कस्त्वं कोऽहं कुत आयातः

मी कोण हा मानवाला पडलेला पहिला प्रश्न आणि त्याचे उत्तर आजतागायत तो शोधतोच आहे. मी कोण हा प्रश्न जसा माणसाला पडतो, तसाच माझा कोण किंवा आपला कोण हाही प्रश्न त्याला फार चटकन पडतो. जे माणसाचे तेच देशाचे. तेच राज्याचे. त्यामुळेच महाराष्ट्रात मराठी माणसाच्या नावाने आंदोलने सुरू झाली, की मराठी कोण आणि उपरा कोण असा वाद सुरू होतो. भारतातही राष्ट्रियतेचा वाद असाच माजलेला आहे. त्यातही काही समूह, काही देश स्वतःची वेगळी अशी ओळख जपतात. मात्र आपण कोण याचा धुंडाळा एक राष्ट्र म्हणून घेणारे देश विरळेच. सध्यातरी हा देश आहे फ्रांस. गेल्याच आठवड्यात मी फ्रांसमधील राजकीय घडामोडींवर लिहून, त्याचा आपल्या देशाशी संबंध जोडला होता. त्यातच याही आठवड्यात तशीच एक घटना घडली, जी आपल्या दृष्टीने रिलिवंट किंवा संबंधित आहे म्हणा.

फ्रांसचे गृह मंत्री एरिक बेसाँ यांनी फ्रासंच्या राष्ट्रीयतेवर, फ्रेंच म्हणून असलेल्या ओळखीबाबत चर्चा सुरू केली आहे. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत देशातील आणि फ्रांसबाहेर असलेल्या फ्रेंच वसाहतीतील नागरिकांना या चर्चेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र संकेतस्थळही सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मूळ फ्रेंच नागरिक आणि परकीय नागरिक यांच्यात तणावाचे अनेक प्रसंग आले. 2005 साली तर या तणावाने दंगलींचे स्वरूप घेतले. शिवाय धार्मिक चिन्हांवर बंदी घालण्याचा विषय तर फ्रांसमध्ये अनेक वर्षे वादाचा विषय आहे. बेसाँ यांनीच गेल्या आठवड्यात बुरख्यावर बंदी घालण्याचे सूतोवाच केले होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या लोकशाहीच्या तत्वांची देणगी फ्रांसने जगाला दिली आहे. मात्र तेवढे पुरेसे नाही. आताच्या काळाला सुसंगत अशी ओळख आपण निर्माण केली पाहिजे. त्यामुळेच नागरिकांनी या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन बेसाँ यांनी केले आहे.

हे झाले फ्रांसचे. आपण मारे विविधतेत एकता, गंगा जमना संस्कृती वगैरेंच्या गप्पा करतो. मात्र भारतीय म्हणजे काय याचा आपण कधी विचार केलेलाच नाही. भारतीय सोडून द्या, अगदी महाराष्ट्रीय म्हणजे कोण, याचीही आपण चर्चा केलेली नाही. कोणीतरी येतं आणि मराठी माणसावर अन्याय होतो म्हणतं. पण मराठी माणूस म्हणजे नक्की कोणता, हे कोणीच सांगत नाही. मागे एकदा मॅक्स मुल्लर भवनने जर्मन भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेतली होती. त्यावेळी कॅनडात राहणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याने छान निंबध लिहिला होता. कॅनडात असताना मी भारतीय असतो, भारतात आल्यावर अनिवासी भारतीय असतो, काहीजण मला दक्षिण भारतीयच म्हणून ओळखतात, माझ्या राज्यात गेल्यावर मी चेन्नईवाला असतो, चेन्नईला गेल्यावर मी हिंदू असतो, हिंदूंमध्ये मी ब्राह्मण असतो आणि ब्राह्मणांमध्येही मी अमुक शाखेचा असतो…इत्यादी.

खऱोखरच आपल्यालाही ही समस्या जाणवत असते. मी कोण म्हणून कसं सांगायचं. आता माझ्याबद्दलच सांगायचे तर पुण्यात मी मराठवाड्यातला त्यातही नांदेडचा असतो. नांदेडला गेल्यावर इतक्या वर्षांच्या पुण्यातील वास्तव्यामुळे सगळे मला पुणेकरच म्हणतात. पुण्यात आल्यानंतर अनेक दिवस विचित्र उच्चारांमुळे माझ्याशी कोणी मराठी बोलायचेच नाही. दक्षिण भारतीय गाण्यांच्या आवडीमुळे मला अनेक लोकं दाक्षिण्यात्यच समजायचे. दाक्षिणात्य लोकांच्या दृष्टीने मी नेहमीच मराठी माणूस होतो. आज का आनंदमध्ये असताना तर सगळे हिंदी भाषक मला माझ्या मराठीपणाची जाणीव करून देत असत. तो त्यांच्या व्यावसायिक अस्तित्वासाठीच्या संघर्षाचा भाग होता, ही गोष्ट वेगळी.

‘अपनी खुदी को जो समझा, उसने खुदा को पहचाना ,’ अशी ओळ एका जुन्या गाण्यात मी ऐकली होती. मग भारतात एवढ्या प्राचीन काळापासून ऋषीमुनी काय सांगत होते? स्वतःला ओळखा म्हणजे तुम्हाला भगवंत मिळतील, अशीच त्यांची शिकवण होती. तरीही भारतात, महाराष्ट्रात आजपर्यंत या विषयावर कोणीच काही बोलले नाही. भारतीय असणे म्हणजे काय, मराठी माणसाचे लक्षण कोणते, भारतीय माणसाचे गुणधर्म काय, भारतीय नागरिकाचा ठळक अंगभूत गुणविशेष काय याबाबत आजवर आपण चर्चाच केली नाही. त्यामुळेच जगातील दृढतम वर्णव्यवस्था असूनही आपण स्वतःला वर्णविद्वेषविरोधातील लढ्याचे नेते समजतो. मूळ लढवय्या असलेला समाज स्वतःला शांततेचा अग्रदूत म्हणवून घेतो आणि आपसातच लाथाळ्या करून एकमेकांची डोकी फोडतो. अशी चर्चा आपल्याकडे व्हायलाच हवी, होऊ दे थोडी वादावादी आणि आरोप-प्रत्यारोप…पण काहीतरी चांगले हाती लागेल. ते एक वाक्य आहे ना…तुम्ही तारे वेचण्यासाठी जाता तेव्हा अयशस्वी होता. मात्र परत येताना तुमचे हात चिखलाने भरलेले असतील, असंही नाही ना.