ओबामा, अमेरिकेचे पहा

वॉशिंग्टन. व्हाईट हाऊस. अमेरिकेचे अध्यक्ष (राष्ट्राध्यक्ष नव्हे!) बराक ओबामा आपल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत.  काँग्रेसच्या येत्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावे, अशा सूचना सगळ्या कार्यकर्त्यांना गेल्या आहेत का आणि त्याची तामिल होती आहे का, याची चिंता त्यांना लागून राहिली आहे. अशात त्यांना भेटण्यासाठी काही विचारवंत मंडळी आल्याचे खासगी सचिव सांगून जातो. वास्तविक अमेरिकेचा अध्यक्ष म्हणजे जगातील सर्वाधिक शक्तिशाली माणूस. त्याला भेटण्यासाठी जायचं तर कुठल्याही व्यक्तीला किती सव्यापसव्य करावे लागतात. मात्र अत्यंत तातडीची भेट हवी असल्याचे, अत्यंत निकड असल्याचे निरोप आलेल्या आगंतुकांनी दिलेले. शिवाय आलेली मंडळी रिपब्लिकन्सच्या जवळची. त्यामुळे त्यांना सरळ प्रवेश दिला नाही, तर निवडणुकीच्या तोंडावर नसते वाद निर्माण होतील असा इशारा अनेक डेमोक्रॅट्सनी आधीच गुप्तपणे पोचविलेला. त्यामुळे ओबामांनी हातातली कामे बाजूला ठेऊन त्यांना सरळ प्रवेश देण्याची आज्ञा सहायकांना केली आहे.

केविन कॅटक्रर आणि त्यांच्या सोबत आलेल्या मंडळींना ओबामांनी थेट ओव्हल ऑफिसमध्ये बोलावून घेतले आहे. कॉफी येण्याची वाट पहात कॅटक्रर कार्यालयावर एक नजर फिरवितात. एका कोपऱ्यात महात्मा गांधींचे पुस्तक दिसल्यावर त्यांच्या भुवया आक्रसतात.
“हे पुस्तक,” ते प्रश्नार्थक सुरात विचारतात.
“मी वाचत असतो. केव्हाही समस्या किंवा गोंधळाची परिस्थिती आली, की मी गांधी विचारांकडे वळतो”, ओबामा कसेबसे उत्तरतात.
“तरीच…”
कॅटक्ररांचे हा उपहासार्थक उद्गार अध्यक्षांना अस्वस्थ करून जातो. एकतर उपटसुंभासारखा आलेला हा माणूस कामाचे काही बोलण्याऐवजी हा लपंडाव का खेळत आहे, हेच त्यांना समजून येत नाही. ते विचारतात, “काही चुकलं का”
“नाही, त्यामुळंच भारतातील स्थानिक राजकारणाची तुम्हाला एवढी माहिती आहे, ” कॅटक्रर पहिला गोळा डागतात.
अंगातील आहे नाही तेवढा संयम एकत्र करून अध्यक्ष महाशय परत हा माणूस मुद्याचं काहीतरी बोलेल याची वाट पाहात राहतात. मनमोहन सिंग यांचे जाहीर कौतुक करण्यापलीकडे भारतातील सरकार किंवा राजकारणाबाबत आपण कधी काही बोललो नाही की लिहिलं नाही. मग हे काय नवीन त्रांगडं उद्भवलं, याचा त्यांना थांगपत्ता लागत नाही. कॅटक्ररांच्या पोशाख आणि एकूण रूपाचा अदमास घेण्याचा ते प्रयत्न करतात. माणूस तसा वेडपट वाटत नाही. तरीही काय सांगता, धाकटे बुश नाही का दिसायला रांगडा पण वागायला-बोलायला एकदम तिरपागडा गडी. तसाच हाही असावा, अशी शंका त्यांच्या मनाला चाटून जाते.
“मला काय माहीत आहे,” ते शक्य तेवढा मार्दव आणून बोलतात. त्रयस्थ व्यक्ती कोणी ते दृश्य पाहिलं असतं, तर ओबामांनी ‘श्वेतभवना’त नक्की काय बदल घडविला आहे, हे कळालं असतं.
“कर्नाटकात भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचं तुम्हाला कळतं. नरेंद्र मोदींवर कलंक असल्याने तुम्ही त्यांना काळ्या यादीत टाकलं. भारतातील कुठला तरी भाजप नावाचा पक्ष किती बरबटलेला आहे, याची खडानखडा माहिती तुम्ही ठेवता. ठेवायला हरकत नाही. पण देशातही तेवढेच लक्ष द्या, अशी विनंती करायलाच आम्ही आलो आहोत,” क्रॅटक्रर एकदाचे बोलतात. परिच्छेद नसलेले लांबच लांब लेख आणि बातम्या छापल्यासारखं त्यांचं लंबंचवडं भाषण ओबामा लक्ष देऊन ऐकतात.
आता मात्र ओबामांच्या सहनशक्तीचा सात्विक कडेलोट होतो. मध्यमवर्गीय मराठी माणसांसारखे ते मनातल्या मनात चरफडतात. “अरे, या फालतू माणसाला वेळ घालविण्यासाठी मीच सापडलो का,” ते विचार करतात. जाहीरपणे मात्र ते एकच वाक्य बोलतात.
“तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं,” ते बोलतात. श्वेतभवनाच्या आतिथ्याची परंपरा सांभाळताना आवंढा गिळण्याची कसरत आता त्यांना साध्य झालेली आहे.
“आम्हीही लोकसत्ता वाचतो म्हटलं,” कॅटक्रर त्याचं असोशीने सांभाळलेले बिंग सरतेशेवटी फोडतात.
वास्तविक ओबामांना अजूनही उलगडा होत नाही. लोकसत्ता हा शब्द त्यांनी पहिल्यांदाच ऐकलेला असतो. “काय बोलताहात तुम्ही. जरा स्पष्ट सांगा,” ते त्राग्याने बोलतात. इराकमधील सैन्याचा प्रश्न, अफगाणिस्तानातील निवडणूक आणि वैद्यकीय सुधारणांच्या चर्चेनंतर ते एवढं पहिल्यांदाच वैतागलेले असतात.
“आता तुम्हाला सगळं स्पष्ट सांगायला हवं तर!” कॅटक्रर उपरोधाने विचारतात. “लोकसत्ता नेहमी वाचत असल्याने तुम्हाला कर्नाटकात किती भ्रष्टाचारा झाला आहे आणि लोकशाहीचे धिंडवडे निघाले ते माहीत असतं. त्यामुळे तुम्ही तिकडे जाणार नाहीत, असं त्या वृत्तपत्राला तुम्हीच सांगता. इकडे आम्हाला बफेलो आणि बंगळूरचे यमक जुळवून दिशाभूल करता. गुजरातमध्ये 2002 मध्ये नरसंहार झाल्यामुळे मोदींना आपण काळ्या यादीत टाकल्याचं तुम्हीच लोकसत्ताला सांगता. गुजराती लोकांना भारताच्या प्रतिष्ठेपेक्षा नरेंद्रभाईंचा उदो उदो होण्याची जास्त ईच्छा असते, असं भारतात फक्त लोकसत्ताला माहित असतं. त्यामुळे भारतात आपण कुठे जाणार आणि त्याची कारणमीमांसा काय असते, याची माहिती तुम्हीच लोकसत्ताला पुरवता. त्यामुळेच महाराष्ट्रात लँडलबाडीचे आदर्श प्रकरण घडलं असतानाही, तुम्ही तेथे भेट देताय कारण तो माध्यमांचा कांगावा आणि टीआरपीची स्पर्धा आहे, हेही आम्हाला ठाऊक आहे. तुमचं इतकं लक्ष नसतं तर कर्नाटकमधील बेसुमार भ्रष्टाचार आणि भाजप सरकारची बेबंदशाही पाहून, ओबामांच्या सल्लागारांनी बंगळुरू भेट रद्द करण्याचा सल्ला त्यांना दिला असेल हे तुम्हाला कळालं तरी असतं का? आमचं म्हणणं एवढंच आहे, की भारतात इतकं लक्ष घालण्यापेक्षा जरा आपल्या देशातील कामात लक्ष द्या. तुमची लोकप्रियता उतरणीला लागल्याचे अनेक पाहण्या सांगताहेत. त्याबद्दल जरा विचार करा, नाहीतर आम्हाला आंदोलन करावे लागेल.”
या शेवटच्या वाक्यामुळे मात्र कॅटक्ररांना मराठी पेपरं वाचायची चांगलीच सवय असल्याची खात्री ओबामांना होते. ते कपाळाला हात लावून घेतात. ‘महाराष्ट्रात मी जाणार आहे पण तिथे सज्जनांची मांदियाळी आहे म्हणून नाही, तर तिथल्या नाकर्त्या सरकारमुळे सुरक्षेचे धिंडवडे कसे निघाले होते, याची आठवण काढण्यासाठी,’ असं सांगण्याचे त्यांच्या ओठांवर येते. पण ते काही बोलत नाहीत. कॅटक्ररांपुढे कोणाची मात्रा चालत नाही, असं डेमोक्रॅट्सनी आधीच कळविलेलं असतं. ते बरळत असतात तेव्हा त्यांना बरळू द्यायचं, हा एकमेव उपाय त्यांच्या हाती असतो.
“ठीक आहे. तुम्ही म्हणताय तसं करतो,” इतकं बोलून ते उठतात आणि सचिवांना सांगतात, “पुढच्या आठवड्यात भारतात गेल्यावर या वर्तमानपत्राला भेट द्यायची. असे लॉयल संपादक आपल्याला का मिळत नाही? ”
…………………..
सदरची नोंद संपूर्ण काल्पनिक नाही. तिला वास्तवाचा अत्यंत भक्कम आधार आहे.