सबनीसांनी केले सेक्युलरांचे पाखंड उघडे!

सहा महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात एक आगळेवेगळे वातावरण पाहायला मिळत होते. पुरोगामीत्व आणि विवेकवादाच्या टोप्या घातलेले साहित्यिक एकामागोमाग चवताळून उठत होते आणि आपापले ठेवणीतले पुरस्कार परत करत होते. सत्तेवर येऊन ज्या सरकारला जेमतेम एक वर्ष झाले होते, त्या सरकारच्या आश्रयाने देशात असहिष्णुता आणि अतिरेक वाढला असल्याचा शोध या लोकांना लागला होता. मागील सरकारच्या साहित्यिकपणाची प्राणप्रतिष्ठा झालेल्या आणि म्हणून सामान्य रसिकांपासून सहस्त्र योजने लांब असलेल्या व्यक्तींचाच त्यात बहुतांशी भरणा होता, हा आपण केवळ योगायोग मानायचा! आम्ही पुरोगामी म्हणजे किती सोज्वळ आणि राष्ट्रवादाची भाषा करणारे कित्ती कित्तीजहरी, असा आपल्याच विचारांचे सोवळे नेसलेल्या या नवब्राह्मणांचा आविर्भाव होता. सरकारी कृपा सुटलेल्या आणि सूर्यमुखी फुलासारखे इंग्लंड-अमेरिकेच्या दिशेनुसार आपली दिशा बदलणाऱ्या माध्यमांचीही त्यांना साथ लाभली होती. त्यामुळे पुरोगामीपणाला असा काही बहर आला होता आणि भारतातील फॅसिस्ट निर्मूलनाला असा काही ऊत आला होता, की खुद्द हिटलर, मुसोलिनी आणि स्टॅलिनच्या देशांनाही त्याचे अप्रूप वाटावे!
या सेक्युलर नाट्याचा प्रभाव असा काही जबरदस्त होता, की शेषराव मोरे यांच्यासारख्या विद्वानानेही पुरोगामी दहशतवाद संपविण्याचे आवाहन केले, तेव्हा ते हिंदुत्ववादाच्या वळचणीला लागल्याचे आणि हे हिंदुत्ववाद्यांचेच कारस्थान असल्याचे सिद्ध करण्याऱ्या युक्तिवादांनी विवेकवाद्यांच्या संगणकांचे पडदे भरून जाऊ लागले.
पण हाय रे दैवा, केवळ चार महिन्यांच्या आत सेक्युलरांच्या सोवळ्याचे वस्त्रहरण त्यांच्या पंथातील एकाने केले आणि सेक्युलरांची दातखिळी बसली. आणि आता जेव्हा अतिरेक, आक्रस्ताळेपणा आणि माथेफिरूपणा हा केवळ गैर-सेक्युलरांची मक्तेदारी नाही तर आपल्यातही अशी माणसे निपजतात, हे कळाल्यावर विश्वामित्री पवित्रा घेऊन ही मंडळी बसली आहेत.
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या 89व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्रीपाल सबनीस यांची निवड झाली तेव्हा मराठी साहित्य जगताशी थोडाफार संबंध असलेल्यांच्या चेहऱ्यावर, ओठांवर आणि डोळ्यांमध्ये एकच प्रश्न तरळला – तो म्हणजे कोण हे श्रीपाल सबनीस? तेव्हा आपण दलित, साम्यवादी आणि पुरोगामी चळवळीतून आलेलो आहोत, हे खुद्द सबनीस यांनीच सांगून टाकले. त्यांच्या घरी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली कुळपरंपरा सॉक्रेटिसपासून कबीर, न्या. रानडे, महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सांगितली होती, तेव्हा सदर लेखक तिथे उपस्थित होता. नावांची ही माळ एवढी लांब होती, की त्या वेळेत एखाद्या निष्णात लेखकाने शंभर पानी एखादे पुस्तक लिहिले असते.
येथे लक्षात घेण्यासारखे म्हणजे सबनीसांनी ही कुळपरंपरा कथन केली, तेव्हा पुरोगाम्यांच्या कुठल्याही पंथ-उपपंथातून त्याला विरोध किंवा आक्षेप झाला नाही.  याचा अर्थ त्यांनी या परंपरेवर केलेला दावा या लोकांना अमान्य नव्हता किंवा नाही. इतकेच नाही, तर त्यांच्याबद्दल उठलेल्या वादंगानंतर भाई वैद्य आणि विलास वाघ या धर्मनिरपेक्षतेच्या झेंडा हाती घेतलेल्या दोघांनीच आपली भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले. आता या दोन्ही नावांचे समाजवादी-साम्यवादी गोटाला वावडे नाही. बाकी य. दि. फडके, ग. प्र. प्रधान ते गंगाधर पानतावणे यांच्यापर्यंत अनेक नावे सबनीस घेतात. याचाच अर्थ सबनीस हे महाराष्ट्रात स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या मंडळींमधीलच एक आहे, याबद्दल शंकेला जागा नाही. 
अन् मग सबनीसांनी आपली ओळख पटविण्यासाठी मुक्ताफळे उधळायला सुरूवात केली. त्यांना मुक्ताफळे म्हणण्याऐवजी बरळणे म्हटले तरी चालेल. सबनीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला. “शांतता शांतता करत हा जगभर फिरतो. मोदी पाकिस्तानात गेला. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या असत्या तर पाडगावकरांच्या मोदींना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आपल्यावर आली असती,” हे सबनीसांचे शब्द आहेत. तसेच “गोध्रातील मोदी हे कलंकित असून असा पंतप्रधान मला चालणार नाही,” असेही म्हटले. त्यानंतर या वक्तव्यावर वादळ उठले तेव्हा माझे शब्द चुकले तरी मला पंतप्रधानांबद्दल आदरच आहे, मी त्यांच्याबद्दल काळजीमुळेच बोललो, अशी मखलाशी त्यांनी करून पाहिली. त्यानंतर मी मोदींना राष्ट्रभक्तच म्हटले, असेही म्हणून पाहिले.
परंतु सबनीसांनी केलेला एकेरी उल्लेख हा मूळ आक्षेप नसावा.  तसा तो आहेच मात्र त्यावर लक्ष केंद्रीत केले तर खऱ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. अशी भाषा पुरोगाम्यांना नवीन नाही. फक्त त्यांच्या गोटातून ती येते तेव्हा ते उद्वेगाचे लक्षण असते आणि हिंदुत्ववाद्याने कोणी वापरली, तर मात्र ती फॅसिस्ट विचारसरणीचा वसा असतो. “माझ्या हाती बंदूक असती तर नरेंद्र मोदींना मी गोळ्या घातल्या असत्या,” हे उद्गार विजय तेंडुलकरांनी काढले होते तेव्हा सेक्युलरांनी ते गोड मानून घेतलेच होते ना. सबनीसांच्या कथनातील आक्षेपाचा मूळ मुद्दा त्यातील खोटेपणा आणि त्यावरची सेक्युलरांची प्रतिक्रिया हा आहे. 
मोदी कलंकित आहेत, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपले मत दिलेले आहे. विद्यार्थ्यांपुढे राजकीय भाषण करणाऱ्या प्राध्यापकाला अशा कायदेशीर बाबीकडे दुर्लक्ष करता येते का? का खोटे बोल पण रेटून बोल, या पुरोगामी काव्यानुसार चाललेला हा प्रकार आहे? मोदी यांनी पाकिस्तानात अचानक जावे का नाही, हा वादाचा विषय आहे. परंतु तो वाद करावा कोणी? काय गंमत आहे पाहा, संरक्षण शास्त्र आणि मुत्सद्देगिरीशी जिचा तिळमात्रही संबंध आलेला नाही, अशी व्यक्ती पंतप्रधानाला आंतरराष्ट्रीय राजकारण व युद्धशास्त्र शिकवते. आता याच व्यक्तीने तौलनिक भाषाशास्त्र या विषयाचे आयुष्यभर अध्ययन-अध्यापन केले आहे (असा त्या व्यक्तीचाच दावा आहे) आणि ही व्यक्ती ‘मी खेड्यातून आलो आहे, मला शब्दांची माहिती नाही,’ असे रडवेल्या चेहऱ्याने सांगत आहे. हा जर भंपकपणा आणि अगोचरपणा नसेल, तर आणखी काय असू शकते?
कॉ. पानसरे यांच्या खुनानंतर वाहिन्यांवर चर्चेची गळती सुरू होती, तेव्हा एका स्वयंघोषित पुरोगामी लेखकाने चर्चेत एक वाक्य म्हटले होते – “कोणताही पुरोगामी माणूस कोणाचा खून करू शकत नाही आणि जो खून करतो तो पुरोगामी असू शकत नाही.” थोडक्यात म्हणजे समस्त पुरोगामी आणि विवेकवादी शुचिर्भूतपणाची कवच-कुंडले घेऊनच आलेली असतात. म्हणूनच आता सबनीसांनी आपले रंग दाखवले तेव्हा त्यांनी आपल्या कोंडाळ्यातून दूर करायचे शिताफीचे प्रयत्न चालू आहेत. कानठळ्या बसविणारी शांतता (डीफनिंग सायलन्स) असा एक वाक्प्रयोग इंग्रजीत आहे. त्याची अशा वेळेस आठवण येते. एरवी हिंदुत्ववाद्यांची असहिष्णुता आणि आक्रमकता याबद्दल ज्यांची टकळी थांबता थांबत नाही, असे सगळे मुखंड कोठे नाहीसे झाले आहेत?  
काल एका वाहिनीवर भाई वैद्य येऊन म्हणाले, की झाले गेले ते विसरून हे संमेलन पार पडू द्यावे. याचा अर्थ असा, की पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या कोणाचीही कसलीही आगळीक सगळ्यांनी नजरेआड करावी आणि वैचारिकतेच्या प्रांगणात त्याने मोठे योगदान दिले, म्हणून त्याला मुकाट्याने कुर्निसात करावा. हिंदुत्ववाद्यांना, त्यातही ब्राह्मणांना, मनाला येतील त्या शिव्या घालायच्या आणि पुरोगामीत्वाचा, सेक्युरिझमचा किंवा विवेकवादाचा पासपोर्ट मिळवायचा आणि त्या पासपोर्टवर सांस्कृतिक विश्वाची सैर करायची, असा हा 60 वर्षांचा साचाच या निमित्ताने उघड झाला आहे. श्रीपाल सबनीसांचे साहित्यातील योगदान वाटेल ते असो, हे पाखंड उघडे करण्याचे तरी योगदान त्यांच्या नावावर नक्कीच जमा होईल.