महाबळेश्वरचे गौडबंगाल-३

अगदी पंधरवड्यापूर्वीची घटना. पांचगणीजवळ पसरणीला डोंगराच्या काठावर खूप हौशी लोक पॅराग्लायडींग करतात. परदेशांहून आलेली मंडळीही त्यात सहभागी होतात. रशियन फेडरेशनमधून आलेल्या अशाच एका गटाचा प्रमुख डेनिस बर्डनिकोव त्याजागी उतरत होता. त्यावेळी तेथील लोकांनी त्याला पैसे मागितले. पॅराग्लायडींग करताना पैसे कशाचे द्यायचे म्हणून त्याने सवाल केला. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर त्याला आठ-दहा लोकांनी मारहाण केली. ८ जानेवारी रोजी झालेल्या या घटनेची तक्रार १५ जानेवारीपर्यंत घेण्यात आली नव्हती. 
त्या दिवशी इंग्रजीत तक्रार घेण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी बर्डनिकोव व त्याचे साथीदार निघून गेले. त्यानंतर दोन दिवसांनी वाईच्या पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून विचारले तर सांगण्यात आले, की आरोपी निष्पन्न नाही झाले. परत दोन दिवसांनी दूरध्वनी केल्यानंतर सांगण्यात आले, की दोन माणसांना ताब्यात घेण्यात आलं आहे. “साहेब, त्या व्हीडीओत काही कोणी मारताना दिसत नाही. आता ही नेतेमंडळी आणि वरिष्ठ सांगतात, म्हणून आम्हाला कोणाला तरी धरल्यासारखं दाखवावं लागतं,” या प्रकरणाचा तपास करणारा अधिकारी सांगत होता.वास्तविक बर्डनिकोव हा जागतिक पॅराग्लायडींग स्पर्धेत भाग घेतलेला खेळाडू.त्याने दिलेली चित्रफीत मी येथे देत आहे.

महाबळेश्‍वर तालुक्यात 12,600 हेक्‍टर जमीन वनाखाली आहे गिरीस्थानाचे क्षेत्र आहे २३७ चौरस किलोमीटर. पाचगणीसह संपूर्ण महाबळेश्‍वर तालुक्यात बांधकाम करण्याबरोबरच वृक्ष तोडीवरही शासनाने निर्बंध घातले आहेत. तरीही झाडे तोडून टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. त्यासाठी काही खास प्रकार आहेत.

आधी एखादे झाड धोकादायक असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात येते. त्यानंतर स्थानिक अधिकारी ते झाड तोडायला परवानगी देतात. एक झाड कापण्याची परवानगी घेऊन त्याऐवजी चार झाडे कापण्यात येतात. काही ठिकाणी जुन्या इमारतींची दुरुस्ती करण्याची परवानगी घेण्यात येते. नवीन बांधकामांना मनाई असली तरी जुन्या इमारतींच्या डागडुजींना परवानगी आहे. अशा ठिकाणी मोठमोठी पत्रे लावण्यात येतात. इमारतीच्या आवारात सुखैनैव झाडांची कत्तल चालू असते. वरकरणी सर्व कायद्यांचे पालन चालू असते आणि आत पायमल्ली चालू असते.
झाडांवर घाला घालण्याचे आणखी एक कारण म्हणजे स्ट्रॉबेरीची लागवड. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची भूरळ कोणाला पडणार नाही. पण याच गोड फळामुळे अनेक झाडांचा जीव गेला आहे. त्याजागी पैशांचा पाऊस पाडणाऱ्या या फळाची लागवड चालू आहे.
महाबळेश्वरच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, 3000 हेक्टर पठार अशा प्रकारे बोडकं करण्यात येत आहे. वीस वर्षांत एकाच जागेवर चार-चारदा वृक्षतोड झाल्याचेही दाखले आहेत. महाबळेश्वरात सगळ्यांनाच जागा पाहिजे आणि राजकीय नेते हे लोकशाहीतील संस्थानिक असल्याने त्यांना सिंहाचा वाटा मिळणार, हे ओघाने आलेच. त्याशिवाय नेत्यांना आर्थिक वाटा पोचवू शकतील अशा खाशा मंडळींचा क्रमांक लागतो. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात ११६ अधिकृत मिळकती आहेत. त्यातील ७० हॉटेल किंवा लॉज आहेत!
अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना महाबळेश्वरच्या स्थानिक पुढाऱ्यांनी एक शक्कल काढली. शहर आणि आजूबाजूच्या परिसरात दोनशे नवीन हॉटेल्स काढण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आणि तसा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे पाठवण्यात आला. जमिनीच्या प्रस्तावांवर मांडी घालून बसण्यात चव्हाण साहेब आधीच वाकबगार. त्यात सध्या महाबळेश्वरात जमिनी लाटण्यात पुढे होते त्यांचे प्रतिस्पर्धी नारायण राणे. ज्यावेळी चव्हाणांवर ‘आदर्श’चा बुमरँग उलटला त्याच सुमारास महाबळेश्वर देवस्थानाची जागा लाटल्याचे प्रकरण राणेंवर शेकले. त्यात निव्वळ योगायोग नव्हता. या जागेशिवायही भर शहरातील कीज हॉटेल हे राणेंचे असल्याची कुजबूज आहे. त्याशिवाय माढा रस्त्यावर विजयसिंह मोहिते पाटलांचे एक हॉटेल उभे राहतच आहे. आंबेनळी घाटात उदयनराजे भोसले यांच्या मालकीच्या एका रिसॉर्ट्सचे काम प्रगतीपथावर आहे.
 
महाबळेश्वर नगरपालिका सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. मकरंद पाटील राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार. विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेचा बऱ्यापैकी जोर आहे. थोडक्यात म्हणजे काँग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे. ही पार्श्वभूमी माहीत असल्याने चव्हाणांनी नव्या हॉटेलांचा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला. कारण ती काढून पक्षाचा फारसा फायदा (राजकीय वा आर्थिक) होण्यासारखी परिस्थिती नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्ट्रॉबेरीच्या पिकाखालील जमीन १५ ते २० टक्क्यांनी वाढली आहे. स्ट्रॉबेरी निर्यातक संघटनेच्या अध्यक्षांनीच दिलेली माहिती आहे ही. गेल्या वर्षी २२०० एकर जागेवर स्ट्रॉबेरीची पिके होती. ती आता २५०० एकरवर गेली आहे. भारतातील स्ट्रॉबेरीच्या एकूण पिकांपैकी ८७ टक्के महाबळेश्वर व पांचगणी परिसरातून येतात.