चार एक्क्यांचा डाव

हाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे कवित्व अद्याप सुरू आहे. मनसे फॅक्टर आणि शिवसेनेची हार ही या निवडणूक निकालांची वैशिष्ठ्ये असल्याचे सांगण्यात येते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे झालेले पुनरागमन अनेकांना रुचलेले नाही. मलाही. मात्र शेवटी हा राजकीय व्यवस्थेचा अटळ परिणाम आहे. तो नाकारून कसा चालेल. मात्र राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने या निकालांमुळे मोठा फायदा झालेला आहे. पुढील काळात राज्याला दिशा देऊ शकतील, असे चार नेते या निवडणुकांमुळे महाराष्ट्राच्या समोर आले आहेत. म्हणजे ते आदी होतेच, मात्र त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या धोरणीपणाची चुणूक याच वेळेस दाखविली.

राज ठाकरे

हा यंदाच्या निवडणुकीतील हुकुमाचा एक्का. राज ठाकरे आणि त्यांची मनसे गेल्या वर्षभरापासून चर्चेत होती. राज्याबाहेरच्या माध्यमांमध्ये आणि लोकांमध्येही मनसेच्या प्रदर्शनाबाबत खूप उत्सुकता होती. ती वावगी नव्हती हे निकालांनी सिद्ध केले. 2008च्या जानेवारीत राज ठाकरेंनी मराठीपणाचा मुद्दा उचलला आणि जणू एखाद्या मधमाशाच्या पोळ्यात हात घातला. या दीड वर्षात त्यांनी जेवढ्या शिव्या खाल्ल्या असतील, जेवढा अपप्रचार झेलला असेल तेवढा देशात कोणीही झेलला नसेल. न्यायाधीशांच्या निकालपत्रातही त्यांचे दाखले देण्यात येतात, म्हणजे बघा.

मनसेच्या यशामागे राज ठाकरे यांच्याकडे असलेली शिवसेनाप्रमुखांची शैली, त्यांची ढब आहे, हे खरेच. मात्र त्यांनी केलेले इम्प्रोव्हायजेशन, कालसुसंगत बदल फारसे कोणी नोंदले नाहीत. बाळासाहेब हा शिवसेना नावाच्या भव्य व्यासपीठावरचा एकपात्री खेळ होता. त्यांच्या ओघवत्या शैलीत आणि संवादात्मक भाषेत त्यांनी टीका करावी, शिव्याशाप द्यावेत यात कोणाला काही खटकत नसे. राज ठाकरे टीका करतात, नकला करतात मात्र राजकीय व्यासपीठावरून ऐतिहासिक दस्तावेजांचे दाखले देणारा सध्याच्या काळात ते एकमेव नेते आहेत. ही त्यांनी खास कमावलेली शैली आहे. शिवसेनेत असताना ते कधी असे करताना दिसत नव्हते. याकामी त्यांना त्यांच्या अनेक साथीदारांची मदत मिळते, हे खरे असले तरी पी. एचडीच्या प्रबंधात शोभेल अशा संदर्भाच्या टीपण्या जोडत राजकीय भाषण करायला जाण लागते ती खास ठाकरे यांची देणगी.

सगळं जग टीका करत असताना, वेड्यात काढत असताना राज यांनी स्वतःचा पक्ष वाढविला. त्याला मुख्य प्रवाहात आणलं. त्यांच्या या आत्मविश्वासाला दादच द्यावी लागेल. पुण्यात जर्मन शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा व्हावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या. अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर खटले भरल्या गेले. त्यातले सगळेच जसे राजकीय सुडबुद्धीने भरलेले नाहीत तसे सगळेच जेन्युइनही नाहीत. काही लोकं पक्ष सोडून गेले आणि जाताना नाना आरोप करून गेले. मात्र अशा परिस्थितीतही मनसेचे इंजिन ट्रॅकवर ठेवण्यात राजना यश आलं. मनसे म्हणजे गुंडगिरी असं म्हणणाऱ्यांना ही एक चपराक आहे.

मनसेतला मोठा दोष म्हणजे एका नेत्यावर अवलंबून असला तरी त्या नेत्याच्या आदेशावर चालणारा तो पक्ष नाही. कार्यकर्ते स्वतःच्या विचारानुसार काहीतरी करतात आणि नेते त्याचे समर्थन करतात, असं चाललं आहे. राजचा राज्याभिषेक झाला आहे मात्र त्यांचे अष्टप्रधान मंडळ अस्तित्वात यायचं आहे. बाळासाहेब स्वतः जेवढे मोठे झाले तेवढेच त्यांनी मनोहर जोशी, सुधार जोशी, छगन भुजबळ, नारायण राणे यांना मोठे केले. मनसेत राज वगळता कोणाचीही सार्वत्रिक ओळख नाही. मनसेचे आमदार तर निवडून आले, आता त्यांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजेत, काम करायला पाहिजे यावर माझा विश्वास नाही. तसं असतं तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन्ही निवडणुकांत विजय मिळाला नसता. त्या साधूने सापाला दिलेला सल्ला आजही तितकाच खरा आहे, “डसू नको पण फणा काढायला काय हरकत आहे?”

अजित पवार

एका पुतण्याने स्वतःचा पक्ष काढून तो यशस्वी करावा आणि दुसऱ्या पुतण्याने काकांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करावा, हा अगदीच योगायोग आहे. यंदाची निवडणूक ही अजितदादांनी अगदी अस्तित्वाची लढाई बनविली होती. त्यामुळेच कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला 20 जागा कमी मिळाल्या आणि अजितदादांचे 15 ते 20 समर्थक अपक्ष आमदार बनले, या योग जुळून आला. खुद्ध पुणे परिसरात तीन आमदार अजित पवार यांना मानणारे आहेत आणि तिघेही बंडखोर असावे, याची संगती त्याशिवाय लागणारी नाही. शिवाय पक्षातर्फे निवडून आलेल्यांमध्ये दादांना विरोध करण्याचा प्राज्ञा कुठे आहे.

आपण केंद्रात पंतप्रधान व्हावे आणि सुप्रिया सुळे यांना वारसदार नेमावे, ही शरद पवार यांची मूळ योजना. लोकसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत ती कागदावर भक्कम वाटायची. मात्र त्या निवडणुकीच्या निकालानंतर योजनेचाही निक्काल लागला आणि अजितदादांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यदाकदाचित राष्ट्रवादीचे अधिक आमदार निवडून आले असते, तर सुप्रियांना मुख्यमंत्री करण्याची चाल साहेब खेळणे शक्य होते. त्यातूनच अजितदादांच्या माणसांना तिकिटवाटपात झुकते माप देण्यात आले नव्हते. केवळ मुख्यमंत्रिपद घ्यायचे यासाठी दोनदा उपमुख्यमंत्रिपद नाकारणाऱ्या अजितदादांच्या हा प्रतिष्ठेचा प्रश्न होता. निव़डणुकीपूर्वी पुण्यात मनसेचीही सरकार स्थापनेसाठी मदत घेता येऊ शकते, ही त्यांची सूचना हा केवळ बोलभांडपणा नव्हता. तो एक गर्भित इशारा होता. आताही उपमुख्यमंत्र्याच्या निवडीवरून जो गोंधळ त्यांनी घातला, तो फुकाफुकी केलेला तमाशा नव्हता. शरद पवार यांच्या अगदी ऐन भराच्या काळात त्यांना स्वतःचे जास्तीत जास्त 60 आमदार निवडून आणता आले. आता पक्षातले 10 ते 15 आणि बंडखोर 15 असे 30आमदार आपण निवडून आणू शकतो, हे अजितदादांनी दाखवून दिले आहे.

राजकारण हा रमीच्या डावासारखा असतो. त्यात केवळ एक्का हातात असून चालत नाही. राजा, राणी असा सिक्वेंसही जुळावा लागतो. शिवाय जोकरचाही जोर पाहावा लागतो. दादांना कदाचित हे यावेळी जमले नसेल. ज्यावेळी त्यांच्या हातात सिक्वेंसचे पत्ते येतील, त्यावेळी राज्यात पुलोदच काय, वसंतदादांचीही पुनरावृत्ती होऊ शकते, हे या निवडणुकीचे इंगित.

अशोक चव्हाण

अशोक शंकरराव चव्हाण महाराष्ट्राला नवी दिशा देऊ शकतील, हे विधान प्रचंड वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. अकरा महिन्यांपूर्वी त्यांना मुख्यमंत्री केले तेव्हा कॉंग्रेसला पराजयाचे डोहाळे लागले आहेत, असा सूर काढला गेला. त्यांच्या कर्तृत्वावर विरोधकांचा सोडा, त्यांच्या स्वपक्षीयांचाही विश्वास नव्हता. मात्र नांदेड जिल्ह्यात स्वतःच्या राजकारणाची शैली बदलण्याऱ्या चव्हाण यांनी वडिलांच्या राजकारणापासून फारकत घेऊन, नाना क्लृप्त्या लढवून आपल्या पक्षाला विजयी केलं. तोंडाची वाफ फारशी न दवडता प्रतिस्पर्ध्यांची हवा काढण्याचं तंत्र चव्हाण यांनी राबवलं. त्यामुळेच बाळासाहेब शिवरकर, प्रताप पाटील चिखलीकर असे विलासराव समर्थक घरी बसले. राणेंच्या स्वतःच्या जिल्ह्यात पडझड पाहावी लागली.

खुर्चीत बसताच पहिल्याच महिऩ्यात चव्हाण यांनी नांदेडला स्वतंत्र विभागीय कार्यालय स्थापन करून वादाला तोंड फोडलं. पण त्यात स्वतः एका शब्दाचीही भर घातली नाही. लातूरकर देशमुख समर्थक आणि अन्य नेत्यांची ती झुंज दोन महिने चालली. त्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी स्मारकाच्या समितीवर बाबासाहेब पुरंदरे यांना घेऊन, मराठा संघटनांना उचकवलं. त्या वादात मराठा-मराठेतर असं ध्रुवीकरण झाल्याचं राष्ट्रवादीला निवडणुकीच्या निकालानंतर समजलं. गेल्या खेपेस शिवाजी महाराजांच्या नावावर नौका पार करणारी राष्ट्वादी यावेळेस त्याच शिवाजीमुळे रसातळाला गेली. आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना बेडूक म्हणून चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना भडकाविण्याचे काम केले. त्यांनी ते केळीचे साल एवढे बेमालूम फेकले, की खरोखरच राज मोठा झाल्याचा भ्रम करून घेऊन उद्धवनी सरकारऐवजी त्यांच्यावरच तोफा रोखल्या. त्या सालीवरून घसरल्याचे दादूंनाही उशिराच समजलं. सत्तेच्या रेसमध्ये कॉंग्रेसचा शंभर वर्ष जुना गाडा विनमध्य़े आणायचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.

माणसं जोडण्याचे राजकारण शंकररावांनी कधीच केले नाही. हेडमास्तर या नावानेच त्यांना ओळखले जाई. आताआतापर्यंत अशोकरावही माणसं जोडण्याच्या फंदात पडले नव्हते. मात्र गेल्या पाच एक वर्षांपासून त्यांनी स्वतःच्या शैलीत प्रचंड बदल केले आहेत. आपल्या मुख्य आधारवर्गातील प्रत्येकाला समाधानी ठेवण्याचे धोरण त्यांनी अंगिकारले आहे. एखाद्याला तोडून बोलणे, कोणाचा अपमान करणे अशा प्रकारांपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कारवर चप्पल फेकणारे चिखलीकर समर्थक किंवा हेलिकॉप्टरवर शिवनेरी येथे दगडफेक करणारे मराठा ब्रिगेडचे कार्यकर्ते, यांच्याविरोधात चव्हाण कठोरपणे बोलल्याचे वाचले किंवा ऐकले आहे तुम्ही? पक्षश्रेष्ठी या चार अक्षरी मंत्रावर चव्हाण यांची श्रद्धा आहे. ते त्यांचे बळ आहे आणि दुबळी जागाही. त्यांच्या सगळ्या चालींमध्ये ते भान बाळगलेले असते. त्यामुळेच विलासरावांप्रमाणे काही अवचित घडलं नाही तर ते आपली कारकीर्द पूर्णही करू शकतात. कारण चव्हाणांना सत्य साई बाबा जसे प्रसन्न आहेत तसे सत्तेचे बाबा कोण हेही माहित आहे.

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे हे नायकच मात्र ग्रीक शोकांतिकेतील नायकाप्रमाणे झाले आहेत. प्रतिस्पर्ध्याच्या विजयापेक्षा आपल्या पराभवाची चर्चा जास्त व्हावी, याचं शल्य त्यांना असणारच. खरं तर त्यांनी खूप मेहनत घेतली होती मात्र नाटकातील केवळ मुख्य पात्राने चांगलं काम करून भागत नाही, त्याला इतरांची तशीच जोड मिळावी लागते. त्यांच्या दुर्दैवाने त्यांना पात्रं नाही, मेषपात्रं मिळाली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी रान उठविलं असेल, मात्र त्यांनीच नेमलेल्या रामदास कदमांना मराठवाडा किंवा विदर्भात कोणती पिकं केव्हा घेतात, हे तरी माहित आहे का. बाळासाहेबांच्या सान्निध्यात अनेक कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला बहर आला. दिवाकर रावते, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे अशी अनेक नावे आहेत. उद्धव यांच्याकडे स्वतःची अशी कुठलीच नावे नाहीत. या चपलाच आपली संपत्ती आहे, असं प्रबोधनकार सांगत असल्याचं शिवसेनाप्रमुख नेहमी आठवण सांगतात. उद्धव यांची माणसं कार्यकर्त्यांना त्यांच्यापर्यंत पोचूच देणार नसतील, तर चपला अन्यत्रच वळतील. मीनाताई ठाकरे गेल्या तेव्हा मी मुंबईत होतो. त्यांच्या अस्थी राज्यभर फिरविण्यात आल्या होत्या. मुंबईच्या आमदार निवासात शिवसेना कार्यकर्ते त्या अस्थी नांदेडला नेण्यासाठी थांबले होते. त्या अस्थी मी डोक्यावर घेईन, या कारणासाठी तेव्हा भांडणारे कार्यकर्ते आज भाजपमध्ये आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत.

मी थकलेलो नाही, पराभूत नाही, हे सांगण्यासाठी उद्धव दोन दिवस न घेते तर त्यांच्या संघर्षाला उदात्ततेची किनार लाभली असती. मनसेसारखे आव्हान, भाजपसारखा आपमतलबी सहकारी, कॉंग्रेस-राष्ट्रवादी सारखे निर्ढावलेले सत्ताधारी आणि शिवसेनाप्रमुखांचा वारसा चालविण्याचे आव्हान, तेही त्यांच्यापेक्षा सर्वस्वी वेगळ्या अशा शैलीत, ही सामान्य गोष्ट नाही. उद्धव यांचा एकट्याचा खांदा त्यासाठी पुरेसा नव्हता, ही गोष्ट त्यांच्याशिवाय इतर सगळ्यांना कळत होती. मी चुकलो, असं म्हणायची पद्धत ठाकरे घराण्यात नाही. त्यामुळेच आपले धोरण चुकले, हे त्यांनी मान्य केलं नाही. उलट दोन वर्षांत मनसे फॅक्टर नाहीसा होईल, असा स्वप्नाळू आशावाद त्यांनी व्यक्त केला. नारायण राणे बाहेर पडले तेव्हा भुजबळ 1992 मध्ये बाहेर पडले आणि 1995 मध्ये आम्ही सत्तेत आलो, असा फसवा युक्तिवाद त्यांनी केला. शिवसेनेची राडा संस्कृती त्यांनी नष्ट केली हे खरे, पण त्यामुळे संघटनेची परिणामकारकता गेली त्याचे काय? असाच फसवा युक्तिवाद त्यांनी मुंबई महापालिकेतील विजयानंतरही केला होता.

उद्धव यांच्या नेतृत्वाला भवितव्य आहे का, या प्रश्नाला मी उत्तर देईल, हो आहे. निवडणुकीत जे पानिपत झालंय ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं नव्हे तर त्यांच्या माणसांचं झालंय. काही झालं तरी 44 आमदार त्यांनी स्वबळावर निवडून आणलेत. रणांगणात स्वतः उतरून दिशा देण्याची ताकद त्यांच्यात आहे, प्रश्न आहे तो त्यांच्या माणसांची पारख करण्याचा आणि माणसांवर विश्वास टाकण्याचा. आनंद दिघे यांनी स्वतःचे साम्राज्य स्थापन केले तरी बाळासाहेबांनी कधी ठाण्यात लुडबुड केली नाही. कारण त्यांनी काही केलं तरी फायदा संघटनेचा होतो, हे तत्व बाळासाहेबांनी बाळगलं. बाकी काही नाही तरी उद्धवनी तो कित्ता बाळगावा.