मोदी लिपीतील पैशाची भाषा

छायाचित्र सौजन्य: एएफपी

र्म ही अफूची गोळी आहे असं कार्ल मार्क्स म्हणतो आणि क्रिकेट हा भारताचा धर्म आहे, या दोन वाक्यांचा लसावि काढला तर, क्रिकेट ही भारतात अफूची गोळी आहे असा निष्कर्ष निघतो. हशीश बाळगल्याबद्दल कोणे काळी अटक झालेले ललित मोदी क्रिकेटच्या धंद्यात कसे काय उत्कर्ष पावले, याचे उत्तर वर काढलेल्या लघुत्तम साधारण विभाजकात आहे. धर्मनिरपेक्ष देशात लोकांना भुलविण्यासाठी प्रस्थापितांनी दोनच अस्त्रे गेल्या दोन दशकात अत्यंत प्रभावीपणे राबविली: पहिले जात आणि दुसरे क्रिकेट. त्यासाठी या नव्या धर्माचे देव आणि देव्हारेही उभे करण्यात आले. पारंपरिक धर्मावर तोंडसुख घेण्याऱ्या अनेकानाही हा नवा धर्म खूपच भावला. गेल्या दशकात त्यात बॉलीवूडचीही भर पडली. धर्म आला की पुरोहित आले आणि पुरोहित आले, की अनाचारही आला. त्यामुळेच स्वतंत्र भारतात एका मंत्र्याला त्रयस्थ बाईशी असलेल्या संबंधावरून राजीनामा देण्याची नामुष्की आली (आपल्या दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने आळ!) आणि या सगळ्या खेळात पैशांचा तमाशा कसा जोरात चालू आहे, याचे उघड्या डोळ्याने दर्शन होऊनही ना लोकांना त्याची चाड ना लोकशाहीतील राजांना.
या देशातील प्रत्येक गोष्टीसाठी राजकारण्यांना दोष देण्याची एक मध्यमवर्गीय फॅशन आहे. त्यामुळे परवा बेन्गुळूरुत स्फोट झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नेहमीप्रमाणे शाब्दिक चकमक सुरु झाली. परंतु केवळ काही मिनिटांमध्ये स्फोट झालेला असताना, पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एक जण जखमी झालेला असताना हजारो माणसे क्रिकेट सामन्याचा आनंद (!) घेत होती. जगातल्या अन्य कोणत्याही देशात हे शक्य झाले नसते. अत्यंत वैयक्तिक वर्तणुकीसाठी कलंकित झालेल्या टाईगर वूडसची प्रतिमा खालावल्यामुळे त्याच्या जाहिराती बंद करणाऱ्या कंपन्या आहेत. इकडे या देशात सट्टेबाजांशी हातमिळवणी करून, देशबांधवांशी प्रतारणा करून आणि वर परत ‘माझ्या धर्मामुळे माझ्यावर आरोप होत आहेत,’ असे आरोप करणारे महाभाग संसदेत निवडून जातात. ज्या देशातले लोक माणसाच्या जिवापेक्षा आयपीएल नामक जुगाराला जास्त महत्व देतात, त्या देशात एक थरूर गेला तरी अनेक पवार असतात. आयपीएलच्या या अफाट आर्थिक शक्तीचे महत्व ओळखल्यामुलेच तर गेल्या वर्षी ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात, निवडणुकांच्या बरोबरीने हा खेळ खेळण्यासाठी पवार साहेबांनी अनुकुलता दर्शविली होती. त्यामुळेच तर अजूनही महाराष्ट्रात आयपीएलवर करमणूक कर लागलेला नाही. पी साईनाथ यांना फक्त पेपरात छापलेल्या जाहिराती दिसल्या. त्यामागचे गौडबंगाल कुठे दिसले होते.
गेली दोन वर्षे आयपीएलच्या संदर्भात माध्यमे, राजकारणी, खेळाडू, बघे आणि धंदेवाले (व्यावसायिक असा कोणाला म्हणायचं असल्यास माझी ना नाही.) यांच्या तोंडी एकच भाषा आहे : पैशाची भाषा. त्यापुढे अन्य सगळी पापे क्षम्य मानण्यात आली. कोटीच्या खाली यायलाच कोणी तयार नाही. दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेष आहे म्हणून त्या देशाच्या अनेक गुणवान खेळाडूंना अडीच दशके मैदानापासून दूर ठेवण्यात आले. मात्र भारतीयांची गुलाम मानसिकता जोखून असलेल्या आयोजकांनी चीअरगर्ल्स मधून कृष्णवंशीय मुलींना अलगद बाहेर काढले. वास्तविक पाहता चीअरगर्ल्समुळे खेळावर बंधने येत असल्याने त्यांना मैदानापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न विकसित देशांत होत आहेत. आता नवी मुंबईत उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे म्हणे. याचा अर्थ हे सामने होईपर्यंत सामान्य लोकांच्या सामान्य हालचालींवर निर्बंध येणार. दुभत्या गाईच्या लाथा खाव्या, पण ते दुध काढणाऱ्याने, मलई खाणाऱ्याने.

जर, जोरू आणि जमीन हे अनादी कालापासून सर्व संघर्षाचे मुल आहे, असा म्हणतात. सुनंदा पुष्कर हे पात्र येण्यापूर्वी सगळेच सभ्य लोक वाटून खात होते. थरूर यांनी पहिल्यांदा या मूक आचारसंहितेचा भंग केला आणि एकच हलकल्लोळ उठला. गेली दोन वर्षे जे लोक आपसात बोलत होते ते आता उघड उघड बोलत आहेत. फक्त मोदी आणि थरूर यांच्या बोली भाषा वेगळ्या आहेत. एकाकडे पैसा आहे आणि दुसऱ्याकडे सत्ता. त्यामुळेच तीन वर्षांपासून हा नंगानाच चालू असताना झोपलेले प्राप्तीकर खाते जागे होऊन कोण किती खाते ते शोधायला लागले आहे. या खात्याच्या आणि त्यावर विश्वास असणाऱ्या काही वर्तमानपत्रांच्या म्हणण्यानुसार, सहा महिन्यांपासून ही चौकशी चालू आहे. केवळ मोदींनी थरूरशी पंगा घेतल्यानंतर चॅनेलच्या समोर कारवाई सुरु झाली.

मोडी लिपीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्यातले काना, उकार, वेलांट्या या जाणकारांनाच कळतात. संदर्भानेच त्यांचा अर्थ लागतो. आयपीएलच्या निमित्ताने चालू असलेला खेळ तसाच आहे. त्यात इतक्या लोकांचे इतके हितसंबंध जोडलेले आहेत, की आपल्याला त्यांचा कधीच तळ लागणार नाही.