तुम्ही म्हातारे होऊ नका!

“आजही मी हातात कप घेतला, की तो थरथरायला लागतो. मात्र हातात ब्रश घेतला तर तो थरथरत नाही. एखादी शक्ती माझ्याकडून हे शक्य करून घेत असावी. मात्र माझ्या हातून चांगलेच काम होत असल्याने त्या शक्तीचा मी आभारी आहे,” मंगेश तेंडुलकर बोलत होते. या वाक्यांनी मला स्वतःला आपण काय गमावले आहे, याची जाणीव करून दिली. तेंडुलकर यांच्या 50 व्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे काल बालगंधर्वमध्ये उदॆघाटन झाले. त्यावेळी त्यांनी वरील उदॆगार काढले. व्यंगचित्रे तसे पाहायले गेले तर माझी पहिली आवड. त्यात तेंडुलकरांची चित्रे म्हणजे वेगळीच खुमारी होती. त्यांच्या या वाक्यासरशी मी एकदम 1983 पर्यंत मागे गेलो.

ज्या वयात रविवारची जत्रा मुलांनी वाचू नये, असा संकेत होता त्यावेळी मी ते साप्ताहिक सर्रास वाचत असे. त्याला कारण तेंडुलकरांची व्यंगचित्रे त्यात येत असत. उरुस का अशाच काहिशा नावाने मलपृष्ठाच्या आतील बाजूस त्यांची व्यंगचित्रे येत असत. त्यात शिवाय नाटकांचा समाचार घेणारे त्यांचे खुमासदार सदरही होतेच. त्या व्यंगचित्रांनी बराच काळ प्रभावित केले होते. त्यानंतर विकास सबनीस आणि राज ठाकरे यांच्या शैलीने भुरळ घातली होती. नंतरही काही काळ या सर्वांची गाठभेट अनेक वर्षे दिवाळी अंक किंवा दैनिक वर्तमानपत्रांतून पडत होती. मग काही काळ व्यंगचित्रकार म्हणून जगण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते सगळे डाव वेगळेच पडले. आता तेंडुलकरांच्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने, त्यांच्या या वाक्याने गमावलेल्या त्या कौशल्याची आठवण झाली.

या कार्यक्रमाचे उदॆघाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी मोठे मनोज्ञ भाषण केले. “मुलगा मोठा होताना बापाला खूप आनंद होतो. मात्र आपले वडिल म्हातारे होऊ नयेत, असे मुलाला वाटत असते. वडिलांनी म्हातारे होणे म्हणजे काहीतरी गमावल्यासारखे आहे. त्यामुळे तेंडुलकर, तुम्ही म्हातारे होऊ नका. आहात तसेच राहा,” नाना पाटेकर बोलत होते. त्यांच्या या विनंतीला उत्तर म्हणून बोलतानाच तेंडुलकरांनी वरील वाक्य उच्चारले होते.

या सगळ्या कार्यक्रमात खरंच व्यंगचित्रकार झालो असतो तर…असा विचार येत होता. कार्यक्रम संपला आणि सगळ्या लोकांनी नाना पाटकेरला एकच गराडा घातला. बिचारे तेंडुलकर एका बाजूला पडले. सगळ्यांची घाई नानाची सही घेण्यासाठी. त्यावेळी व्यंगचित्रकार न झाल्याचे आयुष्यात पहिल्यांदाच समाधान वाटले!