धापा टाकणारे, साईडिंगला गेलेले इंजिन!

जेम्स वॉट किटलीत उसळी मारणारी वाफ दिसली आणि त्याची विचारप्रक्रिया सुरु झाली. काही दिवसांतच त्याने वाफेच्या शक्तीवर चालणारे इंजिन शोधून काढले.
शिवसेनेत बाजूला फेकल्यामुळे राज ठाकरे आतल्या आत धुमसत होते आणि त्यातून त्यांची विचारप्रक्रिया सुरु झाली. काही दिवसांतच त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आणि त्यासाठी रेल्वे इंजिनाचे चिन्ह मिळविले.
मात्र या दोघांतील साधर्म्य येथेच संपते. वॉटने शोध लावलेल्या इंजिनामध्ये उत्तरोत्तर सुधारणा झाली आणि नंतर डिझेल व विजेचे इंजिन आज धावत आहेत. रेल्वे इंजिनाचे चिन्ह असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुधारणा नावाचा प्रकारच आला नाही. त्यामुळे सोळाव्या लोकसभेचे निकाल येताना मनसेचे इंजिन धापा टाकताना दिसत आहे.
सध्याचा रोख पाहता मनसेला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. कारण मोदी नावाच्या सुनामीत भले भले वाहून गेले असताना मनसेच्या अकरा शिलेदारांपैकी कोणीही विजयाच्या किनाऱ्यावर येण्याची सुतराम शक्यता नाही. हत्ती बुडतो आणि शेळी ठाव मागतो, ही जुनी मराठी म्हण चपखल बसावी अशी ही परिस्थिती आहे.

मनसेची स्थापना करताना राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना विठ्ठल आणि त्यांच्या भोवतीच्या लोकांना बडवे म्हणून टीका केली होती. योगायोगाने 2014 च्या निवडणुकीत मतांचा जोगवा मागताना मनसेने एकप्रकारे तशीच भूमिका घेतली होती. आमचे निवडून आलेले खासदार मोदींना पाठिंबा देतील, अशी अफलातून घोषणा केली खरी. परंतु लोकांनी मत देताना विचार केला, की मोदींनाच पाठिंबा द्यायचा तर थेट त्यांच्या उमेदवाराला देऊ. देवाच्या थेट मूर्तीला हात लावता येत असतील तर पुजाऱ्याला कोण विचारणार? म्हणूनच पुण्यासारख्या, शर्मिला ठाकरे यांच्यासारख्यांचा प्रत्यक्ष सहभाग असलेल्या व खुद्द राज ठाकरे यांनी तीन तीन सभा घेतलेल्या, जागी मतदारांनी दिपक पायगुडे यांचा विचारही केलेला नाही. अन्य 10 उमेदवारांबाबत तर बोलायलाच नको.
गेल्या निवडणुकीतही मनसेला जागा मिळालेल्या नव्हत्या, मात्र नवखेपणाचा फायदा त्यांना त्यावेळी मिळाला होता. शिवाय शिवसेनेची मते त्यांनी कापल्याचे निकालांमधून दिसले होते. मात्र मते कापण्याची आपली कामगिरी हेच आपले यश असल्याचा समज मनसेने करून घेतला. शिवाय विधानसभेच्या प्रवेशाच्या निवडणुकीत व नंतर महापालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या माफक यशामुळे तो समज आणखीच दृढ झाला. यंदा त्या कृतक यशाचेही समाधान पक्षाला मिळणार नाही.
अपयश खऱ्या अर्थाने आपल्याला शिकविते आणि यश केवळ आपला अंधविश्वास दृढ करते, असे एका लेखकाने म्हटले आहे. त्याची प्रचिती मनसेला या निकालांमुळे आली असेल.
पुणे पालिकेत मनसेला लक्षणीय विजय मिळाला (म्हणजे तो मुख्य विरोधी पक्ष झाला) तेव्हा निवडून आलेल्या नगरसेवकांना या लेखकाने प्रश्न विचारला होताः तुमच्या या विजयाचे श्रेय तुम्ही कशाला देता? तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता सर्वांनी एकमुखाने उत्तर दिले होते­ – राज ठाकरे यांना!
आज मनसेच्या स्थापनेपासून गेल्या आठ वर्षांत त्या पक्षावर ओढवलेली ही सर्वात दारुण स्थिती असताना त्याचीही जबाबदारी राज ठाकरे यांनाच घ्यावी लागेल. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून दिशा हरविलेल्या गाडीसारखी त्यांची अवस्था होती. प्रचार कोणाविरुद्ध करायचा, एवढेच नक्की होते; कशासाठी करायचा हे नक्की नव्हते.
2009 साली शिवसेनेच्या विरोधात राज ठाकरे यांनी प्रचाराची राळ उठविली होती, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी शाब्दिक वादविवाद करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करून घेतले होते. त्या चुकीपासून त्यांनी धडा घेतल्याचे दिसले. त्यामुळे प्रचाराची आपली संहिता सोडून त्यांनी पदरचे डायलॉग टाकण्याची चूक टाळली. म्हणूनच वडा पाव आणि चिकन सूप सारखे उल्लेख राज ठाकरे यांनी करूनही ते शांत राहिले आणि मनसेचे अर्धे अपयश तिथेच निश्चित झाले. उरलेसुरले अपयश मनसेच्या धरसोडीच्या धोरणांमुळे आले. टोलबाबतचे आंदोलन हे याचे ठळक उदाहरण होय.
आपले मुद्दे संपत आल्याची जाणीव कदाचित स्वतः राज ठाकरे यांनाही झाली असेल. विविध वाहिन्यांवरून दिलेल्या त्यांच्या एक्सक्लुझिव्हमुलाखतींमध्ये त्यांनी घेतलेली शिरजोर भूमिका आणि मुलाखतकर्त्यांवर डाफरण्याच्या देहबोलीतूनच ते दिसून येत होते.
मनसे आणि आम आदमी पक्षासारख्यांना मत म्हणजे काँग्रेसला मत हे मतदारांनी यंदा पक्के ठरविले होते. या पक्षांची भूमिका ही जुन्या उंदराच्या गोष्टीसारखी होती. त्यांनी केवळ राजा भिकारी माझी टोपी चोरलीएवढेच गाणे म्हणायचे होते. राजाने प्रतिक्रिया दिली तर उंदीर मोठा होणार, अन्यथा तशीही त्यांची ताकद ती काय?
म्हणूनच राष्ट्रीय पातळीवर मोदींनी जे साध्य केले ते उद्धवनी महाराष्ट्रात साध्य केले. मोदींनीही प्रचाराच्या संपूर्ण काळात अरविंद केजरीवाल यांची दखलही घेतली नाही (केवळ एका अप्रत्यक्ष उल्लेखाचा अपवाद करता). त्याच धर्तीवर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात मनसेची दखलच घेतली नाही. शिवसेनेच्या इतिहासातील ही सर्वात धोरणी निवडणूक नीती म्हणावी लागेल. शिवसेनेने प्रतिसाद देणे बंद करताच मनसेच्या इंजिनातील कोळसा संपला आणि ते हळूहळू सायडिंगला आणण्याची प्रक्रिया सुरू झाली.
सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात मनसेला विश्वासार्ह खेळाडू म्हणून उतरायचे असेल, तर महाराष्ट्राचे बाजूला राहू द्या, राज ठाकरे यांना पक्षाचेच नवनिर्माण करावे लागेल, एवढे नक्की. अर्थात कोणताही पक्षा एका निवडणुकीच्या अपयशाने संपत नसतो आणि राज ठाकरे यांच्यासारख्या मुत्सद्दी राजकारण्याकडून तर ती अपेक्षाच नको, पण त्यांचा मार्ग निर्वेध नाही, एवढे नक्की
(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझी नोंद. ही नोंद येथेही उपलब्ध आहे.)