या मोदींचं काय करायचं?

Modiलोकसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी जेव्हा प्रचारासाठी फिरत तेव्हा अन्य कुठल्याही विषयावर बोलायला तयार नव्हती. स्वतःचा कारभार, राज्याचे प्रश्न, लोकांचे म्हणणे यापेक्षा त्यांच्याकडे अधिक तातडीचा आणि अधिक महत्त्वाचा विषय होता – नरेंद्र मोदी.

त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा आहे, त्यांना केवळ केंद्रातील सत्ता हवी आहे, ते हुकूमशहा आहेत, ते देशात विभाजन घडवत आहेत अशा नानाविध आरोपांची राळ राज्यातील सत्ताधाऱ्यांनी उडविली होती. अर्जुनाला ज्याप्रमाणे केवळ पक्ष्याचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे पुरोगामी  लोकशाही आघाडीच्या नेत्यांना केवळ मोदी आणि मोदीच दिसत होते. बाकी कुठलाही मुद्दा त्यांच्या दृष्टीने रद्दबातल ठरला होता.

त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि लोकांनीही अन्य सर्व बाबी नजरेआड करून केवळ मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अन्य कोणतीच बाब पाहिली नाही. आपण मोदींवर जरा जास्तच लक्ष केंद्रीत केले, अशी उपरती आघाडीच्या नेत्यांनाही झाली तर विधानसभा निवडणुकीचा सागरही दगडांवर मोदीनाम लिहून तरून जाण्याचा मनसुबा भाजपच्या मंडळींनी केला.

साडेचार महिन्यांनंतर आज आघाडीच्या नेत्यांसमोर तोच प्रश्न उपस्थित राहिलेला दिसतोय. प्रदेश काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडताना ज्या दोन प्रचार पुस्तिका प्रकाशित केल्या, त्यातील एक संपूर्णतः मोदी सरकारवर केंद्रीत आहे आणि दुसऱ्या पुस्तिकेतील बहुतांश भाग मोदींवरच केंद्रीत आहे. यावरून दोन्ही काँग्रेस नरेंद्र मोदींनी केवढ्या पछाडल्या आहेत, याची कल्पना येऊ शकते.

त्यावेळी मोदी अलेक्झांडरच्या आवेशात फिरत होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे काँग्रेस-राष्ट्रवादीला शक्य होते. आज मोदी नेपोलियनच्या आविर्भावात राज्य करत आहेत. आघाडीच्या नेत्यांना काहीही वाटले तरी अद्याप तरी जनतेच्या मनातून पार उतरून जावे, असे काही त्यांनी केलेले नाही. उलट पाकिस्तानशी चर्चा थांबविण्यासारख्या त्यांच्या पावलामुळे त्यांची प्रतिमा आणखी उजळली आहे. मुख्य म्हणजे मोदींच्या धसक्याने दिल्लीतील नोकरशहा वेळेवर काम करू लागले आहेत, या एकमेव बातमीने सामान्य माणूस किती हरखून गेला असेल, याची आघाडीच्या नेत्यांना कल्पनाच नाही!

अशा परिस्थितीत मोदींना कसे हाताळायचे, ही विवंचना काँग्रेस-राष्ट्रवादीला आजही छळू शकते. एका युरोपियन परिकथेत पुंगीवाला येतो आणि शहरातील सर्व उंदरांना भुलवून आपल्यामागे नेतो. त्याचप्रमाणे अनेक पक्षांतील उंदीर या गारुड घालणाऱ्या पुंगीवाल्याच्या मागे जाण्यास उत्सुक आहेतच.

मोदी नावाचा हिंदू ही केवढी समृद्ध अडगळ आहे, याचा चांगला (खरे तर अगदी वाईट) अनुभव राज ठाकरे यांनी घेतला आहे. स्वतःच्या पक्षाचे नवनिर्माण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, यातच सारे काही आले. तेव्हा या व्यक्तीशी जुळवून घेणेही अवघड आणि थेट विरोध करणेही अवघड, अशी अवघडलेली परिस्थिती त्यांच्यावर आली आहे.

नागपूर आणि सोलापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमांच्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना याचा फटका बसला आणि पुन्हा या व्यक्तीचा सहवास नको, असे जाहीर करून ते मोकळे झाले. त्यांचं तरी काय चुकलं? गेली १५ वर्षे ते स्वतःसारख्याच नोकरशहा पंतप्रधानाला पाहत होते. आता अचानक त्यांनी राजकारणी पंतप्रधान पाहिला तेव्हा धक्का बसणारच.

भारतीय जनता ही भारतीय स्त्री सारखीच आहे. नेता भ्रष्टाचारी असो, निष्क्रिय असो किंवा हेकेखोर असो, जोपर्यंत तो त्यांच्याशी संपर्क राखून असतो, जनतेचा त्याच्यावर विश्वास असतो तोपर्यंत जनता त्या नेत्याच्या मागे राहते. शक्यतोवर त्याच्यासोबत नांदण्याकडे तिचा कल असतो. त्यात नेता स्वतःला स्वच्छ म्हणवून घेत असेल, काम करताना दिसत किंवा दाखवत असेल तर मग तर बोलायलाच नको. त्यामुळे शक्यतो कोणाला धुडकावून लावायचा भारतीय जनतेचा स्वभावच नाही. अगदीच कडेलोट झाला तर गोष्ट वेगळी.

याच कारणामुळे मुंदडा प्रकरणात खोलवर गुरफटलेल्या, आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी केवळ दीड वर्षाच्या अंतराने सत्तेत परतू शकल्या. बोफोर्समध्ये गुंतलेल्या राजीव गांधींना १९८९ मध्ये जवळपास २०० जागा मिळवता आल्या आणि १९९१ साली ते परत पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर होते. सतत चार वर्षे माध्यम आणि विरोधकांच्या तोफखान्याला तोंड देऊनही अशोक चव्हाण मराठवाड्यात स्वतःचे वर्चस्व कायम ठेऊ शकतात. कर्नाटकात येडियुरप्पा, तमिळनाडूत जयललिता आणि प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी हेच दाखवून दिले.

महाराष्ट्रात आज जर कोणत्या गोष्टीचा अभाव असेल तर नेमक्या या गोष्टीचा. इथल्या नेत्यांवर जनतेचा सोडा, त्यांच्या कार्यकर्त्या आणि अनुयायांचा विश्वास नाही, तेथे बाकींच्याची काय कथा. स्वतःचे काम नाही आणि इतरांचा विश्वास नाही, अशा परिस्थितीत झोडपायला एक बरे खेळणे म्हणून मागच्या वेळी त्यांना नरेंद्र मोदींचा वापर करता आला. यावेळी ते मोदींचं काय करणार?

(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. ही नोंद आपण येथेही वाचू शकता.)