दादागिरी

    राजकारण हा रमीच्या डावासारखा असतो. त्यात केवळ एक्का हातात असून चालत नाही. राजा, राणी असा सिक्वेंसही जुळावा लागतो. शिवाय जोकरचाही जोर पाहावा लागतो. दादांना कदाचित हे यावेळी जमले नसेल. ज्यावेळी त्यांच्या हातात सिक्वेंसचे पत्ते येतील, त्यावेळी राज्यात पुलोदच काय, वसंतदादांचीही पुनरावृत्ती होऊ शकते, हे या निवडणुकीचे इंगित.
 

    चार एक्क्यांचा डाव या गेल्या वर्षी लिहिलेल्या नोंदीतील हे वाक्य.  त्या नोंदीला एक वर्ष पूर्ण होत असतानाच राज्याच्या राजकारणावर अजित पवार यांनी पकड घेतल्याचे अख्ख्या महाराष्ट्राला दिसून आले. अजित पवार यांनी झपाट्याने हालचाली करून पक्ष आणि प्रतिपक्षातील धुरिणांना अचंबित तर केलेच, पण खुद्द काका शऱद पवार यांचाही रक्तदाब वाढवून ठेवला. आदर्श प्रकरणात झालेले सत्तांतर आणि त्यानंतरच्या घडामोडी बघता, हे संपूर्ण प्रकरण अजितदादांनी व्यवस्थित घडवून आणले का काय, अशी शंका येण्याजोगी परिस्थिती आहे. ज्या प्रकारे एका चेंडूत अशोकराव, विलासराव, सुशीलकुमार, नारायण राणे हे चार बळी आणि पुढच्या चेंडूवर छगन भुजबळांना धावबाद करण्यात आले, त्यावरून तरी हाच निष्कर्ष निघू शकतो.
 
    अशोकरावांनी स्वतःच्या खास शैलीत अजितरावांच्या अनेक फाईली दाबून ठेवल्या होत्या. तो कोंडमारा असह्य झाल्याने अजितदादांनी एक-दोनदा तोंडाची वाफ दवडली होती, हेही माध्यमांतून पोचविण्यात आले होते. तसं दुखणं भुजबळांनाही होतंच, पण त्यांना उपमुख्यमं‌त्रीपदाच्या खुर्चीचा आधार होता. त्यामुळे वेळवखत पाहून चव्हाणांची खुर्ची जाताच आपली राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी अजितदादांना रणांगणात उतरणं भागच होतं. गेल्यावेळेस काही कारणाने हुकलेली संधी यावेळेस परत गमावली असती, तर काकांनी आपल्याला वाचवलं नसतं, याची खूणगाठ दादांनी बांधलीच होती. त्यासाठीच राष्ट्रवादीच्या आमदारांना स्वाक्षरी मोहीम राबविण्याची स्फूर्ती मिळाली. उपमुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडल्यानंतर पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांना आनंदाचे भरते आले आणि दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांत पान-पानभर जाहिराती आल्या.
 
    महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याचा मनसुबा शरद पवारांनी बांधलेला आहे. आपण केंद्रात पंतप्रधान व्हावे आणि सुप्रियांना वारसदार नेमावे, ही पवार यांची मूळ योजना. त्यासाठी सुप्रिया सुळे यांच्यापे‍क्षा अऩ्य कोणतीही व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही, हे तर अगदीच उघड गुपित आहे. तसं झालंच,  तर आता १९९१ पासून शरद पवारांच्या दिल्लीवासात महाराष्ट्राची गादी चालविणाऱ्या अजित पवारांना उघड्यावर पडल्यासारखं वाटलं तर त्यात नवल नाही. त्यामुळेच गेल्या वेळची निवडणूक त्यांनी अस्तित्वाची लढाई लढल्यासारखी लढविली. त्यातूनच कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला 20 जागा कमी मिळाल्या. अजितदादांचे 15 ते 20 समर्थक अपक्ष आमदार निवडून आले. राष्ट्रवादीचे एकूण ७२ आमदार जमेस धरता, आपल्या समर्थक आमदारांसह वेगळी चूल मांडणे अजितदादांना अशक्य नव्हते. त्यातील धोका लक्षात आल्यानेच भुजबळांची ‘समजूत’ काढून काकांना पुतण्याचा हट्ट पुरा करावा लागला.
 
    दादांच्या धडाक्याचा धसका पुण्यातील काँग्रेसजनांनी कसा घेतला आहे, हे एकेकाशी बोलताना जाणवत होतं. अजितदादांना टक्कर देणारा सबसे बडा खिलाडीच गोचिडांनी घायकुतीला आणलेल्या कुत्र्यासारखा बावचळत असेल, तर बाराव्या तेराव्या गड्यांनी करावे तरी काय. इकडे मेट्रोचा रस्ता बंद झालेला असताना, प्रफुल्ल पटेलांकडून हवं ते विधान करून विमानतळाची हवा दादांनी तयार केली. हे असंच चालू राहिलं, तर केवळ वर्षभरावर आलेल्या पुणे पालिकेच्या निवडणुकीत आपली धडगत नाही, हे काँग्रेसजनांच्या लक्षात आलं आहेच. वास्तविक पवारांशी फाटल्यापासून पुणे काँग्रेसवर एकछत्री अंमल चालविणाऱ्या कलमाडींचा उतरता काळ ही पवारांना पर्वणी वाटायला हवी. पण पुतण्या पक्ष पळवून नेतो, म्हटल्यावर  काकासाहेबांच्याही तोंडचे पाणी पळाले. त्यामुळेच प्रणव मुखर्जींच्या संदेशांकडे दुर्लक्ष करून ते मुंबईत ठाण मांडून बसले. पुतण्या इकडे मुख्यमं‌त्र्यांच्या अखत्यारीतील विषयांच्या बैठका घेत असताना, काकासाहेब चार दिवसांत तीनदा मुख्यमं‌त्र्यांना भेटून आले. झेपत नसतानाही एवढी धावपळ करणे त्यांना भागच होते, कारण आयबीएनवर मुलाखतीत अजितदादांनी स्पष्टच सांगितले, “सुप्रियाने दिल्लीत राहावे. मला दिल्ली मानवत नाही आणि महाराष्ट्रातच राहाय़चे आहे.”
 
    दिल्लीतील विजयाची शक्यता किमान चार वर्षांसाठी दुरावलेली असताना आणि आयपीएल, लवासाच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीला बळ मिळणे नजरेच्या टप्प्याबाहेर गेले असताना, सुप्रियाताईंना दिल्लीत धाडण्याचा अर्थ जाणत्या राजाला कळणारच होता. त्यामुळे ताईंचं हित त्यांना पाहावंच लागणार आहे. शिवसेनेच्या भाऊबंदकीवर रंगणारी वृत्तपत्रांची पानं अन् वाहिन्यांच्या चर्चा आता राष्ट्रवादीतील दादागिरीच्या बातम्यांसाठीही यापुढे उपलब्ध होतील, हा चव्हाण ते चव्हाण या सत्तांतराचा मथितार्थ!