‘कॉलगंधर्व’ फोलपटराव

Blog post by devidas deshpande

आपल्या गजकर्णमधुर आणि शू-श्राव्य मोबाईल साधनांसह आपल्याशी गप्पा मारण्यासाठी, म्हणजेच आपल्या कानाचे पडदे किती रिश्टर स्केलचा धक्का पचवू शकतात याची पडताळणी करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रवास करत आहेत ‘कॉलगंधर्व’ फोलपटराव . जरा कान इकडे करा पाहू. शिवाय बॅटरी सोडून वागणारे आपापले हँडसेट खिशातच ठेवा पाहू. आज ते आपल्याला काही अनमोल मार्गदर्शन करणार आहे.

आम्हीः फोलपटराव, अहो फोलपटराव. हा, आता तुमचं इकडं लक्ष इकडे गेलंच आहे तर आम्ही काही प्रश्न विचारावे का

फोलपटरावः मी नाही म्हण्लं तरी तुमी काय ना काय विचारणारच. तर विचारा काय तुम्हाला वाटत असंल तर. फक्त माझ्या वाजणाऱ्या मोबाईलबद्दल काही बोलू नका.

आम्हीः नाही म्हणजे कर्णाला जशी कवच कुंडले, तशी तुमच्या कर्णाला ही मोबाईलचे कवचच की. तर त्याबद्दलच बोलायचं होतं.

फोलपटरावः त्याचं असं आहे बगा, का दहा-वीस वर्षांपूर्वी माराष्ट्रात कर्णा नावाचा एक प्रकार होता. काही लोक त्याला लावूड स्पीकर म्हणायचं. त्याचाच अवतार आहे हा मोबाईल. म्हणजे जुना वाल्वचा रेडिओ जाऊन ट्रांझिस्टर, आन ट्रांझिस्टर जाऊन आता एफेम आला ना तसं. हे एफेम बाकी ऑटोतच जास्त ऐकू येतं. मग त्याला रेडिओ का म्हण्तात, रोडियो का नाही, हा आमचा म्हण्जे माझा प्रस्न आहे. (फोलपटरावांच्या तोंडात लालसर चोथा फिरताना दिसतो. भर गर्दीत शहर वाहतुकीची बस हेलकावे खाते आहे, तशी त्यांची लालसर जीभ त्या चोथ्यातून दंत्य आणि तालव्याचे आघाडी सरकार चालविण्याचा प्रयत्न करते.)

आम्हीः आमचा कर्ण प्राचीन काळातला होता. असो. अर्थ कळाला नाही तरी तुमच्या कानापर्यंत आमचे शब्दं पोचतात, याचा आम्हाला आनंद आहे. पण मंत्र्यांचं भाषण आकड्यांनी थबथबलेलं असतं, टीव्हीवरील मालिका नेहमी संकटग्रस्त असतात तसं तुमचे मोबाईल नेहमी आवाज का करतात. संगीताचा तुम्हाला असा रेल्वे किंवा बसमध्ये उमाळा का येतो?

फोलपटरावः अहो, संगीताचं काय म्हणता. ती आहेच भारी…

आपला नेम परत चुकला आहे. शब्द फोलपटरावांपर्यंत जातायत पण त्यांचा अर्थ पोचत नाही, असं वाटतंय. त्यामुळे आपण परत त्यांना तोच प्रश्न विचारूया. ते परत उत्तर देतायत…

फोलपटरावः त्याचं काय आहे, खरी कला लोकांमधेच फुलते. आपण जे ऐकतो, ते आणखी लोकांनी ऐकावं, त्यांनाही आनंद व्हावा, यासाठी असं पब्लिकमधे गाणं लावावंच लागतं. आता पब्लिकमधे लावल्यावर त्यांना नाराज का करावं, म्हणून ते दणक्यात लावावं लागतं. आनंद वाटल्याने वाढतो ना…

प्रश्नः हो, पण तुम्हाला जो आनंद वाटेल तो इतरांना वाटेलच असं नाही..

फोलपटरावः असं कसं बोलता तुम्ही. आनंद वाटून घेण्यावर वाढतो. आमच्यासारखे आनंदमार्गी जेवढे आहेत, त्यांच्या मोबाईलवर सार्वजनिक वाजणारी गाणी बघा एकदा. अगदी गिनी-चुनी गाणी दिसतील, म्हण्जे ऐकू येतील. याचा अर्थ बहुतके लोकांना ती आवडतात. आता थोड्या काही लोकांना नाही आवडत. ते गेले उडत. सोपं आहे. काय आहे साहेब, तुम्हा लोकांना पब्लिकमधे कसं राहावं ते कळत नाही. आता बगा, मागे ते वॉकमन नावाचं एक डबडं होतं. ते कुणी वापरत तरी होतं का. तुम्हाला वाटतं त्याची किंमत खूप होती म्हणून. तसं नाही. त्याचा आवाज होत नव्हता, त्यामुळे उठाव नव्हता त्याला. या माबोईलवर बगा आमची सोय झाली. परवा तर आमच्या गावठाणात भजनी मंडळाला नेहमीची लोकं आली मी. फक्त आमचं तात्या आणि त्यांचे दोन साथीदार. मी त्यांना दिला हँडसेट आणि लावली त्याच्यावर भजनं. त्यांना सांगितलं तुम्ही फक्त साथ द्या. आदल्या दिवशी गायब झालेली मंडळी दुसऱ्या दिवशी येऊन विचारू लागली, का काल फारच जोरदार भजन झालं. आले तरी किती लोकं?

पुढचा प्रश्न विचारण्याआधीच मोबाईलराव उर्फ फोलपटरावांच्या हातातील खेळण्याला कंठ फुटतो. ‘बेकरार प्यार है आजा,’ असं कुठली तरी महिला आळवू लागते आहे. ती रडारड ऐकून थोड्या वेळाने आतडी तुटायला लागतात. आळवणे आणि आवळणे या क्रियापदांमध्ये इतका निकटचा संबंध का, हे आता आजूबाजूच्या लोकांना लक्षात येऊ लागतं आहे. या बयेनं आणखी अंत पाहण्यापूर्वीच शांतता प्रस्थापित करण्याचा एक प्रयत्न म्हणून पुढचा प्रश्न फोलपटरावांना विचारूया.

प्रश्नः असं चार लोकांमध्ये वाजवायचंच असंल तर एखादं प्रसन्न गाणं टाळावं, याची दीक्षा तुम्हाला कोण देतं?

फोलपटरावः त्याचं म्हणजे आम्ही बाळकडूच पिलेलो असतो म्हणा ना. अशी खुशीची गाणी आम्ही ठेवितच नाही ह्यांडसेटमधे. नकोच ती किटकिट. एकदा ह्यांडसेटमधेच ठेवली नाही तर वाजणार कशी? कार्डातच नाही तर स्पीकरात कशी येणार? काय? पब्लिकमध्ये असलो का अगदी दुःखी, रडकी गाणी वाजवायची. परवा असाच पीएमटीत जाताना मी वाजवत होतो. शिवाजीनगरला उतरताना एक जवान जवळ आला. मला काय म्हण्ला, का आजवर मी म्हण्जे तो नास्तिक होता. पण स्वारगेटपासून मी जी गाणी लावली त्यामुळे त्याने देवाचा धावा केला अन् त्यामुळं त्याच्या पदरी नामस्मरणाचं पुण्य पदरात पडलं. आता साधी गाणी लावली तर हे पुण्य मिळंल का सांगा?

वास्तविक आता प्रश्न खुंटायला आले आहेत. तरीही गप्प राहिल्यास परत कोणाचा तरी प्रेमभंग चव्हाट्यावर येऊन त्याच्या आत्महत्येची दवंडी पिटल्या जाईल, म्हणून आपण चर्चा चालू ठेऊया.

प्रश्नः मोबाईलवरून संगीतप्रसाराची तुमची ही तळमळ पाहून खरं तर भातखंडे आणि पलुसकर बुवांनीही हात टेकले असते व कानाची पाळी धरली असती. (जराशी वरच्या बाजूला!) तरीही आहे त्या यंत्रात तुम्हाला आणखी काय सोयी हव्या आहेत?

फोलपटरावः नाही, आहे हे मशीन मस्त आहे. पण आमचं या कंपन्यांना एकच सांगणं आहे का हॅडसेटसोबत हे कानात घालायचं कशाला देता…उगीच खर्च वाढतो. त्यापेक्षा विदाऊट हे (म्हणजे इअरफोन!)द्या तेव्हा हँडसेट आणखी स्वस्त होतील. पुन्हा मोबाईल विकतानाच त्यात अशी गाणी घालायला सांगितलं पाहिजे. म्हण्जे आमच्यासारख्या लोकांचे कष्ट वाचतील…

फोलपटराव त्यांच्या मागण्या मांडत असतानाच आपला स्टॉप आलेला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या असुरांबोसत मोकळे सोडून आपण त्यांच्या निरोप घेऊया. नमस्ते.