नेमेची येतात निवडणुका…अन जातीयवाद

निवडणुकीच्या तोंडावर कोंग्रेस सरकारने काढलेल्या वटहुकुमाने आपले काम नेमके केले आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांना जातीच्या वादात अडकावायचे आणि इकडे आपला कार्यभाग साधुन घ्यायचा, अशी बिनतोड़ योजना कोंग्रेसने आखलेली आहे. त्याचा पहिला टप्पातरी यशस्वीपणे पार पडला आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने ३०० कोटी रुपये उधळण्याची पूर्वपीठीका ही आहे।

एरवी बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाला मराठा संघटनांचा असलेला विरोध मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना माहीत नसावा, हे शक्य आहे का? बाबासाहेबांच्या नावाला विरोध होणार आणि तो मराठा सन्घटनान्कडूनच होणार ही खूनगाठ बांधूनच हा खेळ खेळण्यात आला. त्यानुसार विनायक मेटे आणि पुरुषोत्तम खेडेकर या महामानवांनी बाबासाहेबांवर दुगाण्या झाडल्या. संसदेच्या निवडणुकीतील यशाने भरात आलेल्या आणि शिवाशाहीरांशी निष्टा बाळगून असलेल्या राज ठाकरे यांनी अगदी साहजिकपणे बाबासाहेबांची बाजू घेतली. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून संभाजी ब्रिगेडने उद्या (शनिवारी) पत्रकार परिषद बोलाविली आहे. त्यासाठी कादालेल्या पत्रकातील भाषा पाहून मला आपले वाटले, की त्या मजकुराचा पहिला कागद जागच्या जागीच जाळून गेला असावा.

राज यांनी सांगितले नसते, तरी अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे, की मराठा संघटनांच्या मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पाठबळ आहे. त्यातही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तर अंगातील सगळे बळ याच संघटनांचे आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा घाव राष्ट्रवादीच्या वर्मावर बसला असल्यास नवल नाही. काँग्रेस नेते by default आपली संघटना सर्वसमावेशक असल्याचे सांगू शकतात. राष्ट्रवादीला ती सोय नाही. राष्ट्रवादीच्या या प्रतिमेमुळे आताच्या निवडणुकीत मराठवाडा आणि विदर्भात अन्य सर्व जाती एकवटून मतदान विरोधात गेले, हां इतिहास किमान पवारांना तरी माहित आहे.शिवाय एकदम कोलांटउडी मारून ओबीसी किंवा अन्य समाजाला एकत्र घेण्याचे प्रयत्नही राष्ट्रवादी करू शकत नाही, कारण तसं केलं तर आहे तो मराठा मतदारही नाराज होऊन दूर होऊ शकतो. त्यामुळे बाबासाहेबांना पुढे करून मराठा विरोधी ब्राम्हण असे भांडण तयार करायचे, त्यात मराठा समाजाला एकाकी पाडायचे म्हणजे पर्यायाने राष्ट्रवादीचा मतदारवर्ग संख्येने कमी होऊ शकतो, हा साधा हिशोब कॉंग्रेसच्या नेतृत्वाने मांडला आहे.
या सगळ्या गदारोळात शिवसेना वा भारतीय जनता पक्षाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यांना भूमिका घेण्याची सोयही सरकारने ठेवलेली नाही. आज राज ठाकरे यांच्या विधानानंतर विनोद तावडे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे. शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ‘जाणता राजा’ शरद पवार यांनीही मराठा नेत्यांना राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यात अर्थात बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाचा उल्लेख नाही. सगळ्या गदारोळानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे, की या समितीच्या अध्यक्षपदी तेच आहेत. गेले तीन दिवस चालू असलेल्या या वादात आता त्यांनी आपले तोंड उघडले आहे.

गमतीचा भाग बघा, गेल्या वेळेस २००४ सालीच्या निवडणुकीत याच बाबासाहेबांची बदनामी करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. आज त्याच बाबासाहेबांच्या नथीतून कॉंग्रेस राष्ट्रवादीची शिकार करू इच्छित आहे. याला म्हणतात काळाचा न्याय!