तर मोदी काय म्हणाले असते?

Narendra Modi Arnab Goswami
‘टाईम्स नाऊ’चे आगाऊ पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दबकत दबकत मुलाखत घेतली. आपल्या मुलखावेगळ्या पत्रकारितेबद्दल प्रसिद्ध असलेल्या गोस्वामी यांनी ही मुलाखत त्रिखंडात गाजवण्याचा चंग बांधलाय जणू. भारताच्या इतिहासात कोणत्याही विद्यमान पंतप्रधानाने एखाद्या खासगी वाहिनीला दिलेली ही पहिली मुलाखत असल्यामुळे तिचे अप्रूप आहेच. मात्र कोणत्याही राजकीय सत्ताधाऱ्याला पूर्णांशाने खरे बोलण्याची कधीही मुभा नसते – त्याच्या किंवा तिच्या कितीही मनात असले तरी! विशेषत: सार्वजनिक व्यासपीठावर. त्यामुळे कोणत्याही सरकारी मुलाखतीएवढीच हीही मुलाखत सपक झाली. अर्णब झाला म्हणून काय झाले? विठ्ठल कामतांचीही कधी कधी भट्टी बिगडू शकते.

पंतप्रधानांनी खरे बोलायचे ठरवले असते तर ते काय बोलले असते? उदाहरणादाखल आपण अर्णबने विचारलेला एक प्रश्न घेऊ.

“तुमच्या पक्षातील काही फाटक्या तोंडाचे लोक बरळत सुटलेले असतात. त्यांच्याबद्दल तुमचे काय मत आहे,” असा काहीसा तो प्रश्न होता. त्यावर पंतप्रधान म्हणाले, की यातील अनेकांचा मी चेहरादेखील पाहिलेला नसतो अन् अशी माणसे पक्षाचे प्रवक्ते म्हणून बोलतात. तुम्ही त्यांना अनावश्यक महत्त्व देऊन मोठे करू नका. उनको हिरो मत बनाओ.”

त्यावर गोस्वामी म्हणाले, “आम्ही त्यांना हिरो बनवत नाही आहोत.आम्ही त्यांना खलनायक बनवत आहोत.” इथे प्रत्यक्ष मुलाखतीत पंतप्रधान मोदी हसून तो विषय टाळताना दिसले. परंतु त्यांनी खरे बोलायचे ठरविले असते, तर ते काय म्हणाले असते? येथे त्यांचे एक स्वगत आले असते.

“तुम्ही कृपा करून कोणालाही खलनायक बनवू नका. तुम्ही खरे म्हणजे कोणालाच काहीही बनवू नका. आज मी जो काही आहे तो तुमच्या या उपद्व्यापामुळे आहे. आता किमान मी असेपर्यंत आणखी एक मोदी तयार करू नका. गेली १४ वर्षे तुम्ही मला, नरेंद्र मोदी याला, खलनायक म्हणून रंगवायचा प्रयत्न करत आहात. त्यासाठी न्यायालयांपासून अमेरिकेच्या अध्यक्षांपर्यंत एकही जागा तुम्ही सोडली नाहीत. मी काही काम केले तर ते मुळात कामच कसे नाही, मला एखादा मान मिळाला तर तो मान किती किरकोळ आहे अशा बाता करण्यात तुम्ही वेळ आणि शक्ती खर्च केलीत. एखादे व्रत करणारी पतिव्रता स्त्री करणार नाही एवढ्या निष्ठेने तुम्ही हे काम केले. तुम्हाला भले वाटले असेल, की तुमच्या या उठाठेवीमुळे मोदींची प्रतिमा काळीकुट्ट झाली असेल, जनतेच्या मनातून ते उतरले असतील.परंतु हा तुमचा भ्रम आहे. जनमत आम्ही घडवितो, देशाला दिशा आम्ही देतो असे तुम्हाला वाटते. लोकांना नाही वाटत. त्यामुळे तुम्ही ज्या ज्या वेळी मला डांबर फासायचा प्रयत्न केला, त्या त्या वेळी लोकांनी मला अभिषेकच केला.

“त्या नंतर परिस्थिती अशी आली, की नदीला आलेल्या पुराबरोबर गाळ वाहावा, तसे माझ्यामागे तुम्हाला फरफटत यावे लागले. त्याचा कळस म्हणजे मला तुम्ही बोल लावला तर लोक तुमच्या अंगावर धावून येऊ लागले. त्यांची ‘भक्त’ म्हणून संभावना करण्यात तुम्ही समाधान मानले. परिणामी काय झाले? मी पंतप्रधान होणार हे आधी जाहीर करून मी ते खरेही करून दाखविले. तुम्ही काहीही करू शकला नाहीत.

“म्हणून म्हणतो बाबांनो, उगाच कोणाला खलनायक बनवायला जाऊ नका. तुम्ही गणपती करायला गेलात, की हमखास त्याचे माकड होते. त्यामुळे शांत बसा.”

अर्थातच केवळ ‘मन की बात’ नव्हे तर ‘मौन की बात’ करण्यात तरबेज असलेल्या मोदी यांनी हे स्वगत म्हटले नाही. मात्र समजदारांना इशारा पुरेसा होता!

एक पुरस्कृत भणंग!

सात दिवसांपूर्वी, 30 मार्च रोजी, मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ आमची गाडी फिरत होती. स्टाफ कॉलेज या नावाने प्रसिद्धअसलेली एक उपेक्षित इमारत आम्हाला हवी होती. कारण थोड्याच वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्य पत्रकारिता पुरस्कार स्वीकारण्यासाठी मला तयारव्हायचे होते. एखाद्या रोमांचक सामन्यातील शेवटच्या षटकांमध्ये चुरस निर्माण व्हावी, तसे अगदी तास-अर्धा तास आधी आम्हाला ती जागा सापडली आणि यथावकाश आम्ही कार्यक्रमस्थळी पोचलो. त्या10-15 मिनिटांत थोडी फार पायपीटही झाली आणि प्रत्यक्ष पुरस्कार स्वीकारण्याआधी 20 वर्षांपूर्वीचा पुनःप्रत्यय मी घेऊ शकलो.
     याच परिसरात अशाच प्रकारे मी कधी काळी भटकलो होतो. फक्त त्यावेळी घर सोडून आलो होतो आणि वाट फुटेल तिकडे रस्ता शोधत फिरत होतो. गेली 15 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात जे काही काम मी केले असेल नसेल, त्याची एक गोळाबेरीज म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना एक भणंग म्हणून केलेली ही भटकंती माझ्या डोळ्यासमोर होती. हा पुरस्कार म्हणजे एक प्रकारे त्या भणंगगिरीला मिळालेली दादच म्हणावी लागेल. वीस वर्षांच्या कालखंडाची दोन टोके जोडणारे एक वर्तुळ जोडले गेले.
         एरवी प्रत्येक पुरस्कारामागे असते त्या प्रमाणे याही पुरस्काराचे श्रेय आईचे कष्ट, वडिलांचे आशीर्वाद तसेच मोठ्यांचे मार्गदर्शन आणि मित्रांचे सहकार्य यांना आहेच. त्याच प्रमाणे नांदेडमध्ये माझ्या घरानंतरचे घर असणारे डॉ. राम मनोहर लोहिया वाचनालय व ग्रंथालयालाही त्याचे श्रेय आहे. वाचन-लेखन ही एक प्रतिष्ठेची बाब आहे, हे वाचनालयानेच मला शिकविले.
     मात्र श्रेय सुफळ होण्यासाठी सुद्धा योग्य वेळ यावी लागते.  बरोबर 25 वर्षांपूर्वी नांदेडमधील एका गणेशोत्सव मंडळाच्या निबंध स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला होता. त्यानंतर मिळालेला हा थेट दुसरा पुरस्कार. मध्ये कुठलाही थांबा नाही. त्यामुळे या पुरस्काराचा आनंद अंमळ जास्तच. शिवाय कुठल्याही वृत्तपत्राच्या नावाखाली नव्हे, तर सरकार दरबारी सोशल मीडिया लेखन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्लॉग लेखनासाठी हा पुरस्कार मिळालेला असल्यामुळे त्याचे कौतुक अधिक! गेल्या दीड-एक वर्षात मदुराईची मीनाक्षी, कन्याकुमारी, तिरुवन्नामलै, पद्मनाभस्वामी (तिरुवनंतपुरम), गोविंद देवजी(जयपूर), कोच्चीतील सेंट फ्रान्सिस चर्च, अमृतसरातील हरमंदिर साहिब आणि नांदेडमधील सचखंड हुजूर साहिब अशा नाना तीर्थस्थळांवर डोके टेकवून आलेलो आहे. (अर्थात् पुरस्कारासाठी नाही!) त्यामुळे यातील नक्की कोणता देव पावला आणि हा मान माझ्या पदरी पडला, हे अजून नक्की कळायला मार्ग नाही. मात्र ज्याने पाहिला नाही दिवा त्याने पाहिला अवा‘, अशा पद्धतीचा हा सन्मान मिळाल्यामुळे हरखून जायला होते हे नक्की.
     मी इंग्रजीत ब्लॉगलेखन सुरू केल्याला यंदा दहा वर्षे पूर्ण होतील तर मराठीला नऊ वर्षे. मराठीत ब्लॉग लिहिणाऱ्या (अन् अद्याप लिहिणाऱ्या) पहिल्या काही पत्रकारांपैकी मी एक. वृत्तपत्रात काम करत असलो, तरी तेथे कामात काही राम नव्हता. मंदिराचा पुजारी सर्वात आधी नास्तिक होतो, असे म्हणतात. त्याच प्रमाणे पेपरमधील कर्मचारी सर्वात आधी निराश होतो, असे म्हणायला हरकत नाही. या क्षेत्रात मी आलो ते लेखनाच्या हौसेखातर आणि त्यालाच वाव मिळत नसल्याचे पदोपदी दिसून येत होते. भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणे जीर्णमङ्गे सुभाषितम् अशी ही अवस्था होती. हे जाणवल्यानंतर आधी इकडे-तिकडे लिहिण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर हे नवे, मुक्त आणि प्रभावशाली माध्यम हाताशी आल्यानंतर ती संधी मी हातोहात घेतली. त्याची ताकद वगैरे ओळखणे राहिले बाजूला, पण आपल्या मनमुराद अभिव्यक्तीसाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळते आहे, याचाच आनंद जास्त होता. म्हणूनच इतरांनाही मी या माध्यमाची कास धरण्याचा आग्रह नेहमीच करत आलेलो आहे. त्यातूनच मी आणि आशिष चांदोरकर यांनी ब्लॉग लेखनाचा मार्ग चोखाळला. आम्ही काम करत असलेल्या संस्थेत आमची ती विद्रोही चळवळच होती म्हटले तरी चालेल. योगायोगाने गेल्या वर्षी त्याला हा पुरस्कार मिळाला आणि मागोमाग माझा क्रमांक लागला.
      सुदैवाने अगदी आरंभापासून माझ्या लेखनकामाठीला प्रतिसाद मिळत गेला आणि हुरूप वाढत गेला.
     तीन वर्षांपूर्वी औपचारिक नोकरी सोडल्यानंतर मुक्त पत्रकार म्हणून काम करायला सुरूवात केली. या काळात याहू, रिडीफ आणि बीबीसीसारख्या संस्थांसाठीही काम केले. त्याच वेळेस माझा मित्र विश्वनाथ गरूड याने लोकसत्ता.कॉमवर ब्लॉग लिहिण्याचा प्रस्ताव दिला आणि साधारण मार्च 2014 पासून मी तेथे ब्लॉग लिहायला सुरूवात केली. राजकीय घडामोडींवर आधारित असा तो ब्लॉग होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात लिहिलेल्या या नोंदींना प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंधरा वर्षांच्या पत्रकारितेत आणि 10 वर्षांच्या ब्लॉगलेखनात मी कधीही एखाद्या विशिष्ठ विचारसरणीचा वा पक्षाचा प्रसार किंवा भलामण केलेली नाही. त्या निष्पक्षतेवर आणि सचोटीवर या प्रतिसाद व प्रतिक्रियांनी शिक्कामोर्तबच केले.
     त्यानंतर विश्वनाथच्याच पुढाकाराने लोकसत्ता.कॉमवर जानेवारी 2015 पासून नवीन एक ब्लॉग लिहायला सुरूवात केली. कवडसेनावाचा हा ब्लॉग साधारण ऑक्टोबरपर्यंत दर आठवड्याला मी लिहित होतो. माझ्या आवडत्या भाषा आणि संस्कृती विषयावरील विविध घडामोडींवर नोंदी यात लिहिल्या. याही ब्लॉगला मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा होता. अनेक ठिकाणाहून मेल यायला लागले, चांगल्या चांगल्या लेखकांकडून दखल घेतली जाऊ लागली. कधी कधी मांडलेली मते आवडली नाहीत, तर थेट नाके मुरडणाऱ्या प्रतिक्रियाही यायला लागल्या. एरवी तुम्ही बरे लिहिता, पण यावेळी गंडलात,’ असेही काही लोक थेट सांगू लागले. एका पातळीवर अहंकार सुखावणारा आणि दुसऱ्या पातळीवर मनावर दडपण आणणारा असा हा अनुभव होता. भाषा हा मराठी वाचकांच्या किती जिव्हाळ्याचा विषय आहे, हे त्यातून अधोरेखित होत होते.
     म्हणूनच वर्ष 2015 साठी दहा ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांच्या समितीने या नोंदींची निवड पुरस्कारासाठी केली, तेव्हा मनाला खूप समाधान झाले. पुरस्काराची मोहर तर आज उमटली आहेच, परंतु खरोखर या नोंदींचा दर्जा उत्तमच होता, हा दावा मी आजही करू शकतो. त्यासाठी लोकसत्ता.कॉम आणि विश्वनाथचे आभार.
    या शासकीय पुरस्कारामुळे एक भणंग पुरस्कृत झाला आहे, हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच!

हा पुरस्कार महाराष्ट्राला भूषणावहच!

image

गेल्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सत्तापालट झाला. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आधीच्या सरकारच्या तुलनेत वेगळे वाटतील असे फार काही निर्णय घेतले नाहीत. फक्त निर्णय घेणाऱ्या व्यक्ती बदलल्या, निर्णयामागचे तत्वज्ञान आणि विचार बदलले आहे, असे जाणवलेच नाही. जे काही मोजके वेगळे निर्णय घेतले त्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा हा पहिला आणि त्यानंतर आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय हा दुसरा. त्यातील पहिल्या निर्णयाची (निर्णय कमी आणि आदेश जास्त!) उपयुक्तता आणि औचित्य वादग्रस्त आहे मात्र हा दुसरा निर्णय निर्विवादपणे उत्तम आहे. महाराष्ट्राचे भूषण म्हणून हा पुरस्कार दिला जात असला तरी या पुरस्काराचे भूषण महाराष्ट्रालाच वाटावे, असे हे पाऊल आहे.

एरवी महाराष्ट्रात गेली काही वर्षे दुष्काळी परिस्थिती असली तरी पुरस्कारांच्या बाबतीत सुकाळ आहे. कोणतीतरी संस्था, कोणत्या तरी कर्तृत्ववान व्यक्तींना शोधून काढून कोणते तरी भूषण म्हणून ठरवून टाकते. अन् सत्कारार्थी व्यक्तीही ‘अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशनविहीन जातं तुण्डम्’ अशा अवस्थेत मंचावर जाऊन त्या पुरस्कारामुळे मी धन्य झालो, असे जाहीर करून टाकते. मात्र काही व्यक्ती अशा स्थानी असतात, की त्या कोणत्याही पुरस्कारांच्या पलीकडे गेलेल्या असतात. बाबासाहेब पुरंदरे हे अशाच व्यक्तीमत्वांपैकी एक!

ज्या लोकांना बाबासाहेबांच्या नावाला विरोध करून आपल्या जातमंडूक (कूपमंडूक तसे जातमंडूक!) वृत्तीचे ढळढळीत प्रदर्शन करायचे आहे त्यांना ते खुशाल करू द्या. ‘आमचेच ऐका नाहीतर खड्ड्यात जा,’ अशा मानसिकतेची ही मंडळी राज्यात सत्ताधाऱ्यांच्या कृपेने पुन्हा डोके वर काढून बसली आहेत. ज्या प्रमाणे उत्तर पेशवाईत रावबाजीच्या आश्रयाने भट-पुरोहितांचे वर्चस्व वाढले आणि त्यांनी सगळ्या समाजाच्या विवेकबुद्धीला ग्रहण लावले तशीच प्रवृत्ती आजही आहे. खरे तर राज्यातील कायदा-सुव्यवस्था, किरकोळ मुद्द्यांना आलेले महत्त्व आणि खुज्या लोकांचे वाढलेले महत्त्व, हे पाहिल्यावर ज्यांनी उत्तर पेशवाईचे वर्णन वाचले आहे त्यांना तोच काळ आठवेल.

पुरोगामीपणाचे सोवळे सांभाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ब्रिगेडी बांशिद्यांना मोकळे सोडले. भांडारकरसारख्या निरूपद्रवी आणि बऱ्यापैकी जमिनी बाळगून असलेल्या संस्था ते फोडत होते तोपर्यंत चांगले चालले होते. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मात्र याच लोकांची मजल शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक करण्यापर्यंत गेली आणि तेही सरकारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर! त्यानंतर नाकापेक्षा जड होऊ पाहणाऱ्या या मोत्यांचे प्रस्थ हळूहळू आश्रयदात्यांनीच कमी केले. नंतर वाघ्या कुत्र्याच्या निमित्ताने परत या लोकांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला परंतु दादोजींप्रमाणे हा मुद्दा काही फळला नाही. उलट त्याची तीव्र प्रतिक्रिया आली म्हणून तलवारी म्यान करून ही मंडळी बसली. आता बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार मिळणार म्हटल्यावर परत आपले हमखास यशस्वी नाट्य रंगेल म्हणून ही मंडळी आपली शीतनिद्रा सोडून बोलायला लागली आहेत.

बाबासाहेबांच्या कर्तृत्वाविषयी खरे तर आवर्जून सांगायची गरज नाही. आपण इतिहासकार नाही, हे त्यांनी स्वतःच्या मुखाने अनेकदा सांगितले आहे. स्वतःच्या इतिहास वर्णनात काळानुरुप बदल करण्याची तयारीही त्यांनी दाखविली आहे. तरीही ब्रिगेडींनी एकदा ही जमीन मऊ लागली आणि मग कोपऱ्याने खणण्याची सवय त्यांना लागली. परत त्यांना जितेंद्र आव्हाडांसारखा भक्कम आधारस्तंभ मिळाला म्हणल्यावर काय पुसता? मुंब्र्यातील बेकायदा बांधकाम पाडू न देण्याचा विडा उचलणारे, दहीहंडीची घातक उंची कमी करू देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे आव्हाड याबाबतीत मागे कसे राहतील? राम जेठमलानींनंतर नेहमी चुकीच्या बाजूने सकृद्दर्शनी तार्किक मांडणी करणारा पण रेटून खोटे बोलणारा एक बडबडतज्ज्ञ आव्हाडांच्या रूपाने देशाला मिळाला, एवढेच म्हणायचे. उरला त्यांच्या टिकेचा प्रश्न तर त्याला भर्तृहरीनेच उत्तर देऊन ठेवले आहे – तत्को नाम सुगुणिनां यो न दुर्जनै नाङ्कित (सज्जनांचा असा कोणता गुण आहे ज्यावर कद्रू मंडळी टीका करत नाहीत)?

स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनी केलेले पाहवत नाही, अशा कायम दुखणाईत अवस्थेतील ब्रिगेडची मंडळी सकारात्मक गोष्टीसाठी कधी पुढे आल्याचे महाराष्ट्राला आठवत नाही. शिवाजीराजांचे सावत्र राजे व्यंकोजी यांनी राजांचा कायम दुस्वास केला. त्यांच्या सततच्या किरकिरीला कंटाळून राजांनी त्यांना एक खरमरीत पत्र लिहिले. त्यात त्यांनी व्यंकोजींना ‘पराक्रमाचे तमाशे दाखवा’ असे एक मार्मिक वाक्य लिहिले आहे. विनाकारण कुरकुर करण्यापेक्षा काहीतरी घडवून दाखवा, असे त्यांनी सांगितले होते. ब्रिगेडच्या सदस्यांना आज परत हेच वाक्य ऐकविण्याची वेळ आली आहे.

शिवरायांची जयंती वाटेल तेव्हा पाहिजे!

१९ फेब्रुवारीला तारखेनुसार आणि ८ मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती आल्यामुळे महाराष्ट्रातील मावळ्यांना मोठाच उत्साह आला होता. त्यामुळे प्रत्येक शहराच्या रस्त्यारस्त्यांवर तीन तीन जण बसून उलट्या बाजूने रस्त्यावरून दुचाकी नेणे काय, हातात शीतपेये वा बियरच्या बाटल्या आणि दुसऱ्या हातात तलवारी नाचविणे काय किंवा रस्त्याने मोठमोठ्याने ओरडत जाणे काय, अशा शौर्य दाखविणाऱ्या बाबींना उधाण आले होते.
टरा टरा आवाज करत जाणाऱ्या दुचाकी म्हणजे हिंदवी स्वराज्याचा जयघोषच होता जणू. ज्याचा आवाज जास्त त्याची शिवाजी भक्ती मोठी. शिवाय एखादी मुलगी किंवा मुलींचा घोळका जवळून जाऊ लागला, की या इतिहासप्रेमाला आणखी उधाण येणारच. त्यामुळे त्यावेळी दुचाकीच्या आवाजासह हॉर्नचा आवाजही वाढलाच पाहिजे. त्याशिवाय महाराष्ट्राच्या अस्मितेची जाणीव लोकांना कशी होईल.
शिवाय महाराजांनी कायद्यांचे पालन करावे, सौजन्याने वागावे अशी शिकवण दिलीही असेल कदाचित. पण ती पाळण्याची आता गरजच काय. हवे तेवढे प्रदूषण करा, हवे तेवढे आवाज काढासरकार आपलेच आहे. बजाते रहो! आणखी तुमचे शिवाजी अन् गणेशोत्सव मग आमचे बाबासाहेब, तुमचे बाबासाहेब तर आमचे परशुराम ही स्पर्धा आहेच. त्यांनाही बिचाऱ्यांना आपल्या भावनांचा निचरा करण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक महापुरुषाची जयंती आणि पुण्यतिथी शिमग्यासारखीच साजरी झाली पाहिजे, दिवाळीसारखी नव्हे! तरी बरे गणपती बाप्पांच्या जन्मतारखेचा काही वाद नाही.
तेव्हा महाराजांच्या नावाने हा जो गलका चालला होता, त्यामुळे त्यांना भरून आले असेल. ही भक्ती अशीच दाखवायची असेल, तर शिवरायांची जयंती केवळ दोनदा साजरी करून चालणार नाही. इंग्रजी तारीख आणि मराठी तिथी यासोबतच वारानुसारही जयंती साजरी करावी. शिवाय ग्रेगरीयन आणि रोमन कॅलेंडर वेगवेगळे असल्यामुळे त्यांनुसारही वेगवेगळ्या तारखांना शिवजयंती साजरी करावी. म्हणजे डॉल्बी सिस्टम आणि भर रस्त्यात घातलेले मंडप यांच्या मदतीने आपण आपल्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देऊ शका. वर्षातून अनेकदा, वाटेल तेव्हा!

यांना कोणीतरी सन्मान द्या हो!

Shiv Sena begging for respect

शिवसेनेला सध्या सन्मानाची प्रचंड आवश्यकता आहे. राज्याचा सन्मान अनुशेष भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्राणपणाने प्रयत्न चालवले आहेत. याबाबतीत त्यांची, अशाच सन्मान आणि स्वाभिमानाच्या नावाने वेगळी चूल मांडणाऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेसशी जोरदार स्पर्धी आहे.

‘आप’लीच प्रतिमा होते…2

‘आप’ला दिल्लीत मिळालेल्या विजयाचे फार मोठे कारण म्हणजे तेथील सरकारी नोकरदार लोकांची असलेली संख्या. दिल्लीतील अनधिकृत वसाहतींना अधिकृत करण्याचे ‘आप’चे आश्वासन हे याच वर्गासाठी दिलेले होते. यात सामान्य लोकांचा कुठे संबंध आला? वीज व पाणी फुकटात (किंवा कमी भावात) देण्याने लोकांचे भले कसे काय होते? ती वचने पूर्ण करूनही त्यातील कठोर अटींमुळे केवळ 20 व 30 टक्के लोकांनाच त्याचा फायदा होतो, अशी सध्याची बातमी आहे. दिल्लीची समस्या पाणी किंवा वीज नाही, कारण देशाची राजधानी म्हणून आधीच त्या शहर/राज्याचे कोडकौतुक होते. तेथील समस्या ही कायदा व सुव्यवस्थेची आहे. याबाबतीत दिल्लीचे राज्य सरकार काही करू शकत नाही कारण तो विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो.

‘आप’च्या विरोधात जाणारे तीन मुख्य मुद्दे म्हणजे एक तर या पक्षाला विचारसरणी नाही. केवळ दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या विरोधात असलेल्या जनभावनेवर तो स्वार झालेला आहे. 1977 सालच्या जनता पक्षासारखे ते एक कडबोळे आहे आणि कुठल्याही क्षणी त्याचा स्फोट होऊ शकतो. ‘आप’ हा पक्ष समाजवादी विचारसरणीचा असल्याचे त्यांचे चाणक्य योगेंद्र यादव म्हणतात, मात्र फोर्ड फाऊंडेशन आणि डच दूतावासाकडून मिळालेला निधी मात्र केजरीवाल यांना चालतो. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची इच्छा त्यांचे नेते प्रशांत भूषण म्हणतात तर गांधी घराणे व मोदींना डिवचण्याचा एकमेव कार्यक्रम कुमार विश्वास राबवतात. मग भूषण यांचे मत त्यांचे वैयक्तिक असून पक्षाचे ते मत नाही, असा खुलासा मुख्यमंत्री केजरीवाल करतात. त्यावेळी राजकारणात पुनःप्रत्ययाचा आनंद किंवा दुःख काय असते, याचा अनुभव मिळतो. सामान्य माणसासाठी सत्ता राबवण्याचे ‘आप’चे लोक बोलत असले तरी म्हणजे काय याबद्दल संभ्रमाची स्थिती आहे. महाराष्ट्रात अंजली दमानिया यांच्यासारखे संधी न मिळाल्यामुळे सज्जन असलेले लोक हे या पक्षाचे आधारस्तंभ आहेत. अन्य राज्यांत थोड्या बहुत फरकाने हीच स्थिती आहे आणि आता नव्याने शिरकाव करणाऱ्यांमुळे तर जेथे नव्हती, तेथेही अशी स्थिती होईल.

‘आप’मध्ये वाढणारी गर्दी हा आपच्या विरोधात जाणारा आणखी एक मुद्दा आहे. या पक्षात सामील होणारे लोक हाही आता कौतुकाचा भाग झाला आहे. आज हे आणि उद्या ते ‘आप’मध्ये गेले, अशा बातम्यांचे भर हिवाळ्यात पीक आले आहे. वास्तविक उगवत्या सूर्याला नमस्कार हा काही आजचा प्रकार नाही. 1988-89 मध्ये विश्वनाथ प्रताप सिंग यांनी राजीव गांधींच्या विरोधात भ्रष्टाचाराच्याच मुद्द्यावरून बंड पुकारले तेव्हा अशीच अनेक व्यावसायिक मंडळी त्यांच्यासोबत सामील झाली. त्यानंतर 1991 मध्ये भाजप जोरात असताना तेव्हाही माजी सनदी अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांची भाजपमध्ये रीघ लागली होती. परंतु म्हणून काही या पक्षांचे चारित्र्य बदलले नाही. दोन्ही पक्षांमधून एका मागोमाग पात्रे नंतर कशी पुढे आली, हे साऱ्या जगाने पाहिले आहे. फार कशाला, राम विलास पासवान, शरद यादव, लालू प्रसाद यादव व मुलायम सिंग यादव अशी वस्ताद मंडळी साक्षात् जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून पुढे आलेली. परंतु त्यांचेही गंगेचे पाणी गंगेलाच मिळाले. त्यामुळे आज केजरीवाल यांच्या सोबत ग्रामस्वच्छतेच्या बाता करणारे लोक उद्या घाण करणारच नाहीत, याची खात्री काय? कालपर्यंत काँग्रेसच्या महाराज्ञी व युवराजांचे गुणगान करणाऱ्या अलका लांबा आणि समाजवादी पक्षात जमेल तशी सत्तेची ऊब मिळविणारे कमाल फारूखी यांच्यासारखे लोक आताच ‘आप’कडे वळत आहेत. आता पक्षाची सदस्यसंख्या वाढविण्याचे मनसुबे आहेत. तेव्हा सदस्यांच्या चारित्र्याची गाळणी लावणार का आणि ती प्रभावी ठरणार का, हा खरा प्रश्न आहे.

तिसरा महत्त्वाचा मुद्दा पक्षाचा कार्यक्रम आहे. गोरगरिब जनतेला आकर्षित करतील अशा मोफत वायद्यांचा सुकाळ हा काही पक्षाचा कार्यक्रम होऊ शकत नाही. ‘आप’च्या यशाने आणि त्याच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील वल्गनांनी भारावलेल्या अनेकांना आज या पक्षाच्या विरोधात बोलणारी व्यक्ती भ्रष्ट लोकांचे समर्थन करणारीच वाटते. दरिद्री नारायणाच्या कल्याणासाठी राबणाऱ्यांच्या विरोधात उठलेला भांडवलशाहीचा हस्तक वाटतो. वस्तुस्थिती तशी नाही. गोरगरिबांच्या नावाने सुरू होणाऱ्या बहुतांश योजना अंती नवकोट नारायणांचेच कल्याण करणारा ठरतो किंवा राज्य व्यवस्थेला बडुविणारा ठरतो, हा इतिहास आहे.

1995 साली महाराष्ट्रात शिवसेनेने एक रुपयात झुणका भाकर योजनेचे आश्वासन दिले आणि तिच्या अंमलबजावणीचा देखावाही उभा केली. मात्र त्या योजनेने कोणाचे पोट भरले, हे साऱ्या जगाने पाहिले. त्याच वर्षी आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव यांनी 2 रुपये किलो दराने तांदूळ पुरविण्याचे आश्वासन देऊन प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकली. त्यांनी आपले आश्वासन पाळलेही. मात्र दोन वर्षांतच त्याचा राज्यावर एवढा बोजा आला, की त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी दीड वर्षांनी बंड करून सत्ता काबीज केल्यानंतर ही योजना गुंडाळली. काही वर्षांनी आंध्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येची एक लाटच उसळली. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये प्रकाशसिंग बादल यांनी 2000च्या आगेमागे शेतकऱ्यांसाठी मोफत विजेची योजना जाहीर करून सत्ता मिळविली. मात्र त्याचा परिणाम असा झाला, की विजेसाठी पैसे देण्याची चिंता नसल्यामुळे शेतकऱ्यांनी वारेमाप मोटारी चालवून पाण्याचा उपसा केला व आज पंजाबमध्ये भूजलाची स्थिती सर्वात चिंतादायक आहे. इंदिरा गांधींनी सुरू केलेली संजय गांधी निराधार योजना असो, सोनिया गांधी मिरवत असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजना असो अथवा शरद पवार वर्ष दोन वर्षाला शेतकऱ्यांच्या नावाने जाहीर करत असलेली मदत असो, त्यांचा खरा फायदा धेंडांनाच होतो, ही वस्तुस्थिती आहे. दिल्लीत ‘आप’ने अठरा हजार अनधिकृत घरे (वस्त्या) अधिकृत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचे सर्व लाभार्थी खरोखर केवळ नाडलेले-पिचलेले लोक आहेत का?

हे सर्व लिहिण्याचा उद्देश देशात भ्रष्टाचार चालू राहावा आणि प्रामाणिक लोकांनी येऊ नये, असा नाही. मात्र प्रामाणिकपणा ही काही मोजक्या लोकांची मक्तेदारी नाही आणि गोरगरिबांच्या नावाने कोणी खोटी आश्वासने व स्वप्ने दाखवून लोकांची दिशाभूल करत असेल, तर ते गैर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हीच तेवढे स्वच्छ आणि बाकी सर्व तुच्छ, हा आविर्भावही चुकीचा आहे. इतर सर्व पक्षांप्रमाणे याही पक्षालाही वेळ द्यावा, कार्यक्रम व विचारसरणीच्या आधारावर टिकून राहून त्याने कारभार केला तरच त्याचे स्वागत करावे. अन्यथा लोकांची स्थिती पुन्हा हुरळली मेंढी तेच रान अशी होईल. ते होऊ नये, इतकाच हेतू. यासाठी या पक्षाला किमान एका वर्षाचा वेळ द्यायला हवा. त्यानंतरच हा पक्ष खरोखर आपला आहे अथवा नाही, हे सांगता येईल. (संपूर्ण)

‘आप’लीच प्रतिमा होते…

आणखी आठवडाभराने सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू झालेले असेल. मात्र उत्तरेतील आम आदमी पक्षाच्या विजयाचे उत्तर रामायण तोपर्यंत संपलेले असण्याची शक्यता नाही. नरेंद्र मोदी यांच्या झंझावातापुढे काँग्रेसची वाताहत होत असल्याचे चित्र अगदी गेल्या महिन्यापर्यंत रंगलेले असताना अचानक ‘आप’ नावाच्या घटकाने राजकीय वातावरण ढवळून काढले. या पक्षाने दिल्ली या म्हटलं तर देशाच्या, पण वास्तवात नोकरशहांच्या राजधानीत अर्ध्याला थोड्या कमी इतक्या जागा मिळविल्या. त्यामुळे मोदी नावाच्या अश्वमेधाच्या घोड्याला कसे रोखायचे, या चिंतेत पडलेल्या सर्व सेक्युलरांना आशेचा नवा किरण दिसू लागला आहे आणि बेडकीचा बैल करण्याचे उद्योग चालू झाले आहेत.

इतकी साधी माणसं झाली नाहीत अन् होणारही नाहीत, असे काहीसे चित्र ‘आप’च्या नेत्यांच्या बाबतीत चित्र जणू असे रंगविले जाते आहे. भारतात राजकारणी नावाची जमात तिच्या वाट्याला येणाऱ्या शिव्या-शाप आणि टिंगलीला पुरून उरेल एवढी वावदूक आहे. मात्र म्हणून सगळे राजकारणी गलिच्छतेचे पुतळे आहेत आणि त्यांच्यापासून मुक्ती देण्यासाठीच केवळ ‘आप’ नावाची सेना आली आहे, असा आविर्भाव तद्दन चुकीचा आहे. या वाक्यातील पहिला भाग एकवेळ खरा मानता येईल, परंतु दुसरा भाग बिल्कुल खरा आहे. हा आविर्भाव केवळ खोटा आहे म्हणून नाही, तर पिडलेल्या-नाडलेल्या कोट्यवधी लोकांची त्यामुळे फसवणूक होते म्हणूनही तो वाईट आहे. म्हणूनच अट्टल राजकारण्यांप्रमाणे लोकांची दिशाभूल करण्यात ‘आप’ची मंडळीही काही कमी नाहीत.

सुमारे अडीच वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी दिल्लीत जे आंदोलन केले, त्यावेळपासून या फसवणुकीला सुरूवात होते. अण्णा हजारे यांच्या तेव्हाच्या काही सभा-पत्रकार परिषदांना मी उपस्थित होतो. त्याबद्दल मी लिहिलेही आहे. [(ही खदखद कुठवर वांझोटी राहणार) (दादागिरी चालते, भाईगिरी चालते मग अण्णागिरी का नाही?)] मात्र त्यांचा चेहरा वापरून व त्यांच्या प्रामाणिक पण भाबड्या तळमळीचा वापर करून कोणीतरी सूत्रे हालवत असल्याचेही जाणवत होते. चार वर्षांपूर्वी कोणालाही माहीत नसलेला अरविंद केजरीवाल नावाचा माणूस या आंदोलनाने पुढे आला. त्यापूर्वी त्यांना मेगॅसेसे पुरस्कार मिळाला होता, मात्र त्यांचे नाव मोजक्या लोकांपर्यंतच पोचले होते. सामान्य माणसापर्यंत तो चेहरा पोचला अण्णांच्या आंदोलनामुळे. मात्र नंतर काँग्रेस व भाजपच्या प्रस्थापित राजकारण्यांनी राजकारणात येण्याचे आव्हानात्मक आवाहन केल्यानंतर मात्र केजरीवालांनी पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानली. त्यांनी अण्णांना टांग मारून ‘आप’ल्या पक्षाला जन्म दिला.

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या एक आठवडा आधी मी बातमीसाठी (मैं अब दिल्ली नहीं जाऊँगाः अन्ना हज़ारे)अण्णांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी दिल्लीची अनेक मंडळी अण्णांच्या संस्थेत तळ देऊन बसली होती. केजरीवालना तुम्ही पाठिंबा द्या, असा त्या लोकांनी धोशा लावला होता. त्यातील एकाने तर अण्णांच्याच पद्धतीने त्यांच्या संस्थेत उपोषण सुरू केले आणि तो उपोषणाचा चौथा दिवस असल्याचाही फलक लावला. पारनेर पोलिसांनी त्याला तिथून हलवला. या लोकांची जातकुळी काय आहे, हे पुरेसे कळून चुकलेल्या अण्णांनी तेव्हा पूर्ण मौन बाळगणे पसंत केले. राळेगण सिद्धीत त्यांच्या उपोषणाच्या वेळेस केजरीवाल यांच्याबाबत प्रश्न विचारल्यावर अण्णांनी तटकन् संवाद संपविणे बरेच काही सांगून गेले. (मात्र आता परत त्यांच्या कोलांटउड्या चालू झाल्या आहेत, त्याबद्दल नंतर कधीतरी).

सत्ता हाती आल्यानंतर गेल्या आठ दिवसांत तर असा माहोल उभा केला आहे, की जणू काही कलियुगातील समस्त हरिश्चंद्र एकत्र आलेले आहेत आणि दुष्ट विश्वामित्रांची आता खैर नाही. अर्धखुळेपणाच्या सीमेवर उभ्या असलेल्या माध्यमांनाही हे मृगजळ खरेच पाणी आहे, असे वाटू लागले. त्यातील काहींनी ‘मिष्ठान्नमितरेजनाम्’ या न्यायाने वाहत्या गंगेत हात धुणे चालू ठेवले आहे. वास्तविक अगदी साध्या माणसासारखे, परंतु व्यापक जनतेच्या हितासाठी उत्तम प्रशासन राबविणारे किमान तीन मुख्यमंत्री या देशाला माहीत आहेत व तिघांपैकी कोणावरही आतापर्यंत डाग नाहीत. ते तीन मुख्यमंत्री म्हणजे पाँडिचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी (आधी काँग्रेस व आता ऑल इंडिया एनआर काँग्रेस), त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार (साम्यवादी पक्ष) व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (भाजप). मात्र त्यांच्यापैकी कोणीही स्वतःचा बडेजाव मिरविला नाही. यातील पाँडिचेरीला राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून भारत सरकारने गौरविले तर त्रिपुरात सरकार यांनी लोकांनी तीन-चारदा सतत निवडून दिले आहे.

माध्यमांनीच मोठे केलेल्या केजरीवाल आणि पार्टीने मात्र साधेपणाचेच देव्हारे माजवायला सुरूवात केली. त्यात कुमार विश्वाससारख्या तोंड वाजविणाऱ्या माणसांनी तर वात आणला. रा. ग. गडकऱ्यांनी जे कवींचे वर्णन केलेले आहे, त्यात थोडा बदल करून नेत्यांचे वर्णन असे करता येईल, की खरा नेता जमिनीवर असतो आणि खोट्या नेत्याला स्वर्ग दोन बोटे उरलेला असतो.

(क्रमशः)

अव्वल राजकारणी

Vilasrao Deshmukh विलासराव देशमुख म्हणजे एक अस्सल राजकारणी. नेतृत्वाचे सर्व खाचखळगे आणि राजकारणाच्या सर्व खाचाखोचा अगदी उत्तम प्रकारे समजलेला आणि त्यातून यशस्वी कारकिर्द घडविणारा एक हिकमती नेता गेला. राजकारणात असल्यावर येणारे सर्व बालंट, किटाळ आणि आरोप त्यांच्या मार्गातही आले. मात्र त्याचा बाऊ न करता किंवा विचलित न होता विलासरावांनी स्वतंत्र शैली जोपासली हे त्यांचे सर्वात मोठे यश.

१९८०च्या दशकाच्या पूर्वार्धात, राजीव गांधींनी काँग्रेसला नवा चेहरा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. तोपावेतो विलासराव काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी स्थिरावले होते. मात्र या नव्या योजनेमुळे त्यांचे नशीब उजळले आणि शंकरराव चव्हाण यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या राजकीय जडणघडणीत चव्हाण यांचा मोठा वाटा होती म्हणूनच  त्यावेळी विलासराव चव्हाण यांचे समर्थक म्हणूनच ओळखले जात. १९८६ साली मंत्रिमंडळात आल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही-अपवाद केवळ १९९५ ते १९९९ या दरम्यानच्या विजनवासाचा. राजकारणात चढ-उतार असायचेच, हे अगदी सरधोपट वाक्य झालं. भल्या-भल्या नेत्यांना त्याची प्रचिती आलेली आहे. मात्र त्या चार वर्षांचा काळ वगळला, तर देशमुखांनी कधी उतार पाहिलाच नाही.

बिनधास्तपणा हा विलासरावांचा महत्त्वाचा गुण होता. पक्षश्रेष्ठींशी चांगले संबंध असल्याने त्यांना हा बिनधास्तपणा कधी डाचला नाही. १९९१-९२ साली, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री असताना विलासरावांनी विधानमंडळात एक निवेदन केले होते. निवेदन म्हणजे कबुलीच होती की, अनेक मंत्री वा आमदार ‘आमदार निवासा’त देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांना घेऊन येतात. अन्य कोणी असता, तर या विधानावर राजकीय वादळ उठले असते. मात्र मोठा गदारोळ होऊनही त्यांना ते विधान मागे घ्यावे लागले नाही.

भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता हे नेतृत्वाचे दोन संसर्गजन्य दोष. त्यांचे अपश्रेयही त्यांच्याकडे जाते. महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रातील घसरगुंडी झाली त्यातील मोठा काळ त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत होता. ती परंपरा त्यांना त्यांच्या पूर्वसुरींनी दिली आणि त्यांचा उत्तराधिकाऱ्यांनी ती जोरात पुढे नेलीय. आघाडी सरकारचा नाईलाज या सबबीखाली निर्णय टाळत राहायचे, हा त्यांनी स्थायीभाव करून ठेवला. एक दिल्लीश्वरांना खुश ठेवले, की बाकी कोणाची तमा बाळगायची नाही, हा मंत्र त्यांनी जपला. त्याचे त्यांना शेवटपर्यंत फळही मिळाले.

हजरजबाबीपणा त्यांच्या स्वभावाचा भाग होता का वकिलीच्या शिक्षणाने तो त्यांच्यात भिनला होता न कळे. मात्र त्यांच्यातील विनोदप्रियता वारंवार दिसून यायची. दोन-तीन नेते एकत्र आलेला एखादा कार्यक्रम असला आणि त्यात विलासराव असले, की विनोदाचे कारंजे हमखास फुलायचे. पत्रकारांच्या प्रश्नांनाही ते शिताफीने तोंड देत. एखाद्या सभेतून किंवा पत्रकार परिषदेतून विलासरावांना काढता पाय घ्यावा लागलाय, हे दृश्य कधीच दिसले नाही. एप्रिल महिन्यात एका परिषदेसाठी ते आले असताना त्यांना घेरण्याची पत्रकारांमध्ये चढाओढ लागली होती. कारण सानंदा प्रकरणात त्यांच्यावर नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते आणि सुभाष घईंनी ‘(विलासराव मुख्यमंत्री असताना) आपल्याला राज्य सरकारने फसविले,’ अशी जाहीर तक्रार केली होती. मात्र विलासराव अविचल मुद्रेने आले, सर्व प्रश्नांना तितक्याच थंडपणे उत्तरे दिली. एकही प्रश्न टाळणे नाही वा विषय बदलणे नाही. मुरलेल्या राजकारण्याला साजेशा सफाईने आरोपांबाबत बोलणे टाळले. त्यावेळी आमच्यापैकी एकाने विचारले, “तुमच्यावर अगदी वारंवार आणि वेगवेगळे आरोप का होतात?”

त्यावर तत्परतेने विलासराव म्हणाले, “मी लोकप्रिय असल्यामुळे असेल.” त्यावर पुढच्या सगळ्या पृच्छा संपल्या!

कृतज्ञता आणि मैत्री जपणे ही विलासरावांची सगळ्यात मोठी खासियत म्हणावी लागेल. शंकरराव चव्हाणांच्या पाठबळावर राजकारणात प्रगती केलेल्या विलासरावांनी त्यांचे चिंरजीव अशोक चव्हाण यांना आपले सहकारी केले. विलासराव मुख्यमंत्री असेपर्यंत अशोकराव त्यांच्या मंत्रिमंडळात होते, इतकेच नव्हे तर शंकररावांच्या मंत्रिमंडळात विलासरावांनी जी खाती सांभाळली तीच त्यांनीही सांभाळली उदा. सांस्कृतिक कार्यमंत्री, महसूल मंत्री. बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार अशा आपल्या जुन्या सहकाऱ्यांना मंत्री केले. गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांची मैत्री तर नेहमीच चर्चेला खाद्य पुरवायची. त्यांनी राजकीय प्रतिस्पर्धा जपली तरी एखाद्या विरोधकाला आयुष्यातून उठविण्याचे काम कधी केले नाही. राजकीय पदांचा वापर त्यांनी स्वतःच्या भल्यासाठी केलाच, पण त्यातील वाटा अन्य कार्यकर्ते-नेत्यांना देण्याइतपत नीयत त्यांच्याकडे होती. लातूरमध्ये फिरताना त्यांचे केलेले काम डोळ्यांना दिसून येते.

त्यामुळेच काल त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना मुंडेंपासून अशोकरावांपर्यंत सर्वजण हळहळत होते. एरवी राजकारण्याच्या, त्यातही मंत्र्याच्या, मृत्यूवर भाडोत्री रडणारे अनेक ‘निबर’ कार्यकर्ते असतात. मात्र काल अनेकांशी बोलताना त्यांचे उमाळे खरे असल्याचे जाणवत होते. विलासराव दगडोजी देशमुख, मूळ गाव बाभळगाव हल्ली मुक्काम नवी दिल्ली यांची ही एकमेव खरी कमाई.