‘आप’लीच प्रतिमा होते…

आणखी आठवडाभराने सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू झालेले असेल. मात्र उत्तरेतील आम आदमी पक्षाच्या विजयाचे उत्तर रामायण तोपर्यंत संपलेले असण्याची शक्यता नाही. नरेंद्र मोदी यांच्या झंझावातापुढे काँग्रेसची वाताहत होत असल्याचे चित्र अगदी गेल्या महिन्यापर्यंत रंगलेले असताना अचानक ‘आप’ नावाच्या घटकाने राजकीय वातावरण ढवळून काढले. या पक्षाने दिल्ली या म्हटलं तर देशाच्या, पण वास्तवात नोकरशहांच्या राजधानीत अर्ध्याला थोड्या कमी इतक्या जागा मिळविल्या. त्यामुळे मोदी नावाच्या अश्वमेधाच्या घोड्याला कसे रोखायचे, या चिंतेत पडलेल्या सर्व सेक्युलरांना आशेचा नवा किरण दिसू लागला आहे आणि बेडकीचा बैल करण्याचे उद्योग चालू झाले आहेत.

इतकी साधी माणसं झाली नाहीत अन् होणारही नाहीत, असे काहीसे चित्र ‘आप’च्या नेत्यांच्या बाबतीत चित्र जणू असे रंगविले जाते आहे. भारतात राजकारणी नावाची जमात तिच्या वाट्याला येणाऱ्या शिव्या-शाप आणि टिंगलीला पुरून उरेल एवढी वावदूक आहे. मात्र म्हणून सगळे राजकारणी गलिच्छतेचे पुतळे आहेत आणि त्यांच्यापासून मुक्ती देण्यासाठीच केवळ ‘आप’ नावाची सेना आली आहे, असा आविर्भाव तद्दन चुकीचा आहे. या वाक्यातील पहिला भाग एकवेळ खरा मानता येईल, परंतु दुसरा भाग बिल्कुल खरा आहे. हा आविर्भाव केवळ खोटा आहे म्हणून नाही, तर पिडलेल्या-नाडलेल्या कोट्यवधी लोकांची त्यामुळे फसवणूक होते म्हणूनही तो वाईट आहे. म्हणूनच अट्टल राजकारण्यांप्रमाणे लोकांची दिशाभूल करण्यात ‘आप’ची मंडळीही काही कमी नाहीत.

सुमारे अडीच वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी दिल्लीत जे आंदोलन केले, त्यावेळपासून या फसवणुकीला सुरूवात होते. अण्णा हजारे यांच्या तेव्हाच्या काही सभा-पत्रकार परिषदांना मी उपस्थित होतो. त्याबद्दल मी लिहिलेही आहे. [(ही खदखद कुठवर वांझोटी राहणार) (दादागिरी चालते, भाईगिरी चालते मग अण्णागिरी का नाही?)] मात्र त्यांचा चेहरा वापरून व त्यांच्या प्रामाणिक पण भाबड्या तळमळीचा वापर करून कोणीतरी सूत्रे हालवत असल्याचेही जाणवत होते. चार वर्षांपूर्वी कोणालाही माहीत नसलेला अरविंद केजरीवाल नावाचा माणूस या आंदोलनाने पुढे आला. त्यापूर्वी त्यांना मेगॅसेसे पुरस्कार मिळाला होता, मात्र त्यांचे नाव मोजक्या लोकांपर्यंतच पोचले होते. सामान्य माणसापर्यंत तो चेहरा पोचला अण्णांच्या आंदोलनामुळे. मात्र नंतर काँग्रेस व भाजपच्या प्रस्थापित राजकारण्यांनी राजकारणात येण्याचे आव्हानात्मक आवाहन केल्यानंतर मात्र केजरीवालांनी पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानली. त्यांनी अण्णांना टांग मारून ‘आप’ल्या पक्षाला जन्म दिला.

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या एक आठवडा आधी मी बातमीसाठी (मैं अब दिल्ली नहीं जाऊँगाः अन्ना हज़ारे)अण्णांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी दिल्लीची अनेक मंडळी अण्णांच्या संस्थेत तळ देऊन बसली होती. केजरीवालना तुम्ही पाठिंबा द्या, असा त्या लोकांनी धोशा लावला होता. त्यातील एकाने तर अण्णांच्याच पद्धतीने त्यांच्या संस्थेत उपोषण सुरू केले आणि तो उपोषणाचा चौथा दिवस असल्याचाही फलक लावला. पारनेर पोलिसांनी त्याला तिथून हलवला. या लोकांची जातकुळी काय आहे, हे पुरेसे कळून चुकलेल्या अण्णांनी तेव्हा पूर्ण मौन बाळगणे पसंत केले. राळेगण सिद्धीत त्यांच्या उपोषणाच्या वेळेस केजरीवाल यांच्याबाबत प्रश्न विचारल्यावर अण्णांनी तटकन् संवाद संपविणे बरेच काही सांगून गेले. (मात्र आता परत त्यांच्या कोलांटउड्या चालू झाल्या आहेत, त्याबद्दल नंतर कधीतरी).

सत्ता हाती आल्यानंतर गेल्या आठ दिवसांत तर असा माहोल उभा केला आहे, की जणू काही कलियुगातील समस्त हरिश्चंद्र एकत्र आलेले आहेत आणि दुष्ट विश्वामित्रांची आता खैर नाही. अर्धखुळेपणाच्या सीमेवर उभ्या असलेल्या माध्यमांनाही हे मृगजळ खरेच पाणी आहे, असे वाटू लागले. त्यातील काहींनी ‘मिष्ठान्नमितरेजनाम्’ या न्यायाने वाहत्या गंगेत हात धुणे चालू ठेवले आहे. वास्तविक अगदी साध्या माणसासारखे, परंतु व्यापक जनतेच्या हितासाठी उत्तम प्रशासन राबविणारे किमान तीन मुख्यमंत्री या देशाला माहीत आहेत व तिघांपैकी कोणावरही आतापर्यंत डाग नाहीत. ते तीन मुख्यमंत्री म्हणजे पाँडिचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी (आधी काँग्रेस व आता ऑल इंडिया एनआर काँग्रेस), त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार (साम्यवादी पक्ष) व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (भाजप). मात्र त्यांच्यापैकी कोणीही स्वतःचा बडेजाव मिरविला नाही. यातील पाँडिचेरीला राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून भारत सरकारने गौरविले तर त्रिपुरात सरकार यांनी लोकांनी तीन-चारदा सतत निवडून दिले आहे.

माध्यमांनीच मोठे केलेल्या केजरीवाल आणि पार्टीने मात्र साधेपणाचेच देव्हारे माजवायला सुरूवात केली. त्यात कुमार विश्वाससारख्या तोंड वाजविणाऱ्या माणसांनी तर वात आणला. रा. ग. गडकऱ्यांनी जे कवींचे वर्णन केलेले आहे, त्यात थोडा बदल करून नेत्यांचे वर्णन असे करता येईल, की खरा नेता जमिनीवर असतो आणि खोट्या नेत्याला स्वर्ग दोन बोटे उरलेला असतो.

(क्रमशः)