‘कॉलगंधर्व’ फोलपटराव

Blog post by devidas deshpande

आपल्या गजकर्णमधुर आणि शू-श्राव्य मोबाईल साधनांसह आपल्याशी गप्पा मारण्यासाठी, म्हणजेच आपल्या कानाचे पडदे किती रिश्टर स्केलचा धक्का पचवू शकतात याची पडताळणी करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रवास करत आहेत ‘कॉलगंधर्व’ फोलपटराव . जरा कान इकडे करा पाहू. शिवाय बॅटरी सोडून वागणारे आपापले हँडसेट खिशातच ठेवा पाहू. आज ते आपल्याला काही अनमोल मार्गदर्शन करणार आहे.

आम्हीः फोलपटराव, अहो फोलपटराव. हा, आता तुमचं इकडं लक्ष इकडे गेलंच आहे तर आम्ही काही प्रश्न विचारावे का

फोलपटरावः मी नाही म्हण्लं तरी तुमी काय ना काय विचारणारच. तर विचारा काय तुम्हाला वाटत असंल तर. फक्त माझ्या वाजणाऱ्या मोबाईलबद्दल काही बोलू नका.

आम्हीः नाही म्हणजे कर्णाला जशी कवच कुंडले, तशी तुमच्या कर्णाला ही मोबाईलचे कवचच की. तर त्याबद्दलच बोलायचं होतं.

फोलपटरावः त्याचं असं आहे बगा, का दहा-वीस वर्षांपूर्वी माराष्ट्रात कर्णा नावाचा एक प्रकार होता. काही लोक त्याला लावूड स्पीकर म्हणायचं. त्याचाच अवतार आहे हा मोबाईल. म्हणजे जुना वाल्वचा रेडिओ जाऊन ट्रांझिस्टर, आन ट्रांझिस्टर जाऊन आता एफेम आला ना तसं. हे एफेम बाकी ऑटोतच जास्त ऐकू येतं. मग त्याला रेडिओ का म्हण्तात, रोडियो का नाही, हा आमचा म्हण्जे माझा प्रस्न आहे. (फोलपटरावांच्या तोंडात लालसर चोथा फिरताना दिसतो. भर गर्दीत शहर वाहतुकीची बस हेलकावे खाते आहे, तशी त्यांची लालसर जीभ त्या चोथ्यातून दंत्य आणि तालव्याचे आघाडी सरकार चालविण्याचा प्रयत्न करते.)

आम्हीः आमचा कर्ण प्राचीन काळातला होता. असो. अर्थ कळाला नाही तरी तुमच्या कानापर्यंत आमचे शब्दं पोचतात, याचा आम्हाला आनंद आहे. पण मंत्र्यांचं भाषण आकड्यांनी थबथबलेलं असतं, टीव्हीवरील मालिका नेहमी संकटग्रस्त असतात तसं तुमचे मोबाईल नेहमी आवाज का करतात. संगीताचा तुम्हाला असा रेल्वे किंवा बसमध्ये उमाळा का येतो?

फोलपटरावः अहो, संगीताचं काय म्हणता. ती आहेच भारी…

आपला नेम परत चुकला आहे. शब्द फोलपटरावांपर्यंत जातायत पण त्यांचा अर्थ पोचत नाही, असं वाटतंय. त्यामुळे आपण परत त्यांना तोच प्रश्न विचारूया. ते परत उत्तर देतायत…

फोलपटरावः त्याचं काय आहे, खरी कला लोकांमधेच फुलते. आपण जे ऐकतो, ते आणखी लोकांनी ऐकावं, त्यांनाही आनंद व्हावा, यासाठी असं पब्लिकमधे गाणं लावावंच लागतं. आता पब्लिकमधे लावल्यावर त्यांना नाराज का करावं, म्हणून ते दणक्यात लावावं लागतं. आनंद वाटल्याने वाढतो ना…

प्रश्नः हो, पण तुम्हाला जो आनंद वाटेल तो इतरांना वाटेलच असं नाही..

फोलपटरावः असं कसं बोलता तुम्ही. आनंद वाटून घेण्यावर वाढतो. आमच्यासारखे आनंदमार्गी जेवढे आहेत, त्यांच्या मोबाईलवर सार्वजनिक वाजणारी गाणी बघा एकदा. अगदी गिनी-चुनी गाणी दिसतील, म्हण्जे ऐकू येतील. याचा अर्थ बहुतके लोकांना ती आवडतात. आता थोड्या काही लोकांना नाही आवडत. ते गेले उडत. सोपं आहे. काय आहे साहेब, तुम्हा लोकांना पब्लिकमधे कसं राहावं ते कळत नाही. आता बगा, मागे ते वॉकमन नावाचं एक डबडं होतं. ते कुणी वापरत तरी होतं का. तुम्हाला वाटतं त्याची किंमत खूप होती म्हणून. तसं नाही. त्याचा आवाज होत नव्हता, त्यामुळे उठाव नव्हता त्याला. या माबोईलवर बगा आमची सोय झाली. परवा तर आमच्या गावठाणात भजनी मंडळाला नेहमीची लोकं आली मी. फक्त आमचं तात्या आणि त्यांचे दोन साथीदार. मी त्यांना दिला हँडसेट आणि लावली त्याच्यावर भजनं. त्यांना सांगितलं तुम्ही फक्त साथ द्या. आदल्या दिवशी गायब झालेली मंडळी दुसऱ्या दिवशी येऊन विचारू लागली, का काल फारच जोरदार भजन झालं. आले तरी किती लोकं?

पुढचा प्रश्न विचारण्याआधीच मोबाईलराव उर्फ फोलपटरावांच्या हातातील खेळण्याला कंठ फुटतो. ‘बेकरार प्यार है आजा,’ असं कुठली तरी महिला आळवू लागते आहे. ती रडारड ऐकून थोड्या वेळाने आतडी तुटायला लागतात. आळवणे आणि आवळणे या क्रियापदांमध्ये इतका निकटचा संबंध का, हे आता आजूबाजूच्या लोकांना लक्षात येऊ लागतं आहे. या बयेनं आणखी अंत पाहण्यापूर्वीच शांतता प्रस्थापित करण्याचा एक प्रयत्न म्हणून पुढचा प्रश्न फोलपटरावांना विचारूया.

प्रश्नः असं चार लोकांमध्ये वाजवायचंच असंल तर एखादं प्रसन्न गाणं टाळावं, याची दीक्षा तुम्हाला कोण देतं?

फोलपटरावः त्याचं म्हणजे आम्ही बाळकडूच पिलेलो असतो म्हणा ना. अशी खुशीची गाणी आम्ही ठेवितच नाही ह्यांडसेटमधे. नकोच ती किटकिट. एकदा ह्यांडसेटमधेच ठेवली नाही तर वाजणार कशी? कार्डातच नाही तर स्पीकरात कशी येणार? काय? पब्लिकमध्ये असलो का अगदी दुःखी, रडकी गाणी वाजवायची. परवा असाच पीएमटीत जाताना मी वाजवत होतो. शिवाजीनगरला उतरताना एक जवान जवळ आला. मला काय म्हण्ला, का आजवर मी म्हण्जे तो नास्तिक होता. पण स्वारगेटपासून मी जी गाणी लावली त्यामुळे त्याने देवाचा धावा केला अन् त्यामुळं त्याच्या पदरी नामस्मरणाचं पुण्य पदरात पडलं. आता साधी गाणी लावली तर हे पुण्य मिळंल का सांगा?

वास्तविक आता प्रश्न खुंटायला आले आहेत. तरीही गप्प राहिल्यास परत कोणाचा तरी प्रेमभंग चव्हाट्यावर येऊन त्याच्या आत्महत्येची दवंडी पिटल्या जाईल, म्हणून आपण चर्चा चालू ठेऊया.

प्रश्नः मोबाईलवरून संगीतप्रसाराची तुमची ही तळमळ पाहून खरं तर भातखंडे आणि पलुसकर बुवांनीही हात टेकले असते व कानाची पाळी धरली असती. (जराशी वरच्या बाजूला!) तरीही आहे त्या यंत्रात तुम्हाला आणखी काय सोयी हव्या आहेत?

फोलपटरावः नाही, आहे हे मशीन मस्त आहे. पण आमचं या कंपन्यांना एकच सांगणं आहे का हॅडसेटसोबत हे कानात घालायचं कशाला देता…उगीच खर्च वाढतो. त्यापेक्षा विदाऊट हे (म्हणजे इअरफोन!)द्या तेव्हा हँडसेट आणखी स्वस्त होतील. पुन्हा मोबाईल विकतानाच त्यात अशी गाणी घालायला सांगितलं पाहिजे. म्हण्जे आमच्यासारख्या लोकांचे कष्ट वाचतील…

फोलपटराव त्यांच्या मागण्या मांडत असतानाच आपला स्टॉप आलेला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या असुरांबोसत मोकळे सोडून आपण त्यांच्या निरोप घेऊया. नमस्ते.

मुख्यमंत्र्यांची ऐपत

Ashok Chavan chief minister of mahasrashtraअशोकाच्या झाडाला ना फुले ना फळे. या झाडाच्या नादाला लागू नका!

सुमारे एक महिन्यापूर्वी अजित पवार यांनी काढलेले हे उद्गार खोटे ठरविण्यासाठी की काय, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अशोकाच्या झाडाला शब्दार्थ लागत असल्याचे दाखवून दिले. एखाद्या माणसाची नीयत म्हणजे त्या झाडाची ऐपत, असा एक वेगळाच अर्थ त्यांनी मराठी भाषेला प्रदान केला. इतके दिवस नीयत म्हणजे दानत असा अर्थ आम्हाला माहीत होता.

एका पत्रकार परिषदेच्या आधी गाफीलपणे बोलत बसलेल्या माणिकराव ठाकरे आणि सतीश चतुर्वेदी यांच्या संभाषणाला स्टार माझा वाहिनीने पकडले. त्यात माणिकराव म्हणतात, मुख्यमंत्र्यांची नियत नाही पैसे देण्याची. स्टार माझाने चव्हाणांना या बातमीवर प्रतिक्रिया विचारली, तेव्हा चव्हाण म्हणाले, “माणिकराव हिंदीत बोलत होते. त्यांना म्हणायचे होते मुख्यमंत्र्यांची ऐपत नाही दोन कोटी रुपये देण्याची.” हे वाक्य ऐकून तमाम महाराष्ट्राच्या काळजाचा ठोक चुकला असेल. देशातील सर्वात प्रगतीशील राज्याचा मुख्यमंत्री, ज्याच्या घरात वडील व मुलगा मिळून चार दशके सत्ता राबली, त्याची ऐपत नाही दोन कोटी रुपये देण्याची!

तशी अशोकरावांची परिस्थिती बेताचीच. ते त्यांनी व त्यांच्या गृहमंत्र्यांनीही अनेकदा जाणवून दिले आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लोकराज्यच्या खाद्य विशेषांकात अमिताभाभींनीच मुलाखतीत सांगितले होते, "मी धान्य दळून आणते व तेच शिजवते.” आज मध्यमवर्गातही नित्याची झालेली विकतच्या पीठाची सोय ज्या कुटुंबाला परवडत नाही, ते कुटुंब अगदीच गरीब म्हणायचे. त्या मुलाखतीनंतर सहा महिन्यांनी आलेल्या निवडणुकीतही चव्हाण यांनी संपत्तीच्या विवरणात ट्रॅक्टर आणि ट्रॉली दाखविल्या होत्याच की! मुख्य म्हणजे, त्या विवरणात अशोकराव किंवा त्यांच्या संपूर्ण कुटंबात एकही मोटार नाही. कदाचित ट्रॅक्टर भाड्याने देऊन त्यांची उपजीविका चालत असेल.

महाराष्ट्रातील जमिनी विकून त्यातील वाटा जनपथावरील ‘आम आदमीं’ना पोचविण्याचे व्रत घेतलेल्या राज्यकर्त्यांना (आठवा सिडको जमीन विक्री गैरव्यवहाराच्या बातम्या) दोन कोटी रुपये देणे जड व्हावे, ही मराठी मातीतील अस्सल ‘ब्लॅक कॉमेडी’ करून अशोकरावांनी मुख्यमंत्र्यांना कोट्या सुचण्याची परंपरा कायम ठेवली. छान आहे. याआधी बाबासाहेब भोसल्यांनी ‘बंडोबा थंडोबा झाले’ ही प्रसिद्ध उक्ती समाजाला दिली होती. बिचारे माणिकराव! त्यांना काय माहीत, मुख्यमंत्री कोट्यधीश असतात ते या अर्थाने!!

सबको वाटणी दे भगवान!

sadhu

साठ वर्षे न्यायालयात रेंगाळलेल्या आणि 150 वर्षांपासून दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करणाऱ्या एका खटल्याचा निकाल राजकीय तडजोडीतून अखेर देण्यात आला. खरं तर बाबरी वास्तूच्या जागी मंदीर होते, परंतु ते रामाचेच होते असे ठामपणे म्हणता यायचे नाही, असा निर्णय न्यायालय देईल, अशी माझी अपेक्षा होती. सकाळी मी तसेच मत व्यक्त केले होते. न्यायालयाच्या साखरपाकात घोळून दिलेली ही गोळी खटल्याशी संबंधित आणि असंबंधित अशा सर्वच लोकांना फायद्याची ठरणार आहे. कुठलाही धोका न पत्करता काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने एकमेकांच्या फायद्याचा निर्णय न्यायालयाकडून वदवून घेतला आहे.

दुपारी चारच्या सुमारास एका बेकरीवर उभा होतो (ती मुसलमानांची होती हे वेगळे सांगायला पाहिजे का?) इंडिया टीव्ही नावाची एक दिव्य वाहिनी पाहत तेथील कामगार मंडळी उभी होती. त्यावेळीच पडद्यावर ‘रामलला नहीं हटेंगे’ अशा ओळी पाहिल्या आणि बहुतेक हा निर्णय हिंदुंच्या बाजूने लागला, असे वाटले.  पडलेल्या चेहऱ्याने त्या कामगारांनीही दूरचित्रवाणी बंद केला. नंतर निर्णयातील खाचाखोचा उघड होऊ लागल्या तशा त्यातील तडजोडी समोर येऊ लागल्या.

शहाबानो खटल्याच्या घोडचुकीनंतर तिचे परिमार्जन करण्यासाठी राजीव गांधी सरकारने 1986 साली अयोध्येतील वास्तूचे कुलूप उघडून तिथे पूजा करण्यासाठी परवानगी दिली. राजीव गांधींनी दिलेला तो सोपा झेल भारतीय जनता पक्षाने घेतलाच, शिवाय नंतर शतक झळकावून सत्ताही बळकावली. श्रीरामचंद्रांच्या (अव)कृपेने आठ वर्षे वनवास भोगलेली काँग्रेस पुन्हा आपले हात पोळून घेण्यासाठी तयार नव्हतीच. त्यातही राष्ट्रकुल स्पर्धांचं भजं, काश्मीर प्रश्नाचं भिजत घोंगडं, माओवाद्यांचा आगडोंब आणि तेलंगाणाची खिचडी अशा आम आदमीच्या प्रश्नांवर, शेपटीभोवती फिरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे फिरणारे काँग्रेसप्रणीत सरकार कुठल्याही प्रश्नाचा सामना करण्यास मानसिकदृष्ट्या तयार नव्हतीच, नसणार. इकडे बाबरीच्या पतनानंतर माध्यमे आणि सेक्युलरांचे शिव्याशाप झेलणारी भाजपही आपल्यावरील कलंक पुसण्यासाठी संधीची वाट पाहात होतीच.

बिहार विधानसभेच्या निवडणुका एका महिन्यांनी होणार आहेत. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालात पुढील वर्षी त्या होणार आहेत व त्यासाठी सगळेच पक्ष आपापली हत्यारे परजून उभी आहेत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत अवचित मोठ्या जागा पदरात पडल्यानंतर काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वाचे डिंडिम वाजवायला सुरवात केली. यदाकदाचित या निकालामुळे कुठलाही एक मतदार वर्ग नाराज झाला आणि त्याची परिणती उ. प्र.मध्ये पराभवात झाली, तर युवराजांच्या राज्याभिषेकाला ते प्रतिकूल ठरले असते.

उ. प्र. मध्ये काँग्रेसची लढाई आहे ती बहुजन समाज पक्षाशी. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनेही तेथे मनोमन दुय्यम स्थान मान्य केले आहे. निकाल लागल्यानंतर दोन तासांच्या आत मायावतींनी माध्यमांसमोर येऊन केंद्र शासनाला जो गर्भित इशारा दिला, त्याची संगती ही आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, ही त्यांची भाषा काँग्रेसला कात्रीत पकडण्याचे द्योतकच आहे. मुलायम सिंहांचा बाहेरून पाठिंबा घेऊन त्यांना शह देण्यासाठीही काँग्रेसला या निर्णयाचा फायदा होईल.

डिसेंबर 1992 मध्ये कारसेवकांच्या कृत्यामुळे आणि फेब्रुवारी 2002 मधील गुजरात दंगलींमुळे भाजपवर धर्मांध पक्षाचा शिक्का बसला होता. तो पुसून काढण्यासाठी वापरलेला ‘जीना’ही भलत्याच मजल्यावर घेऊन जात होता. आपण घटना व न्यायालयाच्या निर्णयाशी बांधील आहोत, हे दाखवून देण्यासाठी भाजपला अशा एखाद्या संधीची गरजच होती. अणू करारापासून वेळोवेळी भाजपने काँग्रेसशी जुळवून घेतल्याचे जे चित्र गेले एक वर्षभर दिसत होते, त्या मैत्रीचाही एक भाग या राजकारणात असू शकतो. शिवाय काँग्रेसच्या विरोधात आक्रमकपणे उभे राहण्याची भाजपला आणखी चार वर्षे तरी गरज नाही. गेल्या आठवड्यात पी. चिदंबरम यांनी व आज लालकृष्ण अडवाणी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले ‘हा कोणाचा जय किंवा पराजय नाही,’ हे विधान कुठंतरी आतल्या समंजसपणाचेच लक्षण आहे.

आता राहिला वक्फ बोर्डाचा दावा. त्यांना या निर्णयाचा फारसा तोटा होण्याची शक्यताच नव्हती. एकतर ती वास्तू बांधली होती शिया मुस्लिमांनी. खटला लढत होते सुन्नी वक्फ बोर्ड. शिवाय निकाल त्यांच्या बाजूने लागला असता तरीही तिथे परत एखादी वास्तू उभारणे त्यांना अशक्यच होते. मग पदरात पडते आहे ती 1/3 जागा घेऊन न्यायव्यवस्थेच्या नावाने चांगभलं म्हणण्यात त्यांचंही काही नुकसान नव्हतंच. त्यामुळे न्यायालयाने वरपांगी हिंदुंच्या बाजूने, मुस्लिमांना न दुखावणारा आणि त्याचवेळेस आणखी कित्येक वर्षे हे लोणचं मुरवत ठेवता येईल, असा निकाल देऊन सगळ्यांचीच समजूत काढली आहे.

उच्च न्यायालयासारख्या संस्थेने राजकीय विचारातून असा निर्णय दिला असेल, हा विचार कितीही अतर्क्य वाटला तरी भारतात असं होऊ शकतं. सरतेशवटी, श्रीराम होते का नाही, याबद्दल श्री अरविंद एके ठिकाणी म्हणतातः-

ख्रिश्चन किंवा इस्लाम हे ऐतिहासिक घटना व व्यक्तींवर आधारित धर्म आहेत. त्यामुळे त्या ऐतिहासिक घटना किंवा व्यक्तींना धक्का पोचला, की त्या धर्मांची पाळेमुळे हालतात. हिंदूंमध्ये मात्र राम किंवा कृष्णासारख्या देवतांच्या ऐतिहासिक पात्रांवर भर दिलेला असतो. बहुसंख्य हिंदूंची आपल्या दैवतांवर श्रद्धा असते ती त्या दैवतांमधील तत्वांमुळे. उद्या राम किंवा कृष्ण अशा व्यक्तीच नव्हत्या, हे सिद्ध झाले तरी हिंदूंतील श्रद्धावंतांना काही फरक पडत नाही.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानिमित्ताने श्रीरामाने एक अग्निपरीक्षा दिली आणि आपण ‘होतो”  हे सिद्ध केले, हेही नसे थोडके.