गोंधळ-धर्माचा आणि राजकारणाचा

देशाच्या राजधानीत राम मंदिर आणि बाबरी मस्जिद यांच्या पाठीराख्यांमध्ये पाठशिवणीचा खेळ चालू असताना पुण्यात काल रामकृष्ण मिशनचे स्वामी तत्वज्ञानानन्द यांचे भाषण होते. एमआयटीच्या कार्यक्रमात त्यांचे हे व्याख्यान झाले. यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, “भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे असे म्हणण्यापेक्षा तो अध्यात्मिक देश आहे, असे म्हणणे अधिक सयुक्तिक आहे. इंद्रियांमधून मिळणाऱ्या आनंदापेक्षा आत्मिक आनंद महत्वाचा आहे. हा आनंद कसा मिळवायचा हे आपलाल्या केवळ धर्मग्रंथच नाही, तर शास्त्रीय संगीत, कला आणि साहित्य यातूनही ही शिकवण मिळते.”

खरे तर अशा प्रकारची वाक्ये चोहोबाजूला अनेकजण बोलत असतात. मात्र रामकृष्ण मिशनसारख्या संस्थांमधील वरिष्ठ आणि सन्माननीय व्यक्ती वरील विचार मांडते तेव्हा त्याला वेगळा अर्थ असतो. अयोध्येतील ज्या वास्तूवरून नवी दिल्लीत गोंधळ सुरु आहे, तो धार्मिक आहे का राजकीय? म्हणजे पहा, धार्मिकता सोडा आणि भौतिकता पकडा, असा उपदेश आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी केला. त्यामुळेच रामापेक्षा रामाच्या मंदिराबाबतच या लोकांना अधिक प्रीती आहे. घ्या, तुम्हाला भौतिक विचारसरणी हवी होती ना? आता बोला, आम्ही अयोध्येतील भौतिक वास्तू आणि भौतिक जमिनीसाठी हातघाईवरच येऊ.

खरं म्हणजे, धर्म, आध्यात्मिकता आणि नैतिकता या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, हे आपल्या शिक्षणव्यवस्थेने  कधी नीट सांगितलेच नाही. धर्म म्हणजे पूजापाठ, देव-देवस्की आणि मंदिरात जाणे, अशा तद्दन बाह्य उपचारांशी जोडली गेलेली वस्तू. ‘आनंदो’ नावाच्या एका बंगाली नियतकालिकाचा आरोग्य विशेषांक एकदा माझ्या हातात पडला. त्यात बंगालमधील बहुतेक साऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती होत्या. त्यात जवळजवळ सगळ्यांनी आपण प्राणायाम करतो हे सांगतानाच, याचा कोणत्याही देवाशी संबंध नाही अशी पुस्तीही जोडली होती. कम्युनिस्ट बंगालमधील नामवंतांना आपण धार्मिक गणले जाऊ, याची कोण हि धास्ती! भारत हा आध्यात्मिक देश आहे, हि वस्तुस्थिती देशाच्या मुखंडांना मान्य करता आलेली नाही. त्यामुळे प्रच्छन्न समारंभ आणि कर्मकांड धार्मिक विचारांच्या नावावर खपविले जातात. सत्य साईबाबांना ‘वर्षा’वर बोलावणे येतात आणि पुणे जिल्ह्यात तसेच आजूबाजूला डुप्लिकेट धर्मस्थळांची रास उभी राहते. तिरुपती बालाजी, शिर्डी, पंढरपूर यांच्या प्रतिकृती एखाद्या मॉलच्या शाखा निघाव्यात तशा निघत आहेत.

गम्मत पहा, शिरगावला शिर्डीच्या नावाखाली एक राजेशाही दुकान काढले तर अर्धा अर्धा पान छापणारे वर्तमानपत्र आध्यात्मिकता शिकवणाऱ्या पुरुषांना मात्र खड्यासारखे दूर ठेवते. नवरात्रात महालक्ष्मी मंदिराचे,  गणेशोत्सवात दगडूशेठ गणपतीचे छायाचित्र छापणारे किंवा दाखविणारे, या सगळ्याची गरज नसून केवळ स्वतःकडे पहा असे सांगणाऱ्या लोकांना वगळणारच. त्यात त्यांची भौतिक गरज आहे. तुकारामांच्या देहू येथे त्यांच्या मूळ मंदिरात भाविक श्रद्धेने जातात. तिथेच आता थोड्या अंतरावर गाथा मंदिर नावाचे एक मोठे दुकान उभे राहत आहे. संगमरवराच्या या तीन माजली इमारतीत तुकोबांचे अभंग संगमरवराच्याच फारशीत कोरलेले आहेत. जोडीला तुकोबांचा भव्य पुतळा. आयुष्यभर व्यवहार न जमलेल्या तुकोबांनी जवळच्या डोंगरावर जाऊन साधना केली. अशा उंची प्रसादाची गरज असती तर त्यांनी आपल्याकडे चालून आलेल्या शिवाजीसारख्या राजाला मागितले असते. पण नाही. स्वामी तत्वाज्ञानानन्द म्हणाले, सध्या उपभोगवाद वाढत आहे. मोठ्या धर्मस्थळांच्या  प्रतिकृती काय किंवा या गाथा मंदिरासारख्या नवीन रचना काय, या आध्यात्मिकातेत शिरलेल्या उपभोगवादाचेच परिणाम आहेत. हा उपभोगवाद आहे, तोपर्यंत मंदिर-मशीद पडतच राहणार. राजकारण हे त्याचे केवळ एक रूप आहे.