भाऊ माझा… मी भावाचा… वैरी!

हत्ती भांडतात तेव्हा गवत चिरडले जाते, अशी एक आफ्रिकी म्हण आहे. मुंबईत गुरुवारी झालेल्या राड्यानंतर या म्हणीचा पडताळा किमान या दोन सेनेच्या मागे फरफटत जाणाऱ्या कार्यकर्ते व मतदारांना आला असेल. 
खरं तर अफलातून खेळी करत उमेदवार देण्याची घोषणा करणाऱया राज ठाकरे यांच्याकडून चांगल्या व वेगळ्या प्रचाराची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी पूर्ण भ्रमनिरास केला.मागील निवडणुकीच्या वेळेस मध्यंतर झालेल्या ‘संगीत भाऊबंदकी’च्या प्रयोगाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यनगरीत मुळा-मुठेच्या तीरावर केली. कुठलाही आशय नसलेल्या, विषय हरविलेल्या आणि दिशा नको असलेल्या बेचव सभेला फोडणी देण्यासाठी त्यांनी महायुतीत सामील न होण्यामागच्या कारणाची (सनक्कल) जंत्री सादर केली. 
जणू काही या आवतणाची वाटच पाहत असलेले शिवसेनेचे ‘मर्द’ कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तोच धागा पुढे चालवला व त्यांना पेलवेल अशा इर्षेने प्रत्युत्तर दिले. त्याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी मेनूच सादर केला. त्यावेळी त्यांनी जे तपशील दिले, त्यानुसार पाचवीत असताना माझे दोन चॉकलेट कशाला खाल्ले किंवा लहानपणी रेल्वेतून जाताना खिडकीशी जागा कशी मिळू दिली नाही, अशा आठवणीच यायच्या बाकी होत्या.त्याची परिणती शेवटी दोन्ही सेनांना प्राणप्रिय असलेल्या प्रत्यक्ष हाणामारीत झाली. सख्खा भाऊ पक्का वैरी या मराठमोळ्या म्हणीला जरा वेगळे वळण देऊन ठाकरे बंधूंनी चुलत भाऊ पक्के वैरी अशी स्थिती तयार केली आहे. 
(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. संपूर्ण नोंद वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.)