सल्मान-ए-वालेकुम!

प्यारे सलमान भाई,

हाडाबे-अर्ज. आता हा हाडाब कुठून आला, हा प्रश्न तुला पडणार. आधीच तुझ्या अगाध व समाजहितदक्ष मेंदूवर नाना काळज्यांचा भार पडलेला असताना, अशा क्षुल्लक कोड्यांनी त्यात भर घालण्यात काय हशील? त्यामुळे मीच सांगतो. अदाब-ए-अर्ज या सुंदर अभिवादनाचे हे खास मराठी रूप अर्ज. आता मराठी लोक एका विशिष्ट प्राण्याला घालवताना हा शब्द वापरतात, याची सांगड तू घालू नको. आमच्यामध्ये अद्वातद्वा बोलून कोणी स्वतःची (असो अथवा नसो) अब्रू घालवत असेल, तरी जिभेला हाड आहे का नाही, असं विचारतात. आताशा कोणी जुन्या म्हणी वापरत नाही. पण त्यांची आठवण अधूनमधून होत असते, एवढं खरं.

ही याद आम्हाला तुझ्याएवढी कोणीही आणून देत नाही, भाई. याबाबतीत तुझा हात अथवा जबान धरणारा कोणीही नसेल, हे लिहिताना माझी कलम जराही कचरत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला किंवा जीभेला हाड नसणे, या मराठी भाषेतील वाक्यांना तमाम दुनियेपुढे उलगडण्याचा तू वसाच घेतलाय जणू. वीस वर्षांपूर्वी तू चित्रपटांत येतोस काय आणि एकामागोमाग फडतूस चित्रपट करतोस काय, सारंच अघटीत. पण ती उणीव लोकांना जाणवू देण्यासाठी तू जो काय आटापीटा करतोस, त्याची सर कोणाला नाही. तुझ्या जिभेचे दशावतार एव्हाना साऱ्या देशाने पाहिले आहेत. मग ते ‘बॉलिवूडला हलविणारा मीच माफिया’ अशी एका इमारतीत केलेली गगनभेदी मोबाईल घोषणा असो, किंवा विवेक ओबेरॉय आणि अभिषेक बच्चन यांची धुणी सार्वजनिक जागी धुण्याचे प्रसंग असो, थेटरातील कसर वास्तवात भरून काढण्याची एकही संधी तू सोडलेली नाहीस, याबद्दल तुला मनापासून शुक्रिया. या जिभेच्या नादी लागूनच नाही का राजस्थानात काही काळवीटांना तू मुक्ती दिली आणि मुंबईत काही लोकांना उंची गाड्यांखालून सफर घडवून आणलीस?

आता मी एवढं यारीमध्ये का लिहितोय? अरे, असं का करतोस? मागे मी तुझ्याबद्दल लिहिलं होतं, आठवत नाही का तुला? त्यावेळी हा जालीम समाज तुला कैदेत टाकायला निघाला होता. आता तुझ्या नावाने शिमगा वेगळा करताहेत. त्यासाठीच तुला पत्र लिहितोय. बाकी, या मधल्या काळात मी तुझ्याबद्दल काही लिहिलं नाही. पण ते यासाठी, की तुमच्या भाषेत – उस वक्त मैंने ऐरोंगैरोंपर लिखना छोड दिया था! पण भाई, या वेळेस तू चक्क पॉलिटिक्समध्ये घुसलास. पोरी आणि किस यापलिकडे दुनिया आहे, हे तरी तुला माहितंय का? अन् तू इतिहासाचा कीस पाडणार?

भाई, मी तुझ्यावर खूप रागावलोय. खूप म्हणजे खूप. अरे, क्यों का विचारतोस? नेहमीप्रमाणे तू तुझ्या विद्वत्तेचा उजेड पाडण्यासाठी आणि सखोल चिंतनातून आलेली काही मते मांडलीस. त्यावर गदारोळ होत होता. सगळं कसं स्क्रीप्टनुसार चाललं होतं. सलीमचाचांची हयात गेली स्क्रीप्टा लिहिण्यात पण त्यांनाही असलं टाईमिंग जमलं नाही कधी. गणेशोत्सवात पोलिस बंदोबस्तावर. नेते मतदारसंघात. सारखे गणपतींचे डेकोरेशन दाखवून डोकं दुखायला आलं. खबरा कुठून येणार? काश्मीर पेटलेला ठीकंय, पण त्यासाठी माणसे पाठवावी लागतात. ते कोण करणार. तुझी आयती बातमी आली होती. पाकिस्तानच्या चॅनेलशी केलेली गुफ्तगु. राज ठाकरेंनी तुझ्यासाठी शब्द टाकलेला. दुसऱ्या ठाकरेंनी ‘ठोकरे’ची पोझ घेतली. सगळं कसं सेट झालं होतं. तीन दिवस आहे नाही तो जुन्या नव्या फिल्लमांचा स्टॉक चालवून मजा करण्याचा बेत आखत होतो आम्ही. अन् फु्स्स्स्स्स! तू कम्बख्त माफी मागून मोकळा!

अरे, टाईटल साँगलाच कोणी दि एन्डची पाटी लावते का? बोल ना मला. तुझ्यासारखा अवसानघातकी माणूस पाहिला नाही मी. भाई, ये तूने गलतईच किया. हमारे पेट पे लात मार दी.

अरे भाई, तू जो बोलला होता ना त्यात फार चूक नव्हतं. पण तू पडला फिल्म स्टार. कुठं आणि कसं बरळायचं, तुला कसं कळणार. तुला माहितंय, तु जे बोलला होता तसंच काहीसं कोण बोललं होतं? शिवसेनाप्रमुख!

Talking about those who lit candles in front of Taj Hotel after the last month’s terror attacks, he said, "Those who party at the Taj have lost their watering holes. Hence this outrage. Where were these people when other terror attacks took place?"

हिंदुहृदयसम्राट तेच म्हणतात, मराठी हृदयसम्राट तेच बोलतात आणि मीही तेच बोलतो, भाई. मग तू आमच्या नावावर खपवायचं ना! तुला एक ‘राज’ सांगतो पत्रकारांचा. आपल्याला जे म्हणायचं ना, ते दुसऱ्यांच्या तोंडात कोंबायचा. कोट टाक, आरोप केला बोल. तुम्ही टपोरी लोकं पुण्याचे पेपर वाचत नाही, त्यामुळं हे सगळं शिकवावं लागतं.

और एक भाई, हे असं कुठंही बरळत जाऊ नको. खासकरून मुंबई हल्ल्याबाबत नकोच नको. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना तुझा निषेध करावा लागतो. बहोत बुरा लगता है भाई, मुझे नहीं उनको. अरे, इलेक्षनच्या वेळेस तुम्हा लोकांना फिरवावं लागतं त्यांना तुमच्या मतदारसंघात. नाहीतर कोण कुत्रं जाणार आहे प्रचार सभांना. गेल्या निवडणुकीतच नाही का तू औरंगाबाद का कुठल्याशा शहरात फिरला होतास? तू भले घरी गणपती बसवत असशील, पण उस्मानपुऱ्यातली मतं मिळण्यासाठी तुझा उत्सव करावा लागतो, भाई. एवढी मदत केल्यावर तुझाच निषेध करायचा म्हणजे काय वाटत असेल त्यांना, आँ? नाही केला निषेध तर वांधा व्हायचा भाई. तू राम गोपाल वर्माची एकही फिल्म केली नाही किंवा त्याच्या बरोबर ताजमध्येही गेला नाहीस, तुला काय कळणार भय काय असतं?

आता तुला देशभक्ताचं सर्टिफिकेट मिळालं, भाई, पण आमच्या रोजगार हमीचं नुकसान झालं, ते कोण भरून देणार? असो. पुढच्या वेळेस काळजी घे. म्हणजे माफी मागायची असली तरी जरा वेळ जाऊ दे. आम्हाला बातम्या करू दे. हजारो मुडदे पाडल्यांनतर पंचवीस वर्षांनी माफी मागूनही शेखी मिरविणारा देश आहे हा. तुला एक आठवडा कळ काढता येऊ नये?

आता तरी शहाणा हो. आता थांबतो. पत्र थोडं लांबलंय. तुला मुंबई हल्ल्यामागचे राजकारण कळते, म्हणजे लिहिता-वाचता येत असंल, असं समजून लिहिलंय. तुला जमलं नाही तर दुसऱ्यांकडून वाचून घे. आता परत तुझ्यावर इतक्यात लिहिन असं वाटत नाही. त्यामुळे ट्रेलरला फिल्म आणि बाईटला इंटरव्यू समजून घे.

तुझाच,

डीडी