फोलपटराव ट्विटरकर

छायाचित्र सौजन्य: clker.com

फोलपटराव यांचा वास्तविक व्यवसाय पत्रकारितेचा. बातम्या देणे आणि बाता मारणे, यांत त्यांचा हातखंडा. परंतु आताशा त्यांचा जास्त वेळ ट्विटरवर जात आहे. ट्विटरवर कोण काय म्हणत आहे आणि त्यामुळे कोणावर काय परिणाम होतात, याची खबरबात घेता घेता त्यांची दमछाक होत आहे. सकाळी अभिषेक बच्चनने काय ट्वीट केलं, दुपारी ऐश्वर्याने काय म्हटलं, संध्याकाळी मोदी काय म्हणाले याच्यावर त्यांना सारखं लक्ष ठेवावं लागतं. त्यात दुसरं कोणी नवीन माणूस येऊन बातम्यांमध्ये चमकू लागलं, की यांचे वांधे होतात. त्यांचे हे काम ते कशा शिताफीने आणि किती अडचणींना तोंड देऊन करतात, हे जाणून घेऊया त्यांच्याचकडून!

प्रश्नः फोलपटराव, आपण ट्विटरवर किती दिवसांपासून वावरत आहात?
उत्तरः तसे फार दिवस झाले नाहीत. काही महिन्यांपूर्वी आमच्या प्रतिस्पर्धी वाहिनीने एक बातमी केली होती ट्विटरवर एका नटीने केलेल्या खरडलेल्या कसल्याशा दोन ओळींवर त्या वाहिनीने सहा तास किल्ला लढविला. मी सकाळी बाहेर गेलो, एका राजकीय पक्षाची सभा होती असाईनमेंटसाठी. ती आटोपून परत आलो तरी यांचं तेच दळण चालू होतं. मी मनात हिशेब केला, की हे बरं आहे. आम्ही ऊन्हा-ताणात हिंडायचं आणि लोकांच्या बातम्या करायच्या. त्यापेक्षा संगणकापुढे बसायचं आणि काही मोजक्या लोकांच्या बातम्या करणं केव्हाही सोपं. मग मीही ट्विटरवर एक खातं काढलं. जेव्हढ्या म्हणून नट-नट्या, संगीतकार, खेळाडू, राजकीय नेते (हे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके) आणि नामी पत्रकार सापडले, त्यांच्या मागे लागलो (म्हणजे फॉलोइंग सुरू केलं हो!).

प्रश्न: मग आता तुमचं काम खूपच सोपं झालं असेल ना?
उत्तर : नाही हो. पूर्वी म्हणजे कार्यक्रम किंवा पत्रकार परिषद करायची असायची, तर आम्हाला नेमकी जागा माहित असायची. आता हे ट्विटरवर वावरायचं म्हणजे, किती लोकांवर लक्ष ठेवायचं, काय काय पाहायचं याची यादी करायची म्हटली तरी दमछाक होते. नुसतं चित्रपट कलावंत घेतले, तरी अख्खा दिवस पुरत नाही. अन् सगळेच काही कामाचं ट्विट करत नाहीत. त्यामुळे कधी कधी कंटाळा येतो. यात आणखी एक अडचण आहे. या ट्विटरवर फ़क्त १४० अक्षरांत सगळं म्हणणं उरकावं लागतं. आता मला सांगा, ज्या दिवशी कुठल्याही महामार्गावर अपघात होत नाही, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत किंवा परदेशी महिलेवर बलात्कार झालेला नसतो, एकही नेता मनोरंजन करण्य़ाच्या मूडमध्ये नसेल त्यावेळी एकेका दिवसाची खिंड आम्हाला या १४० शब्दांवर लढवावी लागते. सुदैवाने आमच्यापैकी कोणी अजून धारातिर्थी पडले नाही.

प्रश्न: मग तुमच्या या बातमीदारीला लोकांचा कसा प्रतिसाद आहे?
उत्तर: भरपूर. लोकांना खूप आवडतं ट्विटर आणि फ़ेसबुकच्या बातम्या. परवा, मुंबईच्या ज्या भागात जोरदार पाऊस झाला, लोकांच्या घरात पाणी शिरलं. तशाही अवस्थेत एक नवी नटी ट्विटर वापरू लागली आहे, ही आमची बातमी लोकांनी पाण्यात बसून पाहिली. परवा तर गंमतच झाली. ’रावण का झोपला,’ याबाबत ट्विटरच्या वापरकर्त्यांची एक चर्चा चालू असल्याची बातमी आम्ही ’चालू’विली. त्यावर एका प्रेक्षकाने आम्हाला एसएमएस केला: ’अरे, रावण कसा झोपेल? झोपणारा तो कुंभकर्ण!’ अशा अनेक गंमती आमचे प्रेक्षक व वाचक करतात. कारण ट्विटरवरून दिलेल्या बातम्या त्यांना स्वतःशी निगडीत वाटतात. लोकांच्या भावभावनांशी त्या जोडलेल्या आहेत.

प्रश्न: परंतु अशा बातम्यांना कितपत भवितव्य आहे, असं तुम्हाला वाटतं?
भवितव्य म्हणजे, आता यातच भवितव्य आहे. आज मोदींनी लोकांच्या उखाळ्यापाखाळ्या इथे काढल्या. उद्या नेतेगण ट्विटरवरून सांगतील, ’मी आयपीएलच्या दरम्यान, कोट्यवधी रुपये कसे पचविले, शिक्षण संस्थांच्या नावे कसे पैसे लाटले….’ इ. मग त्यावेळी शोध पत्रकारिता म्हणजे, अशा एकावर एक कडी रहस्य बाहेर काढणारे अकाऊंट शोधणारी पत्रकारिता असा अर्थ होईल. त्यामुळे आम्हा ट्विटरकरांना काही काळजी नाही.