नवे मुख्यमंत्री बेबंदशाही थांबवणार का?

1.9 महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण दिले आहे. महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची सर्व जण फडणवीस यांच्याकडून अपेक्षा करत असले, तरी राज्याची गाडी रुळावर ठेवण्यासाठीच नव्या मुख्यमंत्र्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. बेबंदशाही या एका शब्दात वर्णन करता येईल, अशी परिस्थिती मागील सरकारने त्यांच्यापुढे ठेवली आहे. कायदा सुव्यवस्था असो का आर्थिक व्यवस्था, सगळीकडे आनंदीआनंद पसरला आहे.

फडणवीस यांनी शपथ घेतली त्याच दिवशी पुण्यात सहा मजली इमारत कोसळली. त्यात एक व्यक्ती दगावली. त्यापूर्वी आठ दिवस आधी अहमदनगर जिल्ह्यात दलित कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली. आधीच्या सरकारने घालून ठेवलेल्या घोळाची ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे.

स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणार, असे नवे मुख्यमंत्री ठासून सांगत आहेत आणि त्यांच्या आजवरच्या निष्कलंक चारित्र्याकडे पाहता ते खरे होईलही. परंतु राज्याच्या कारभारात जरब कशी बसवणार, हा प्रश्न त्यांना आधी सोडवावा लागेल.

कमळाच्या चिन्हावर घड्याळ्याची अनेक माणसे निवडून आली आहेत. शिवाय वर बिनशर्त पाठिंब्याचा टाईम बॉम्ब आहेच. त्यामुळे सरकारचा चेहरा बदलला तरी स्वभाव तोच राहीला, असे व्हायला नको. याचीही काळजी फडणवीस यांना घ्यावी लागणार आहे.

या उप्पर स्वपक्षातील नाठाळांना वठणीवर लावण्यातही तरुण मुख्यमंत्र्यांची ऊर्जा खर्ची पडणार आहे. गेल्या वर्षी भाजप राज्य कार्यकारणीची बैठक पुण्यात झाली होती. त्यावेळी स्थानिक भाजप नेत्यांनी केलेली हडेलहप्पी आणि पत्रकारांना गृहित धरण्याची त्यांची वृत्ती, यामुळे अनेक पत्रकारांनी फडणवीस यांच्या उपस्थितीतच वाभाडे काढले होते. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष या नात्याने त्यांनी त्यावेळी प्रत्यक्ष माफी मागितली होती.

त्यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बेमुर्वतपणाबद्दल मी फडणवीस यांना इमेलही केला होता आणि त्यावर प्रत्युत्तरादाखल माफी मागणारा इमेलही केला होता. त्यातून त्यांचा प्रांजळपणा दिसला असला तरी ठिकठिकाणच्या अशा स्थानिक नेत्यांना ते कसे आवरणार, हा प्रश्नच आहे. कारण पुण्यातील भाजप नेत्यांच्या वर्तनात त्यानंतरही काही परिणाम पडलेला दिसला नाही. इतका की, ऐन निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

तेव्हा अशा सर्वच आघाड्यांवरील बेबंदशाही रोखण्याचे काम फडणवीस यांना करावे लागणार आहे. हे काम त्यांनी पार पाडावे, हीच मनापासून इच्छा आणि त्यांना शुभेच्छा!