अखेर गोपीनाथ मुंढे यांचे बंड थंड झाले. ते होणारच होते. कारण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी त्याच क्रमाने मुंढे यांना आत घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे गेली ३७ वर्षे ज्या भारतीय जनता पक्षाची सेवा केली, त्याच पक्षात पुढची संधी मिळेपर्यंत दिवस काढणे त्यांना अधिक भावले असावे. या पक्षांनी मुंढे यांना न घेण्याचे कारणही योग्य असेच होते.
ब्राह्मणवादी म्हणविल्या जाणाऱ्या भाजपमधील एकमेव खंदा अन्य मागासवर्गीय नेता ही मुंढे यांची सध्याची एकमेव ओळख. दरबारी, म्हणजेच विधिमंडळाच्या, राजकारणात त्यांनी एकेकाळी मोठी कामगिरी केली असली तरी त्यानंतर त्यांच्या नावावर भरीव असं कुठलंही काम नाही. मराठा नव-संस्थानिकांचा भरणा असलेल्या राष्ट्रवादीत त्यांचे स्वागत होणे अशक्यच होते. त्यातही रा. काँ.च्या प्रमुखांना सत्तेवरून घालविण्यात मुंढे यांनी सिंहाचा वाटा उचललेला. शरद पवारांच्या मनातील ती अढी एकीकडे कायम असतानाच, रा. काँग्रेसची सूत्रे अजित पवारांच्या हातात गेली आहेत. त्यामुळे मुंढे यांना तिथे वाव मिळणे अशक्यच होते.
सोळा वर्षांपूर्वी ज्येष्ठ पवारांवर सातत्याने शरसंधान करणाऱ्या मुंढे यांना विलासराव देशमुख या काँग्रेसी मित्राची खरी मदत झाली होती. मात्र दुसऱ्या पक्षातील मित्राला आपल्या पक्षात घेऊन पक्षातील प्रतिस्पर्ध्यांमध्ये भर घालणे विलासरावांना खचितच आवडणार नाही. बाभुळगावच्या सरपंचपदापासून कारकीर्द सुरू करणाऱ्या देशमुखांना सख्खा भाऊ पक्का वैरी ही म्हण माहित नसण्याचे काही कारण नाही. शिवाय भाजपमध्ये मुंढे यांनी स्वतःसाठी खासदारपद, मुलगी व पुतण्यासाठी आमदारपदे, जिल्हाध्यक्षपदे आणि समर्थकांसाठी आणखी काही काही मिळविले होते. काँग्रेस किंवा रा. काँग्रेसमध्ये मुंढे यांना यातील कितपत मिळविता येणार होते.
विधिमंडळात मुंढे लढवय्या असतील, पण निवडणुकीच्या राजकारणात स्वतःच्या ताकदीवर दहा आमदार निवडून आणण्याचीही त्यांची ताकद नाही. बीड आणि लातूर जिल्ह्याचा काही भाग वगळला तर त्यांचे प्रभावक्षेत्र फारसे नाही. मुळात प्रमोद महाजन यांच्या जोडीने राजकारण करण्यात त्यांची हयात खर्ची पडलेली. त्यामुळे स्वतंत्र प्रभाव गाजविणे आजवर त्यांना जमलेले नाही. खुद्द त्यांच्या बीड जिल्ह्यात काँग्रेस-रा. काँग्रेसचे आठ आमदार व दोन मंत्री आहेत. यातच सर्व काही आले.
शिवसेनेला गरज आहे ते अशा राजकारण्याची ज्याच्या जोरावर किमान डझनभर आमदार निवडून येतील. विनाकारण त्यांना पक्षात घेऊन भाजपशी वितुष्ट घेणे बाळासाहेबांच्या राजकारणात बसणार नाही. त्यातही स्वतःपेक्षा इतरांना मोठं होऊ न देण्याच्या उद्धव यांच्या अट्टाहासाखातर नारायण राणे व राज ठाकरे यांच्यासारख्यांना पक्षाबाहेर जावे लागले, तिथे उद्धव यांच्यापेक्षा कितीतरी ज्येष्ठ व अनुभवी असलेल्या मुंढेंना पक्षात कोण घेणार होते. त्यामुळे मुंढे यांच्या चाचपणीला तिथून थंडा प्रतिसाद मिळाला. ‘तुम्ही आता भाजपमध्येच राहा, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले,’ या मुंबईतील पत्रकार परिषदेत मुंढेंनी उच्चारलेल्या वाक्याचा अर्थ असा होता.
मुंढे यांच्या या खटपटीतून नितीन गडकरी यांना मात्र जोरदार फायदा होणार, एवढं निश्चित. उमा भारती आणि जसवंतसिंग यांना पक्षात परत आणून आधीच त्यांनी एक गड सर केला होता. पक्षापेक्षा व्यक्ती मोठा नाही, हे माझ्या स्वतःच्या राज्यात मी दाखवून दिले, हे दाखवून देण्याची संधी मुंढे यांनी त्यांना मिळवून दिली. कर्नाटकातील पेचप्रसंगानंतर भाजपवर आलेले आणखी एक संकट टाळण्यात त्यांना यश आले. अर्थात त्यांनीही या सर्व घडामोडींदरम्यान अत्यंत ठाम भूमिका घेऊन मुंढेंची कोंडी वाढविण्यात मोलाची कामगिरी केली. गडकरींनी जाहीररीत्या अपमान केलेल्या सुषमा स्वराज यांच्या शिष्टाई नंतरच मुंढेंनी तलवार म्यान केली, हे मोठे सूचक आहे. सुषमाताईंनी राजघाटावर दिल्लीच्या नौटंकीवाल्यांना लाजवणारे नृत्य करून भाजपची बेअब्रू करण्याचा प्राणपणाने प्रयत्न केल्याला तसेही फारसे दिवस झालेले नाहीत. त्यात मुंढेंचा आणखी एक प्रयोग लागला एवढेच.
उद्भवलेल्या पेचप्रसंगावर बोलायचे नाही, छोट्या नेत्यांना हवे ते बोलू द्यायचे आणि नंतर ती पक्षाची भूमिका नाही असे जाहीर करायचे, आपल्या गडकिल्ल्यांत सुखरूप बसून तमाशा पाहायचा, हा नेतृत्वाचा सोनिया पॅटर्न गडकरींनी आत्मसात केल्याचे या प्रकरणातून दिसून आले. आता येथून पक्षाच्या प्रत्येक व्यासपीठावर या प्रकरणाची टिमकी गडकरी वाजविणार आणि पक्षापेक्षा व्यक्ती मोठा नसल्याचे आपण कृतीतून दाखविल्याचे सांगणार. त्यांच्या गृहराज्यातीलच हा पेचप्रसंग असल्याने त्यांच्या दाव्यात आणखी बळ येणार. त्यामुळे हे बंड मुंढेंचे असले तरी आणि ते गडकरींच्या विरोधात असले तरी त्यातून खरा फायदा होणार तो गडकरींनाच त्या अर्थाने मुंढेंचे दुहेरी नुकसान होणार.
पक्षात आपल्याला कोणी किंमत देत नाही, हे जाहीरपणे सांगून मुंढेंनी स्वतःचे नुकसान करून घेतले. त्यात त्यांच्या बंडातील हवा निघून गेल्याने काहीही न करता गडकरींचे निशाण पक्षात रोवल्या गेले. त्यामुळे मुंढेंच्या औटघटकेच्या बंडात फायदा झालाच तर तो गडकरींना होणार.