आता तरी शहाणे व्हा!

ऐन दसऱ्याच्या दिवशी नाशिकमध्ये सहज प्रवासात एका शिवसैनिकाची भेट झाली. काय एकूण राजकीय परिस्थिती, असे त्याला विचारलेतेव्हा पहिल्यांदा मोठ्या आत्मविश्वासाने त्याने सांगितले, की शिवसेनेला स्वतःच्या बळावर सत्ता मिळेल. मात्र आणखी थोडी चर्चा केल्यानंतर त्याचा अभिनिवेश गळून पडला आणि सत्य बाहेर पडले. “नुकसान तर होणारच आहे. दोन्ही पक्षांना नुकसान होईल,” असे त्याने अत्यंत खालच्या आवाजात सांगितले.

ज्यावेळी उद्धव ठाकरे हातात धनुष्यबाण घेऊन उत्तरेतून अफझलखानाचे सैन्य आल्याची आरोळी ठोकत होते आणि भाजपचे लोक शिवसेनेने हटवादीपणा केला, असे सांगत होते त्यावेळी दोन्ही पक्षांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना हीच होती. सत्तेचा कितीही वास आलेला असला तरी आपण आपल्या बळावर सत्ता मिळवू शकत नाही, एवढे शहाणपण जमिनीवर काम करणाऱ्या माणसांना होते.

नेमके हेच भान मुंबईतील वातानुकूलित कार्यालयांमधून राज्याचा गाडा हाकण्याची इच्छा बाळगणाऱ्या नेत्यांकडे उरले नव्हते. म्हणूनच तब्बल महिनादोन महिना चुरस निर्माण केल्यानंतर आलेले निवडणुकीचे निकाल शिवसेना व भाजपला हरखून टाकणारे असले तरी त्यांचा काहीसा विरस करणारेही असतील, यात शंका नाही. कारण हुकुमी बहुमताने भाजपला दगा दिलेला आहे तर शिवसेनेचा बाण लक्ष्यभेद करण्यात अपयशी ठरला आहे. आजही दोन्ही पक्ष जेव्हा विजयाचे फटाके फोडतील तेव्हा आम कार्यकर्त्यांचा

आवाज ते ऐकणार की नाही, हाच कळीचा प्रश्न असणार आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात तथ्य असेलही. परंतु तसे करणे भाजपला परवडेल का, हा प्रश्नच आहे.
कोणीही काहीही म्हटले तरी शिवसेना हाच भाजपचा नैसर्गिक साथीदार आहे. त्यात विचारसरणी वगैरेंचा मुद्दा नाही परंतु सहवासाची सवय हा एक भाग आहे. गेली पंधरा वर्षे राज्यात दंडेली, टगेगिरी आणि लुटीचे वातावरण निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादीला भाजप कसे काय सोबत घेऊ शकतो?  केवळ आठवडाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच पक्षाविरुद्ध आग ओकत होते. आता त्याच पक्षाशी घरोबा कसा काय होऊ शकतो?
बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेना नेत्यांनी भाजपची खिल्ली उडवायची आणि भाजपच्या नेत्यांनीही कधीतरी शिवसेनेबद्दल तोंड वाजवायचे, ही परंपरा चालत आलेली आहे. त्यानंतर दोन्ही पक्ष विषयावर पडदा पाडत आणि जनतेनेही त्यांची ही रीत स्वीकारली होती. तेव्हा निवडणुकीतील रंगपंचमी विसरून दोघांनीही पुन्हा गळाभेट घेतली, तर त्यात काही विलक्षण असेल, असे नाही.
शिवसेनेलाही एक पाऊल मागे घेऊन भाजपशी पुन्हा बंधनाचा गंडा बांधावा लागेल. कारण 15 वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यानंतर आणि बाळासाहेबांसारखे करिश्माई नेतृत्व नसताना शिवसैनिकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी जबरदस्त डिंकाची गरज आहे. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व अशा डिंकाचे काम करू शकत नाही. तेव्हा पराभूत सैन्याप्रमाणे नाही तर बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्याप्रमाणे शिवसेना भाजपशी व्यवहार करू शकत नाही. आपण ज्याला पराभूत करू शकत नाही त्याच्याशी हातमिळवणी केली पाहिजे, ही जुनी म्हण इतिहासप्रेमी उद्धवजींना माहीत असेलच. खरं तर शिवसेना व भाजपने युती म्हणून निवडणूक लढविली असती, तर त्यांना कितीतरी उदंड यश मिळाले असते. तसे झाले असते तर 200 जागांचा टप्पा दूर नव्हता, असे अनेक विश्लेषकांचे आजही मत आहे. परंतु कुठेतरी माशी शिंकली आणि वेगवेगळे लढण्याचा निर्णय दोघांनी घेतला.
बरं, स्वतंत्रपणे लढणे याचा अर्थ एकमेकांशी लढणे, असा ग्रह दोघांनी करून घेतला. एवढे करून दोघांना 200 च्या जवळपास जागा मिळाल्याच आहेत. म्हणजे या दोन पक्षांची समजूत काहीही असो, मतदारांची समज चांगली आहे. उलट असे म्हणता येईल, की या दोन्ही पक्षांनी युती न करून अनेक जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडणे मतदारांना भाग पाडले. मुख्यमंत्र्यांसकट अनेक मंत्री काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असणे, यातून हाच संदेश मिळत आहे.  संधी मिळाली असती तर मतदारांनी सत्ताधाऱ्यांना दूर भिरकावून दिले असते, हे स्पष्टपणे दिसते. मतांचे विभाजन केल्याने ती संधी हिरावल्याचेही दिसून येते.
जेव्हा एखाद्या निवडणुकीत मतदार सत्ता बदलण्याचा आदेश देतात, तेव्हा सत्तेतील सर्व घटकांना बदलण्याचाच तो आदेश असतो. विजयाच्या कैफात बुडालेल्या भाजपला हे विसरता येणार नाही. तेव्हा घड्याळाला हातभर अंतरावर ठेवणे, हाच कमळापुढचा एकमेव पर्याय आहे.
सेना-भाजप युतीचे जागा वाटपाचे चर्चेचे गुऱ्हाळ चालू होते, तेव्हा सेनेच्या बाजूने एक संदेश सोशल साईट्सवर फिरत होता. त्यात  शहाणे व्हा असा संदेश अमित शहांच्या चित्रासह दिलेला होता. आज दोन्ही पक्षांनी शहाणे होऊन परत एकत्र येण्याची वेळ आली आहे.
(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. ही नोंद आपण येथेही वाचू शकता.)