पत्रकार दिन; दीन पत्रकार

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर (याबद्दल खरे तर संभ्रम आहे) यांच्या स्मृत्यर्थ आज आम्ही सगळ्यांनी पत्रकार दिन साजरा केला. आम्ही सगळ्यांनी म्हणजे ज्यांना वेळ मिळाला, ज्यांना वेळ काढावा लागला अशांनी. त्यात अर्थात मी नव्हतो. जागोजागी मार  खाऊन वर त्याच पत्रकारांना आपल्या धंद्याशी (आता तरी त्याला व्यवसाय म्हणण्याचे पातक करु नको) निष्ठा राखण्याचा उपदेश करण्याऱ्यांना ऐकण्याची काय गरज  आहे.

पुण्यात आज पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांवरील हल्ले असाच विषय ठेवला होता. त्यात झालेल्या भाषणांचा मतितार्थ काढायचा झाला, तर एवढाच निघेल की मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींपासून बालिशशास्त्रींपर्यंत जोमाने मजल मारली आहे. पगार नाही, सुरक्षितता नाही, साधने नाहीत आणि समाजात आता प्रतिष्ठाही नाही, अशा अवस्थेत पत्रकारांनी आता कोणत्या प्रकारची वस्तुनिष्ठ पत्रकारिता करावी, हे सांगणाऱ्यांना तरी माहित आहे का याबद्दल शंका आहे. योगेश कुटेवर हल्ला झाला, त्यानंतर त्याच्या बाजूने सेवलेकरचा निषेध करण्यासाठी तोंडदेखले का होईना, राजकारणीच पुढे आले. पत्रकारांना ज्यांचे पाठबळ असावे अशी अपेक्षा आहे ते लोकं कुठे होते?  चार दिवस पुण्यातल्या मोठ्या रस्त्यांवर आमची जमात फलक हाती घेऊन आरडा ओरडा करत होती आणि कुठल्याही व्यवस्थेवर साधा ओरखडीही उमटला नाही. आम्हीच घोषणा द्यायच्या, आम्हीच ऐकायच्या आणि आम्हीच त्याच्या बातम्या छापायच्या, असा मोठा गमतीशीर प्रसंग झाला. त्यानंतर न्यायालयात सुनावणी झाली, तेव्हा ज्यांची उभी हयात गुन्हेगारांच्या कृत्यावर काळा पडदा घालण्यात गेली त्यांनीच पत्रकारिता कशी भरकटली आहे, माध्यमांनी मूल्ये कशी पायदळी तुडविली याच्यावर भाषण दिले.

राज्य मराठी पत्रकार संघाने यंदाच्या दर्पण पुरस्कार सोहळ्यासाठी कोणाला बोलवावे मुग्धा गोडसे. वर्तमानपत्रातील पहिल्या पानावर नट्यांचे छायाचित्र छापण्याबद्दल तक्रार करता ना, घ्या, आम्ही नट्यांना आता आमच्यातच सामिल करून घेतो. त्यानिमित्ताने तरी लोक आपल्या समारंभाला येतील, अशी  संस्थेला आशा वाटत असावी. एवीतेवी बहुतांशी वर्तमानपत्रांत सदर आणि लेख लिहिण्यासाठी नेटिव्ह (म्हणजे आपल्याकडे असलेल्या) पत्रकारांऐवजी नट-नट्या किंवा खेळाडूंसारख्या सेलिब्रिटींना मानाचे पान देण्याची प्रथा पडलेलीच आहे. वैचारिक मजकुराऐवजी सध्या चारिक मजकुराला अधिक मागणी आहे. पूर्वी लोक समाजात आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी एखाद्या संपादकाने शब्द टाकावा, लेखणी झिजवावी अशी आशा बाळगायचे. आता पेपरं तुरुंगातून सुटलेल्या साबित गुन्हेगारांकडून आपल्या निष्पक्षपाती पत्रकारितेचे टेस्टिमोनियल घेत आहेत.

खरी गोष्ट अशी आहे, की समाजाला आमची गरज आहे का नाही हेच आम्हाला कळेनासे  झालंय. त्या प्रश्नावर उत्तर शोधण्यापेक्षा हे दिवस घालणे चालू आहे.  हे असे धिंडवडे काढण्यापेक्षा पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेण्याऐवजी दीन पत्रकार नावाचा तमाशा आयोजित करावा. त्यानिमित्ताने तरी लोकांना पत्रकार ही काय चीज आहे, हे कळेल.