खराखुरा दलपती

हिंदीतील ‘अंधा कानून’ या चित्रपटाद्वारे रजनीकांत उत्तर भारतातील प्रेक्षकांना माहित झाला. मात्र त्यापूर्वीच तेलुगु आणि कन्नड प्रेक्षकांचा तो गळ्यातील ताईत झाला होता. तमिळनाडूत तर त्याच्या नावाचे नाणेच तिकिटबारीचालत होते. १९८७ साली एमजी रामचंद्रन यांचे निधन झाले आणि त्यानंतर रजनीकांत राजकारणात येणार अशा अफवा सुरू झाल्या. याचवेळी त्याच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल, अध्यात्माच्या ओढीबद्दल, समाजसेवेच्या वृत्तीबद्दल चर्चा होऊ लागल्या.

या सर्वाँचा फायदा चित्रनिर्मात्यांनी घेतला नसता तरच नवल. त्यामुळे रजनीकांतला केंद्रस्थानी ठेवून चित्रपट जसे होऊ लागले, तसे रजनीकांतच्या जीवनावरच चित्रपट तयार होऊ लागले. ‘अण्बुळ्ळ रजनीकांत’ हा असा जगात कुठेही बनला नसेल अशा प्रकारचा चित्रपट. या संपूर्ण चित्रपटात रजनीकांतने रजनीकांतचीच भूमिका केली आहे. त्यात त्याचे घर, आध्यात्मिक गुरु यांचे चांगलेच चित्रण घडते.

त्यानंतर ‘अन्नामलै’, ‘मुथु’, ‘पडैयप्पा’, ‘बाशा’ व ‘बाबा’ आणि आता ‘शिवाजी’…अशा चित्रपटांमध्ये पडद्यावर एखाद्या पात्राच्या वेशात रजनी असला तरी त्या पात्राचा सूत्रधार रजनीकांत असल्याचेच जाणवते ते त्यामुळे. त्याच्या सर्व चित्रपटांत रजनीकांत मातृप्रेमी असतो, देवभक्त असतो ते यासाठी. त्याच्या गाण्यातही त्याच्या तत्वज्ञानाच्या ओळी असतात. रजनीकांत बोलतो ते संवादही त्याचेच तत्वज्ञान सांगतात. पडद्यावर तो जे बोलतो त्यात वास्तवाचा अंश असतो असे त्याचे चाहते मानतात. नान ओरु तडवै सोन्ना, नुरु तडवै सोन्न मातिरी (मी एकदा जे सांगितले ते शंभरदा सांगितल्यासारखं आहे) किंवा नान एप्पो वरुवेन एप्पडी वरुवेन यारुक्कुम तेरुयादु. आणा वर वेण्डिय नेरत्तिले नान करेक्टा वरुवेन, (मी कधी येणार कसा येणार कोणालाही माहित नाही. मात्र येण्यासाठी योग्य वेळी मी नक्की येईन) अशा त्याच्या वाक्यांना त्याच्या राजकारणप्रवेशाशी जोडून पाहण्यात येते.

यादृष्टीने ‘पडैयप्पा’ हा चित्रपट रजनीकांतच्या जीवनाचेच पडद्यावरील दर्शन आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या चित्रपटात रजनीकांतच्या समोर खलनायक नाही तर खलनायिका आहे (जयललितांचे रुपक), त्याच्या खऱया जीवनाप्रमाणेच चित्रपटातही दोन मुली दाखविल्या आहेत. चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये त्याच्या तोंडचे संवादही वास्तव जीवनाशी निगडीतच दाखविण्यात आले आहेत. मला आठवते १९९९ सालच्या फेब्रुवारीत हा चित्रपट आला होता. त्यावेळी एन वळी तनी वळी या त्याच्या खास ‘पंच डायलॉग’ने संपूर्ण तमिळनाडूला वेड लावले होते. या चित्रपटाच्या एका दृश्यात तो खलनायिकेला म्हणतो, पोंबळ पोंबळेया इरुक्कनुम. (बाईने बाईसारखे रहावे.) त्यावेळी अख्ख्या थिएटरमध्ये ‘जयललिता…जयललिता’चा आवाज घुमायचा. ‘पडैयप्पा’चे दिग्दर्शक के. एस. रवीकुमार यांनी चित्रपटाच्या यशाचे वर्णन इमालय वेट्री (हिमालयासारखे उत्तुंग यश) असे केले होते.
‘बाबा’ हा तसा (रजनीकांतच्या मानाने) अपयशी चित्रपट. या चित्रपटात एक दृश्य होते…नायिका (मनीषा कोईराला) हिला सिनेमाची तिकिटे हवी असतात. बाबा (रजनीकांत) तिला तिकिटे काढून देण्याची ऑफर देतो. नायिका यावर अविश्वास दाखविते. त्यानंतर बाबाचा मित्र (गौंडमणी) तिला म्हणतो, “याने मनात आणलं तर सिनेमाचीच काय, खासदारकीचीही तिकिटे मिळतात.” या वाक्याला टाळ्यांची दाद मिळाली नसती तरच नवल. ‘शिवाजी’मध्येही अशा प्रत्यक्ष आणि पडद्यावरील जीवनाची सीमारेषा प्रचंड धूसर आहे. रजनीबाबतच्या या वास्तवाचा वेगळाच अनुभव मणीरत्नमलाही आला. ‘दलपती’ चित्रपटात रजनीकांत मुख्य नायक. सोबत अरविंद स्वामी आणि मलयाळम अभिनेता ममूट्टी हेही होते. चित्रपटाच्या कथेच्या मागणीनुसार रजनीकांतचा मृत्यू अपेक्षित होता. मात्र तमिळ प्रेक्षकांना हा शेवट कधीही खपला नसता. रजनीकांतचा मृत्यू असलेला चित्रपट अद्याप तमिळमध्ये निर्माण व्हायचा आहे…अन आता तशी शक्यताही नाही. तर मणीरत्नमला अपेक्षेनुसार मोठी विरोध झाला. वितरकांनीही त्याच्या चित्रपटाला (रजनी असूनही) हात लावायला नकार दिला. अखेर क्लायमॅक्स बदलून त्याला तो चित्रपट तमिळनाडूत वितरित करावा लागला. केरळमध्ये मात्र मूळ क्लायमॅक्स असलेली मलयाळम आवृत्ती वितरित करण्यात आली.

रजनीकांतच्या पडद्यावरील भूमिकेचा वास्तव जीवनात काय परिणाम होतो, हे मी डोळ्यांनी पाहिले आहे. ‘बाशा’ चित्रपटात रजनीकांत ऑटोचालक दाखविला आहे. त्याच्या ऑटोवर प्रसवूक्काक इलवसम (गरोदर स्त्रियांसाठी मोफत) असे ठळक लिहिलेले दिसते. तमिळनाडूत गेलो असताना तेथील अनेक रिक्षांवर मला अशा प्रकारचीच सूचना लिहिलेली दिसली. प्रत्यक्षाहूनि प्रतिमा उत्कट असा अनुभव चित्रपट क्षेत्रातील अनेकांना येतो. मात्र प्रत्यक्ष आणि प्रतिमा यांच्यातील फरक क्षीण झालेला रजनीसारखा एखादाच. तो मराठी आहे हा योगायोगाचा भाग आहे. काही झालं तरी आमच्यासारख्या ‘मनोरंजन के मारें’चा तो बॉस आहे, हे नक्की!