तमिळ राजकारणात आणखी एका वारसाचा सूर्योदय

ब्राह्मणी आणि उत्तर भारतीय (थोडक्यात आर्य) वर्चस्वाच्या विरोधात विद्रोह म्हणून उभा राहिलेल्या द्रविड राजकारणात फार काही जगावेगळे घडत नाही. उत्तरेतील मुलायमसिंह-लालूप्रसादांच्या बरोबरीने किंबहुना जास्तच वंश परंपरावादी राजकारण दक्षिणेतही घडते. फक्त त्याचे रंग वेगळे आहेत. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंनी आपला मुलगा नारा लोकेश याला अलगद पुढे आणले आहेच, कर्नाटकात एच. डी. देवेगौडा आणि कुमारस्वामी ही बाप-लेकांची जोडी प्रसिद्ध आहेच. तमिळनाडूत द्रविड राजकारणाचे अध्वर्यू असलेल्या करुणानिधी यांचे चिरंजीव एम. के. स्टॅलिन अनेक वर्षे त्यांच्या द्राविड मुन्नेट्र कळगमची धुरा वाहत आहेतच. आता त्यांची तिसरी पिढीही राजकारणात प्रवेश करत आहे.

स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन याने नुकतेच आपल्या राजकीय प्रवेशाचे सूतोवाच केले आहे. आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करणार आहोत, अशी घोषणाच त्यांनी केली आहे.

द्रामुकचे नेते आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचे उदयनिधी हे नातू. मी राजकारणात आधीपासूनच होतो, परंतु आता सक्रिय होण्याचे ठरविले आहे, असे उदयनिधी यांनी सांगितले आहे.
उदयनिधी यांनी आतापर्यंत राजकारणात फारसे स्वारस्य नव्हते. उदयनिधी किंवा माझा जावई राजकारणात प्रवेश करणार नाहीत, असे दोन वर्षांपूर्वी निवडणुकीचा प्रचार करताना त्यांचे वडील एम. के. स्टॅलिन यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

उलट राजकारणाच्या बरोबरीने तमिळनाडूची आणखी एक आवड असलेल्या चित्रपट क्षेत्रात ते रमले होते. निर्माता म्हणून सुरूवातीला तमिळ चित्रपट उद्योगात उदयनिधीचा प्रवेश झाला. ‘ओरु कल ओरु कन्नाडी’ हा त्याचा नायक म्हणून पहिला चित्रपट. नायक म्हणून त्यांची कारकीर्द बऱ्यापैकी चालली होती. द्रामुकचे मुखपत्र असलेल्या मुरासोली या वृत्तपत्राचे व्यवस्थापक-संपादक म्हणून काही महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या राजकीय प्रवेशाचे ते पहिले संकेत होते.

“माझा मुलगा, आणि माझे जावई राजकारणात सामील होणार नाहीत. माझ्या कुटुंबियातील कोणीही राजकारणात प्रवेश करणार नाही, याची ग्वाही मी देतो, ” असे स्टॅलिन म्हणाले होते. परंतु कमल हासन आणि रजनीकांत या दोन अभिनेत्यांच्या प्रवेशामुळे कदाचित दृश्य बदलले असावे. त्यामुळे तरुण रक्ताचे म्हणून कदाचित उदयनिधींना आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

“माझे जन्म झाल्यापासून, मी राजकारणात आहे … मी जन्मापासूनच द्रामुकवादी आहे, द्रामुक माझ्या रक्तात आहे.मी चित्रपट उद्योगात प्रवेश करण्यापूर्वीपासून मी राजकारणात सक्रिय आहे. मी तलैवरांसाठी (करुणानिधी) व मुरासोली मारन यांच्यासाठी प्रचार केला आहे आणि वडिलांसोबत दौरेही केले आहेत. मी या सर्वांपासून काही काळ दूरच होतो, परंतु आता सगळेच कलाकार यात येत आहेत. मला वाटतं आता राजकारणात प्रवेश करण्याची वेळ आली आहे,” असे उदयनिधीने जानेवारी महिन्यात एका तमिळ संकेतस्थळाशी बोलताना सांगितले होते.

गेल्या महिन्यात देशात पुतळेतोडीचे सत्र सुरू असताना तमिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याचीही विटंबना झाली होती. तेव्हा ट्विटरवरून प्रतिक्रिया देऊन त्यांनी आपली भूमिका मांडली होती.
“पेरियार ही एक व्यक्ती नव्हती. ती तमिळनाडूची अस्मिता आहे. एक पुतळा तोडला तर हजारो, लाखो उद्भवतील. मोडतोडीची इतकीच खुमखुमी असेल तर दिवस, वेळ आणि जागा सांगून ये” असे जाहीर आव्हान त्यांनी दिले होते.

स्टॅलिनचे जावई साबरीश यांना 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची माध्यमांतील प्रचार मोहीम राबविण्याचे श्रेय जाते. स्टॅलिन यांच्या अनेक राजकीय निर्णयांमागे त्यांचा हात असल्याचे म्हटले जाते.

कावेरी नदीच्या प्रश्नावरून अलीकडेच स्टॅलिन यांनी तिरुवारुरपासून कडलूरपर्यंत यात्रा काढली होती. त्या यात्रेत उदयनिधींचा सहभाग लक्षणीय होता. इतकेच नव्हे तर या यात्रेच्या समापनाच्या वेळेस कडलूर येथे त्यांचे भाषण झाले. त्या सभेसाठी निघताना उदयनिधीने आजोबा करुणानिधी यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. या घटनेचा व्हिडियो सध्या तमिळनाडूत फिरत आहे.

द्रामुक (म्हणजे करुणानिधी) यांच्यावर घराणेशाहीचे आरोप फार पूर्वीपासून करण्यात येत आहेत. नेहरू-गांधी घराण्याची शैली तमिळनाडूत आणण्याची टीका त्यांच्यावर केली जाते. करुणानिधी यांचे ज्येष्ठ पुत्र एम.के. मुथु यांना पुढे आणण्यासाठी लोकप्रिय असूनही एम. जी. रामचंद्रन यांना दूर ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मुथू यांना द्रामुकचे पुढील नेते म्हणून चित्रित करण्यात येत होते. त्यावर नाराज होऊनच एमजीआर यांनी अण्णा द्रामुक पक्ष काढला आणि नंतरचा इतिहास ताजा आहे. त्यानंतर एम. के. स्टॅलिन यांच्याकडे नेतृत्व सोपविण्याचे प्रयत्न सुरू झाले. खुद्द स्टॅलिन यांना धोका ठरू नये, वैकोंना बाजूला करण्यात आले, असे अनेक राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळ द्रमुकमधून राजीनामा देऊन बाहेर पडलेले वैको हे या घराणेशाहीवर टीका करण्यात आघाडीवर आहेत.

आता उदयनिधी यांच्या रूपाने या नाट्याचा पुढचा अंक सुरू होत आहे. करुणानिधी हे आतापर्यंत कुडूम्ब अरसियल (कौटुंबिक राजकारण) करत होते, आता वारिसु अरसियल (आनुवंशिक राजकारण) सुरू झाले आहे, अशी मार्मिक टिप्पणी गांधी मक्कल इयक्कम या पक्षाचे संस्थापक तमिऴरुवी मनियन यांनी यावर केली आहे.

उगवता सूर्य हे द्रामुकचे निवडणूक चिन्ह. इतके दिवस मुरासोली मारन, दयानिधी मारन हे भाचे, अळगिरी आणि स्टॅलिन ही मुले, कनिमोऴी ही मुलगी अशा एक भलामोठा कुटुंबकबिला करुणानिधींनी राजकारणात आणला होता. त्यात नातवाच्या रूपाने आणखी एक सूर्योदय!