चल भाऊ, डोकं खाऊ!

मी पुण्यात राहतो. आता खरं तर हे आपणहून सांगायची गरज नाही. कारण कोणतीही व्यक्ती इतरांना न कळालेली गोष्ट आपल्याला कळाली आहे अशा आविर्भावात सांगू लागला, की तो एकतर पुण्यात राहतो किंवा केव्हा ना केव्हा पुण्याचं पाणी चाखलेला आहे हे लक्षात येतं. पुण्यात राहणार्‍या प्रत्येकाला नागरिकत्वाचा दाखला मिळो न मिळो, पण शहाणपणाचा मक्ता मिळालेला असतो हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट नाही तरी शनिवारवाड्याइतके उघड खचितच आहे.
तर अशा या शहाणपणाच्या पुण्यनगरीत अन्य लोकांना असतात तशाच सवयी मलाही आहेत. ‘अभिमानाने सांगाल रांगेत उभे राहून या हॉटेलमध्ये जेवलो,’ हे माझही ब्रीद आहे. ‘ज्ञान मिळविताना असे मिळवा की आपल्या कधी मॄत्यू येणारच नाही, पुण्य करताना असा विचार करा की आपल्याला उद्याच मॄत्यू येणार आहे,’ असं एक संस्कॄत वचन आहे. त्यात बदल करून मी असं वागतो, की ‘जेवण करताना मी असं करतो की आपल्याला उद्याच मरण येणार आहे आणि जगाला उपदेश देताना असा देतो, की जगाच्या सुरवातीपासून मी येथे एकटाच शहाणा आहे.’ तास तासभर दरवाजाजवळ ‘ताट’कळत उभे राहिल्याशिवाय माझं पोटच भरत नाही. आणि एकदा का पोट भरलं की अख्ख्या जगाला फुकटची शिकवणी देण्याची जी मजा आहे, ती अन्य कशात आहे काय?
असं एकूण बरं चाललं असलं तरी आपण जास्त खातो की काय, अशी एक शंका मनाला चाटून जात होती. सांगणारे असंही सांगतात, की मी जगण्यासाठी खात नसून खाण्यासाठी जगत असतो. अन त्या खाण्याची रेंजही मोठी आहे. मात्र माझ्या या भूकेला आता शास्त्रीय आधार मिळाला आहे. मी माझ्या आयुष्यासाठी, वैयक्तिक फयद्यासाठी खावखाव करत नसून त्याचा माझ्या कौतुकास्पद बुद्धिमत्तेशी थेट संबंध आहे, असं शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यांच्या मते, बौद्धिक काम करणारी माणसं अधिक खातात. माझ्यावर खार खाऊन असणार्‍या लोकांच्या हे संशोधन पचनी पडणार नाही, हे मला पक्कं ठाऊक आहे। मात्र कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा राहतो थोडाच? आता शास्त्रज्ञांनी आणखी एक उपकार करावा। त्यांनी बुद्धिमान माणसे आळशी असतात असाही एक शोध लावावा. दिवस रात्र बसून राहणारी, कोणतंही काम व करणारी आणि आराम करायला मला वेळ पुरत नाही, अशी तक्रार अभिमानाने करणारी जी मोजकी मंडळी आहेत, त्यांची बुद्धिमत्ता इतरांपेक्षा जास्त असते, असा निष्कर्ष काढणारे एखादे संशोधन त्यांनी करावे, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी लागेल तितक्या वेळा सँपलिंग करण्यासाठी इतरांना सांगण्याचे माझी तयारी आहे। म्हणजे कसं, माझी प्रोफाईल पूर्ण होईल.