तुम्ही म्हातारे होऊ नका!

“आजही मी हातात कप घेतला, की तो थरथरायला लागतो. मात्र हातात ब्रश घेतला तर तो थरथरत नाही. एखादी शक्ती माझ्याकडून हे शक्य करून घेत असावी. मात्र माझ्या हातून चांगलेच काम होत असल्याने त्या शक्तीचा मी आभारी आहे,” मंगेश तेंडुलकर बोलत होते. या वाक्यांनी मला स्वतःला आपण काय गमावले आहे, याची जाणीव करून दिली. तेंडुलकर यांच्या 50 व्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे काल बालगंधर्वमध्ये उदॆघाटन झाले. त्यावेळी त्यांनी वरील उदॆगार काढले. व्यंगचित्रे तसे पाहायले गेले तर माझी पहिली आवड. त्यात तेंडुलकरांची चित्रे म्हणजे वेगळीच खुमारी होती. त्यांच्या या वाक्यासरशी मी एकदम 1983 पर्यंत मागे गेलो.

ज्या वयात रविवारची जत्रा मुलांनी वाचू नये, असा संकेत होता त्यावेळी मी ते साप्ताहिक सर्रास वाचत असे. त्याला कारण तेंडुलकरांची व्यंगचित्रे त्यात येत असत. उरुस का अशाच काहिशा नावाने मलपृष्ठाच्या आतील बाजूस त्यांची व्यंगचित्रे येत असत. त्यात शिवाय नाटकांचा समाचार घेणारे त्यांचे खुमासदार सदरही होतेच. त्या व्यंगचित्रांनी बराच काळ प्रभावित केले होते. त्यानंतर विकास सबनीस आणि राज ठाकरे यांच्या शैलीने भुरळ घातली होती. नंतरही काही काळ या सर्वांची गाठभेट अनेक वर्षे दिवाळी अंक किंवा दैनिक वर्तमानपत्रांतून पडत होती. मग काही काळ व्यंगचित्रकार म्हणून जगण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते सगळे डाव वेगळेच पडले. आता तेंडुलकरांच्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने, त्यांच्या या वाक्याने गमावलेल्या त्या कौशल्याची आठवण झाली.

या कार्यक्रमाचे उदॆघाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी मोठे मनोज्ञ भाषण केले. “मुलगा मोठा होताना बापाला खूप आनंद होतो. मात्र आपले वडिल म्हातारे होऊ नयेत, असे मुलाला वाटत असते. वडिलांनी म्हातारे होणे म्हणजे काहीतरी गमावल्यासारखे आहे. त्यामुळे तेंडुलकर, तुम्ही म्हातारे होऊ नका. आहात तसेच राहा,” नाना पाटेकर बोलत होते. त्यांच्या या विनंतीला उत्तर म्हणून बोलतानाच तेंडुलकरांनी वरील वाक्य उच्चारले होते.

या सगळ्या कार्यक्रमात खरंच व्यंगचित्रकार झालो असतो तर…असा विचार येत होता. कार्यक्रम संपला आणि सगळ्या लोकांनी नाना पाटकेरला एकच गराडा घातला. बिचारे तेंडुलकर एका बाजूला पडले. सगळ्यांची घाई नानाची सही घेण्यासाठी. त्यावेळी व्यंगचित्रकार न झाल्याचे आयुष्यात पहिल्यांदाच समाधान वाटले!

गोंधळ-धर्माचा आणि राजकारणाचा

देशाच्या राजधानीत राम मंदिर आणि बाबरी मस्जिद यांच्या पाठीराख्यांमध्ये पाठशिवणीचा खेळ चालू असताना पुण्यात काल रामकृष्ण मिशनचे स्वामी तत्वज्ञानानन्द यांचे भाषण होते. एमआयटीच्या कार्यक्रमात त्यांचे हे व्याख्यान झाले. यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, “भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे असे म्हणण्यापेक्षा तो अध्यात्मिक देश आहे, असे म्हणणे अधिक सयुक्तिक आहे. इंद्रियांमधून मिळणाऱ्या आनंदापेक्षा आत्मिक आनंद महत्वाचा आहे. हा आनंद कसा मिळवायचा हे आपलाल्या केवळ धर्मग्रंथच नाही, तर शास्त्रीय संगीत, कला आणि साहित्य यातूनही ही शिकवण मिळते.”

खरे तर अशा प्रकारची वाक्ये चोहोबाजूला अनेकजण बोलत असतात. मात्र रामकृष्ण मिशनसारख्या संस्थांमधील वरिष्ठ आणि सन्माननीय व्यक्ती वरील विचार मांडते तेव्हा त्याला वेगळा अर्थ असतो. अयोध्येतील ज्या वास्तूवरून नवी दिल्लीत गोंधळ सुरु आहे, तो धार्मिक आहे का राजकीय? म्हणजे पहा, धार्मिकता सोडा आणि भौतिकता पकडा, असा उपदेश आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी केला. त्यामुळेच रामापेक्षा रामाच्या मंदिराबाबतच या लोकांना अधिक प्रीती आहे. घ्या, तुम्हाला भौतिक विचारसरणी हवी होती ना? आता बोला, आम्ही अयोध्येतील भौतिक वास्तू आणि भौतिक जमिनीसाठी हातघाईवरच येऊ.

खरं म्हणजे, धर्म, आध्यात्मिकता आणि नैतिकता या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, हे आपल्या शिक्षणव्यवस्थेने  कधी नीट सांगितलेच नाही. धर्म म्हणजे पूजापाठ, देव-देवस्की आणि मंदिरात जाणे, अशा तद्दन बाह्य उपचारांशी जोडली गेलेली वस्तू. ‘आनंदो’ नावाच्या एका बंगाली नियतकालिकाचा आरोग्य विशेषांक एकदा माझ्या हातात पडला. त्यात बंगालमधील बहुतेक साऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती होत्या. त्यात जवळजवळ सगळ्यांनी आपण प्राणायाम करतो हे सांगतानाच, याचा कोणत्याही देवाशी संबंध नाही अशी पुस्तीही जोडली होती. कम्युनिस्ट बंगालमधील नामवंतांना आपण धार्मिक गणले जाऊ, याची कोण हि धास्ती! भारत हा आध्यात्मिक देश आहे, हि वस्तुस्थिती देशाच्या मुखंडांना मान्य करता आलेली नाही. त्यामुळे प्रच्छन्न समारंभ आणि कर्मकांड धार्मिक विचारांच्या नावावर खपविले जातात. सत्य साईबाबांना ‘वर्षा’वर बोलावणे येतात आणि पुणे जिल्ह्यात तसेच आजूबाजूला डुप्लिकेट धर्मस्थळांची रास उभी राहते. तिरुपती बालाजी, शिर्डी, पंढरपूर यांच्या प्रतिकृती एखाद्या मॉलच्या शाखा निघाव्यात तशा निघत आहेत.

गम्मत पहा, शिरगावला शिर्डीच्या नावाखाली एक राजेशाही दुकान काढले तर अर्धा अर्धा पान छापणारे वर्तमानपत्र आध्यात्मिकता शिकवणाऱ्या पुरुषांना मात्र खड्यासारखे दूर ठेवते. नवरात्रात महालक्ष्मी मंदिराचे,  गणेशोत्सवात दगडूशेठ गणपतीचे छायाचित्र छापणारे किंवा दाखविणारे, या सगळ्याची गरज नसून केवळ स्वतःकडे पहा असे सांगणाऱ्या लोकांना वगळणारच. त्यात त्यांची भौतिक गरज आहे. तुकारामांच्या देहू येथे त्यांच्या मूळ मंदिरात भाविक श्रद्धेने जातात. तिथेच आता थोड्या अंतरावर गाथा मंदिर नावाचे एक मोठे दुकान उभे राहत आहे. संगमरवराच्या या तीन माजली इमारतीत तुकोबांचे अभंग संगमरवराच्याच फारशीत कोरलेले आहेत. जोडीला तुकोबांचा भव्य पुतळा. आयुष्यभर व्यवहार न जमलेल्या तुकोबांनी जवळच्या डोंगरावर जाऊन साधना केली. अशा उंची प्रसादाची गरज असती तर त्यांनी आपल्याकडे चालून आलेल्या शिवाजीसारख्या राजाला मागितले असते. पण नाही. स्वामी तत्वाज्ञानानन्द म्हणाले, सध्या उपभोगवाद वाढत आहे. मोठ्या धर्मस्थळांच्या  प्रतिकृती काय किंवा या गाथा मंदिरासारख्या नवीन रचना काय, या आध्यात्मिकातेत शिरलेल्या उपभोगवादाचेच परिणाम आहेत. हा उपभोगवाद आहे, तोपर्यंत मंदिर-मशीद पडतच राहणार. राजकारण हे त्याचे केवळ एक रूप आहे.

…अखेर व्हायचे ते झालेच

अखेर व्हायचे ते झालेच. निखिल वागळे यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर शिवसैनिकांच्या मारामारी स्वातंत्र्याने अतिक्रमण केले. स्वतःच्या मोठेपणासाठी वागळे यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही चोप कसा असतो ते दाखवून दिले आणि शिवसेना अद्यापही शिवसेनाच आहे, ते पाच पंचवीस कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गात हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे राणा भीमदेवी थाटात आश्वासन दिले. (त्यावेळी खरं तर त्या फ्रेममध्ये आबांच्या जवळ विनायक मेटे दिसतात का, याचा शोध मी घेत होतो.शिवाय  छगन भुजबळही कुठे दिसले नाहीत ते.)

आयबीएन-लोकमतवर हल्ला झाला, त्याच संध्याकाळी योगायोगाने पुण्यात मनसेच्या एका नेत्याकडे पत्रकारांचा स्नेहमेळावा जमला होता. तिथे याच घटनेची चर्चा झाली नसती तर नवल. त्यावेळी बहुतेक पत्रकारांचे मत पडले, की वागळे कधी न कधी मार खाणारच होते. त्यांच्या शैलीमुळे महानगरच्या काळापासून शिवसैनिकांची आणि त्यांची सातत्याने गाठभेट होत असे. नव्हे शिवसैनिकांचा मार खाऊनच त्यांनी जिगरबाज पत्रकार अशी स्वतःची ओळख निर्माण केली आणि त्यांच्यावर हात साफ करूनच शिवसैनिकांनी स्वतःची हिंस्र प्रतिमा निर्माण केली.

त्यांच्यावर पहिला हल्ला झाला 1991 मध्ये. त्यावेळी विजय तेंडुलकर यांच्यासहित बरीच मोठी मंडळी निषेधासाठी रस्त्यावर उतरली होती. त्यानंतरच्या पाच वर्षांमध्ये महानगरवर अनेकदा हल्ला झाला. मग पूर्वीचा निषेधाचा जोष उतरला. त्यावेळी लोकमतमध्येच आलेले अग्रलेख मला आठवतात. सातत्याने एकाच वर्तमानपत्रावर हल्ले का होतात, अशा प्रश्न त्यावेळी विचारला जाई. वागळे इलेक्ट्रॉनिक माध्यमात आले आणि त्यांच्या धडाकेबाज व आक्रमक शैलीमुळे आयबीएन-लोकमत वाहिनी यशस्वीही झाली. मात्र आक्रमकता वेगळी आणि अहंमन्यता वेगळी, हे त्यांच्या गावी नव्हती. वागळे चर्चेसाठी नेत्यांना बोलावतात आणि त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना बोलू देत नाहीत ही सार्वत्रिक तक्रार आहे. सध्याच्या राजकीय नेते भ्रष्टाचारी आहेत, काहिसे अनघड (रॉ) आहेत ही गोष्ट खरी आहे. मात्र म्हणून त्यांना वाटेल तसे सोलून काढण्याची गरज नाही. दुर्दैवाने राजकारणी म्हणजे पंचिंग डॉल आणि त्यांना हवं तसं बोलण्याचा आपल्याला परवाना आहे, असा बहुतेक पत्रकारांचा समज आहे. राजदीप सरदेसाई, निखिल वागळे, करण थापर ही यातलीच मंडळी. त्यामुळेच थापरच्या डेव्हिल्स अ़ॅडव्होकेटमधून नरेंद्र मोदी उठून गेलेले गुजराती जनतेत खपून गेले. समोरची बाजू ऐकायचीच नाही, असे ठरवलेल्या लोकांशी आणखी कसे वागणार. वर उल्लेख केलेल्या मनसेच्या नेत्याच्या शब्दांत सांगायचे म्हणजे, चॅनेलवाले एखाद्या माणसाला संपवायलाच निघतात. त्या माणसाने केलेले काम, त्याचीही काही बाजू असते हे ऐकायला ते तयारच नसतात.

राहता राहिल प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. ज्यांची मालकी राजकीय नेत्यांकडे आहे, ज्यांच्या प्रकाशनामध्ये विशिष्ठ राजकीय पक्षांची तरफदारी करण्यात येते, एकतर्फी प्रचार हीच ज्यांची ओळख आहे, त्या वर्तमानपत्रांनी हल्ले झाल्यावर मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र आणि विचार स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढावेत हीच मोठी गंमत आहे. दीड महिन्यांपूर्वी सगळी वर्तमानपत्रे जेव्हा राजकीय पक्षांच्या पैशांवर लोकशाहीवर काळी शाई पुसण्यात दंग होती, त्यावेळी यांची ही चाड कुठे गेली होती, ते कळायला मार्ग नाही. (नाही म्हणायला, ज्यांनी पॅकेजसाठी पैसे पुरविले त्यांचेच लेख पॅकेजच्या विरोधात छापून लोकसत्ताने पापक्षालन करण्याच प्रयत्न केला होता. ) पुण्यात काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी असेच माध्यमांच्या नैतिकतेवर भाषण दिले होते. अशावेळी आपलं गप्प बसण्याचं स्वातंत्र्य वापरण्यापलिकडे आपण काय करू शकतो.

सरते शेवटी बाकी शिवसैनिकांनी हा हल्ला करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे अपयश अधोरेखित केले आहे. घर फिरले की घराचे वासे फिरतात, असे म्हणतात. त्याप्रमाणे आधीच राजकीय पराभवाने गलितगात्र झालेल्या या पक्षाच्या प्रतिष्ठेला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सुरुंग लावलेला आहे. बाळासाहेबांपेक्षा वेगळ्या मार्गाने राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ही मोठी चपराक आहे. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेने अनेक पत्रकारांवर हल्ले करून पचविले कारण ते पाप धुवून काढणारे अनेक चांगली कामे शिवसेना करत होती. आता मात्र एकीकडे राजकीय पदांसाठी चाललेली दुकानदारी आणि दुसरीकडे रस्त्यावरील ही गुंडगिरी अशा कात्रीत पक्ष अडकला आहे. एकतर हे पक्षाचे भान सुटल्याचे लक्ष आहे किंवा नियंत्रण तरी सुटल्याचे लक्षण आहे.

…………..

संबंधित पोस्ट

पत्रकाराची प्रतिज्ञा

विक्रम वेताळ आणि सच्छील खेळाडू

राजा विक्रमाने परत आपली जुनी-पुराणी भंगार फटफटी बाहेर काढली आणि तिला कीक मारली. अनेक शतकांच्या शिरस्त्याप्रमाणे तो वेताळाला घेऊन येणार होता. बायपासवरून दहा मिनिटांतच तो शहराजवळच्या जंगलात पोचला. वेताळाची बसण्याची जागा तर त्याला माहितच होती. शिवाय ज्या झाडाजवळून रिअॅलिटी शोचा आवाज ऐकू येतो, तिथे वेताळ असतो हे त्याला माहित होतं. त्यामुळे त्याने तिकडे मोर्चा वळवला आणि वेताळाला उचलून खांद्यावर घेतले. वेताळाचेही आवडते पात्रं शोमधून बाहेर पडल्याने त्यालाही शो बघण्यात रस नव्हता. त्यापेक्षा राजाला जरासे छेडून त्याला ताज्या घडामोडीवर आजचा सवाल विचारावा निघून जावे, असा खासा बेत त्याने रचला होता.

गाडी महामार्गाला लागताच वेताळाने आपले तोंड उघडले. तो म्हणाला, “ए राजा, परिवहन अधिकाऱ्यांनी गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये असा नियम केला आहे. केवळ बोलण्यासाठी तो लागू नाही. तरीही तू असा गप्प गप्प का?  दुचाकी चालकांना अद्याप टोल द्यावा लागत नाही, त्यामुळे तू मला नेण्यासाठी कितीदाही येऊ-जाऊ शकतोस. तरीही सत्ताधारी नेत्यांसारखे न बोलता तुला मुका कावा साधायचा असेलच, तर मी मात्र विरोधी पक्षांसारखा आवाज काढतच राहणार. त्यासाठी कितीदाही निलंबित होण्याची माझी तयारी आहे. कारण मेली कोंबडी आगीला भीत नाही. मग वेताळ कशाला निलंबनाला घाबरेल? मी तुला आता एक फर्मास कथा सांगतो. ती नीट ऐक.  मी त्या कथेवर आधारित एक प्रश्न विचारेन. त्याचे उत्तर कार्यक्रमानंतर एसएमएसद्वारे दे.”

इतके बोलून वाहतूक पोलिस जसे नियम मोडणाऱ्या वाहनांची वाट पाहात रस्त्याच्या कडेला उभे राहतात, तसा एक सहेतूक पॉज वेताळाने घेतला. मग तो महागाईसारखा सुटला, “एक नगरी होती. ती राज्याची राजधानी नव्हती तरी राज्याच्या राजधानीपेक्षा त्या नगरीचा तोरा जास्त होता. कारण राज्याच्या राजाचा, मंत्र्यांचा, सरकारी अधिकाऱ्यांचा, झालंच तर सरकारचाही खजिना भरण्याची ताकद त्या नगरीत होती. अशा या नगरीत राज्याच्या सगळ्या भागातून लोक येत होते. त्याबद्दल त्या नगरीच्या लोकांमध्ये नाराजी होती. त्यामुळेच नाराजीचे नाराजकारण करणारे पक्षही तिथे होते. ही नगरी उभी करण्यासाठी नगरीच्या लोकांनी दिलेल्या लढ्याचे उदाहरण पक्ष देत होते. तरीही नगरी आडवी करण्याऱ्यांना अडवण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. नगरीबाहेरचे लोक याच्याविरूद्ध होते. आता पुढे काय झाले ऐक.

“या नगरीतून मोठे झालेले काही लोक होते. त्यांच्यामध्ये एक सच्छील असा खेळाडू होता. तोंडावर नियंत्रण असल्याबद्दल त्याची ख्याती होती आणि त्याची कामगिरीही चोख होती. राज्यात सगळीकडे त्याच्या नावाचा दबदबा होता. या नगरीच्या लोकांना त्याचा खास अभिमानही होता. आपला माणूस म्हणून त्याच्याकडे सगळे अपेक्षेने पाहायचे. एकदा काय झाले, कोणालाही अशक्य अशी प्रदीर्घ खेळी केल्याबद्दल या सच्छील खेळाडूचा सत्कार सगळ्यांनी आयोजित केला. राज्याच्या, नगरीच्या नव्हे हां, मुखंडांनी त्याला एका मंचावर ठेवले. याचवेळी बोलताना कधी नाही ते या सच्छील खेळाडूने जाहीर केले, की ही नगरी केवळ त्या नगरीच्या नव्हे तर सगळ्या राज्याची आहे. त्याच्या या वाक्याचा खूप गाजावाजा करण्यात आला. ज्येष्ठांनी टीका केली तर कनिष्ठांनी दुर्लक्ष केले. तर आता तू मला सांग, काहीही गरज नसताना या सच्छील खेळाडूने असा बाँबगोळा का टाकला?  गेला काही वर्षे त्याने फिरकी गोलंदाजी केलेली नाही म्हणून का असा दुसरा टाकला? माझ्या प्रश्नाचे उत्तर ताबडतोब दे, राजा नाहीतर तुझ्या या मतलबी मौनाचा मी कडक शब्दांत निषेध करीन. झालंच तर तुझ्या पुतळ्याचे दहन करीन. फेसबुकवरील तुझ्या सगळ्या मित्रांपर्यंत तुझे हे अपयश पोचवीन…” थेट प्रक्षेपण करताना वृत्तवाहिन्यांचे बातमीदार करतात तशी असंबद्ध बडबड करत वेताळ हातवारे करू लागला. तितक्यात कौटुंबिक मालिकांमधील पुरूष मंडळी करतात तसा मख्ख चेहरा करून राजा बोलला.

 

“वेताळा, अरे रिएलिटी शो आणि दररोजच्या मालिका सोडून हा तमाशा बघितल्यामुळे तुला हा प्रश्न पडला का? अरे, ज्या ठिकाणी, ज्या मंचावर हा प्रसंग घडला तो जरा आठवून पाहा बरे. त्यात मुळचे नगरीचे माणसं किती आणि नगरीबाहेरचे मात्र राज्यातील किती, याचा तू अंदाज घेतला का? या सच्छील खेळाडूला फारसे बोलून कधी माहित नव्हते, असे तूच म्हणतोस. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या मुलाखती घेणाऱ्यांनीही त्याला कधी राजकारणाचे प्रश्न विचारले नाहीत. मात्र त्या दिवशी माध्यमांच्या लोकांनी त्याला तावडीत घेऊन त्याला असे काही प्रश्न विचारले, की त्याला ते वाक्य बोलावेच लागले. वरच्यांना सांभाळण्यासाठी जे खालच्यांना दाबतात, त्यांनाच माध्यम म्हणतात हे तुला ठाऊक नाही का? भौगोलिकदृष्ट्या नगरी ही राज्याचाच भाग आहे, हे कोणीही बोलू शकतो. शिवाय वर्षातले आठ-दहा महिने नगरीबाहेर तेही राज्याबाहेरच काढणाऱ्या त्या खेळाडूला वास्तव परिस्थिती काय आहे, याचं ज्ञान असण्याची शक्यता किती?

“वेताळा, आपल्याला हवं ते कोणाकडून कसं बोलवून घेतलं जातं याचा एक उत्तम नमुना तुला माहित आहे का? सर्वोच्च धर्मगुरु पोप एकदा परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांचे विमान जमिनीला लागताच पत्रकारांनी त्यांना घेरले. पत्रकारांनी त्यांना विचारले, तुम्ही येथील वेश्यांना भेटणार का? त्यावर पोप उत्तरले, येथे वेश्या आहेत का? दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत ठळक मथळा होता, पोप विचारतात येथे वेश्या आहेत का? अशा परिस्थितीत त्या बिचाऱ्या खेळाडूचा दोष काय? त्याच खेळाडूचे दुसरे वाक्य होते, की त्याला या नगरीचा नागरिक असल्याचा अभिमान आहे. त्याला मात्र पत्रकारांनी कशी बगल दिली, हे तू पाहिले नाहीस काय? त्यामुळे वेताळा, या साऱ्या घटनेत त्या खेळाडूचा दोष किंचितही नसून त्याच्या तोंडून आपला अजेंडा राबवून घेणारे नगरीबाहेरचे पत्रकार  आणि अशा लोकांना तोंड देण्याचा खेळाडूला नसलेला अनुभव, या तेवढ्य़ा दोषी आहेत.”

राजाने आपले भाषण संपविले नाही तोच वेताळाने एक गडगडाटी हास्य केले. तो म्हणाला, “राजा, तू राजा असल्याने पत्रकारांना कसे हाताळावे तुला माहित आहे. त्यामुळेच तू काहीही बोलत नाहीस. मात्र वेताळ होण्यापूर्वी मीही पत्रकारच होतो. त्यामुळे गप बसणाऱ्यांना कसे बोलते करावे, हे मलाही माहित आहे. आता तू बोललास आणि मी चाललो. आता पुढल्या इलेक्शनपर्यंत मला असेच झाडावर मालिका पाहत बसू दे.”

इतके बोलून वेताळाने फटफटीवरून रस्त्यावर उडी मारली. विरूद्ध बाजूने जाणाऱ्या एका सहा आसनी रिक्षाला हात दाखवून त्याने ती थांबविली आणि राजाला कळायच्या आत तो रिक्षात बसलाही. भाज्यांचे वाढणारे भाव बघत राहावेत तसा राजा त्या रिक्षाकडे पाहत राहिला.

शेतकरी आणि राजाः माध्यमांची अदलाबदल

अँड्रयू ब्राऊन (गार्डियन)

जगभरातील वर्तमानपत्रांमध्ये ७० लाख डॉलरच्या जाहिराती गुगल देणार आहे, हे ऐकून एक पत्रकार म्हणून मला आनंद झाला. जणू काही आता ख्रिसमसच आहे. मात्र कुडकुविणाऱया थंडीचा ख्रिसमस व मी जणू एक शेतकरीच आहे. या शेतकऱयाला उदार राजाने पाहिले स्वयंपाकासाठी लाकडे गोळा करताना पाहिले.

हा राजा-गुगलचा अध्यक्ष एरिक श्मिड्ट- आपल्या हुजऱयासोबत येतो आणि त्याच्या मेजवानीतून उरलेले पक्वान्न मला पोचत करायला सांगतो. या पक्वान्नांबाबत माझी काहीच तक्रार नाही. मात्र राजा गेला आणि मी झोपडीत परतलो, की तो राजाच राहणार आणि मी शेतकरीच राहणार. राजा आणि शेतकऱयातील फरक एवढाच नाही, की एकाला पोटभर खायला मिळते आणि दुसऱयाला नाही. हा फरक महत्वाचा आहे, मात्र तो बदलू शकतो खरा महत्वाचा फरक म्हणजे राजा शेतकऱयाचे आहे नाही ते अन्न हिरावून घेऊ शकतो. शेतकऱयाची ती प्राज्ञा नसते. त्याचा तर त्याने स्वतःच्या मेहनतीने कमाविलेल्या संपत्तीवरही हक्क नसतो.

वर्तमानपत्रे ऑनलाईन होत असताना त्यांची गती हीच होणार असल्याची त्यांना भीती आहे. नव्या जगात आपण गुगलचे मजूर असणार आहोत. आतापर्यंत लोक वर्तमानपत्रे विकत घेत. आता, लोक जाहिरातदारांकडून मिळणाऱया सेवांशिवाय इतर कशासाठीही पैसा देण्यास तयार नाहीत. बातमीचे कार्यही आता केवळ जाहिराती मिळविणे, एवढेच राहणार आहे. पत्रकारांना मान्य नसले तरी हे कायमचे सत्य आहे. आता इंटरनेटच्या काळात तर प्रत्येक गोष्टीमागे हेच सूत्र असणार आहे.

वर्तमानपत्रांतून पैसा कसा मिळतो, हे केवळ वर्तमानपत्रे चालविणाऱयांनाच माहित. लॉर्ड बीवरब्रुक यांनी तर त्यांच्या यशाचा एक नियमच तयार केला होताः कोणत्याही पत्रकाराच्या जागी दुसरा एखादा पत्रकार आणता येतो. मात्र वर्तमानपत्रांतून पैसे मिळविणारे लोक आता वर्तमानपत्राचे नव्हे, तर गुगलचे मालक आहेत. ते एक पाऊल पुढे टाकून असंही म्हणू शकतातः कोणत्याही वर्तमानपत्राच्या जागी दुसरे वर्तमानपत्र आणता येते.

गुगल काही दुष्ट नाही. सुरक्षितही आहे. मात्र पन्नास वर्षांनी याच कंपनीचा इंटरनेटच्या बाजारावर कब्जा राहिल, असे म्हणणे मूर्खपणाचे होईल. खरं तर त्यावेळी लोकांना टाईप करताना किंवा कोणाशी बोलताना आपण एखाद्या बाजाराचा हिस्सा आहोत, याची कल्पनाही येणार नाही. त्यांना ती जादूच वाटेल. मात्र त्या जादूतून कोणीतरी पैसे कमाविलच आणि तो कोणीतरी आपण नसू. आता गुगल पुस्तकांच्या जगात प्रवेश करत आहे. वर उल्लेख केलेल्या जाहिराती या जगातील सर्व महत्वाच्या ग्रंथालयांचे डिजिटाईजेशन करून ते मोफत उपलब्ध करून देण्याच्या मोठ्या योजनेचा भाग आहेत. या पुस्तकांचे प्रताधिकार असणाऱयांना, ज्यांच्यासाठी त्या जाहिराती दिल्या आहेत, विशिष्ट रक्कम दिली जाईल. रेडियोवर प्रसारित होणाऱया संगीतासाठी कलाकारांना मानधन मिळते, तसेच आहे हे. अशा व्यवस्थेतून गेल्या वर्षी मी ३७.५० पौंडांची कमाई केली. त्यामुळे मी सांगू शकतो, की या योजनेत खाचखळगे आहेत. पण तो गुगलचा दोष नाही.

पुस्तकांचे प्रकाशन इलेक्ट्रॉनिक स्वरूपातच केवळ होणार असेल, तर लेखकांचे आणखी मरण आहे. कारण पुस्तक लिहिणे हे कॉपी प्रोटेक्शनच्या दृष्टीने सर्वमान्य आणि साधे साधन आहे. पुस्तकांचीही डिडिटल संगीतासारखी उचलेगिरी होणार असेल, तर पुस्तक लिहिणाऱयांच्या दृष्टीने ती धोक्याची घंटा ठरेल. एखाद्या बाजाराचेही काही कायदे असतात व त्यांच्या अंमलबजावणीचे मार्गही. शेतकऱयांना राजांची भीती वाटत असे, मात्र त्यांना अराजकाची जास्त भीती वाटत असे. त्याला तशी कारणेही होती. गुगल हा चांगला, समर्थ, समंजस राजा वाटतो. मी तरी या राजाचे स्वागत करतो. 

———————-

सहा महिन्यांपूर्वी गार्डियन वृत्तपत्रात आलेल्या लेखाचा Andrew Brown यांच्या लेखाचा हा अनुवाद. यात गॉर्डन यांनी गुगलमुळे वृत्तपपत्रांवर
होणाऱ्या परिणामांची चर्चा केली आहे.

मनसेला पाठींबा दक्षिणेचा

राज ठाकरे आणि त्यांची मनसे यांच्याबद्दल मराठी माध्यमांत आणि ब्लॉगवर इतकं काही लिहिले जात आहे. मात्र अन्य माध्यमांत, खास करून दक्षिण भारतीय भाषांमध्ये काय प्रतिक्रिया उमटत आहेत, याचा कोणीही अदमास घेताना दिसत नाही. काही तेलुगु आणि तमिळ वर्तमानपत्रे व ब्लॉगचा धुंडाळा घेण्याचा प्रयत्न केला. वर्तमानपत्रांची प्रतिक्रिया साधारण आपल्यासारख्या वर्तमानपत्रासारखीच आहे. मात्र ब्लॉगवरील प्रतिक्रिया या अधिक मोकळ्या आणि खऱ्या आहेत.

काही ठिकाणी हिंदी न शिकल्यामुळे तमिळ लोकांचे नुकसान झाले आहे, असा सूर आहे तर काही ठिकाणी पेरियार यांनी एके काळी जे केले तेच राज आणि मनसे आता करत आहेत, अशीही स्पष्टोक्ती आहे. मनसेच्या आमदारांची कृती देशाच्या ऐक्याला घातक आहेत असे काही म्हणतात. एका व्यक्तीने मात्र, या आमदारांची कृती विघातक असल्याचे सांगतानाच, हिंदी हि देशाची राष्ट्रभाषा असल्याचे असत्य पसराव्नियात येऊ नये, अशीही विनंती केली आहे.

आन्ध्रप्रभा हे एक्सप्रेस समुहाचे तेलुगु प्रकाशन. या वर्तमानपत्राने १२ नोवेम्बेरच्या अग्रलेखात मनसेचा समाचार घेतला आहे. “भाषा आणि प्रांताच्या दुराभिमानाचे प्रतिक असलेल्या  शिवसेनेत राज यांनी अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्यात आणि शिवसेनेत फारसा फरक नाही. भाषा आणि अन्य कारणावरून लोकांमध्ये फूट पाडणारे अनेक पक्ष, संघटना आणि व्यक्ती या देशात आहेत. केवळ उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक भांडणामुळे राज यांनी हा तमाशा चालविला आहे,” असे मत आन्ध्रप्रभाने व्यक्त केले आहे.

सिंगापूर येथील तमिळ अभियंता को वी कन्नन याचा ब्लॉग आहे ‘कालम’ नावाचा. त्याच्या १० नोवेम्बेरच्या पोस्टाचे शीर्षक आहे ‘महाराष्ट्राविल परवुम द्राविड वियादी’ (महाराष्ट्रात पसरणारा द्रविड रोग). त्यात त्याने लिहिले आहे, की हिंदी न शिकल्यामुळे दक्षिण भारतीय लोकांना अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांचे चित्रपट पाहता येत नाहीत, तमिळ पर्यटकांना देशाच्या इतर प्रांतात गेल्यावर नीट  आस्वाद घेता येत नाही. उत्तर भारतीय उद्योजक तमिळनाडूत व्यवसाय करण्यापूर्वी चार-चारदा विचार करतात. मोठ-मोठे राष्ट्रीय नेते तमिळनाडुत गेल्यावर केवळ भाषेच्या अज्ञानामुळे जनतेशी संवाद स्थापू शकत नाहीत. द्रविड नेत्यांच्या हिंदी विरोधाची आठवण करून देऊन लेखकाने वर, ‘म्हणजे द्रविड संस्कृती संपूर्ण भारतात पाय पसरत आहे,’ अशी मार्मिक टिप्पणी केली आहे.

मुंबईमध्ये राहणाऱ्या राजा वैस या तमिळ लेखकाने एकप्रकारे मनसेची पाठराखण केली आहे. जेमतेम २५०-३०० शब्दांची ही पोस्ट मुळातूनच वाचण्यासारखी आहे. रजनीकांतच्या एका जुन्या संवादाची आठवण करून राजा म्हणतो, “अबू आझमीला आधी सांगून मारले या घटनेतून राज यांनी आपला शब्द पाळला. ज्याप्रकारे हिंदी वाहिन्या अबूच्या कुटुंबावर फोकस करत होत्या ते पाहून या माणसाला इतके महत्व देण्याची गरज आहे का, असा प्रश्न पडत होता. हिंदी आणि मराठीच्या लिपीत फारसा फरक नसल्याने ज्याला हिंदी येते त्याला मराठीही येते. अशा परिस्थितीत मला मराठी येत नाही हे अबुचे म्हणणे कोणालाच मान्य होण्यासारखे नाही. मारहाण करणे चुकीचे असले तरी त्या मारहाणीमागे  काही योग्य कारण आहे. असा राग ५० वर्षांपूर्वी तमिळ लोकांनी दाखविला म्हणूनच हिंदीच्या विरोधात लढा यशस्वी झाला.”

अर्थात याच्या उलटही काही प्रतिक्रिया आहेत. त्यात राज ठाकरे हे दहशतवाडी असल्याचे म्हणणारे जसे ब्लोग आहेत तसे केवळ हिंदी माध्यमांतील बातम्यांचे भाषांतरही आहेत.

माहिती हवीय तर मोबदला द्या

माध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक यांनी अखेर गुगल विरूद्ध युद्धाचे बिगुल फुंकले आहे. गेली दोन तीन वर्षे पाश्चात्य माध्यमांना, खासकरून मुद्रीत माध्यमांना गुगलने, त्यातही गुगल न्यूजने जेरीस आणले आहे. विविध पातळ्यांवर याबाबत चर्चा चालू असतानाच, आपल्य़ा मालकीच्या न्यूज कॉर्पोरेशन समूहाच्या संकेतस्थळांवर गुगलच्या बॉट्सना (BOTS) प्रवेश न करू देण्याचे सूतोवाच मर्डोक यांनी केले आहे. आपल्याच स्काय न्यूज ऑस्ट्रेलियाला दिलेल्या मुलाखतीत मर्डोक यांनी म्हटले आहे, की या संकेतस्थळांवर येणारे पाहुणे गुगलच्या शोधपरिणामांतून येतात. त्यांची संकेतस्थळावरील मजकूराशी सलगी नसते. त्यामुळे अशा उचलेगिरी करणाऱ्या लोकांपेक्षा मोजकेच पण पैसे देऊन वारंवार येणारे वाचक या संकेतस्थळांवर यावेत, असा प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी मुदत देण्यात आलेली नाही.

बातम्या पुरविणाऱ्या बहुतेक संकेतस्थळांची कमाई ही त्यावरील जाहिरातींच्या उत्पनातून होत असते. मात्र इंग्रजीसारख्या भाषेत जिथे जगभरातील वर्तमानपत्रे, वाहिन्या आणि ब्लॉग्ज अहोरात्र मजकूर (content) पुरवित आहेत, तिथे जाहिराती येणार किती आणि कुठून? गुगलच्याच अॅडसेन्सने प्रकाशकांना जाहिराती मोठ्या प्रमाणात पुरविल्या मात्र त्यातून उत्पन्न अगदी तटपुंजे मिळते. एखाद्या छोट्या ब्लॉगरला कदाचित त्यातून आपली उपजीविका भागविणे शक्य असेल मात्र मोठमोठ्या कंपन्यांनी त्यावर कसे भागवावे? मर्डोक यांनी याच मुद्यावर बोट ठेवले आहे. गुगलवरील एखादे शीर्षक बघून कोणीतरी या संकेतस्थळांवर येतो आणि जातो. त्यातून फायदा काय होणार? लोकांना मोफतमध्ये काही देऊ नये,” असं त्यांचं म्हणणं आहे.

मर्डोक यांच्या म्हणण्यात काहीसं तथ्य आहे. अशा पद्धतीने वाचकांना मोफत काही न देता माहितीसाठी मोबदला घेण्याने उत्पन्न काहीसे वाढेल. शिवाय इंग्रजीत नक्कल करणे खूप सोपे आहे. त्यामुळे एखादी बातमी कोणत्याही संकेतस्थळाने पहिल्यांदा दिली, की तीच Ctrl+c Ctrl+v करून जुजबी फेरफार केले, की दुसऱ्या संकेतस्थळांवर दिसायला लागते. अगदी अल्पावधीत ती इतक्या ठिकाणी पसरते, की मूळ बातमी देणाऱ्याचे संकेतस्थळ पाहण्याची कोणाला गरजही पडत नाही. मायकेल जॅक्सनच्या मृत्यूची बातमी सर्वात आधी टीएमझेड या संकेतस्थळाने दिली होती. मात्र भाव खाल्ला लॉस एंजेलिस टाई्म्सच्या संकेतस्थळाने. त्यामुळे मर्डोकसाहेब बोलले ते खरं आहे. मात्र त्यात एक मेख आहे.

बातमी देणाऱ्याने आपले हात आखडते घेतले तरी वाचणाऱ्याला ती वाचायची उत्सुकता हवी. मर्डोक यांच्याकडे वॉल स्ट्रीट जर्नल, फॉक्स न्यूज, स्काय न्यूज अशी यशस्वी ब्रांड्स आहेत. त्यातील डब्लूएसजेने मजकुरासाठी मोबदला घेण्याची पद्धत आधीच राबविली आहे. अन्य संकेतस्थळांवरील मजकुरासाठी तसेच पैसे मोजण्याची वाचकांची इच्छा आहे का, हाच कळीचा प्रश्न आहे. अन् वाचकाने पैसे मोजले तर त्याबदल्यात त्याला त्याच प्रतीचा मजकूर मिळेल, याची काय व्यवस्था आहे. मर्डोक यांच्या मुलाखतीनंतर अनेक ठिकाणी, अनेक फोरमवर चाललेल्या चर्चेचा इत्य़र्थ हाच आहे. इंटरनेटवरील मुक्त आणि मोफत माहितीची सवय झालेला वाचक खिशात हात घालून बातमी वाचणार का, हा मोठा सवाल आहे. या प्रश्नाचे उत्तर खुद्द मर्डोक यांच्याकडेही नाही.

दरम्यान, गुगलने आपली बाजू स्पष्ट करताना म्हटले आहे, की आम्ही वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवर दर महिन्याला अब्जावधी वाचक (किंवा प्रेक्षक म्हणा) पाठवत असतो. (त्यातील गोम अशी, की गुगल हजारो वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांची यादी सादर करतो. अब्जावधी वाचक हजारो संकेतस्थळांवर सरासरी दीड मिनिटांसाठी गेल्यानंतर ते कोणत्या जाहिरातींवर क्लिक करणार आणि त्यातून वृत्तपत्रांना काय डोम्बले मिळणार). या वाचकांना खिळवून ठेवण्याची, त्यांना आपल्या व्यवसायाशी बांधून ठेवण्याची संधी प्रकाशकांना (म्हणजे संकेतस्थळ मालकांना) मिळते. प्रकाशकांना वाचक हवे असतात म्हणूनच तर ते मजकूर प्रकाशित करतात. शिवाय आपल्या संकेतस्थळांवर काय असावेनसावे याचे पूर्ण स्वातंत्र्य संकेतस्थळधारकाला असते.

आता सामना सुरू झाला आहे आणि तो अनेक वळणे घेत जाणार आहे. पाहूया पुढे काय होते ते.