भागवतधर्म

संघचालक मोहन भागवत

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा हाती घेतल्यानंतर मोहन भागवत यांनी भारतीय जनता पक्षाच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली. लोकसभेतील भाजपच्या पराभवानंतर त्यांनी आस्तेकदम त्या पक्षाच्या नेतृत्वातही बदल केला. मात्र मूळच्या महाराष्ट्रीय असलेल्या भागवत यांच्याकडून भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही उभारी देण्याचे काम होईल, अशी कोणाला अपेक्षा नव्हती. केवळ एका विधानाच्या माध्यमातून शिवसेनेला महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यभागी आणण्याचे काम डॉ. भागवतांनी अगदी कौशल्याने केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झंझावातामुळे आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे शिवसेना काहीशी क्षीण होत होती. अशावेळेस अगदी संजीवनी मिळावी, तशी भागवतांनी उत्तर भारतीयांचे रक्षण करण्याची घोषणा केली. उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेचे आंदोलन 2008 सालापासून चालू आहे. शिवसेनेनेही मध्यंतरी आंदोलन केले. याकाळात संघाने फारसा आवाज केला नाही. त्यामुळे नेमके आताच ही घोषणा करण्यामागचे गौडबंगाल काय असावे? त्यातही शाहरूख खानच्या विरोधात शिवसेनेने चालविलेली मोहीम संघाच्या धोरणांशी अनुकूलच होती. त्यामुळे संघाला उत्तर भारतीयांच्या समर्थनार्थ पुढे येण्याचे सकृद्दर्शनी तरी काहीही कारण नव्हते.

सकृद्दर्शनी म्हणायचे कारण, खुद्द महाराष्ट्र सरकारने मराठीच्या हिताच्या नावाखाली घेतलेले अनेक निर्णय मनसेच्या पथ्यावर पडणारे होते. त्यातून मनसेला महत्त्व देऊन शिवसेनेला खच्ची करण्याचा डाव सरकारचा होता. हा प्रकार असाच चालू राहिला तर शिवसेना आणि पर्यायाने भाजपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असते, ही गोम युतीच्या धुरिणांना आली असणारच. त्यासाठी डॉ. भागवतांनी मराठी विरूद्ध उ. भारतीय वादाचे पिल्लू सोडून शिवसेनेकडे पास दिला.  त्यांच्या विधानावर पहिली प्रतिक्रिया शिवसेनेकडून आली, याचा अर्थ तो पास योग्यप्रकारे घेतला गेला.

भागवत यांची खेळी यशस्वी झाली याची पावती काल राज ठाकरे यांच्या विधानावरून आली. जन्माने महाराष्ट्रीय तोच मराठी असं विधान करून राज ठाकरे यांनी मनसेला पुन्हा झोतात आणण्याचा प्रयत्न केला. राजकारणात वरचढ ठरण्याच्या प्रयत्नात केलेली त्यांची ही घोषणा फाऊल करण्याच्या दिशेने पुढे पडलेले पाऊल आहे. त्याचा फायदा शिवसेनेलाच होणार. त्यातून सेनेचा ‘संघ’र्ष कमी होऊ शकतो.