शरद पवार सगळं सगळं खरं सांगतील?

महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य (केवळ वय आणि ज्येष्ठत्वाच्या दृष्टीने, प्रतिज्ञापालनाच्या दृष्टीने नव्हे) शरद पवार यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस काल, १२ डिसेंबर रोजी, साजरा झाला. पवारांनी विधानसभेत प्रवेश केला तेव्हा ते सर्वात तरुण राजकारण्यांपैकी एक होते. आज ते राज्यातील सर्वात ज्येष्ठ व देशातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. या त्यांच्या प्रवासात पवारांचे मौन किंवा त्यांचे सूचक वक्तव्य हीच त्यांनी ओळख बनली आहे. गमतीने असं म्हटलं जातं, की पवारांच्या मनात काय चालले आहे हे प्रतिभाताईंनाही ठाऊक नसते. असंही म्हणतात, की पवार जांभई देतात तेव्हा त्याचेही वेगवेगळे अर्थ असतात.
सोयिस्कर मौन आणि राजकीय कसरती, यांची अशी जबरदस्त प्रतिमा असणाऱ्या पवार साहेबांनी लेखणी हाती धरून राजकीय आत्मकथा लिहीली आहे. साहेबांच्या शब्दांभोवती गूढ वलय आणि साहेबांच्या वाक्याला रहस्याची झालर. साहेबांचे वजन असे जबर, की सत्ता गमावल्यानंतर एका वर्षानंतरही सध्याचे सरकार त्यांच्याच जोरावर चालल्याचे  लोक मानतात.
ही सगळी रहस्ये साहेब आता उलगडून दाखविणार आहेत, असं म्हणतात. तसं महाराष्ट्राचे शाश्वत सत्ताधारी असलेल्या पवार साहेबांवर साहित्य काही कमी आहे, असे नाही. परंतु आतापर्यंत ते सगळे अंदाज, अनुमान आणि आराखडे यांच्या पलीकडे नाही. राजकारणाच्या रंगपटलावरील हा महानायक स्वत: काही बोलायला तयार नाही आणि बोलणाऱ्यांची धाव अनमान धपक्यापलीकडे नाही, अशी ही अवस्था होती.
‘लोक माझे सांगाती’ हे पवारांचे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले असून १० डिसेंबर रोजी ते प्रकाशित झाले. राजहंस प्रकाशनाचे संपादक डॅा. सदानंद बोरसे यांच्या मते, “शरद पवारांची राजकीय कारकीर्द अनेक उतार-चढावांनी भरलेली आहे. ती अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये अडकलेली आणि अनेक प्रवाद-विवादांमध्ये सापदलेली आहे. पवारांच्या स्वभावातील अनेक वैशिष्ट्यांमुळे, त्यांनी रेखाटलेल्या राजकीय व्यक्तिचित्रांमुळे तसेच अनेक राजकीय घडामोडींच्या त्यांनी केलेल्या वर्णनामुळे ही आत्मकथा म्हणजे महाराष्ट्राच्या अर्ध-शतकाच्या राजकीय वाटचालीचा महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे.”
आता या पुस्तकात पवारांनी पुलोदची स्थापना, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी कारकीर्द, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, पंजाब व अयोध्या यांसारखे विषय यावर लेखन। केले असल्याचे प्रकाशकांनी जाहीर केले आहे. पवारांनी अनेक वेळा केलेले पक्षबदल, त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि मुख्य म्हणजे दाऊद इब्राहीमशी संबंधांचे आरोप यांबाबत त्यांनी लिहिले आहे, असेही सांगितले गेले.

आता पवारच हे सांगतायत म्हटल्यावर हे पुस्तक चर्चेला खाद्य देणार, हे नक्की. याचे कारण म्हणजे ज्यांची उत्तरे पवारांकडून हवी आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. मावळमधील गोळीबार झाला तेव्हा पवार उत्तर न देता पत्रकारांसमोरून (पळून) गेले, स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणून घेत स्वतः कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या देशातील सर्वाधिक आत्महत्या कशा घडू दिल्या, इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना शेती सोडा असा सल्ला का दिला, अलीकडेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून कोलांटउड्या का मारल्य, असे अनेक प्रश्न पवारांभोवती पिंगा घालत होते आणि घालत राहतील. त्यांची उत्तरे त्यांनी द्यावीत, ही सामान्य अपेक्षा आहे.
मात्र सह्याद्रीच्या फत्तराप्रमाणे अभेद्य असणारे पवारांचे मौन सुटणार का आणि त्यांच्या मनातील संपूर्ण संचित बाहेर पडणार का, हा खरा प्रश्न आहे.