एक विलक्षण भुरटे आंदोलन!

पुदुच्चेरी हा भौगोलिकदृष्ट्या विखंडीत आणि राजकीयदृष्ट्या नगण्य प्रदेश. केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्यामुळे तर तेथील घडामोडी राष्ट्रीय माध्यमांमध्ये क्वचितच जागा मिळवितात. वर्ष-दोन वर्षांतून मी तेथे जातो तेव्हा काही ना काही गमतीदार मात्र हमखास पाहायला मिळते. असा एक किस्सा मी याआधी वर्णन केला होता.

त्या किश्श्यावर वरताण असा एक प्रकार मला यंदाच्या दौऱ्यात पाहायला मिळाला. पुदुच्चेरीतील भारतीयार रस्ता आणि फ्रांस्वा मार्तेन रस्सा जिथे मिळतात ती जागा अत्यंत महत्त्वाची आहे. श्री अरविंद आश्रम, आश्रमाचे भोजनगृह, मनक्कुळ विनायगर (गणपती) मंदिर, पुदुच्चेरी सरकारचे सचिवालय, राजनिवास, विधानसभा, फ्रेंच सरकारचे वाणिज्य दूतावास, रोमां रोलां वाचनालय व ग्रंथालय अशा अनेक महत्त्वाच्या जागा या परिसरात आहेत. बहुतेक सरकारी कार्यालये याच ठिकाणी असल्यामुळे आंदोलन निदर्शनांचा येथे धडाका चालू असतो.

गेल्या वेळेस (ऑगस्ट 2012) मध्ये ख्रिश्चन लोकांना आरक्षण देण्यासाठी येथे आंदोलन चालू होते. यावेळीही असे एखादे आंदोलन आहे का, हे मी पाहत होतो. मी गेलो तेव्हा 16 जुलै रोजी भारतीयार उद्यानासमोर नेहरू पुतळ्याच्या बाजूला शिक्षण खात्यातील काही महिला कर्मचाऱ्यांचे चक्री उपोषण चालू होते. दोन तीन दिवसांच्या मुक्कामात, हे चक्री उपोषण म्हणजे या बायका सकाळी येणार, तेथे टाकलेल्या प्लास्टिक खुर्च्यांवर बसणार, काही महिला खाली जमिनीवर सतरंजी अंथरून त्यावर बसणार, मग संध्याकाळी सर्व काही आवरून घरी परतणार, पुन्हा दुसऱ्या दिवशी येणार, असा प्रकार असल्याचे मला दिसले. त्यामुळे त्यात लक्ष देण्यासारखे काही नव्हते.

Devidas0114 मात्र मला हवे होते त्यापेक्षा आणखी कैकपट गमतीशीर असे मला पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले. श्री अरविंद आश्रमाच्या भोजनगृहातून मी बाहेर पडलो. त्यावेळी दुपारचा 11:30 – 12 चा सुमार असेल. प्रवेशद्वाराच्या बाहेर येताच उजव्या बाजूला एक घोळका दिसला. राजनिवासाच्या डाव्या हाताला हा भाग येतो. येथे काहीतरी घडत आहे किंवा घडणार आहे, असा मला वास आला.

तिथे गेलो तर काही लोक एका माणसाचा फोटो एका मोठ्या फळीला चिकटवत असल्याचे दिसले. त्यांच्या भोवती काही छायाचित्रकार सरसारवल्याचे आणि एकजण त्याचे दृश्यांकन करत असल्याचेही दिसले. पुदुच्चेरीत आल्यानंतर दर्शन झाल्यावर मी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे रोमां रोलां वाचनालयात गेलो होतो. साधारण ताज्या घडामोडी काय आहेत, याचा अदमास घेतला होता. त्यामुळे या प्रकाराचा अंदाज याचा यायला लागला.

त्या गृहपाठामुळे हे छायाचित्र नायब राज्यपाल विरेंद्र कटारिया यांचे असल्याचे मी ओळखले. कटारिया यांना चारच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने हटविण्याचे आदेश काढले होते. राज्यातील सत्ताधारी एनआर काँग्रेस पक्ष केंद्रातील नव्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य आहे. शिवाय कटारिया आणि मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्यातून विस्तवही जात नव्हता. त्यामुळे रंगास्वामींच्याच सांगण्यावरून कटारियांचा पत्ता कट झाला होता, हे उघड होते.

आता गुमान आपली खुर्ची सोडण्याऐवजी कटारिया यांनी शेवटची चाल खेळली. राजनिवासात पत्रकार परिषद बोलावून त्यांनी सांगितले, की मुख्यमंत्री आणि त्यांच्या हस्तकांच्या भ्रष्टाचारात त्यांनी आडकाठी आणल्यामुळेच त्यांची गच्छंती करण्यात आली आहे. शिवाय मुख्यमंत्री व मुख्य सचिवांनी मला फसवून (कांची येथील पुजारी) शंकररामन हत्या प्रकरणात शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना निर्दोष सोडण्याच्या न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी घेतल्याचाही आरोप त्यांनी केला. (इतकेच नाही तर स्वतःच्या हकालपट्टीची कारणे शोधण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचाही आधार घेण्याची घोषणा त्यांनी पुढच्या दिवशी केली.)

ही सर्व हकीगत त्या दिवशीच्या वृत्तपत्रांत छापून आली होती. त्यावर राज्यपालांचे आरोप योग्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रियाही छापून आली होती. पण राजापेक्षा राजनिष्ठ नसतील तर ते कार्यकर्ते कसले?

तेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळल्याबद्दल कार्यकर्ते येथे त्यांचा रोष व्यक्त करणार हे उघड होते. पण ते नक्की काय करणार, याचा अंदाज येत नव्हता.

इतक्यात त्यातील मुख्य कार्यकर्त्याने पुकारा केला, "मॅडम या, मॅडम या".

आता काय होणार याची मला उत्सुकता लागली होती. म्हणून मी माझा मोबाईल काढून कॅमेरा चालू केला.

Devidas0118 हाक मारलेल्या मॅडम आल्या. हाक मारणारा कार्यकर्ता त्या फोटो नि फळीला रस्त्याच्या एका बाजूला घेऊन आला. त्याला मदतीला पाच-सहा जण होते. उंची साडी घातलेल्या मॅडमही फळीच्या शेजारी होत्या. त्यांनी एका गरीब दिसणाऱ्या बाईला हाक मारली.

ती मध्यमवयीन बाई बिचारी एक बादली घेऊन आली. ती बादली कार्यकर्त्यांच्या घोळक्यात ठेवण्यात आली आणि काही कळायच्या आता कार्यकर्त्यांनी बादलीतला माल हाताने उचलून फळीवर फेकण्यास सुरवात केली. ते शेण असल्याचे वासावरून जाणवले. इकडे छायाचित्रकार हातघाईवर आले. मीही त्या क्लिकक्लिकाटात सामील झालो.

इतक्यात आपली ही नेमबाजी आपल्या चेहऱ्यासह छापून आली पाहिजे, हे एकाच्या लक्षात आले. मग त्याने घोळक्याला सूचना दिल्या आणि कॅमेराधारकांना फळी सहज दिसेल, अशी विभागणी करण्यात आली. मग परत लेन्सात डोळे घालून कटारियांचा चेहरा `गोमय` करण्यास सुरवात केली. सर्व कार्यकर्ते, अगदी त्या मॅडमसकट, इमानदारीने शेण फेकत होते बहुतेक. कारण संपूर्ण फोटोवर हिरवे आच्छादन पसरले होते.

या सर्व वेळेत कार्यकर्त्यांच्या घोषणाही चालूच होत्या. ‘राज्यपाल, चले जाव’ हे तमिळमधून सर्व जण कटारियांच्या छायाचित्राला ऐकवत होते.

Devidas0116 तितक्यात एका कार्यकर्त्याने ते छायाचित्र पाण्याने धुवून काढले. शेण वाळण्यापूर्वीच धुतल्याने कटारियांचा चेहरा पुन्हा स्वच्छ दिसू लागला. आता हाक मारणाऱ्या कार्यकर्त्याने कुठूनतरी एक प्लास्टिकची पिशवी पैदा केली. त्यातून त्याने नासके-किंवा वाळके म्हणूया – टमाटे काढले आणि सर्वांना वाटण्यास सुरुवात केली. परत नेमबाजी सुरू झाली.

हिरव्या रंगानंतर छायाचित्राला लाल रसाने न्हाऊ घालण्यात आले होते. इतका वेळ सगळा खेळ, बेट लावणारा पंटरसुद्धा पाहणार नाही इतक्या तन्मयतेने नि तिऱ्हाईतपणे पाहणाऱ्या पोलिसांना अचानक गणवेश अंगावर असल्याची नि प्रदेशाच्या प्रमुखाची टवाळकी रोखणे हे स्वतःचे कर्तव्य असल्याची आठवण झाली. त्यामुळे त्यांनी हलकेच ती फळी हटविण्यासाठी पाऊल उचलले. त्याला कार्यकर्त्यांनी रितसर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते ते!

Devidas0122 परंतु, पोलिसांनी हट्टाने ती फळी हिसकावून घेतली आणि त्यांच्या गाडीत ठेवायला पाठवली. कार्यकर्त्यांचेही चित्रण-छायाचित्रण संपले होतेच. साडी व शर्टावर पडलेले शेणाचे डागही धुवायचे होते. त्यामुळे फोटोयुक्त फळीसाठी फारसा सत्याग्रह न करता कार्यकर्त्यांनी ती पोलिसांना घेऊ दिली व लेन्सात डोळे घालून विधाने करण्यास सुरूवात केली. पुण्यात हेच काम करत असल्याने ते काय बोलत असतील याचा अंदाज होताच. फक्त हे लोक कोण होते, एवढेच माझे औत्सुक्य होते.

अपेक्षेप्रमाणे सर्वच वृतपत्रांनी (हिंदूसह) या कार्यक्रमाला ठळक प्रसिद्धी दिली होती. या मॅडमचे नाव सुमती असल्याचे मला दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांतून कळाले. राज्यपाल स्वतःच भ्रष्टाचार करतात, स्वतःच्या मुलीला सरकारी पदावर बसवतात आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात, अशी सुमती मॅडमची तक्रार होती. सरकारने काढून टाकल्यानंतर 4-4 जिवस राज्यपाल राजनिवासात कसे राहतात आणि पत्रकारांना बोलावून वाटेल ते आरोप करतात. त्यामुळे त्यांना एक क्षणही राहण्याचा अधिकार नाही, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती.

Devidas0121या सर्व गोंधळात आणखी एक गमंत झाली. हा सर्व प्रकार मी मोबाईलमध्ये हिरिरीने चित्रबद्ध करत होते. एक व्यक्ती हातात वही घेऊन तेथे आली. काय चाललंय, असे त्याने मला विचारले. माहीत नाही, असे त्यावर मी उत्तर दिले.

"तुम्ही कुठून आलात," त्याने पुन्हा प्रश्न केला.

"मी पुण्याहून आलोय," मी सांगितले.

तो पुढे निघून गेला. त्यानंतर मी त्याची वही पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आले, की तोही पत्रकार होता आणि मी बातमीसाठीच आलोय, असे त्याला वाटले असावे. माझ्या उत्तराने त्याची निराशा केली होती.

कुठून कुठून लोक येतात, (अक्षरशः) असे त्याने मनोमन म्हटले असावे!