आधीच मर्कट त्यात…कॅमेरा मिळाला

नाशिक जिल्ह्यातील वणी हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. तेथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दुरदुरून लोक येतात. (त्यांना सरसकट भाविक असं म्हटलं जातं.) महाराष्ट्रात मांगल्य कायम असलेल्या मात्र ते झपाट्याने गमावत असलेल्या काही स्थळांपैकी ही जागा. ज्याला पर्यटनाला जायचे त्याने पर्यटनाला जावे आणि त्याला श्रद्धेने जायचे त्याने श्रद्धेने जावे अशी ही विशिष्ट जागा आहे.
सर्वच डोंगराळ भागांमध्ये असतात तसेच येथेही माकडं आहेत. देवीच्या दर्शनाला आलेल्या लोकांच्या हातातील, स्वतःला हवाशा वाटतील त्या वस्तू हिसकावून घेणे हा या माकडांचा हातखंडा प्रयोग. शिवाय त्यांनी तसे हिसकावून घेतलेच, तर परत ५०० पायऱया उतराव्या लागतील म्हणून या दर्शनार्थ्यांनी प्राणपणाने स्वतःच्या वस्तू जपण्यासाठी केलेली धडपड, हे त्यातील ऍडिशनल मनोरंजन. देवीच्या मंदिरात त्या माकडांना पाहून लोकांना जेवढी गंमत वाटते, त्याहून कित्येकपट गंमत त्या माकडांना या लोकांच्या चेष्टा पाहून होत असाव्यात असं माझं ठाम मत आहे.

अलिकडे तर कॅमेरा आणि मोबाईलच्या सुळसुळाटामुळे माकडांचे वंशज खूपच चेकाळले आहेत. माकडांना गाण्यातील काही कळत नाही, दुर्दैवाने त्याच्या वंशजांना गाता तर येतेच शिवाय ते गाणे कुठंही वाजविण्याची सोय मोबाईलमुळे झाली आहे. त्यामुळे तारस्वरात कुठला तरी गदारोळ चालू करून मोबाईल मिरविण्याचा चंग बांधणारे वीर आताशा जास्त दिसू लागले आहेत. परवाच एके ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलेला प्रकारः
सकाळचे पावणे पाच वाजले आहेत. समोर बसलेली व्यक्ती कोणालातरी मोबाईलवरून कॉल करते. त्या तेवढ्याच धन्य पुरुषाने लावलेली डायलर टोन याला इतकी आवडते की ही पहिली व्यक्ती स्पीकर फोन सुरू करते. ज्याला कॉल केलेला असतो तो चरफडत फोन उचलतो, या वेळेला कशाला त्रास देतो म्हणून शिव्या घालतो (स्पीकरफोन चालू बरं का!) आणि फोन ठेवून देतो.
पहिली व्यक्ती पुन्हा फोन लावते. तो पुन्हा उचलतो.पुन्हा चरफडणे. पहिली व्यक्ती समोरच्याला फोन सायलंट करायला सांगते. त्यानंतर सार्वजनिक शांतता भंगाचा तो अत्याधुनिक बिग बँग प्रयोग चालू राहतो.
तर आपण वणीत होतो. या ठिकाणी माकडांना भरपूर खाद्य मिळत असल्याने त्यांची गर्दी असणे हे नवल नव्हते. मात्र त्यांच्या लीला पाहून माझ्यासकट सगळ्याच कॅमेराबाजांनाही चेव आला. मग काय, मंदिरात माकड पुढे पळतंय आणि आम्ही आपले कॅमेरे घेऊन त्यांच्यामागे पळतोय, अशा दृश्यांची मालिका सुरू झाली. तेही बेटे आपले फोटो सेशन करण्यासाठी नाना क्लृप्त्या करत होते.
काही वेळ असे फोटो काढल्यानंतर मात्र कंटाळा आला. आपण आलो कशासाठी आणि करतोय काय, असं वाटायला लागलं. आधीच मर्कट त्यात मदिराच प्याला, अशी काहीशी म्हण ऐकलेली होती. मात्र मदिरा न घेताही कशा मर्कटलीला करता येतात, हे या वेळी कळाले.
(या मर्कटचेष्टांची क्षणचित्रे इथे आहेत.)