भुजबळं बलिं दद्यात् सरकारो पवाररक्षक:

bhujbal

गेल्या वर्षी महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि आधी भारतीय जनता पक्षाचे व नंतर भाजप-शिव सेना युतीचे सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी शरद ऋतू सुरू होता, ही नियतीचीच इच्छा होती. सत्तेवर आल्यानंतरही या सरकारवर शरदाच्या चांदण्याची छाया असल्याचे गावगन्ना मानले जात होते आणि त्याबद्दल सरकारबद्दल लोकांमध्ये चीडही होती.

ज्या सिंचन गैरव्यवहारावर भाजपने बहुमताचे पीक काढले, त्याची काही तरी तड लावणे त्या पक्षाला आवश्यक होते. पण शिवसेनेच्या संभाव्य दगाफटक्याची दहशत आणि मुळातच ‘राष्ट्रवादी’ला दुखावण्याची अनिच्छा, यामुळे कारवाईचा बांध काही फुटत नव्हता. एकीकडे ‘राष्ट्रवादी’वर कारवाई झाल्याशिवाय, किंवा झालेली दिसल्याशिवाय, लोकांचे समाधान नाही आणि कारवाई करण्याची तर इच्छा किंवा तयारी नाही, अशी जबरदस्त कात्री ‘छत्रपतींचा आशीर्वाद’ मिळविणाऱ्या पक्षाची झाली होती. इकडे आड आणि तिकडे विहीर म्हणजे काय, याचा अनुभव भाजपच्या मंडळींना येत होता.

मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये राष्ट्रवादीशी सोयरिक करायची, निरनिराळ्या जिल्हा बँकांच्या निवडणुकांत त्यांच्या गळ्यात गळे घालायचे आणि मुंबईत त्यांच्यात म्होरक्यांना जेरबंद करायचे, ही कसरत जमणार तरी कशी?

याच्यावरचा एक जबरदस्त उतारा म्हणजे छगन भुजबळ आणि त्यांच्या प्रभावळीतील अधिकाऱ्यांवर या आठवड्यात फिरलेला रोडरोलर. ‘राष्ट्रवादी’चे ‘दादा’ अजित पवार यांना एसीबीच्या चौकशीसाठी प्रत्यक्ष न येण्याची सूट मिळते आणि एका आठवड्याच्या आत भुजबळांच्या भ्रष्ट कारभाराचा एक एक चिरा निरा निखळून काढण्यास सुरूवात केली जाते…सरकारी कामकाजात योगायोग या शब्दाला जागा नसते, हे ज्यांना माहीत असते त्यांना या दोन घटनांमधील संगतीही कळेल.

खुद्द भुजबळ यांना संपविण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ची अनेक मंडळी एका पायावर तयार होती. ‘मराठ्यां’च्या मळ्यात हा ‘ओबीसी माळी’ तसा उपराच होता. सुंठीवाचून हा खोकला जाणार असेल तर कोणाला नको होते? त्यामुळे त्यांना निशाण्यावर घेऊन ‘पहिलटकर’ सरकार शिकार करू लागले, तर त्यांना वाचवायला कोण येणार होते?

याच कारणाने अजापुत्रं बलिं दद्यात या न्यायाने राष्ट्रवादीच्या खऱ्या सूत्रधारांना बाजूला ठेवून सरकारने छगन भुजबळाच्या संस्थानात आपले घोडे धाडले आहेत. त्यातून ‘राष्ट्रवादी’ची गचांडी धरल्याचे पुण्यही मिळणार आणि दोस्ताची मैत्रीही कायम राहणार, असा हा खेळ आहे. नाहीतर कुटुंबियांसकट आपल्याला संपविण्याचा हा कट आहे, असा टाहो भुजबळ यांनी फोडला नसता. ‘अश्वं नैव गजं नैव, व्याघ्रं नैव च नैव च अजापुत्रं बलिं दद्यात देवो दुर्बलघातकः’ हा केवळ श्लोक नाही, ते राजकारणाचे वास्तव आहे. सत्ताधारी कोण, हा प्रश्न गौण आहे.

एरवी भुजबळांच्या पंखांखाली इमले उभे करणारे दीपक देशपांडे सापडतात आणि पवार कुटुंबियांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या अनिरुद्ध देशपांडेंच्या ‘अमनोरा’मध्ये मुख्यमंत्री गाणे म्हणतात, हे चित्र काय सांगते? सत्ता गेल्यानंतरही फक्त भुजबळांच्या शाही बंगल्याच्या सुरस कथा बाहेर येतात आणि राष्ट्रवादीच्या बाकी मंत्र्यांची आलिशान जीवनशैली मागील पानावरून पुढे चालू राहते, याचा तरी अर्थ काय?

भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय हे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, हे तर खरेच. पण हा डागाळलेला तांदूळ ज्या कुजकट डाळींसोबत आजपर्यंत खिचडी शिजवत होता, त्या दाळींना कोण हात घालणार?

तेव्हा फडणवीस सरकारला खरोखर भ्रष्टाचाऱ्यांच्या मुसक्या आवळायच्या असतील तर पवार कुटुंबियांसहित भुजबळांवर कारवाई करावी लागेल. अन्यथा शक्तिशाली महागुरुंना सोडायचे आणि त्यांच्या गणंगांना बळी द्यायची, हीच परंपरा हेही सरकार चालवत आहे, एवढेच म्हणावे लागेल.