. या रुग्णालयाने ऑस्कर या नावाच्या एका बेवारस मांजराला आश्रय दिला. या मांजराने मरणपंथाला लागलेल्या अनेक रुग्णांची भविष्यवाणी केली. इतकी की या मांजराच्या वर्तवणुकीवरून आता कोणाचा ‘नंबर’ लागणार आहे, हे रुग्णालयांच्या कर्मचाऱयांना कळून येते.

ऑस्कर काय करतं, तर त्याला एखाद्याच्या मरणाचा वास आला, की त्या रुग्णाच्या खोलीबाहेर ते वाट पाहत थांबतं. यासाठी काही वेळेला अगदी घंटोगणती प्रतीक्षा करण्याची त्याची तयारी असते. एखाद्या नर्ससोबत ते खोलीत जातं आणि थेट रुग्णाच्या अंथरुणात उडी मारून बसतं. तिथं काही वेळ हुंगल्यासारखं करतं आणि तिथेच झोपीही जातं. यानंतर चार तासांच्या आत त्या रुग्णाची जीवनयात्रा संपलेली असते. बरं, हा पेशंट मरत असताना ऑस्करला तिथेच थांबायचं असतं. कोणी त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केल्यास ते निषेधाचा आवाज काढते.

अशा रितीने ऑस्करने आतापर्यंत पंचवीस रुग्णांना वरची वाट दाखविली आहे. त्यामुळे रुग्णालयांच्या कर्मचाऱयांच्या दृष्टीने त्याला खूप महत्त्व आहे. एखाद्या रुग्णाजवळ ते गेलं की नर्सेस त्या रुग्णाच्या कुटुंबियांना बोलावतात. खास बाब म्हणजे, ऑस्करच्या या जगावेगळ्या गुणाचे रुग्णाच्या कुटंबीयांना मात्र कौतुकच वाटते. ऑस्करच्या कौतुकादाखल रुग्णालयात एक फलकही उभारण्यात आला आहे.

इथपर्यंतचं सारं ठीक होतं. मात्र यातही गमतीचा भाग असा, की न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन या प्रतिष्ठेच्या नियतकालिकातही ऑस्करवर एक लेख प्रकाशित झाला. डॉ. डेविहड एम. डोसा यांनी हा लेख लिहिला आहे. त्यात ऑस्करचे विचित्र गुण आणि वर्तणूक यांची माहिती देतानाच, त्याचे स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केला आहे. डॉ. डोसा यांच्या मते, मृत्यूप्राय व्यक्तींच्या शरीरातून काही विशिष्ट रसायने निघत असावीत आणि ऑस्करला त्यांचा गंध लागत असावा. ते काही असले, तरी या लेखावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र नियतकालिकाच्या मते, डॉ. डोसा यांच्या लेखाला काही आधार देता येत नसला तरी त्याला नाकारते येणेही शक्य नाही.

या वादात मात्र ऑस्करचे काम अजून चालूच आहे. आता तो आणखी किती जणांना परलोकाचा रस्ता दाखवितो, ते त्यालाच माहित!.
——–


हेच ते मृत्यूची चाहूल लागणारे जगावेगळे मांजर