आज खरी विधानसभा जनसभा झाली

महाराष्ट्राच्या विधानसभेत चार आमदारांनी गोंधळ काय घातला, त्या आमदारांना चार वर्षांसाठी निलंबित करण्याचे मोठे पाऊल सरकारने उचलले. ज्या त्वरेने हर्षवर्धन पाटील यांनी प्रस्ताव मांडला आणि तो मंजूरही झाला, त्याच तडफेने सरकारने येत्या काळात काम केले तर पुढील चार-पाच सरकारांना राज्यात करण्यासारखे काहीही काम उरणार नाही. मात्र सरकारला चाळीस वर्षांपासून यशस्वी ठरलेली रोजगार हमी योजनाच आणखी यशस्वी करायची असल्याने, भावी सरकारांचा रोजगार हिसकावून घेण्याची आगळीक ते करणार नाही.

विधानसभेत अबू आझमी यांना थोबाडीत मारून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा घालविली, यामुळे पुरोगामी आणि वैचारिक महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे, राडा संस्कृतीची ही पुढची पायरी आणि राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच एवढी अधोगती गाठल्या जाणे हा दैवदुर्विलास आहे….इ. इ. मला या चार ओळी लिहिताना धाप लागली. मात्र अशा चार-चार स्तंभी (पाचवा स्तंभही भरू शकतो मात्र त्याला पंचमस्तंभी म्हणायचे नाही) लेख येत्या काही दिवसांत अगदी धो-धो येणार. नाहीतरी अद्याप जाहिरातींचा रतीब पूर्वासारखा सुरू न झाल्याने जागा कशी भरायची, हा प्रश्नच आहे. मराठी आणि इंग्रजीतील स्वतःला शहाणे समजणाऱ्या पत्रकारांच्या लेखणीला धार येईल.

मात्र कधी न कधी विधानसभेत हे व्हायचेच होते. ज्या विधानसभेत एक सदस्य दुसऱ्यावर पेपरवेट फेकतो, ज्या विधानसभेत माईक आणि राजदंडाची पळवापळव करण्याचे सामाईक वरदान विरोधी पक्षांना मिळाले आहे त्या विधानसभेत सदस्यांनी पडेल चेहऱ्याने चर्चा करावी, ही अपेक्षाच नाही. पाण्याच्या प्रश्नावर मोर्चे काढल्यानंतर बंदुकीतील गोळ्यांना बळी पडणाऱ्या, पुतळ्यांना कोणी हात लावला म्हणून जीवंत माणसांना माणसातून उठविणाऱ्या, वाहतुकीचे नियम मोडले म्हणून कारवाई केल्यास पोलिसांवर डाफरणाऱ्या आणि गंमत म्हणून लोकल गाड्यांवर दगड फेकणाऱ्या लोकांचे प्रतिनिधी एकमेकांशी मुद्याला धरून बोलताहेत, हे चित्रच अनैसर्गिक आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत गेली पन्नास वर्षे अपवाद वगळता हे चित्र अगदी रंगवून-रंगवून प्रदर्शित करण्यात आले. मात्र त्याचे प्रदर्शनीय मूल्य आता संपले असून वास्तविक होण्याचे दिवस आले आहेत, या राज्यस्थापनेला पन्नास वर्षे होत असतानाच दाखवून दिल्याबद्दल खरे तर मनसे आमदारांचे आपण आभारी असायला हवे.

राज ठाकरे याच्या 13 नवनिर्माण सैनिकांपैकी चारांची गच्छंती झाल्याने आता त्यांच्या आमदारांची संख्या 9 वर आली आहे. त्यांना ही संख्या लाभदायक आहे म्हणे.  सभागृहाने या सदस्यांना चार वर्षांसाठी निलंबित करण्याऐवजी डायरेक्ट बडतर्फ का केले नाही, हे गौड’बंगाल’ कोण उलगडील बरे. या चार जागांवर कदाचित निवडणूक झाली आणि जादा मतांनी हे चौघे निवडून आले तर कोण उगाच विषाची परीक्षा घ्या.  त्यापेक्षा हे बरे आहे. प्रत्येक प्रसंगात बरेपणा पाहण्याच्या या गुणाला कधीकधी चाभरेपणा असंही म्हणतात. आपल्या विधानसभेच्या सदस्यांना त्यांच्या अंगावर कोणी हात टाकलेले आवडत नाही. त्यासाठी कोणत्याही पद्धतीचा अंगिकार करण्याचे त्यांना वावडे नाही. सात-आठ वर्षांपूर्वी मराठवाड्यातील विना-अनुदानित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सभागृहातच आमदारांच्या अंगावर उड्या मारल्या होत्या. त्यावेळी सभागृहात चर्चाच चालू होती आणि पोरं प्रेक्षक गॅलरीत बसली होती. उड्या मारल्यानंतर सर्व आमदारांनी त्या पोरांना तर चोप दिलाच नंतर त्यांना पोलिसांनीही ताब्यात घेतले. आता मारणारे आणि मार खाणारेही सभागृहाचेच सदस्य असल्याने अॅक्शनपट अधिक रंगणार आहे.

त्यामुळे मनसेचे सदस्यहो, तुम्ही बिल्कुल मनाला लावून नका घेऊ. महाराष्ट्राच्या सध्याच्या मानसिकतेला साजेसेच कृत्य तुम्ही केले आहे. रिझल्ट ओरिएंटेड अशा या मार्गाची कास धरल्याशिवाय, विकासाची सुतराम शक्यता नाही, हे लक्षात घ्या. पारंपरिक मार्गाने जाल तर फार फार तर राळेगण सिद्धीपर्यंत पोचाल. त्यापेक्षा सर्व सिद्धीला कारण ठरणाऱ्या या मार्गावरून तुम्ही जसजसे जाल, तसतसे अधिकाधिक लोकप्रिय व्हाल. कारण, सध्याच्या काळात कोणालाही प्रिय व्हायचे असेल तर अन्य कोणाल तुडविणे, बडविणे, वाजविणे (देशकालपरिस्थिती पाहून)  आवश्यक आहे. आम्हाला कोणाही आजमावून पाहू शकत नाही, हे तुम्ही दाखवूनच दिले. पूर्वी वेडात सात वीर दौडत जायचे, आता वेड पांघरून पेडगावला जाणाऱ्यांना चार जणही ठणकावू शकतात, हा या घटनेचा मथितार्थ.

……………….

वि. सू. अबू आझमी या माणसाबद्दल काहीही लिहिलेले नाही. तो उल्लेख अनवधानाने राहून गेलेला नसून, मुद्दाम केलेला नाही.