दादागिरी

    राजकारण हा रमीच्या डावासारखा असतो. त्यात केवळ एक्का हातात असून चालत नाही. राजा, राणी असा सिक्वेंसही जुळावा लागतो. शिवाय जोकरचाही जोर पाहावा लागतो. दादांना कदाचित हे यावेळी जमले नसेल. ज्यावेळी त्यांच्या हातात सिक्वेंसचे पत्ते येतील, त्यावेळी राज्यात पुलोदच काय, वसंतदादांचीही पुनरावृत्ती होऊ शकते, हे या निवडणुकीचे इंगित.
 

    चार एक्क्यांचा डाव या गेल्या वर्षी लिहिलेल्या नोंदीतील हे वाक्य.  त्या नोंदीला एक वर्ष पूर्ण होत असतानाच राज्याच्या राजकारणावर अजित पवार यांनी पकड घेतल्याचे अख्ख्या महाराष्ट्राला दिसून आले. अजित पवार यांनी झपाट्याने हालचाली करून पक्ष आणि प्रतिपक्षातील धुरिणांना अचंबित तर केलेच, पण खुद्द काका शऱद पवार यांचाही रक्तदाब वाढवून ठेवला. आदर्श प्रकरणात झालेले सत्तांतर आणि त्यानंतरच्या घडामोडी बघता, हे संपूर्ण प्रकरण अजितदादांनी व्यवस्थित घडवून आणले का काय, अशी शंका येण्याजोगी परिस्थिती आहे. ज्या प्रकारे एका चेंडूत अशोकराव, विलासराव, सुशीलकुमार, नारायण राणे हे चार बळी आणि पुढच्या चेंडूवर छगन भुजबळांना धावबाद करण्यात आले, त्यावरून तरी हाच निष्कर्ष निघू शकतो.
 
    अशोकरावांनी स्वतःच्या खास शैलीत अजितरावांच्या अनेक फाईली दाबून ठेवल्या होत्या. तो कोंडमारा असह्य झाल्याने अजितदादांनी एक-दोनदा तोंडाची वाफ दवडली होती, हेही माध्यमांतून पोचविण्यात आले होते. तसं दुखणं भुजबळांनाही होतंच, पण त्यांना उपमुख्यमं‌त्रीपदाच्या खुर्चीचा आधार होता. त्यामुळे वेळवखत पाहून चव्हाणांची खुर्ची जाताच आपली राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी अजितदादांना रणांगणात उतरणं भागच होतं. गेल्यावेळेस काही कारणाने हुकलेली संधी यावेळेस परत गमावली असती, तर काकांनी आपल्याला वाचवलं नसतं, याची खूणगाठ दादांनी बांधलीच होती. त्यासाठीच राष्ट्रवादीच्या आमदारांना स्वाक्षरी मोहीम राबविण्याची स्फूर्ती मिळाली. उपमुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडल्यानंतर पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांना आनंदाचे भरते आले आणि दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांत पान-पानभर जाहिराती आल्या.
 
    महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याचा मनसुबा शरद पवारांनी बांधलेला आहे. आपण केंद्रात पंतप्रधान व्हावे आणि सुप्रियांना वारसदार नेमावे, ही पवार यांची मूळ योजना. त्यासाठी सुप्रिया सुळे यांच्यापे‍क्षा अऩ्य कोणतीही व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही, हे तर अगदीच उघड गुपित आहे. तसं झालंच,  तर आता १९९१ पासून शरद पवारांच्या दिल्लीवासात महाराष्ट्राची गादी चालविणाऱ्या अजित पवारांना उघड्यावर पडल्यासारखं वाटलं तर त्यात नवल नाही. त्यामुळेच गेल्या वेळची निवडणूक त्यांनी अस्तित्वाची लढाई लढल्यासारखी लढविली. त्यातूनच कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला 20 जागा कमी मिळाल्या. अजितदादांचे 15 ते 20 समर्थक अपक्ष आमदार निवडून आले. राष्ट्रवादीचे एकूण ७२ आमदार जमेस धरता, आपल्या समर्थक आमदारांसह वेगळी चूल मांडणे अजितदादांना अशक्य नव्हते. त्यातील धोका लक्षात आल्यानेच भुजबळांची ‘समजूत’ काढून काकांना पुतण्याचा हट्ट पुरा करावा लागला.
 
    दादांच्या धडाक्याचा धसका पुण्यातील काँग्रेसजनांनी कसा घेतला आहे, हे एकेकाशी बोलताना जाणवत होतं. अजितदादांना टक्कर देणारा सबसे बडा खिलाडीच गोचिडांनी घायकुतीला आणलेल्या कुत्र्यासारखा बावचळत असेल, तर बाराव्या तेराव्या गड्यांनी करावे तरी काय. इकडे मेट्रोचा रस्ता बंद झालेला असताना, प्रफुल्ल पटेलांकडून हवं ते विधान करून विमानतळाची हवा दादांनी तयार केली. हे असंच चालू राहिलं, तर केवळ वर्षभरावर आलेल्या पुणे पालिकेच्या निवडणुकीत आपली धडगत नाही, हे काँग्रेसजनांच्या लक्षात आलं आहेच. वास्तविक पवारांशी फाटल्यापासून पुणे काँग्रेसवर एकछत्री अंमल चालविणाऱ्या कलमाडींचा उतरता काळ ही पवारांना पर्वणी वाटायला हवी. पण पुतण्या पक्ष पळवून नेतो, म्हटल्यावर  काकासाहेबांच्याही तोंडचे पाणी पळाले. त्यामुळेच प्रणव मुखर्जींच्या संदेशांकडे दुर्लक्ष करून ते मुंबईत ठाण मांडून बसले. पुतण्या इकडे मुख्यमं‌त्र्यांच्या अखत्यारीतील विषयांच्या बैठका घेत असताना, काकासाहेब चार दिवसांत तीनदा मुख्यमं‌त्र्यांना भेटून आले. झेपत नसतानाही एवढी धावपळ करणे त्यांना भागच होते, कारण आयबीएनवर मुलाखतीत अजितदादांनी स्पष्टच सांगितले, “सुप्रियाने दिल्लीत राहावे. मला दिल्ली मानवत नाही आणि महाराष्ट्रातच राहाय़चे आहे.”
 
    दिल्लीतील विजयाची शक्यता किमान चार वर्षांसाठी दुरावलेली असताना आणि आयपीएल, लवासाच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीला बळ मिळणे नजरेच्या टप्प्याबाहेर गेले असताना, सुप्रियाताईंना दिल्लीत धाडण्याचा अर्थ जाणत्या राजाला कळणारच होता. त्यामुळे ताईंचं हित त्यांना पाहावंच लागणार आहे. शिवसेनेच्या भाऊबंदकीवर रंगणारी वृत्तपत्रांची पानं अन् वाहिन्यांच्या चर्चा आता राष्ट्रवादीतील दादागिरीच्या बातम्यांसाठीही यापुढे उपलब्ध होतील, हा चव्हाण ते चव्हाण या सत्तांतराचा मथितार्थ!

दिवाळीची धुळवड

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेला एक आठवडा जे काही नाट्य रंगले होते, त्याच्यापुढे दिवाळीतील फटाकेच काय, प्रत्यक्षातील बॉम्बस्फोटसुद्धा कमी पडतील. एकीकडे अशोक चव्हाण यांची गच्छंती होणार म्हणून देव पाण्यात घालून बसलेली माध्यमकर मंडळी, तर दुसरीकडे ‘आदर्श’ भानगडबाजांमध्ये आपलीही शिरगणती होणार का, याचा धसका घेतलेले राजकारणी असा जंगी सामना रंगला होता. दररोज नवी विधाने आणि दररोज नवी भानगडी…शंभर वर्षांची परंपरा असलेल्या दिवाळी अंकांचीही खुमारी कमी पडेल असा हा मनोरंजनाचा मसाला होता. अशोक शंकरराव चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे ऐन दिवाळीतील धुळवड संपून रंगपंचमीला सुरवात होईल, अशी आशा आहे. चव्हाणांच्या जाण्यानंतर ‘आदर्श’चा गलका थांबला, त्यावरून या प्रकरणामागे भ्रष्टाचार आणि त्याची चीड नसून, हा दुराग्रही मुख्यमंत्री कसा जात नाही ते पाहतोच, हा आविर्भाव होता हे स्पष्ट झाले आहे.
* ‘आदर्श’ प्रकरणात मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मंजूर केल्यानंतर हा राजकीय बळी असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे  यांनी दिली. त्याआधी ती जमीन संरक्षण खात्याची असेल तर प्रकरण गंभीर आहे, हे शरद पवार यांचे विधान होते. या दोन्ही विधानांचा मध्यबिंदू म्हणजे – ती जमीन संरक्षण खात्याची नाही आणि या प्रकरणात अशोक चव्हाण एकटे दोषी नाहीत. आता अशोकरावांच्या गच्छंती नंतर बाकीच्यांचे काँग्रेस पक्ष काय करणार आहे, हा पुढचा प्रश्न आहे. शिवाय अशोकरावांनीही गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारून राजीनामा नाही दिलेला, तर सोनियाजींनी आदेश दिल्यामुळे खुर्ची सोडली आहे.
* शंकरराव चव्हाण हे सलग ३४ वर्षे मंत्रीपदी राहिलेले देशातील एकमेव राजकारणी होते. संजय गांधी यांच्या चपला उचलण्यासारखे आगळे कृत्य त्यांच्या नावे असले तरी कारकिर्दीत कधीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले नाहीत. त्यांचे चिरंजीव अशोकराव यांना याच आरोपातून राजीनामा द्यावा लागला, ही काँग्रेसोचित विसंगती होय. शंकररावांचे राजकीय शिष्य विलासराव देशमुख यांच्यावर असे कित्येक आरोप झाले, पण त्यांना राजीनामा कधी द्यावा लागला नाही.
* ‘आदर्श’ भानगडीच्या आधी काही दिवसांपूर्वीचा घटनाक्रम पाहिला तर मोठे गमतीदार दृश्य दिसतं. आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे गाफिलपणे मुख्यमंत्रांचा उद्धार करताना कॅमेरात बंदिस्त झाले. मुख्यमंत्र्यांची दानत नसल्याचे ते सांगतात. यामुळे विलासराव देशमुख गट वरचढ झाल्याचे राजकीय पत्रकार निष्कर्ष काढतात. त्यानंतर लातूरमध्ये राणे, विलासराव, भुजबळ आणि मुंढे एकत्र येतात. मुंढेंना मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण देतात. त्याचवेळेस राणेही आपला घोडा अडीच घरे आडवा चालवून आपला दावा जाणवून देतात.
एका आठवड्याच्या आत ‘आदर्श’ सोसायटीच्या गैरव्यवहाराबाबत टाईम्स ऑफ इंडियात बातमी येते. त्यानंतर अन्य मंडळी ती बातमी पुढे चालवितात. आधी चव्हाणांच्या सासूबाईंचे नाव त्यात आढळल्याने पहिले निशाण ते बनतात.  नंतर राणे, शिंदे, कन्हैयालाल गिडवानी, सुरेश प्रभू, देशमुख अशी खाशी मंडळी त्यात अडकतात त्यांच्यासोबत लष्कर आणि प्रशासनातील काही मंडळीही सामील असल्याचे दिसून येते. हा सगळा गोंधळ माध्यमांनी समोर आल्यामुळे माध्यमांना वाटेल, असाच त्याचा परिणाम व्हावा, ही त्यांची इच्छा. त्यामुळे चव्हाणांची गच्छंती होणार हेही ते ठरवून टाकतात व काँग्रेस नेतृत्वाने चव्हाणांना दूर ठेवण्यास सुरवात केली, हाही शोध लावतात.
ओबामांच्या भेटीमुळे चव्हाणांना थोडा काळ मिळतो. त्यानंतर राणे यांच्या पत्नीच्या नावे केलेल्या महाबळेश्वर येथील जमिनीच्या खरेदीचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडतो. राणेही लगोलग खुलासा करतात. त्यानंतर देशमुख आणि शिंदे यांच्या कारकिर्दीत झालेल्या ‘आदर्श’ गैरव्यवहारांना पाय फुटतात. चव्हाणांचा राजीनामा ठरलेला असतानाच या नेत्यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा आपोआपच कमजोर होतो.
सरतेशेवटी अशोक चव्हाण पायउतार होतात. त्याचवेळेस नवा मुख्यमंत्री स्वच्छ प्रतिमेचा असेल, असे राहुल गांधी सांगतात. आता काँग्रेसमध्ये स्वच्छ प्रतिमेचा माणूस शोधायचा म्हणजे वेळ लागणारच. शिवाय राजकारणात स्वच्छ प्रतिमेचा याचा अर्थ कुठल्याही भानगडीत न पडणारा आणि निष्क्रिय. गांधी घराण्याशी एकनिष्ठता या मुख्य निकषासह वरील सर्व कसोटींवर उत्तीर्ण होणारे म्हणून, पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव वादातीतच होते.
* पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने पुढे करताच राष्ट्रवादीने अजित पवारांना पुढे करणे, काहीसे अनपेक्षित होते. मात्र राज्याच्या राजकीय परिस्थितीत आता संधी नाही घेतली तर परत कधी मिळेल, याची शाश्वती नसल्याने अजितदादांनी सर्व तऱ्हेची फिल्डिंग लावून ठेवली. याउलट पश्चिम महाराष्ट्रात चुकूनमाकून जी काय चांगली कामे होतील, त्याचे श्रेय काँग्रेसच्या पदरात पडू नये, यासाठी राष्ट्रवादीलाही प. महाराष्ट्रातील माणूसच तेथे पाठवणे भाग होते. बिचाऱ्या छगन भुजबळांचा त्यात बळी गेला असेलही. पण राजकारणात थोडंसं इकडं-तिकडं होत असतेच. शिवाय समोर अजितदादाच उभे राहिल्यानंतर आणखी वेगळी अपेक्षा ठेवणे चूकच ठरले असते.
* आता अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील कामांना गती मिळेल, हे त्यांनी जाहीर करणे; त्यानंतर पुण्यातील मॅरिएट हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी काका आणि पुतण्या पवारांनी सरकारला होत नसेल तर खासगी विमानतळ उभारावे, असे प्रफुल्ल पटेलांकडून वदवून घेणे;  लगोलग काकांच्याच वर्तमानपत्रात अशोक चव्हाणांना अनेकदा प्रस्ताव देऊनही त्यांनी विमानतळाचा प्रश्न रखवडला, असा माजी मुख्यमंत्र्यांचा तीन-तीनदा उद्धार करणाऱ्या बातम्या प्रकाशित होणं, ही गतीशील राज्यकारभाराची चुणूकच म्हणायला पाहिजे. अर्थात ‘अशोकपर्वा’चे डिंडिम वाजविताना चव्हाणांनी दर्डा साहेबांच्या वृत्तपत्राला झुकतं माप दिल्याचा राग कधीतरी निघणारच होता. तशीही विमानतळासाठी खेड-चाकण परिसरात काकांनी  ‘नांगरणी’ करूनच ठेवली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होण्याच्या आधीच अजित पवारांच्या स्वागतासाठी पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्याची चर्चा सुरू झाली होती.

* एकूणात महाराष्ट्राच्या सत्तापदावर माय नेम इज चव्हाणचे प्रयोग चालूच राहणार आहेत. बघूया, पुढे काय होतं ते.

ओबामा, अमेरिकेचे पहा

वॉशिंग्टन. व्हाईट हाऊस. अमेरिकेचे अध्यक्ष (राष्ट्राध्यक्ष नव्हे!) बराक ओबामा आपल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत.  काँग्रेसच्या येत्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावे, अशा सूचना सगळ्या कार्यकर्त्यांना गेल्या आहेत का आणि त्याची तामिल होती आहे का, याची चिंता त्यांना लागून राहिली आहे. अशात त्यांना भेटण्यासाठी काही विचारवंत मंडळी आल्याचे खासगी सचिव सांगून जातो. वास्तविक अमेरिकेचा अध्यक्ष म्हणजे जगातील सर्वाधिक शक्तिशाली माणूस. त्याला भेटण्यासाठी जायचं तर कुठल्याही व्यक्तीला किती सव्यापसव्य करावे लागतात. मात्र अत्यंत तातडीची भेट हवी असल्याचे, अत्यंत निकड असल्याचे निरोप आलेल्या आगंतुकांनी दिलेले. शिवाय आलेली मंडळी रिपब्लिकन्सच्या जवळची. त्यामुळे त्यांना सरळ प्रवेश दिला नाही, तर निवडणुकीच्या तोंडावर नसते वाद निर्माण होतील असा इशारा अनेक डेमोक्रॅट्सनी आधीच गुप्तपणे पोचविलेला. त्यामुळे ओबामांनी हातातली कामे बाजूला ठेऊन त्यांना सरळ प्रवेश देण्याची आज्ञा सहायकांना केली आहे.

केविन कॅटक्रर आणि त्यांच्या सोबत आलेल्या मंडळींना ओबामांनी थेट ओव्हल ऑफिसमध्ये बोलावून घेतले आहे. कॉफी येण्याची वाट पहात कॅटक्रर कार्यालयावर एक नजर फिरवितात. एका कोपऱ्यात महात्मा गांधींचे पुस्तक दिसल्यावर त्यांच्या भुवया आक्रसतात.
“हे पुस्तक,” ते प्रश्नार्थक सुरात विचारतात.
“मी वाचत असतो. केव्हाही समस्या किंवा गोंधळाची परिस्थिती आली, की मी गांधी विचारांकडे वळतो”, ओबामा कसेबसे उत्तरतात.
“तरीच…”
कॅटक्ररांचे हा उपहासार्थक उद्गार अध्यक्षांना अस्वस्थ करून जातो. एकतर उपटसुंभासारखा आलेला हा माणूस कामाचे काही बोलण्याऐवजी हा लपंडाव का खेळत आहे, हेच त्यांना समजून येत नाही. ते विचारतात, “काही चुकलं का”
“नाही, त्यामुळंच भारतातील स्थानिक राजकारणाची तुम्हाला एवढी माहिती आहे, ” कॅटक्रर पहिला गोळा डागतात.
अंगातील आहे नाही तेवढा संयम एकत्र करून अध्यक्ष महाशय परत हा माणूस मुद्याचं काहीतरी बोलेल याची वाट पाहात राहतात. मनमोहन सिंग यांचे जाहीर कौतुक करण्यापलीकडे भारतातील सरकार किंवा राजकारणाबाबत आपण कधी काही बोललो नाही की लिहिलं नाही. मग हे काय नवीन त्रांगडं उद्भवलं, याचा त्यांना थांगपत्ता लागत नाही. कॅटक्ररांच्या पोशाख आणि एकूण रूपाचा अदमास घेण्याचा ते प्रयत्न करतात. माणूस तसा वेडपट वाटत नाही. तरीही काय सांगता, धाकटे बुश नाही का दिसायला रांगडा पण वागायला-बोलायला एकदम तिरपागडा गडी. तसाच हाही असावा, अशी शंका त्यांच्या मनाला चाटून जाते.
“मला काय माहीत आहे,” ते शक्य तेवढा मार्दव आणून बोलतात. त्रयस्थ व्यक्ती कोणी ते दृश्य पाहिलं असतं, तर ओबामांनी ‘श्वेतभवना’त नक्की काय बदल घडविला आहे, हे कळालं असतं.
“कर्नाटकात भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचं तुम्हाला कळतं. नरेंद्र मोदींवर कलंक असल्याने तुम्ही त्यांना काळ्या यादीत टाकलं. भारतातील कुठला तरी भाजप नावाचा पक्ष किती बरबटलेला आहे, याची खडानखडा माहिती तुम्ही ठेवता. ठेवायला हरकत नाही. पण देशातही तेवढेच लक्ष द्या, अशी विनंती करायलाच आम्ही आलो आहोत,” क्रॅटक्रर एकदाचे बोलतात. परिच्छेद नसलेले लांबच लांब लेख आणि बातम्या छापल्यासारखं त्यांचं लंबंचवडं भाषण ओबामा लक्ष देऊन ऐकतात.
आता मात्र ओबामांच्या सहनशक्तीचा सात्विक कडेलोट होतो. मध्यमवर्गीय मराठी माणसांसारखे ते मनातल्या मनात चरफडतात. “अरे, या फालतू माणसाला वेळ घालविण्यासाठी मीच सापडलो का,” ते विचार करतात. जाहीरपणे मात्र ते एकच वाक्य बोलतात.
“तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं,” ते बोलतात. श्वेतभवनाच्या आतिथ्याची परंपरा सांभाळताना आवंढा गिळण्याची कसरत आता त्यांना साध्य झालेली आहे.
“आम्हीही लोकसत्ता वाचतो म्हटलं,” कॅटक्रर त्याचं असोशीने सांभाळलेले बिंग सरतेशेवटी फोडतात.
वास्तविक ओबामांना अजूनही उलगडा होत नाही. लोकसत्ता हा शब्द त्यांनी पहिल्यांदाच ऐकलेला असतो. “काय बोलताहात तुम्ही. जरा स्पष्ट सांगा,” ते त्राग्याने बोलतात. इराकमधील सैन्याचा प्रश्न, अफगाणिस्तानातील निवडणूक आणि वैद्यकीय सुधारणांच्या चर्चेनंतर ते एवढं पहिल्यांदाच वैतागलेले असतात.
“आता तुम्हाला सगळं स्पष्ट सांगायला हवं तर!” कॅटक्रर उपरोधाने विचारतात. “लोकसत्ता नेहमी वाचत असल्याने तुम्हाला कर्नाटकात किती भ्रष्टाचारा झाला आहे आणि लोकशाहीचे धिंडवडे निघाले ते माहीत असतं. त्यामुळे तुम्ही तिकडे जाणार नाहीत, असं त्या वृत्तपत्राला तुम्हीच सांगता. इकडे आम्हाला बफेलो आणि बंगळूरचे यमक जुळवून दिशाभूल करता. गुजरातमध्ये 2002 मध्ये नरसंहार झाल्यामुळे मोदींना आपण काळ्या यादीत टाकल्याचं तुम्हीच लोकसत्ताला सांगता. गुजराती लोकांना भारताच्या प्रतिष्ठेपेक्षा नरेंद्रभाईंचा उदो उदो होण्याची जास्त ईच्छा असते, असं भारतात फक्त लोकसत्ताला माहित असतं. त्यामुळे भारतात आपण कुठे जाणार आणि त्याची कारणमीमांसा काय असते, याची माहिती तुम्हीच लोकसत्ताला पुरवता. त्यामुळेच महाराष्ट्रात लँडलबाडीचे आदर्श प्रकरण घडलं असतानाही, तुम्ही तेथे भेट देताय कारण तो माध्यमांचा कांगावा आणि टीआरपीची स्पर्धा आहे, हेही आम्हाला ठाऊक आहे. तुमचं इतकं लक्ष नसतं तर कर्नाटकमधील बेसुमार भ्रष्टाचार आणि भाजप सरकारची बेबंदशाही पाहून, ओबामांच्या सल्लागारांनी बंगळुरू भेट रद्द करण्याचा सल्ला त्यांना दिला असेल हे तुम्हाला कळालं तरी असतं का? आमचं म्हणणं एवढंच आहे, की भारतात इतकं लक्ष घालण्यापेक्षा जरा आपल्या देशातील कामात लक्ष द्या. तुमची लोकप्रियता उतरणीला लागल्याचे अनेक पाहण्या सांगताहेत. त्याबद्दल जरा विचार करा, नाहीतर आम्हाला आंदोलन करावे लागेल.”
या शेवटच्या वाक्यामुळे मात्र कॅटक्ररांना मराठी पेपरं वाचायची चांगलीच सवय असल्याची खात्री ओबामांना होते. ते कपाळाला हात लावून घेतात. ‘महाराष्ट्रात मी जाणार आहे पण तिथे सज्जनांची मांदियाळी आहे म्हणून नाही, तर तिथल्या नाकर्त्या सरकारमुळे सुरक्षेचे धिंडवडे कसे निघाले होते, याची आठवण काढण्यासाठी,’ असं सांगण्याचे त्यांच्या ओठांवर येते. पण ते काही बोलत नाहीत. कॅटक्ररांपुढे कोणाची मात्रा चालत नाही, असं डेमोक्रॅट्सनी आधीच कळविलेलं असतं. ते बरळत असतात तेव्हा त्यांना बरळू द्यायचं, हा एकमेव उपाय त्यांच्या हाती असतो.
“ठीक आहे. तुम्ही म्हणताय तसं करतो,” इतकं बोलून ते उठतात आणि सचिवांना सांगतात, “पुढच्या आठवड्यात भारतात गेल्यावर या वर्तमानपत्राला भेट द्यायची. असे लॉयल संपादक आपल्याला का मिळत नाही? ”
…………………..
सदरची नोंद संपूर्ण काल्पनिक नाही. तिला वास्तवाचा अत्यंत भक्कम आधार आहे.