धर्मं चर, ख्रिस्तं अनुचर

गेली एक-दोन वर्षे मी बायबल वाचत आहे. संस्कृतमधून. मुळात बायबल हे एक पुस्तक नसून ते 27 पुस्तकांचा एक संग्रह आहे. त्यामुळे या प्रत्येक पुस्तकाची एक वेगळी मौज आहे.

बायबलमधला येशु ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. एकूण बायबल वाचले तर येशूची कहाणी ही करुण रसाने ओथंबलेली दिसते. तो नेहमी स्नेहाळ भाषेत बोलतो. तो ठायी ठायी श्रद्वावंतांना आवाहन करतो. मात्र येशूवर विश्वास ठेवणारेच तरतील, असे बायबल म्हणते. धर्माऐवजी तिथे श्रद्धेला जास्त महत्त्व आहे. विश्वास न ठेवणारे खितपत पडतील, असे बायबल बजावून सांगते.

ईश्वर, येशू आणि पवित्र आत्मा (होली घोस्ट) हे तीन सत्य आहेत, येशू हा ईश्वराचा एकुलता एक पुत्र आहे आणि क्रूसावर मरण आल्यावर त्याचे पुनर्जीवन झाले, या ख्रिस्ती धर्माच्या तीन मुलभूत श्रद्धा आहेत. या श्रद्धा न बाळगता कोणीही ख्रिस्ती असू शकत नाही.

ईश्वर श्रेष्ठ आहे, असं म्हणायची तयारी असेल तर तुम्हाला पूर्ण तारण्याची तजवीज बायबल करते. खालील वाक्यांचा मासला पाहा,

 • असाध्यं मनुष्याणां, न त्वीश्वरस्य। (असाध्य मानवांना आहे, ईश्वराला नाही).
  सर्वमेव शक्यं विश्वसता। तव विश्वासं त्वां तारयामास। (श्रद्धेने सर्व शक्य आहे. तुझी श्रद्धा तुला तारेल.)
 • न केवलेन पूपेन मनुष्यो जीविष्यति अपि ईश्वरस्य येन केनचिद् वचनेन (मनुष्य केवळ पैशावर जगत नाही, तर ईश्वराच्या एखाद्या वचनावर जगतो.)
 • निजेईश्वरस्य प्रभोर्भजना त्वया कर्तव्या, एकश्च स एव त्वयाराधितव्यः। (तू केवळ आपल्या ईश्वराचे भजन केले पाहिजेस. तू फक्त त्याची आराधना केली पाहिजे.)
 • चिकित्सको न स्वस्थानाम् अपि तु अस्वास्थानाम् आवश्यकः। न धार्मिकान् अपि तु मनःपरावर्तनाय पापिन् आव्हातुम् अहम आगतः। (वैद्य निरोगी लोकांना नव्हे, तर आजारी लोकांसाठी आवश्यक असतो. मी धार्मिक लोकांचे नाही तर पापी लोकांच्या मनाचे परिवर्तन करण्यासाठी आलेलो आहे.)
 • किमर्थं वा यूयं मां प्रभो प्रभो इत्यभिभाषध्वे न तु मद्वाक्यानुरूपाचरणं कुरूथ? (तुम्ही मी सांगतो तसे वागत नाही, तर मला प्रभू प्रभू तरी का म्हणता?)
 • ईश्वरस्य धनस्य चोभयोर्दास्यं कर्तुं युष्माभिर्न शक्यते। (ईश्वर आणि धन या दोहोंचीही गुलामी तुम्ही करू शकत नाही).
 • मत्तः पृथक् युष्माभिः किमपि कर्तुं न शक्यते (माझ्यावाचून तुम्ही काहीही करू शकत नाही.)
 • अहमेव पन्थाः सत्यश्च जीवनश्च, नान्योपायेन मनुष्यः पितुः समीपमायाति। केवलं मया। (सत्य आणि जीवनाचा मीच मार्ग आहे. अन्य कोणत्याही उपायाने मनुष्य पित्याजवळ (देवाजवळ) जाऊ शकत नाही. केवळ माझ्या माध्यमातून जातो.)
 • सत्यं मयानुभूयते यद् ईश्वरो न पक्षपाती अपि तु सर्वस्यां जात्यां यः तस्माद् बिभेति धर्ममाचरति च स तस्य ग्राह्यः। (हे सत्य मी अनुभवले आहे, की ईश्वर पक्षपाती नाही, परंतु जो जीव त्याला भितो आणि धर्माचे आचरण करतो तो त्याला ग्राह्य ठरतो.)
 • यदि त्वं ‘यीशुं प्रभुरूपेण‘ स्वयं अंगीकरोषि तथा च मनसा यं स्वीकरोषि यत् परमेश्वरेण एव मृतेषु जीवेषु स: जीवित: कृत: तर्हि निश्चयरूपेण त्वम् उद्धरसि (तू येशूला प्रभू म्हणून स्वतः मान्य केलेस आणि परमेश्वरानेच त्याला मृत्यूनंतर जीवंत केले, हे मनाने अंगीकारलेस, तर तू तुझा उद्धार निश्चितच करशील – रोमिणस्य पत्रम् 10:9)

या उलट बायबलच्या तुलनेत भगवद्गीता किंवा पुराणांमध्ये अधिक भावनिक ओलावा. येशू हा देवपुत्र आहे, त्यामुळे तो नेहमीच एका उंचीवर राहतो. याउलट भागवतातील श्रीकृष्ण एकाच वेळेस बालक, खोडकर मुलगा, किशोर, प्रेमी, राजकारणी असे बरेच काही आहे. श्रीरामाच्या बाबतीतही हेच. त्यामुळे तुम्ही त्यांना कोणत्याही रीतीने भेटू शकता. त्यामुळे संतांचा पांडुरंग एकनाथांच्या घरी पाणी भरी शकतो आणि जनाबाईच्या घरी दळण-कांडण करू शकतो. त्यात त्याची मानहानी झाली किंवा अवमान झाला, असे कोणाला वाटत नाही. म्हणूनच भगवद्गीतेत विश्वरूपदर्शन पाहिलेला अर्जुन श्रीकृष्णाची माफी मागतो. मी तुला मित्र समजून तुझी थट्टा केली, बोलू नये तो बोललो, असे खजील होऊन म्हणतो. तेव्हा श्रीकृष्ण नुसतेच हसून तो विषय टाळतो, त्याची निर्भर्त्सना करत नाही.

त्यापेक्षाही म्हणजे या ग्रंथांमध्ये बौद्धिक स्वातंत्र्य अधिक आहे. “यः तस्माद् बिभेति धर्ममाचरति च स तस्य ग्राह्यः” असे ते म्हणत नाहीत. धर्मभीरू किंवा पापभीरू नावाचा प्रकार हिंदू संस्कृतीत नाही. उलट “यो यथा मां भजति तांस्तथैव भजाम्यहम्” असे भगवद्गीता म्हणते.

अगदी “मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू” असे म्हणणारा श्रीकृष्ण भगवद्गीतेत शेवटी अर्जुनाला म्हणतो, “इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्‌गुह्यतरं मया। विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥18- 63॥” (हे मला माहीत असलेले गुप्तातील गुप्त ज्ञान तुला निःशेष दिले आहे. यानंतर तुझी जी इच्छा असेल ते कर.)

सत्यं वद, धर्मं चर (खरे बोल, धर्माचे आचरण कर) हा हिंदू जीवनपद्धतीचा संदेश आहे. (येथे धर्म म्हणजे वागणुकीचा कायदा, कर्मकांड नव्हे). म्हणजे ईश्वरावर श्रद्धा न बाळगता केवळ धर्म पाळल्याने मनुष्य हिंदू असू शकतो. म्हणूनच भगवद्गीतेत चौथ्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतो, ”त्रैगुण्यविषया वेदा निस्रैगुण्य भवार्जुन”. म्हणजे साक्षात वेद हेच त्रिगुणांबाबत बोलतात पण तू या तीन गुणांच्या पलीकडे जा, असे तो सांगतो. याचाच अर्थ जीवनाचा अर्थ लावताना वेदांचेही प्रामाण्य नाकारण्यात त्याला फार काही वाटत नाही. पण ख्रिस्तं अनुचर (ख्रिस्ताचे अनुसरण कर) हा बायबलचा संदेश आहे.

आता धर्माचे अनुसरण करायचे का श्रद्धेने जगायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.