ट्रम्प बनणार का नरेंद्र मोदी?

दोन वर्षांपूर्वी 2014 मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका होऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाने मोठा विजय नोंदवला. त्यावेळी स्वघोषित लिबरल गोटाने असे एक मिथक तयार केले, की ती निवडणूक अमेरिकेच्या धर्तीवर लढल्या गेली होती. अमेरिकेत ज्या प्रकारे अध्यक्षपदासाठी एक उमेदवार असतो आणि सगळी निवडणूक त्याच्याच अवतीभोवती फिरते, तशीच ती निवडणूक नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीवर केंद्रीत झाली होती, हा त्यांचा आवडता सिद्धांत होता. पुरोगामी किंवा नेहरूवादी सेक्युलरिजमच्या नावावर खपविल्या जाणारी विचारसरणी पिछाडीवर पडली आहे, हे मानण्यास नकार देण्यासाठी निर्माण केलेला तो एक युक्तिवाद होता. आता पं. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळापासूनच निवडणुका अशाच पद्धतीने लढल्या गेल्या होत्या, ही गोष्ट वेगळी.
ही आठवण येण्याचे कारण म्हणजे अमेरिकेतील अध्यक्षपदाची सध्या चालू असलेली निवडणूक. तिथे रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्यात टक्कर आहे. अन् नरेंद्र मोदी यांनी ज्या परिस्थितीचा सामना केला होता, जवळपास अशाच परिस्थितीचा सामना ट्रम्प या टक्करीमध्ये करत आहेत. असंही म्हणता येईल, की अमेरिकेतील ही निवडणूक भारतातील निवडणुकांसारखीच लढली जात आहे. (प्रचाराची खालची पातळी आणि शिवीगाळीसह!) भारतात ज्या प्रकारे स्वघोषित उदारवादी मंडळी आणि माध्यमांनी मोदींना हरविण्यासाठी एक आघाडी उघडली होती, त्याच प्रकारे जवळपास संपूर्ण अमेरिकी माध्यमांनी  ट्रम्पना हरविण्याचा विडा उचलला आहे. रिपब्लिकन समर्थक आणि अनेक निष्पक्ष निरीक्षकांचे मत बनले आहे, की ट्रम्प फक्त हिलरींसोबतच लढा देत नाहीत, तर अमेरिकेच्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रे आणि टीव्ही वाहिन्यांसोबतही लढाई करत आहेत. 
म्हणूनच पाश्चिमात्य माध्यमांत असे म्हटले जात आहे, की या नोव्हेंबरमध्ये होणारी निवडणूक केवळ ट्रम्प आणि हिलरी यांच्या दरम्यानच नसून माध्यमांची विश्वासार्हतेची बाजी लागलेली आहे. भारतात ज्या तऱ्हेने मोदींनी मुख्य प्रवाहातील माध्यमांना बाजूला सारून नवीन माध्यमांच्या मदतीने आपले नाणे खणखणीत वाजवून घेतले, तशीच जादू अमेरिकेत  ट्रम्प करू शकतील का, हा आता प्रश्न आहे.
वॉशिंग्टन पोस्टमधील ताज्या लेखात माध्यमांच्या या पक्षपाती वागणुकीवर कठोर टीका करण्यात आली आहे. या लेखाचे उपशीर्षक आहे ‘डोनाल्ड ट्रम्प यांनी मुख्य प्रवाहातील माध्यमांचे पितळ उघडे पाडले’. या लेखात म्हटले आहे, “मुख्य प्रवाहातील माध्यमांनी डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूने आपला कल प्रदर्शित करण्यातील सारे पडदे दूर केले आहेत.” फॉक्स न्यूजच्या हॉवर्ड कुर्टझ् यांच्या शब्दांत, “माध्यम बिचाऱ्या डोनाल्डवर तुटून पडले आहेत.”
याचे एक उदाहरण वॉशिंग्टन पोस्टनेच दिले आहे. त्यानुसार ट्रम्प यांच्या सभेत अडथळा आणण्यासाठी लोकांना पैसे वाटण्याचे एक  स्टिंग ऑपरेशन समोर आले. तेव्हा हे स्टिंग करणारे लोक मुख्य प्रवाहातील पत्रकार नव्हते, असे सांगून हिलरींनी त्याची सच्चाई मान्य करण्यास नकार दिला. यावर वर्तमानपत्राने म्हटले आहे, की एक लॅपटॉप आणि मोबाइल असणारी कोणतीही व्यक्ती आजकाल पत्रकार असतो.मात्र मुख्य माध्यमांनी या घटनेकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले. वोक्स या संकेतस्थळाचे राजकीय विश्लेषक एज्रा क्लाईन यांनी लिहिले आहे, की न्यूयॉर्क आणि वाशिंग्टनमध्ये असलेल्या माध्यमांचा स्वतःचा ‘कॉस्मोपोलिटन’ पूर्वग्रह आहे, तो  ट्रम्पसारख्या बाहेरच्या व्यक्तींच्या विरोधात काम करतो.   ट्रम्पच्या विजयाची या माध्यमांनी संस्थात्मक, व्यक्तिगत आणि शारीरिक भीतीही वाटते, असेही त्यांनी लिहिले आहे. मोदींच्या विजयापूर्वी ‘दिल्लीच्या वर्तुळातील बाहेरच्या व्यक्तीच्या विजयाबाबत’ भीतीचे जे वर्णन होते, त्यात आणि यात काही फरक आहे का?
अध्यक्षपदाच्या मुख्य उमेदवारांच्या शेवटच्या वादविवादापूर्वी एका कार्यक्रमात हिलरींसोबत ट्रम्पही सहभागी झाले होते. तेथे उपस्थित पत्रकारांकडे इशारा करत आणि प्रत्येकाचे नाव घेऊन ते हिलरींना उद्देशून म्हटले,  “अहो बघा, तुमचे सगळे पाठिराखे येथे आले आहेत.” अमेरिकेचे राजकारण आणि पत्रकारितेतील हा एक नवा अध्याय होता. 
नरेंद्र मोदी हे एक सुसंस्कृत नेता आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या विरोधकांबद्दल किंवा माध्यमांबद्दल त्यांनी कधी अपशब्द काढला नाही. येथे करण थापर यांच्या ‘डेविल्स अॅडव्होकेट’  या कार्यक्रमातील त्यांच्या एका मुलाखतीची आठवण येणे साहजिक आहे. मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या कार्यक्रमात थापर यांनी गुजरात दंगलींबाबत एकच प्रश्न वारंवार विचारला होता. मोदींनी त्यांना अत्यंत संयमाने एकच उत्तर दिले. शेवटी जेव्हा थापर आपल्या प्रश्नावर अडून बसले, तेव्हा मोदी म्हणाले, ‘थापर साहेब, तुम्ही माझे मित्र आहेत आणि तुम्ही मित्रच राहावेत, अशी माझी इच्छा आहे.’ आणि त्या कार्यक्रमातून ते निघून गेले.
ट्रम्पची मात्र गोष्टच वेगळी. त्यांच्या सैल सुटलेल्या जिभेसाठीच ते ओळखले जातात. परिस्थिती अशी आहे, की कोलोराडोतील एका सभेतट्रम्पनी आपल्या पाठिराख्यांना सांगितले, “वर्तमानपत्रे विसरून जा, इंटरनेट वाचा. तिथे मला जास्त प्रामाणिकपणा सापडतो.”  
नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे मुख्य प्रवाहातील माध्यमांना अर्थहीन बनवत  सोशल मीडियाचा आश्रय घेतला आणि त्यात यशही मिळविले, त्याच प्रकारे ट्रम्प यांनी फेसबुकच्या साहाय्याने प्रचार सुरू ठेवला आहे. म्हणूनच अमेरिकेतील भारतीय लोकांसमोर प्रचार सभेत ‘मी मोदींचा प्रशंसक आहे आणि त्यांच्या प्रकारे काम करण्याची माझी इच्छा आहे,’ असे ट्रम्प म्हणतात तेव्हा त्याचे अनेक अर्थ असतात. आता ते नरेंद्र मोदी बनणार का, हे फक्त काळ आणि अमेरिकी मतदातेच सांगू शकतात.