…खग भेणे वेगळाले पळाले!

post महाराष्ट्र हे प्रवासी पक्षांचे राज्य म्हणून ओळखला जाते. हिवाळ्यात थंडी जाणवू लागली, की हिमालयातून किंवा अगदी रशिया, सायबेरिया अशा प्रांतांतून पक्षी उडत येतात आणि उष्ण वातावरणात काही काळ काढून आपल्या देशात परत जातात. या पक्ष्यांनाही अचंबा वाटावे, असे काही प्रवासी पक्षी निवडणुकांच्या हंगामात आपले पक्ष बदलून कुंपणाच्या पलीकडे उडी मारतात आणि राजकीय वारे फिरले, की परत आपल्या जागी जातात. कालपर्यंतचे बगळे आज कावळे होतात आणि आजचे कावळे उद्या बगळे होतात. सत्तेची ऊब हे त्यांचे एकमेव लक्ष्य असते.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची जी वाताहत झाली, त्याचा धसका घेऊन त्या शिविरातील डझनावारी नेत्यांनी आपल्या टोप्या फिरविल्या आहेत. खरं तर गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी या दोन सणांच्या दरम्यान, ऐन पितृपक्षात, पक्षांतराचा हंगामच सुरू झाला आहे. गेली 15 वर्षे सत्ता भोगणारी मंडळी आता सत्ताबदल होणार, अशी शंका मनात येताच धडाधड कुंपणाच्या पलिकडे उडी मारू लागली आहेत. दुसरीकडे भगव्या झेंड्याखाली नांदणाऱ्या काही मंडळींनीही अचानक धर्मनिरपेक्षतेची दीक्षा घेतली आहे. मात्र त्यांची संख्या आणि चेहरे किरकोळ आहेत.

बबनराव पाचपुते, भास्करराव पाटील खतगांवकर, प्रताप पाटील चिखलीकर, विजयकुमार गावित लोकांनी कमळाच्या आश्रयाखाली जाण्याचा निर्णय घेतला आहे. कमळाच्या पानावरील जलबिंदू ओघळावेत एवढ्या सहजतेने हे नेते आपापले पक्ष सोडून नवीन पक्षाची पायरी चढले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश करून या सर्वांवर कडी केली. हत्ती खड्ड्यात पडला म्हणजे वटवाघूळ सुद्धा त्याला लाथ मारते, अशा अर्थाची एक बंगाली म्हण आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांना ही म्हण माहीत असण्याची शक्यता धूसर असली, तरी तिचा अर्थ आज नक्कीच जाणवत असणार.

रघुनाथ पंडितांनी नलोपाख्यानात नल राजा आल्यानंतर हंसांची जी त्रेधातिरपिट उडाली होती, त्याचे वर्णन केले आहे. त्यात त्यांची ‘तदितर खग भेणे वेगळाले पळाले’ अशी एक ओळ आहे. नल राजा येताच भीतीने गाळण उडून सगळे हंस मिळेल त्या दिशेने उडाले’, असे ते म्हणतात. आपल्या या प्रवासी पक्ष्यांची गती नेमकी अशीच आहे. त्यांच्या या राजकीय उड्डाणाचे याहून समर्पक वर्णन करणारी ओळ दुसरी सापडणार नाही.

कुठल्याही दूषित गोष्टीवर गोमूत्र शिंपडून तिची शुद्धी करता येते, अशी भारतीय (मुख्यतः हिंदू) समाजात समजूत आहे. कालपर्यंत ज्यांच्या विरोधात कंठशोष केला, त्याच मंडळींना पावन करून घेताना भाजपेयींनी कुठले गोमूत्र वापरले माहीत नाही. मात्र नांदेडची जिल्हा बँक बुडविणारे खतगांवकर आणि नंदूरबार जिल्ह्यात घराण्याची सत्ता प्रस्थापित करणारे गावित भगवे उपरणे घालताच कसे काय स्वीकारार्ह होतात, हे गौडबंगाल जनतेला समजले तर त्यांच्या प्रबोधनात भरच पडेल.

इटालीच्या जनतेला फॅसिस्ट विचारसरणीची भूल देताना मुसोलिनी म्हणाला होता, "आपले लक्ष्य केवळ राष्ट्र असले पाहिजे. बाकी सर्व गोष्टी अनुषंगिक आहेत". आपल्या पुरोगामी, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, समतावादी, राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी, प्रखर राष्ट्रीय, देशभक्तीचा अंगार इ. इ. पक्षांनी एक नवीन मंत्र दिला आहे, "काहीही करून खुर्ची मिळवा, बाकी सर्व गोष्टी अनुषंगिक आहेत". मग विचारसरणी, तत्वे आणि इतिहास अशा क्षुल्लक गोष्टींची चाड बाळगण्याची गरजच काय?

कालपर्यंत ज्यांच्या विरोधात आरोपांची राळ उडविली, ज्यांच्या विरोधात आंदोलने केली आणि ज्यांना घालवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, त्यांचीच गळाभेट घेताना ही मंडळी तीळमात्रही कचरत नाहीत. नाहीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र दिलेलाच आहे ‘सबका साथ, सबका विकास’. त्याची तामिली ही अशी चालू आहे.

असे म्हणतात, की या जगात प्रलय आला तरी झुरळ हा एकमेव प्राणी त्यात तग धरून राहू शकतो. याचे कारण कोणत्याही परिस्थितीत चिकाटीने राहण्याची झुरळाची शक्ती अपार असते. सत्ता कोणत्याही पक्षाची असो, खुर्चीवर बसणारी व्यक्ती तीच असते, तेव्हा शास्त्रज्ञांचे हे निरीक्षण खोटे नसल्याचे जाणवते.

एक प्रश्न राहून राहून समोर येतो – निवडणुका हा एखादा बोधिवृक्ष आहे का, की ज्याच्या जवळ आल्यावर या लोकांना आत्मसाक्षात्कार कसा काय होतो? जिथे 10-10 वर्षे काढली त्या पक्षात आपले कोणी ऐकत नाही, पक्ष धनदांडग्यांच्या ताब्यात गेला आहे, आपली मुस्कटदाबी होत आहे, असे एकाहून एक शोध यांना लागतात. ज्या पक्षाच्या बळावर आमदारकी-खासदारकी भोगली तिथेच त्यांची घुसमट होत असल्याचा साक्षात्कार होतो. जनतेच्या प्रश्नांबद्दल वर्षानुवर्षे अनभिज्ञ असलेल्या लोकांना, कुठल्याही प्रश्नावर ‘मी माहिती मागवली आहे, माहिती घेऊन सांगतो’ असे साचेबद्ध उत्तर देणाऱ्यांना, वातानुकूलित कक्ष आणि स्कॉर्पियो-हमर यांसारख्या गाड्यांमध्ये वावरणाऱ्यांना घुसमटीची जाणीव करून देणाऱ्या त्या निवडणूक नामक बोधिवृक्षास नमस्कार असो!

(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. ही नोंद आपण येथेही वाचू शकता).