घुमानच्या निमित्ताने-9 घुमानचे इष्टकार्यं सिद्धम्!

tumblr_nm9z1uycif1u5hwlmo1_500[1] अमृतसरला हरमंदिर साहेब आणि जालियांवाला बागेचे दर्शन झाल्यानंतर त्या दिवशी तिथेच मुक्काम केला. तेथून परतताना वाघा सीमेवर नेणाऱ्या ऑटोवाल्यांचा पुकारा चालला होता. मात्र एकाच दिवशी हे सर्व करण्याची माझी इच्छा नव्हती. शिवाय संमेलनानंतरचा एक दिवस मी त्यासाठी राखीव ठेवला होता. त्यामुळे त्या दिवशी विश्रांती घेण्याचे ठरवले आणि बस स्थानकावरील खोलीत परतलो.

रात्री बस स्थानकाशेजारीच एका हॉटेलमध्ये जाऊन मिनी थाळी मागविली. तमिळनाडूत ज्या प्रमाणे राईस प्लेट या संज्ञेत चपातीचा समावेश होत नाही, त्याच प्रमाणे पंजाबमध्ये थाली या संज्ञेत भाताचा समावेश होत नाही, अशी माहिती या निमित्ताने झाली. तरीही मिनी थाली ४० रुपये आणि भाताची प्लेट ३० रुपये या हिशेबाने ७० रुपयांत अगदी शाही जेवण झाले. बटाटा आणि टोमॅटोची भाजी आणि शेजारी गरमागरम रोटी असा जामानिमा होता. गायकाला जसा जोडीला तंबोरा लागतो तसा या जेवणाला सोबत करण्यासाठी अख्खा मसूर होताच. आधी ते दृश्यच पोटभर पाहून घेतले. आचार्य अत्रे असते तर ‘तो पाहताच थाला, कलिजा खलास झाला’ असे एखादे गाणे त्यांनी नक्कीच लिहिले असते. मग जेवण जे काय रंगले म्हणता, पाककर्ता सुखी भव असा तोंडभरून आशिर्वाद देऊन मी रजा घेतली आणि झोपेच्या स्वाधीन झालो.

सकाळी खाली उतरून लगेच समोरच्या प्लॅटफॉर्मवर घुमानची गाडी शोधली. पंजाबच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा असे झाले असेल, की अमृतसरहून सुटणाऱ्या बसमध्ये पंजाबी लोकांपेक्षा मराठी लोक जास्त असतील. एकूण प्रवाशांपैकी सुमारे अर्धे लोक मराठी होते आणि त्यांच्यापैकी बहुतेकांकडे शबनमी होत्या. परंतु ते संमेलनालाच निघाले होते, हे ओळखण्यासाठी शबनमींची गरजच नव्हती. ज्यांच्याकडे शबनम नव्हती, त्यांच्याही तोंडातून मराठी शब्द बाहेर पडला, की त्यांचे तिकिट कुठले असणार, याचा अंदाज यायचा. एखाद्या जत्रेला निघावे, तशी ही मंडळी घुमानला निघाली होती. त्यात अकोला, बुलढाणा अशा गावांमधून आलेले लोक होते. माझ्याशेजारी बसलेली व्यक्ती पुण्याहून आली होती. त्यांच्यासोबत देहू संस्थानचे माजी विश्वस्त आणि तुकाराम महाराजांचे वंशज होते. ते बियासवरून आले होते. त्यांनी एक गंमत सांगितली. मुंबईहून सुटणारी गाडी येणार म्हणून जागोजागच्या गुरुद्वारांमधील लोकांनी स्वागताची, पाहुणचाराची जय्यत तयारी केली होती. परंतु या गाडीला उशीर झाल्यामुळे त्या लोकांची तयारी फलद्रूप होऊ शकली नाही. माझ्या सोबत बसलेली मंडळी जेव्हा बियासला उतरली तेव्हा या लोकांनी त्यांना बळेबळेच आपल्यासोबत नेले आणि मुक्काम करायला लावला. त्यांना खाऊ-पिऊ घातले.

ते काही असो, घुमानला गाडी पोचली आणि तेथील चौकातच पताका-झेंडे आणि बॅनरनी आमचे स्वागत केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनर तर लावले होतेच पण काही स्थानिक शिवसैनिक गळ्यात भगव्या पट्टे घालून उत्साहाने जमले होते. संपूर्ण रस्त्याच्या कडेने पांढरी रांगोळी होती, रस्त्यावर पताका फडकत होत्या. घुमानचा गुरुद्वारा मुख्य रस्त्यापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण रस्ता १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला सजावा तसा सजला होता. जागोजागी लोकांनी लंगर लावले होते आणि चहा-पकोडे मुक्तहस्ते वाटल्या जात होते. मुख्य म्हणजे संपूर्ण गावात पंजाबीपेक्षा मराठी वाक्ये अधिक ऐकू येत होती.

गावात लॉज आहे का, असे मी एकाला विचारले. कारण मी आगाऊ नोंदणी केली नव्हती. संमेलनासाठी पुण्यातून जे वऱ्हाड निघाले होते त्यात मी नव्हतो. इतकेच काय, संजय नहार यांची ओळख असली तरी मी येणार आहे, हे मी त्यांनाही सांगितले नव्हते. त्यामुळे गावात उतरायला जागा मिळेल का, ही माझ्या मनात धाकधूक होतीच. मला उत्तर मिळाले, की गावात लॉज नाही. गुरुद्वाऱ्याचे यात्री निवास आहे, मात्र त्याची नोंदणी आधीच झाली असणार. मग एका इंटरनेट कॅफे चालकाने सल्ला दिला, की शेजारच्या शाळेमध्ये जागा असेल तिथे चौकशी करा. तेथे गेल्यावर जागा आहे का, असे विचारल्यानंतर तेथील व्यक्तीने होकार भरला आणि नाव-गावाची नोंद केल्यानंतर एका मुलाला मला जागा दाखविण्यास पाठविले. दशमेश पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात अशा तऱ्हेने माझा मुक्काम पडला.

घुमानच्या निमित्ताने-8 जालियांवाला बाग का खेलियांवाला बाग?

अशा रितीने हरमंदिर साहेबला पहिली भेट दिल्यानंतर बाहेर पडलो  आणि चार पावले पुढे जात नाही तोच जालियांवाला बाग लागली. म्हणजे तशी हरमंदिर साहिबकडे येताना ही जागा दिसतेच; परंतु दर्शन झाल्यानंतर तिथे जाऊन भेट दिली. जालियांवाला बाग हत्याकांड हे भारतीय इतिहासातील एक दुर्दैवी पान. १३ एप्रिल १९१९ रोजी जनरल डायर याच्या आदेशावरून ब्रिटीश सैनिकांनी येथेच हजारो भारतीय लोकांची हत्या केली. लहानपणापासून इतिहासाच्या पुस्तकात वाचलेली ही हकिगत, ‘गांधीचित्रपटात अंगावर काटे येतील अशा पद्धतीने चित्रित केलेली ही घटना जालियांवाला हत्याकांडाच्या स्मारकात प्रवेश करताना सर्रकन डोळ्यासमोरून गेली.

जालियांवाला बाग हे नाव थोडेसे दिशाभूल करणारे आहे. म्हणजे गोष्ट अशी, की इथे बाग वगैरे काही नव्हते. जल्ले ही पंजाबमधील जातीच्या उतरंडीत खालच्या थरावर मानलेल्या जातींपैकी एक जात. या जातीतील अनेकांच्या नावावर असलेल्या जमिनीच्या तुकड्यांचे मैदान म्हणजे ही जागा. म्हणून तिला जालियांवाला असे नाव. एकेकाळी येथे केरकचरा आणि गवताचे साम्राज्य होते. नंतर ती जागा साफसूफ करण्यात आली. सुवर्ण मंदिराला जवळ असल्यामुळे बहुतेक राजकीय सभा येथे भरत असत. रौलेट कायद्याच्या दडपशाहीच्या विरोधात भरलेली सभा ही त्यापैकीच एक.

चारी बाजूंनी इमारती आणि आत जाण्यासाठी केवळ एक अरुंद गल्ली, अशी तिची स्थिती. आजही या स्मारकात जाण्यासाठी हीच एक गल्ली वापरण्यात येते. तेथून जाताना लावलेल्या पाटीवरची अक्षरे वाचताना त्या कोंडलेल्या निष्पाप माणसांचे आक्रोश आणि आकांत आपल्या कानावर आदळू लागतोआता या जागी व्यवस्थित उद्यान विकसित केले आहे. उद्यानाच्या एका कोपऱ्यात अखंड तेवणारी ज्योत असून तिला अमर ज्योति असे नाव आहे. एका ठिकाणी छोट्याशा मंदिरासारखी एक वास्तू आहे. एका कोपऱ्यात एक विहीर असून तिला शहीदी विहीर असे नाव आहे. सोजिरांच्या गोळीबारापासून वाचण्यासाठी सैरावरा धावणाऱ्या अनेक सत्याग्रहींनी याच विहीरीत उड्या मारून आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या विहीरीची खोली फारशी नाही मात्र त्याच्या इतिहासाची भीषणता रौद्र आहे. ही विहीर नसून साक्षात काळाचा जबडा आहे, असे आपल्याला वाटू लागते. येथेच एका दालनात जालियांवालाशी संबंधित एक प्रदर्शन लावले असून तिथे या घटनेतील शहीद, पत्रव्यवहार, घटनाक्रम अशी माहिती मांडली आहे.

मात्र या सर्वांत सर्वार्थाने मनाला विद्ध करणारी कोणती निशानी असेल तर ती म्हणजे येथील भिंतीवर पडलेल्या बंदुकीच्या गोळ्यांचे ठसे. या हत्याकांडात बंदुकीच्या … फैरी झाडल्या गेल्या त्यातील ३८ गोळ्यांच्या निशाण्या येथील लाल विटांच्या भिंती अद्याप अंगावर बाळगत आहेत. प्रत्येक निशाणीभोवती पांढरी चौकट आखली असून त्यातून गोळ्या लागल्यानंतर निर्माण झालेल्या खाचा दिसतात. या खुणा पाहत असताना प्रत्यक्ष गोळ्या अंगावर आल्याचा भास होतो.


जालियांवाला बागेत फिरत असताना खरे तर आपल्याला इतिहासाचे स्मरण व्हायला हवे. या हत्याकांडाला अजून पुरते शंभऱ वर्षही लोटले नाहीत. त्यामुळे त्या हजारो लोकांच्या बलिदानाची स्मृती जागवणे एवढे अवघड नाही. परंतु येथे येणारे लोक हे एखाद्या सामान्य बागेत आल्यासारखे नाचतबागडत असतात. लहान मुले उंडारत असतात आणि त्यांच्या पोरकट आया कौतुकाने पाहत असतात. घटनेचे गांभीर्य आणि जागेचे पावित्र्य याचा लवलेशही कोणाच्या चेहऱ्यावर दिसत नाही. जालियांवाला बाग स्मारक अशी पाटी जिथे लावली आहे तिथे पर छायाचित्रेच्छुकांच्या झुंडी लोटत असतात. कोणी त्या अक्षरांकडे तोंड करून सलाम करण्याचा आविर्भाव करतो, कोणी ताठ उभे राहतो तर कोणी चार मित्रांना कवेत घेऊन आपणच इतिहास घडविल्याच्या ढंगात छबी टिपून घेतो. त्याचवेळेस वाघा सीमेवर नेण्यासाठी ग्राहकांना हाकारे घालत ऑटोवाले तिथे फिरत असतात. त्यामुळे ही जालियांवाला बाग आहे की खेलियांवाला बाग आहे, असा प्रश्न पडतो.

एखाद्या जागेचे पावित्र्य कायम ठेवायचे तर तिथे देवाची मूर्ती किंवा धर्मग्रंथातील वचनेच लावायला पाहिजेत, असा काहीतरी भारतीयांचा नियम असावा. एरवी पुण्यातील शनिवारवाडा किंवा आगाखान पॅलेस असो, मदुराईतील गांधी स्मारक असो, कन्याकुमारीतील गांधी मंडपम किंवा विवेकानंद स्मारक असो अथवा पानीपतचे युद्ध स्मारक असो, कुठल्याही जागी लोकांची प्रवृत्ती तळमळीऐवजी खेळीमेळीकडेच असल्याचे मी पाहिले आहे.

घुमानच्या निमित्ताने-7 पोट भरण्याची चिंताच नाही!

WP_20150406_010तसे पोट भरायचे झाले तर पंजाबमध्ये खरे तर एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. कुठल्याही गुरुद्वाऱ्यात जावे आणि लंगर साहिबमध्ये बसून मनसोक्त आहार घ्यावा. काही गुरुद्वाऱ्यांमध्ये विवक्षित वेळी लंगर चालतो तर काही ठिकाणी चोवीस तास चालतो. शीख पंथामध्ये लंगर (सामुहिक स्वयंपाकघर आणि अन्नदान) याचे मोठे महत्त्व आहे. शिखांचे पाचवे गुरु अर्जुनदास यांची अटच होती, की ‘पहले पंगत फिर संगत’. म्हणजे पाहुण्याने आधी जेवायचे आणि मगच त्यांची भेट घ्यायची. एकदा अकबर बादशहा त्यांची भेट घेण्यास गेला असता त्यालाही ही अट सांगण्यात आली. त्यावेळी मुकाट्याने बादशहालाही सामान्य लोकांसोबत पंगतीत बसावे लागले आणि लंगर घ्यावा लागला.

डोक्यावर रुमाल पांघरायचा, कुठलीही लाज न बाळगता पंगतीत बसावे आणि प्रशादा म्हणून मिळणारी रोटी हातावर झेलावी. ही एवढी तयारी असेल तर मक्के दी रोटी, एखादी भाजी, दाल, चावल आणि पेलाभर चहा मिळून जातो. जात, धर्म किंवा लिंग असा कुठलाही भेदभाव यात असत नाही. हरमंदिर साहिबमध्ये दोनदा गेलो असताना दोन्ही वेळेस मी तेथील लंगर साहिबमध्ये जेवलो. अर्थात पैसे वाचविणे किंवा पोट भरणे हा हेतू नव्हता. कारण वर म्हटल्याप्रमाणे हॉटेलमध्ये कुलचा खाल्ल्यानंतरही मी लंगरमध्ये गेलो होतो. मी गेलो कारण ती सवय आहे. घुमानच्या गुरुद्वारातही लंगर साहिब आहे आणि तेथे मी गेलो होतो. तिथे सुधीर गाडगीळ म्हणाले, "मला भूक लागलीय.”

मी म्हणालो, "चला लंगरमध्ये" आणि त्यांना तेथील लंगरच्या जेवणाचा अनुभव दिला.

नांदेडला चोवीस तास चालणारा एक गुरुद्वारा आहे आणि मुख्य गुरुद्वाऱ्यात, सचखंड साहिबमध्ये, रात्री लंगर लागतो. कधीकाळी मी तेथे जेवलोही आहे आणि सेवाही केली आहे. तशी ती शीख पंथियांमधील बहुतेक मंडळी करत असतात. ही सेवा करणारे लोक कुठले आलतू-फालतू नसून चांगले अनिवासी भारतीय, मोठे व्यावसायिक आणि कर्ती-सवरते लोक असतात. बाहेर कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारी व्यक्ती येथे आपले जोडे सांभाळायला असते. त्यामुळे हरमंदिर साहिबचा लंगर पाहण्याची, तेथील अनुभव घेण्याची मला खूप इच्छा होती.

tumblr_nm9zq08oep1u5hwlmo1_500[1]  मात्र हरमंदिर साहिबमध्ये मी जो लंगर पाहिला, तो छाती दडपून टाकणारा होता. एका वेळी किमान एक हजार लोकांची पंगत येथे बसते आणि त्याच वेळेस किमान शे-दोनशे लोक सेवेत गर्क असतात. चोहोकडे भांड्यांचा, ताट-वाट्यांचा खणखणाट चालू असतो. सुवर्ण मंदिरातील लंगर साहिब दोन मजली असून त्याच्या विस्ताराचे काम चालू आहे. एकीकडे चहाची जागा होती. म्हणजे आपल्याकडे जशी पाणपोई असते तशी चहापोई होती. तिकडे जातानाच एक सरदारजी आपल्या हातात वाडगा देणार आणि पुढे फिल्टरच्या टाकीतून आपण तोटीद्वारे पाणी घेतो, तसा तोटीद्वारे चहा मिळणार. त्यासाठी दोन सेवेकरी बसलेलेच असतात. तिकडे न जाता आपण सरळ पायऱ्या चढून वर गेलो, की लंगर साहिबचे मुख्य दालन लागते. लंगर ‘छकणाऱ्या'(सेवन करणाऱ्या) लोकांच्या शेकड्यांनी ओळी बसलेल्या असतात. पद्धत अशी, की भारतीय बैठकीत पाठीला पाठ लावून लोकांनी बसायचे. वाढकरी एकामागोमाग रोटी, दाल, भात इ. पदार्थ घेऊन फिरतात. मी गेलो तेव्हा एकदा शेवयांची खीर आणि एकदा भाताची खीर होती. आता या पदार्थांचे वाटप पंगतीत करायचे म्हणून त्यांच्या दर्जात कोणतीही तडजोड नसते. अख्ख्या मसुराच्या दालीत तुपाचा ओशटपणा आढळणार म्हणजे आढळणार. भात बासमती तांदळाचाच असणार आणि त्यातही तुपाची झाक असणार म्हणजे असणार. तेव्हा असे जेवण जेवल्यानंतर कोणत्या व्यक्तीला आणखी काही खाण्याची इच्छा होणार? गंमत म्हणजे इतके सारे मोफत उपलब्ध असूनही पंजाबमध्ये हॉटेल अगदी भरभरून चालतात.

हरमंदिर साहिबची आणखी एक खासियत येथील प्राकारात तुम्हाला छायाचित्र काढण्यापासून कोणीही रोखत नाही. हवी तेवढी छायाचित्रे काढा. मी तर हरमंदिर साहिबच्या अगदी गाभाऱ्यात प्रवेश करेपर्यंत मोबाईलमध्ये छायाचित्रे काढत होतो. फक्त गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारापासून सेवेकरी छायाचित्रांना मनाई करत होते. आणखी विशेष बाब म्हणजे हरमंदिर साहिबच्या अगदी घुमटापर्यंत जाण्यास प्रत्येकाला मुभा आहे. तेथून आजूबाजूचे दिसणारे दृश्य मनोहर खरे. चारी बाजूला संगमरवराच्या भिंती ढगांशी स्पर्धा करत असतात आणि पांढरे शुभ्र घुमट निळ्या आकाशात घुसखोरी केल्यासारखे दिसतात. चारीकडच्या भिंतींमध्ये दिसणाऱ्या कमानींमधून बसलेले भाविक छायाचित्रकारांसाठी एक पर्वणीच भासतात. कोणी गुरु ग्रंथसाहिबचे पारायणे करतोय, कोणी डोळे मिटून ध्यान करतोय, एखादी स्त्री सोन्याच्या घुमटाकडे तोंड करून हात जोडून आणि डोळे मिटून प्रार्थना करतेय, अशा कमानींच्या पार्श्वभूमीवरच्या प्रतिमा चित्रमय वाटणार नाहीत तर काय? बरं, याच्या जोडीला शुद्ध शास्त्रीय रागांमध्ये बसविलेल्या आणि मंजुळ व सौम्य आवाजात चालणाऱ्या शबद किर्तनांचे पार्श्वसंगीत. या धवल चौकटीच्या बाहेरही काही जग आहे आणि तिथेही काही घडामोडी होतात, याचे विस्मरण ज्याला होत नाही त्याला जगातील सौंदर्य पाहण्याची दृष्टीच नाही, हे छातीठोकपणे सांगता येते.

घुमानच्या निमित्ताने-6 अमृतसरी कुलचा आणि लस्सी

tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo5_500[1] नाही म्हणायला, अमृतसर शहरात आल्याची भरभक्कम जाणीव होते ती येथील हॉटेल आणि लस्सीचे दुकान पाहून. त्यातही हरमंदिर साहिबच्या परिसरातील जी हॉटेल आहेत ती खऱ्या अर्थाने आस्वाद घेतलाच पाहिजे या वर्गवारीत मोडणारी आहेत.

हरमंदिर साहिबच्या आधी जी पहिली गल्ली आहे तिथेच थोडे आत गेले, की शर्मा भोजन भांडार नावाचे हॉटेल आहे. घुमानहून परतल्यानंतर मी हरमंदिर साहिबची परत भेट घेतली तेव्हा सकाळी या हॉटेलमध्ये गेलो होतो. अमृतसरी कुलचा नावाचा पराठ्याचा एक लांबचा नातेवाईक लागेल असा पदार्थ येथे खूप प्रसिद्ध आहे. पराठ्याप्रमाणेच नाना पदार्थ आतमध्ये सारून हा पदार्थ तयार केला जातो. मी आधी गोबी-बटाटा मिक्स कुलचा मागविला. त्याच्यासोबत हरभऱ्याची (चना) भाजी आणि कांदा, मिरची व आणखी काही पदार्थ असा बेत दिसला. शिवाय कुलच्यासोबत चमचाभर लोण्याचा ‘चढावा’ होताच. सर्वात आधी कुलच्याचा तुकडा आणि हरभऱ्याच्या भाजीचा घास घेतला आणि मन तृप्त झाले. शंभर मटणाच्या तोंडात मारेल, असा विसविशीत शिजलेला चना आणि तो कुलचा यांची चव म्हणजे ज्याचे नाव ते. त्यानंतर वाघा सीमेवरून परतल्यानंतर मी परत त्याच ह़ॉटेलमध्ये गेलो आणि दोन कुलचे खाल्ले. एक पनीर कुलचा आणि दुसरा गोबी कुलचा. प्रत्येकासोबत भाजी आणि चटणी होतीच. ही चटणी काही वेगळाच पदार्थ असेल, म्हणून मी वेटरला विचारले, याला काय म्हणतात. तो म्हणाला, "इसे चटनी बोलते है”. मग मात्र मी मूग गिळून गप्प बसावे, त्याप्रमाणे चने आणि कुलचा गिळून गप्प बसलो. अमृतसरी कुलच्याचा हा आस्वाद घेतल्यामुळे नंतर पानीपतला गेल्यावर तिथे जे कुलचे मी पाहिले, ते काही माझ्या गळी उतरले नाहीत. वेगवेगळ्या गाड्यांवर अगदीच लुसलुशीत कुलचे विकायला काढले होते त्यावरून त्यांच्या तोंडी न लागण्यातच शहाणपणा आहे, हे मी ताडले. tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo6_400[1]

अमृतसरच्या आणखी दोन खासियत म्हणजे लस्सी आणि कुल्फी. महाराष्ट्रात मिळणारी लस्सी हे लस्सीच्या नावावर चालणारे थोतांड आहे, असे मी म्हणणार नाही. परंतु  असे म्हणता येईल, की पंजाबी लस्सी म्हणजे कुंभमेळा आहे आणि महाराष्ट्रातील लस्सी ही गावची जत्रा आहे. यहां की लस्सी जैसी कोई नहीं. इतक्या दूर पंजाबमध्ये आल्यानंतर एखादी व्यक्ती लस्सी न पिता परत जाणार असेल तर त्या व्यक्तीकडे रसिकता नावालाही नाही, असे बेलाशक म्हणता येईल. ‘हाय जालीम तूने पीही नहीं,’ असे शायर म्हणतो ते अशा लोकांसाठीच.

आपल्याकडे जे ग्लास असतात त्याच्या साधारण दीडपट उंच आणि गोल स्टीलच्या पेल्यांमध्ये पुढ्यात आलेली थंडगार लस्सी जेव्हा घशाखाली जाते तेव्हा जगात दुःख, दैन्य, उपद्रव, भांडणे वगैरे गोष्टी असल्याची सूतराम आठवणही राहत नाही. उमर खय्याम म्हणतो त्याप्रमाणे थंडगार लस्सीने भरलेली एक सुरई आणि एक कवितेची वही, एवढ्या भांडवलावर कोणा व्यक्तीचे आयुष्य सहजपणे व्यतीत होऊ शकते.

गंमत म्हणजे, कुलच्याबाबत जे झाले ते लस्सीबाबत झाले नाही. अमृतसरला जी लस्सी मिळाली, त्या चवीची नाही परंतु आकार आणि घट्टपणाच्या बाबतीत त्याच तोडीची लस्सी पानीपतलाही मिळाली. त्यामुळे तेथेही मी दोनदा लस्सीशी दोन हात केले. या दोन्ही शहरांमधील लस्सी पिण्याचा उल्लेख केवळ भाषेची सवय म्हणूनच करायला पाहिजे. वास्तविक त्यांच्याबाबत लस्सी खाल्ली असे म्हणायला पाहिजे. तेवढी त्यांची घनता आणि घट्टता होतीच होती. तमिळमध्ये कॉफी पिली असे न म्हणता कॉफी खाल्ली असेच म्हणतात. (कॉफी साप्पिटेन). त्याच प्रमाणे पंजाबमध्ये लस्सी प्यायची बाब नसून खायची बाब आहे आणि कामचलाऊ पोट भरायचे असेल तर तीस रुपयांत पोटभर लस्सी हा उत्तम पर्याय आहे, एवढे ध्यानात घ्यावे. तसेही केवळ जेवायचे म्हटले तरी खुशाल एखाद्या हॉटेलात जावे आणि ३० ते ५० रुपयांत पोटोबाची सोय करून यावी, हे येथे अशक्य नाही.

tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo10_500[1] संस्कृतमध्ये लास या शब्दाचा अर्थ उत्सव करणे, नाचणे, मौजमजा करणे असा आहे. उल्लास, विलास वगैरे शब्द त्यांतूनच आलेले आहेत. पंजाबमधील लस्सीचे प्याले पाहिल्यानंतर या लस्सीचे कुळ लासमध्येच असावे, अशी खात्री पटते. एखाद्या मटक्यात ‘लावायला’ ठेवलेली लस्सी मस्त थंडगार झाली आणि ऐन तळपत्या उन्हात ती घशाखाली ओतली, तर मेजवानी, सेलिब्रेशन, स्वर्गसुख अशा सगळ्या कल्पना हात जोडून समोर उभ्या राहतात. अन् अशी मनसोक्त लस्सी पिल्यानंतर पेट भर गया लेकिन दिल नहीं भरा, अशी अवस्था होते. खल्लास!

घुमानच्या निमित्ताने-5 भिंडराँवालाचा गुरुद्वारा!

Gurudwara यातीलच एक गुरुद्वारा जर्नैलिसिंग भिंडराँवाला (भिंद्रनवाले) याचाही आहे. पंजाबमध्ये खालसा चळवळ जोरात होती, त्यावेळी या भिंडराँवाला आणि त्याच्या हस्तकांच्या कारवायांमुळे सुवर्णंमंदिर बदनाम झाले होते. ६ जून १९८४ रोजी भिंडराँवालाचा बीमोड करण्यासाठी इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार लष्कराने‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ राबविले. त्यावेळी मंदिराचे बरेच नुकसान झाले. यात भिंडराँवाला मारला गेला. परंतु त्याच्या अनुयायांनी त्याच्या स्मृत्यर्थ एक गुरुद्वारा बनविला आहे.

हा गुरुद्वारा केवळ तीन वर्षांपूर्वी (2012) बांधला आहे. आधी ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या स्मृत्यर्थ एक स्मृतिस्थळ बनविण्याची योजना होती. पण केंद्र सरकारने घेतलेला आक्षेप,काँग्रेससह विरोधी पक्षांनी केलेली टीका आणि लेफ्ट. जन. (निवृत्त) कुलदीपसिंग ब्रार व केपीएस सिंग गिल यांच्यासारख्यांनी केलेला विरोध, यामुळे स्मृतिस्थळाऐवजी गुरुद्वाऱ्यावरच काम भागले.

हरमंदिर साहिबला जाण्यासाठी जी रांग लागते त्या रांगेच्या बाजूलाच हा गुरुद्वारा आहे. भिंडराँवालाला येथेच गोळ्या घालून मारण्यात आले, असे म्हणतात. ‘काँग्रेस सरकारने राबविलेल्या मोहिमेत शहीद झालेले जर्नैलिसिंग भिंडराँवाला’ असा या गुरुद्वाऱ्याच्या पायथ्याशी शिलालेख आहे.

इतकेच कशाला, सुवर्णंमंदिराच्या प्रवेशद्वाराशी शिखांचे संग्रहालय असून त्यात शीख हुतात्मे, लढाया आणि इतिहास यांची माहिती आहे. त्यातही भिंडराँवालाचे गुणगान गायले आहे. मात्र त्याची फिकीर करण्याची गरज वाटली नाही. कारण मी पाहिले, की गुरुद्वाऱ्यात जाणारे भाविक भिंडराँवाला किंवा खलिस्तानबाबत फारशी आस्था बाळगून जात नाहीत. हरमंदिर साहिबच्या प्राकारातील सर्व उपासना स्थळ त्यांना पवित्र वाटतात. त्यामुळे तिथे डोके टेकवून ते जातात. याच प्रांगणात एक बोराचे झाड असून त्यात दैवी शक्ती आहे, असे मानतात. त्या झाडाची लोक जशी पूजा करतात तशीच या गुरुद्वाऱ्यात माथा टेकतात.

दमदमी टाकसाळ किंवा भिंडराँवाला किंवा खलिस्तान अशा बाबींशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. एकीकडे भिंडराँवालाला हुतात्मा बनवून हळूच त्याच्या आंदोलनाची हवा काढण्याची उत्तम राजकीय चाल भारतीय सरकारने खेळली आहे. कारण या गोष्टी उभारण्याची परवानगी दिली नसती, तर विनाकारण खलिस्तान्यांच्या हाती कोलीत मिळाले असते आणि ती नसती डोकेदुखी ठरली असती. तीन वर्षांपूर्वी सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या दिवशी झालेली तलवारबाजी डोळ्यांपुढे आणली, तर कल्पना येईल की काय गहजब झाला असता.

ते असो. पण हरमंदिर साहिबमध्ये फिरताना दोनदा शिरा खाल्ला. गुरुद्वाऱ्याचा प्रसाद म्हणून नांदेडला असताना हा शिरा कितीदा तरी खाल्लेला. आता येथे परत तीच चव, तोच तुपकट ओशटपणा आणि तोच सुगंध. शुद्ध आटीव तुपाचा घमघमाट ल्यालेला हा शिरा हातातून तोंडात टाकण्याची इच्छाच होत नाही. या शिऱ्याच्या बदल्यात शीख धर्म स्वीकारण्याची अट असती तर तीही मान्य केली असती, इतकी त्याची लज्जत भारी. घास न घेता या शिऱ्याचा मुटका ओंजळीत घेऊन त्याचा सुवासच घेत राहावा, अशी इच्छा होत राहते. मात्र त्याही मोहावर विजय मिळवून त्याला गिळंकृत केले.

याच्या जोडीला नांदेडहून आलेली एक यात्रा आणि घुमानला जाण्यापूर्वी आलेले अनेक लोक, असे बहुतांश मराठी लोक त्याचवेळेस हरमंदिर साहिबमध्ये आलेले असल्याने अवतीभवती मराठी स्वर कानावर पडत होते. येथे परत काळ आणि वेळेची गल्लत होऊ लागली. मी कुठे आहे? अमृतसर का नांदेड? आणि पुण्याचे काय झाले? या मधल्या १८ वर्षांचे काय झाले? असे प्रश्न पडू लागले.

घुमानच्या निमित्ताने– 4 हरमंदिर साहिबच्या पवित्र प्रांगणात

Golden Temple Amritsar
अमृतसरला पोचल्यानंतर पहिल्यांदा बसस्थानकावरच राहण्याची खोली घेतली. येथील बस स्थानकावर सामान ठेवण्याची आणि खोलीची चांगली सोय आहे. भाड्यानुसार खोलीचा दर्जा बदलतो. नाही म्हणायला हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) आणि अन्य गुरुद्वाऱ्यांच्या यात्री निवासांमध्ये राहण्याची सोय होते, परंतु मी ऐकले, की एकट्या व्यक्तीला सहसा तिथे जागा मिळत नाही. म्हणून असा खासगी निवासाचा मार्ग पत्करावा लागला. चेन्नई, म्हैसूर अशा ठिकाणी मी ही सोय पाहिली आहे. बस स्थानकावरच राहण्याची सोय उपलब्ध असते. आपल्याकडे मला मुंबईचे माहीत नाही परंतु अन्य शहरात तरी अशी सोय मला दिसली नाही. पुण्यात तर बस स्थानकांचाच पत्ता नाही तिथे राहण्याचा काय ठावठिकाणा?
अमृतसरला आल्यानंतर पाहण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे हरमंदिर साहिब. सुवर्ण मंदिर या नावाने ते अधिक प्रसिद्ध आहे. ते शिखांचे उपासनामंदिर आहे, प्रसिद्घ पर्यटनस्थळ आहे आणि सांस्कृतिक केंद्रही आहे. शहरातील एका भव्य तलावाच्या मध्यभागी वसले आहे. वास्तविक या तलावामुळेच या शहराला अमृतसर हे नाव मिळाले आहे. ज्या तलावातील पाणी अमृत आहे तो अमृतसर. शिखांचे चवथे गुरु रामदास यांनी या शहराची स्थापना केली. तेव्हा या शहराला रामदासपूर असे नाव होते. या गुरुद्वाऱ्याचा उल्लेख स्थानिक लोक हरमंदिर साहेब, दरबार साहेब, हरिमंदिर अशा नावांनीही करतात. 
शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथसाहिब पहिल्यांदा या मंदिरात ठेवला गेला. एखाद्या गुरुद्वाऱ्यात गुरु ग्रंथसाहिब ठेवणे याला प्रकाश होना असे म्हणतात. तर गुरु ग्रंथसाहिबचा पहिला प्रकाश पहिल्यांदा येथे प्रकट झाला. त्यामुळे या मंदिराला शीख संप्रदायात सर्वोच्च स्थान आहे. गुरु रामदास यांनी त्याचा पाया घातला. विशेष म्हणजे गुरु रामदास यांनी एका मुस्लिमाच्या हातून पायाचा पहिला दगड रचला. पुढे पाचवे गुरु अर्जुनदेव यांनी १५८८–१६०७ दरम्यान त्याचे बांधकाम पूर्ण केले. नंतर वेळोवेळी सभोवतीच्या प्राकारातील वास्तूत बदल होत गेला. मात्र मूळ मंदिराची रचना होती तशीच आहे. 
Golden Temple Amritsar
हरमंदिर साहिबची वास्तू चौरस असून सांडवा किंवा साकवावरुन मंदिरात प्रवेश करावा लागतो. मुंबईच्या हाजी अलीची आठवण यावेळी येते. सध्या तेथे भलीमोठी रांग लागते आणि भक्तांना किमान दोन तास वाट पाहावी लागते. मला स्वतःला दोन तास लागले आणि घुमान येथे भेटलेल्या काही जणांनी अडीच-तीन तास लागल्याचेही सांगितले. नुसता वेळच लागत नाही तर या रांगेमध्ये चांगलीच रेटारेटी आणि ढकलाढकली चालू असते. एखाद्या हिंदू मंदिरातील स्थितीची आठवण करून देणारा हा गोंधळ असतो. त्यामुळे हरमंदिर साहिबपर्यंत पोचणे हा मोठाच अवघड प्रसंग ठरतो.
मंदिराची मूळ वास्तू दुमजली आणि त्यावर घुमट अशी आहे. येथे भव्यता कमी आणि पवित्रता जास्त आहे. मुख्य म्हणजे एवढी मोठी वास्तू सोन्याची असल्यामुळे ती झळाळीच डोळ्यांने पारणे फेडते. त्यामुळे भव्यता कमी असली तरी चालून जाते. मंदिराला चारही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. 
अहमदशहा अब्दाली याने या मंदिरावर विध्वंसक हल्ला केला होता. पुढे शिखांच्या बाराव्या मिस्लने मंदिराची झालेली पडझड दूर करुन पुनर्बांधणी केली. महाराजा रणजितसिंग यांनी मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता त्याची पुनर्बांधणी संगमरवरी दगडात केली व कळस तांब्याच्या पत्र्याने मढवून त्याला सोन्याचा मुलामा चढविला. (नांदेड येथील गुरुद्वाराही महाराजा रणजितसिंह यांनीच बांधून घेतला आहे.) तेव्हापासून ते सुवर्णंमंदिर म्हणून ख्यातनाम आहे.  शिखांच्या संदर्भातील सर्व निर्णय घेणारे ‘अकाल तख्त’ हरिगोविंद यांनी मंदिरासमोर बांधले आहे. मंदिराच्या परिसरात अनेक लहान गुरुद्वारे आहेत. त्यांत शिखांच्या ऐतिहासिक शौर्यगाथा दर्शविणाऱ्या धातूंच्या तबकड्या लावल्या आहेत. त्यावर वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत.

घुमानच्या निमित्ताने– 3 सुवर्ण मंदिराच्या शहरात

tumblr_nm9zlj5iky1u5hwlmo1_1280[2] नवी दिल्लीहून आधी अमृतसर येणे. त्यासाठी दिल्लीच्या महाराणा प्रताप आंतरराज्य बस स्थानकावर यायचे. तिथे गाडी पकडायची, असे सगळे सोपस्कार पार पाडले. परंतु तिथे गेल्यावर लक्षात आले, की दिल्लीहून थेट अमृतसरला बस नाही. म्हणजे गाड्यांवर पाट्या अमृतसरच्याच लागतात परंतु त्या तिथपर्यंत जात नाहीत. मार्गात जालंधर (पंजाबीत जलंधर) येथे थांबतात. त्यातही काही गाड्यांसाठी आधी तिकिट घ्यावे लागते आणि त्यांचे आसन क्रमांक ठरलेले असतात. त्यामुळे जालंधरच्या एका गाडीत चांगला बसलेलो असताना उतरावे लागले.

अशा दोन तीन गाड्या सोडल्यानंतर रात्रीचे साडे दहा-अकरा वाजू लागतात आणि आपला धीर खचायला लागतो. अमृतसरला कधी पोचणार, तिथले सुवर्ण मंदिर कधी पाहणार, जालियांवाला बाग कधी पाहणार, अशा नाना प्रकारच्या चिंता मनात येऊ लागतात. तेवढ्यात देवाने धाडल्यासारखी दिल्ली-अमृतसर अशी पाटी लागलेली एक गाडी येते. हिय्या करून आपण त्याला विचारतो, "गाडी अमृतसर जाएगी ना?" त्यावर तद्दन बाऊन्सरसारखा दिसणारा मात्र कंडक्टरचे काम करणारा इसम आपल्याला सांगतो, की जाईल पण साडे अकराला निघेल. तिकिट मीच देणार आहे, असेही सांगतो. आपल्याला वाटते, झाले, अब अमृतसर दूर नहीं. परंतु तिकिट फाडून हातात देताना कंडक्टर आपल्याला सांगतो, की तिकिटांचे यंत्र जालंधरचे असल्यामुळे जालंधरपर्यंतचे तिकिट घ्या आणि पुढचे नंतर देतो. पाऊण प्रवास झाल्यानंतर तोच कंडक्टर आपल्याला सांगतो, की गाडी जालंधरपर्यंतच जाणार आहे, तिथे अर्धा तास थांबेल. तुम्हाला उशीर होईल म्हणून तुम्ही दुसऱ्या गाडीने जा. शेवटी अडला हरी…ही म्हण मनातल्या मनात घोळत जालंधरच्या अलीकडे चार-पाच किलोमीटरवर आपण दुसऱ्या गाडीत बसतो. दुःखात सुख एवढेच, की कंडक्टर आपल्याला त्या गाडीत लवकर जाऊन बसायला सांगतो आणि दुसऱ्या गाडीच्या चालक-वाहकांना आपल्यासारख्या प्रवाशांसाठी थांबण्यास सांगतो.

असा हा प्रवास करून एकदाचा अमृतसरच्या दिशेने गाडीत जाणाऱ्या गाडीत बसलो. पहाट सरून ऐन सकाळची वेळ. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा आणि संपूर्ण गाडीत आपल्या अवतीभवती पगडीधारी मंडळी. अशा स्थितीत रस्त्यातील पाट्या नि गुरुद्वारे न्याहाळत मी प्रवास चालू ठेवला. अमृतसर…नांदेडमध्ये पहिल्यांदा ब्रॉडगेज ही गाडी धावू लागली (आणि हा मोठा ऐतिहासिक क्षण होता बरं का) तेव्हापासून ज्या शहरास जाणारी वाट नित्य दिसायची तेच हे शहर. नांदेड स्थानकावरून मुंबई पाठोपाठ ज्या शहरासाठी लांब पल्ल्याची गाडी सुरू झाली ते हे शहर. सचखंड एक्स्प्रेसने येथे यायचे, हा मनसुबा ही गाडी सुरू होऊन वीस वर्षे होत आली तरी मनसुबाच राहिला होता. तो काही अंशी पूर्ण होण्याची वेळ आज आली होती.

अमृतसर येण्यापूर्वी एकामागोमाग शुभ्र झळाळत्या घुमटांचे गुरूद्वारे मागे क्षितीजावर दिसू लागले. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे हवते गारवा होता आणि ओलाव्यामुळे या गुरुद्वाऱ्यांचे संगमरवरी पृष्ठभाग आणखीच उजळून निघत होते. अन् येथे काळ व वेळेचा गुंता निर्माण होऊ लागला. ‘अॅन एरिया ऑफ डार्कनेस’ या पुस्तकात सर व्हिवियन नायपॉल यांनी आपल्या जन्मगावाला भेट दिल्यानंतर अनेकदा काळ व वेळेची सरमिसळ झाल्याचा उल्लेख केला आहे. भारतीय खेड्यांमध्ये आपल्या पूर्वजांच्या गावांमध्ये नायपॉल यांना जन्मभूमीच्या, बालपणीच्या खाणाखुणा दिसत जातात आणि आपण कुठे आहोत, नक्की काळ कोणता आहे, असे प्रश्न त्यांच्या मनात उमटत जातात.

इथे उलट घडत होते. जन्मगाव सुटल्यानंतर १९ वर्षांनी एका परक्या प्रदेशात एका व्यक्तीला त्याच्या जन्मगावाशी साधर्म्य सांगणारी परिचित दृश्ये दिसत होती आणि आपण नक्की कुठे आलो आहे, काळ पुढे गेला आहे का मागे गेला आहे, असे विचार मनात गर्दी करू लागले. खुद्द अमृतसरला आल्यानंतर तर अशा ओळखचिन्हांची गिरवणी सुरू झाली. नांदेडची आठवण करून देणारे तेच अरूंद रस्ते, पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर तयार होणारे तेच डबके, तशाच पायरिक्षा, तोच गर्दी-गोंधळ आणि रस्त्यांच्या कडेने उघड्या हॉटेलांमधून येणारा तोच पराठा, भाजी व तंदुरी चिकनचा वास! खिशातील तिकिटे आणि खर्च झालेला पैसा यांची जाणीव होती म्हणून, नाही तर आपण परक्या प्रदेशात आलो आहोत, हे कोणी सांगूनही मी मान्य केले नसते.

घुमानच्या निमित्ताने – 2 ‘झेलम’मधील चर्चासत्र

Devidas0633
झेलमचा प्रवास मात्र मस्तच झाला. भोपाळ, ग्वाल्हेर, झाशी अशा मोक्याच्या स्थानकांवर गाडी दिवसा पोचली. त्यामुळे अवतीभवतीचा प्रदेश तर चांगला न्याहाळता आलाच, परंतु दररोज ये-जा करणाऱ्या ‘जिव्हाळ्या’च्या प्रवाशांच्या अनौपचारिक गप्पांमुळे बरीच मनोरंजक माहितीही मिळाली. भारतीय रेल्वेमध्ये बसायची जागा मिळाली, तर त्यासारखे प्रबोधन आणि मनोरंजन करणारे दुसरे साधन नाही, याची प्रचिती परत एकदा आली. सतत येणाऱ्या कंत्राटी फेरीवाल्यांकडून मधूनच चहा घ्यायचा आणि मस्त गप्पा ऐकायच्या. ही ‘चाय पे चर्चा’ आपल्याला एकदम शहाणी करून सोडते.

दरम्यान मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान मागे टाकून गाडी परत उत्तर प्रदेशात आली होती. मथुरा पार पडले, की दिल्लीच्या हवेच्या वास यायला लागतो. उत्तर प्रदेशापासूनच गिलावा न केलेल्या उघड्या बांधकामांचे घर दिसायला लागतात. एरवीही संपूर्ण प्रदेशावर गरिबीचीच सावली दिसत राहते. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले दिसत होते. शेतात पिके होती परंतु पिकात जान दिसत नव्हती.
मध्य प्रदेशातील दातिया येथून ग्वाल्हेरपर्यंत आमच्या डब्यात बसलेल्या अधिकाऱ्यांच्या एका गटाची चर्चा चांगलीच रंगली. राज्यातील भ्रष्टाचार, तरुणांमधील बेरोजगारी, ग्ग्रामीण भागातील लोकांचे स्थलांतर अशा अनेक विषयांवर ते बोलत होते. मी सकाळी एक वर्तमानपत्र घेतले होते. पण संपूर्ण वृत्तपत्र वाचून जेवढी माहिती मिळाली, त्याच्या कित्येकपट जास्त माहिती त्या दीड दोन तासांच्या चर्चासत्रात मिळत गेली. शिवराज चौहान यांच्या स्वच्छ कारभाराच्या चकचकीत प्रतिमेवर त्यातून ओरखडे तर पडत होतेच, नव्या पिढीच्या भविष्याची चिंताही सतावत होती.

बच्चों को यहां नौकरी ही नहीं है, साब. हमारे गांव से गुजरात के लिए एक बस हर दिन भरकर निकलती है. अहमादाबाद और राजकोट में सब हमारे लड़के काम कर रहै है,” “हमारे गांव का एक लड़का पूना में पानीपुरी बेचता था. मैंने उसको देखा तो पूछा, ये क्या कर रहे हो. उसने बताया, साब हमने एक फ्लैट ले लिया है. अभी सोचो साब पंदरह साल पहले की बात है, आज उसकी क्या कमाई होगी. मुंबई, पूना में काम है कमाई है, हमारे यहां क्या रखा है,” ही त्यातील काही लक्षात राहिलेली वाक्ये.
त्याच्या पुढची हद्द आणखी पुढे होती.

हमारे गांव के तो कितने लोग महाराष्ट्र-गुजरात में सिक्युरिटी गार्ड का काम करते है,” एकाने सांगितले.

त्यावर दुसऱ्याने विचारले, “हां, और एक दो काण्ड भी करके आए थे ना वो.”

पहिल्याने सांगितले, “हां, किए थे ना.”

आपल्या राज्यातील सर्व भल्या-बुऱ्या गोष्टींची धुणी रेल्वे कपार्टमेंटमधील दोन बाकांवर समोरासमोर बसून ही बाबू मंडळी धूत होती. अन् त्या चर्चेत मी तर पडलोच नव्हतो. शेवटपर्यंत. त्यांच्या आपसातील चर्चेतूनच ही मौलिक माहिती मिळत होती. मी ही चर्चा कान देऊन ऐकत आहे, याची जाणीव असूनही त्यांच्यापैकी कोणी ती थांबविण्याचा किंवा तिला वळण देण्याचा प्रयत्न करत नव्हते. ही बाब मला मोठी लक्षणीय वाटली.

गाडीत पी. जी. वुडहाऊसचे ‘स्मिथ दि जर्नलिस्ट’ हे पुस्तक वाचून पूर्ण केले. आधी हे पुस्तक काहीसे वाचून झाले होते परंतु ते संपविण्यात यश आले ते या प्रवासात. महत्त्वाचे म्हणजे ते वाचले माझ्या मोबाईलवर.

Devidas0628
एरवी १४ तास, १७ तास अशा विलंबाचे छाती द़डपून टाकणारे आकडे नोंदवून झेलम एक्स्प्रेसने सर्वार्थाने आसेतू हिमाचल आपली दहशत निर्माण केली आहे. या गाडीची ही ख्याती ऐकून असल्यामुळे असावे कदाचित, गाडीने केवळ ४५ मिनिटांच्या उशीराने नवी दिल्ली स्थानकावर सोडले, याचे मोठेच कौतुक वाटले.

घुमानच्या निमित्ताने – 1 शुभास्ते पंथानः

When you return to a place after a long time, you realize how much you yourself have changed over the time – Nelson Mandela

पंजाबला कधीही गेलेलो नसलो तरी पंजाबी भाषा, पंजाबी संस्कृती आणि शीख पंथ हे माझ्यासाठी अपरिचित कधीही नव्हते. किंबहुना जन्मल्यापासून पंजाबी वातावरण मी अवतीभोवती पाहतच होतो. नांदेडचा असल्यामुळे गुरुद्वारा काय, अरदास किर्तन काय किंवा होला मोहल्ला काय, यांचे अप्रूप मला नव्हते. ते माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग तर होतेच, पण शीख वर्गमित्र, कुटुंबाचे शीख स्नेही यांच्यामुळे पंजाबीपणा हा माझ्या जाणिवेचा भागच होता. नांदेड सोडण्यापूर्वी एक दोन वर्षे, १९९६-९७ च्या दरम्यान, तर जवळ जवळ प्रत्येक दिवशी गुरुद्वारा हुजूर साहिब आणि गुरुद्वारा लंगर साहिब ही आमची हक्काची ठिकाणे होती. अठरा वर्षे पुण्यात राहिल्यामुळे ही जाणीव पुसट झाली होती. नंतर दक्षिण भारतीय संस्कृतीचा ध्यास लागल्यानंतर तर ही जाणीव अगदीच झिरझिरीत झाली. लुई टॉलस्टॉय यांच्या भाषेत सांगायचे, तर "एखाद्या खानावळीवरील जुन्या पाटीसारखी ती झाली होती. त्यावर काहीतरी लिहिले होते, हे समजत होत परंतु काय लिहिले आहे हे कळत नव्हते.”

त्यामुळे घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या साहित्य संमेलनाला जायचे हे जेव्हा नक्की झाले, त्यावेळी पहिल्यांदा माझी भावना नेल्सन मंडेला यांच्या वरील वाक्यासारखी होती. हा एक प्रकारचा शोधच होता. पुण्याहून झेलम एक्प्रेसने नवी दिल्लीला निघालो त्यावेळी तरी ही भावना अंधुक स्वरूपात होती. कारण नाही म्हटले तरी पंजाबचे भूदृश्य अनोळखी असल्याची भावना मनात होती. त्याहून महत्त्वाचे म्हणजे पूर्ण १९ वर्षांनी मी उत्तर भारतात जात होतो. मनमाड-भुसावळ आणि तेथून मध्यप्रदेश या मार्गावर एकेकाळी प्रवास केला होता. त्यावेळी निव्वळ भणंग म्हणून वाट मिळेल तिकडे मी भटकत होतो. आज २०१५ साली त्याच मार्गावरून जाताना माझ्या स्वतःमध्ये किती बदल झाला, याचीच चाचणी या प्रवासात होणार होती. किमान तशी व्हावी, ही अपेक्षा होती.

नाही म्हणायला गेल्या वर्षी दिल्लीची एक फेरी झाली होती. परंतु त्यात भोज्याला शिवून येण्यासारखा प्रकार होता. त्यात अनुभव घेणे, हा प्रकार फारसा झालाच नाही. या फेरीत मात्र अनुभवांची आराधना तेवढीच असणार होती. त्यामुळे या प्रवासाची असोशी अधिक होती.

Devidas0622 पुणे रे ल्वे स्थानकावर झेलम एक्प्रेसमध्ये बसलो ते या पार्श्वभूमीवर. गाडीत बसल्यावर आश्चर्याचा पहिला धक्का बसला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केलेल्या अंदाजपत्रकातील घोषणांची अंमलबजावणी वेळेआधीच झालेली दिसली. वास्तविक अंदाजपत्रकातील घोषणा एक एप्रिलपासून अमलात येतात. परंतु ३१ मार्चलाच झेलम एक्स्प्रेसच्या शौचकूपात बायो टॉयोलेट बसविलेले होते. प्रत्येक आसनाजवळ मोबाइल चार्जिंगची सोय केलेली होती. इतकेच नाही तर वरच्या आसनावर जाण्यासाठी अधिक चांगल्या पायऱ्यांची सोय केलेली दिसली.

जातानाच पूर्णपणे स्वतंत्र गाडीने आणि स्वतंत्र मार्गाने जायचे, याचा निश्चय मी आधीच केला होता. त्यामुळे झाले काय, की वृत्तपत्रांतून ठळक घोषणा केलेल्या पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ऐन परीक्षेच्या काळात रेल्वेच्या डब्यात केलेल्या कवितांचे सादरीकरण, फ्लॉवर आणि टमाटे या झक्कास मिश्रण असलेल्या भाज्यांची मेजवानी अशा प्रक्षोभक मनोरंजनाला मी मुकलो. परंतु हाच निर्णय योग्य होता, हे घुमानला पोचल्यानंतर सिद्ध झाले. नवी दिल्ली, अमृतसर आणि घुमान अशी त्रिस्थळी यात्रा केल्यानंतर कळाले, की संयोजकांच्या सौजन्याने धावणारी ती गाडी वास्तवात धावलीच नाही. कण्हत-कुंथत साठ तास घेऊन ती गाडी अमृतसरला पोचेपर्यंत संमेलनाच्या उद्घाटनाची वेळ येऊन पोचली होती.