अदियोस ढोंग

सोळाव्या लुईचा शिरच्छेद केला, तेव्हाही जनता नाचली होती. हिटलर आणि मुसोलिनी उंदरासारखे बिळात घुसून मेले, तेव्हाही लोकांनी आनंदाने चित्कार केला होता. स्टॅलिन मेला तेव्हा लोकांना आनंद व्यक्त करता येईल एवढे पुरोगामी आणि समतावादी वातावरण रशियात नव्हते. तरीही बेरियासारखे त्याचे विरोधक-स्पर्धक छद्मी हास्य करत होते. मृत्यूच्या दारातील घंटा वाजवून आल्यावर स्टॅलिन काही काळ उठून बसला, तेव्हा हाच बेरिया हवालदिल झाला होता. मग परत तो मेल्याची खात्री पटल्यावर त्याने नि:श्वास सोडला. पूर्व जर्मनीतील एरिख होनेकरची कारकीर्द संपल्यावर जनतेने अशाच उत्साहातिरेकाने दोन जर्मनीतील भिंत फोडली होती. 1994 साली तो गेला तेव्हाही कित्येकजण आनंदले होते. हिटलर हा आदर्श आहे, म्हणून इतरांकडे बोटे दाखविणाऱ्यांनी या सत्तांधांबद्दल वावगा शब्द काढल्याचे दिसले नाही. 
सांगायचा मुद्दा हाच, की हुकूमशहा हा हुकूमशहाच असतो. जुलूम हा जुलूच असतो. त्यात डावे उजवे असे काही नसते. 
मात्र बुद्धिवंतांच्या क्षेत्रावर नागाप्रमाणे वेटोळा घालून बसलेल्या डाव्यांनी आणि त्यांच्या वळचणीला बसून आपली प्रज्ञा गहाण टाकणारे पुरोगामी, यांनी गेल्या अनेक दशकांपासून हुकूमशहा म्हणजे फक्त हिटलर आणि भारत माता की जय म्हणणारे त्याचे आराधक असा एक धुरळा उडवून दिला आहे. चुकूनही डावीकडे झुकलेला कोणी इसम किंवा व्यवस्था चुकीची असूच शकत नाही, त्या व्यक्ती किंवा व्यवस्थेने केलेली आगळीक ही मानवकल्याणासाठीच असते, यावर या विचारवंतांची अगाध श्रद्धा असते. म्हणूनच पन्नास वर्षे क्युबाच्या जनतेला तोबा तोबा करायला लावणारा हुकूमशहा त्यांना महान क्रांतीकारक वाटलाच नसता. एरवी स्टॅलिन, होनेकर आणि तत्सम मंडळी काय आणि हिटलर-मुसोलिनी काय, ही एकाच माळेची मणी आहेत.
कॅस्ट्रोच्या मरणानंतर आज अमेरिकेच्या रस्त्यांवर आनंदोत्सव साजरा करणारे लोक मनोरोगी नाहीत. आपल्या अनेक पिढ्यांच्या उच्छादाचे एक साकार कारण नष्ट झाल्याची बालिश (अगदी विकृत म्हणता येईल) अशी मजा ते घेत आहेत. 

फिडेल कॅस्ट्रो हे डाव्या आणि पुरोगाम्यांच्या ढोंगाचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांनी सुरू केलेली जुलूमशाही अद्याप संपलेली नाही. जनतेला दडपण्याचा वारसा आपल्या भावाला सोपवून ते गेले आहेत.हुकूमशहा, फॅसिस्ट आणि जगाचा कर्दनकाळ म्हणविले जाणारे डोनाल्ड ट्रम्प

राजकीय परिघाबाहेरून मुसंडी मारून सत्तेच्या पायरीवर पोचले आहेत. आणि समतावाद, क्रांती व सर्वहारांचे तारणहार म्हणून म्हटल्या जाणाऱ्या कॅस्ट्रोंनी साठ दशके सत्ता आपल्याच घरात कोंडून ठेवली आहे.  तरीही क्रांतीचा तारा ढळला आहे, असा कंठशोष करायला पुरोगामी – तेच ते, लिबरल – मोकळे आहेत. कारण ढोंग हा त्यांच्या स्वभावाचा भाग बनला आहे. एरवी किमान 14 हजार खून पाडणारा चे गवारा यांचा पोस्टर बॉय बनता ना!

ढोंगाच्या शेवटचा प्रभावी स्तंभ कोसळला आहे. अलविदा ढोंग, एवढेच आपण म्हणू शकतो!