धर्मं चर, ख्रिस्तं अनुचर

गेली एक-दोन वर्षे मी बायबल वाचत आहे. संस्कृतमधून. मुळात बायबल हे एक पुस्तक नसून ते 27 पुस्तकांचा एक संग्रह आहे. त्यामुळे या प्रत्येक पुस्तकाची एक वेगळी मौज आहे.

बायबलमधला येशु ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. एकूण बायबल वाचले तर येशूची कहाणी ही करुण रसाने ओथंबलेली दिसते. तो नेहमी स्नेहाळ भाषेत बोलतो. तो ठायी ठायी श्रद्वावंतांना आवाहन करतो. मात्र येशूवर विश्वास ठेवणारेच तरतील, असे बायबल म्हणते. धर्माऐवजी तिथे श्रद्धेला जास्त महत्त्व आहे. विश्वास न ठेवणारे खितपत पडतील, असे बायबल बजावून सांगते.

ईश्वर, येशू आणि पवित्र आत्मा (होली घोस्ट) हे तीन सत्य आहेत, येशू हा ईश्वराचा एकुलता एक पुत्र आहे आणि क्रूसावर मरण आल्यावर त्याचे पुनर्जीवन झाले, या ख्रिस्ती धर्माच्या तीन मुलभूत श्रद्धा आहेत. या श्रद्धा न बाळगता कोणीही ख्रिस्ती असू शकत नाही.

ईश्वर श्रेष्ठ आहे, असं म्हणायची तयारी असेल तर तुम्हाला पूर्ण तारण्याची तजवीज बायबल करते. खालील वाक्यांचा मासला पाहा,

 • असाध्यं मनुष्याणां, न त्वीश्वरस्य। (असाध्य मानवांना आहे, ईश्वराला नाही).
  सर्वमेव शक्यं विश्वसता। तव विश्वासं त्वां तारयामास। (श्रद्धेने सर्व शक्य आहे. तुझी श्रद्धा तुला तारेल.)
 • न केवलेन पूपेन मनुष्यो जीविष्यति अपि ईश्वरस्य येन केनचिद् वचनेन (मनुष्य केवळ पैशावर जगत नाही, तर ईश्वराच्या एखाद्या वचनावर जगतो.)
 • निजेईश्वरस्य प्रभोर्भजना त्वया कर्तव्या, एकश्च स एव त्वयाराधितव्यः। (तू केवळ आपल्या ईश्वराचे भजन केले पाहिजेस. तू फक्त त्याची आराधना केली पाहिजे.)
 • चिकित्सको न स्वस्थानाम् अपि तु अस्वास्थानाम् आवश्यकः। न धार्मिकान् अपि तु मनःपरावर्तनाय पापिन् आव्हातुम् अहम आगतः। (वैद्य निरोगी लोकांना नव्हे, तर आजारी लोकांसाठी आवश्यक असतो. मी धार्मिक लोकांचे नाही तर पापी लोकांच्या मनाचे परिवर्तन करण्यासाठी आलेलो आहे.)
 • किमर्थं वा यूयं मां प्रभो प्रभो इत्यभिभाषध्वे न तु मद्वाक्यानुरूपाचरणं कुरूथ? (तुम्ही मी सांगतो तसे वागत नाही, तर मला प्रभू प्रभू तरी का म्हणता?)
 • ईश्वरस्य धनस्य चोभयोर्दास्यं कर्तुं युष्माभिर्न शक्यते। (ईश्वर आणि धन या दोहोंचीही गुलामी तुम्ही करू शकत नाही).
 • मत्तः पृथक् युष्माभिः किमपि कर्तुं न शक्यते (माझ्यावाचून तुम्ही काहीही करू शकत नाही.)
 • अहमेव पन्थाः सत्यश्च जीवनश्च, नान्योपायेन मनुष्यः पितुः समीपमायाति। केवलं मया। (सत्य आणि जीवनाचा मीच मार्ग आहे. अन्य कोणत्याही उपायाने मनुष्य पित्याजवळ (देवाजवळ) जाऊ शकत नाही. केवळ माझ्या माध्यमातून जातो.)
 • सत्यं मयानुभूयते यद् ईश्वरो न पक्षपाती अपि तु सर्वस्यां जात्यां यः तस्माद् बिभेति धर्ममाचरति च स तस्य ग्राह्यः। (हे सत्य मी अनुभवले आहे, की ईश्वर पक्षपाती नाही, परंतु जो जीव त्याला भितो आणि धर्माचे आचरण करतो तो त्याला ग्राह्य ठरतो.)
 • यदि त्वं ‘यीशुं प्रभुरूपेण‘ स्वयं अंगीकरोषि तथा च मनसा यं स्वीकरोषि यत् परमेश्वरेण एव मृतेषु जीवेषु स: जीवित: कृत: तर्हि निश्चयरूपेण त्वम् उद्धरसि (तू येशूला प्रभू म्हणून स्वतः मान्य केलेस आणि परमेश्वरानेच त्याला मृत्यूनंतर जीवंत केले, हे मनाने अंगीकारलेस, तर तू तुझा उद्धार निश्चितच करशील – रोमिणस्य पत्रम् 10:9)

या उलट बायबलच्या तुलनेत भगवद्गीता किंवा पुराणांमध्ये अधिक भावनिक ओलावा. येशू हा देवपुत्र आहे, त्यामुळे तो नेहमीच एका उंचीवर राहतो. याउलट भागवतातील श्रीकृष्ण एकाच वेळेस बालक, खोडकर मुलगा, किशोर, प्रेमी, राजकारणी असे बरेच काही आहे. श्रीरामाच्या बाबतीतही हेच. त्यामुळे तुम्ही त्यांना कोणत्याही रीतीने भेटू शकता. त्यामुळे संतांचा पांडुरंग एकनाथांच्या घरी पाणी भरी शकतो आणि जनाबाईच्या घरी दळण-कांडण करू शकतो. त्यात त्याची मानहानी झाली किंवा अवमान झाला, असे कोणाला वाटत नाही. म्हणूनच भगवद्गीतेत विश्वरूपदर्शन पाहिलेला अर्जुन श्रीकृष्णाची माफी मागतो. मी तुला मित्र समजून तुझी थट्टा केली, बोलू नये तो बोललो, असे खजील होऊन म्हणतो. तेव्हा श्रीकृष्ण नुसतेच हसून तो विषय टाळतो, त्याची निर्भर्त्सना करत नाही.

त्यापेक्षाही म्हणजे या ग्रंथांमध्ये बौद्धिक स्वातंत्र्य अधिक आहे. “यः तस्माद् बिभेति धर्ममाचरति च स तस्य ग्राह्यः” असे ते म्हणत नाहीत. धर्मभीरू किंवा पापभीरू नावाचा प्रकार हिंदू संस्कृतीत नाही. उलट “यो यथा मां भजति तांस्तथैव भजाम्यहम्” असे भगवद्गीता म्हणते.

अगदी “मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू” असे म्हणणारा श्रीकृष्ण भगवद्गीतेत शेवटी अर्जुनाला म्हणतो, “इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्‌गुह्यतरं मया। विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥18- 63॥” (हे मला माहीत असलेले गुप्तातील गुप्त ज्ञान तुला निःशेष दिले आहे. यानंतर तुझी जी इच्छा असेल ते कर.)

सत्यं वद, धर्मं चर (खरे बोल, धर्माचे आचरण कर) हा हिंदू जीवनपद्धतीचा संदेश आहे. (येथे धर्म म्हणजे वागणुकीचा कायदा, कर्मकांड नव्हे). म्हणजे ईश्वरावर श्रद्धा न बाळगता केवळ धर्म पाळल्याने मनुष्य हिंदू असू शकतो. म्हणूनच भगवद्गीतेत चौथ्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतो, ”त्रैगुण्यविषया वेदा निस्रैगुण्य भवार्जुन”. म्हणजे साक्षात वेद हेच त्रिगुणांबाबत बोलतात पण तू या तीन गुणांच्या पलीकडे जा, असे तो सांगतो. याचाच अर्थ जीवनाचा अर्थ लावताना वेदांचेही प्रामाण्य नाकारण्यात त्याला फार काही वाटत नाही. पण ख्रिस्तं अनुचर (ख्रिस्ताचे अनुसरण कर) हा बायबलचा संदेश आहे.

आता धर्माचे अनुसरण करायचे का श्रद्धेने जगायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

फतवे-आदेशांच्या पलीकडचा भारत

स्वांतत्र्यदिन! हा दिवस म्हणजे भारतीयांच्या आशा-आकांक्षांची उजळणी करण्याचा दिवस. हक्काची सुट्टी म्हणूनही अलीकडे त्याकडे पाहिले जात असले, तरी राष्ट्रीय सण म्हणून त्याचे महत्त्व अबाधित आहे. दिडशे वर्षे ब्रिटीशांच्या आणि त्यापूर्वी 800 वर्षे तुर्कांच्या-मुगलांच्या जोखडात सापडलेल्या भारतमातेने 70 वर्षांपूर्वी स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला. भारत मातेचा जयजयकार गगनाला भेदून गेला.

अर्थातच 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारतीयांच्या मनात सुराज्याची जी ऊर्मी होती, ती आज क्षीण झाली आहे. देशभक्तीची जागा व्यवहाराने घेतली आहे. हा बदल हळूहळू झाला आहे. अक्षम राजकारणी, निर्ढावलेले नोकरशहा व कमुकवत विचारवंत अशा सर्वांनीच या अधःपतनाला हातभार लावला आहे. आज झेंडावंदनासारख्या पवित्र प्रसंगाला उपस्थित कोण राहतात तर केवळ सरकारी कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी! अन् त्यासाठी सरकारी परिपत्रके काढावी लागतात, त्याच्यावरही वाद-विवाद होतात आणि मूळच्या स्वांतत्र्यालाच हरताळ फासण्याच्या स्वातंत्र्याचे दाखले दिले जातात.

एरवी केंद्र सरकारच्या परिपत्रकाला विरोध करण्याची दुर्बुद्धी ममता बॅनर्जींना झाली नसती! केंद्रीय मनुष्यबळ खात्याने ७ ऑगस्ट रोजी सर्व राज्यांना हे पत्र पाठवले होते. केंद्राने काय सांगितले होते, तर फक्त नजीकच्या हुतात्मा स्मारकावर जा आणि श्रद्धांजली वाहा! बरे, हा आदेशही नव्हता तर केवळ सल्ला होता. पण त्या सल्ल्यातही ममतांना (त्याच त्या, शिवसेनेच्या भाषेतील बंगालच्या वाघीण!) त्यातही हुकूमशाहीचा वास आला. आम्ही हा आदेश पाळणार नाही, असे त्यांनी सांगितले. भाजपकडून आम्हाला राष्ट्रभक्तीचे धडे शिकण्याची गरज नाही, असे ममतांनी ट्वीटरवरून जाहीर केले. अर्थात मोदी आणि कंपनीच्या दहशतीमुळे असेल कदाचित, पण हे त्यांनी नेहमीच्या कर्कश पद्धतीने सांगितले.एरवी केंद्र सरकारला विरोध करायचे धाडस आजकाल कोणात उरलेय?

दुसरीकडे योगी सरकारने स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत आणि ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मध्य प्रदेशत सरकारने असेच आदेश काढले होते. आणि नेहमीप्रमाणे मुस्लिम मौलवींनी त्याला विरोधही केला. एका मौलवींनी तर सांगितले, की वंदे मातरम आणि राष्ट्रगीत म्हणू नका.

सुदैवाने सगळा भारत एवढा संकुचित नाही. मातृभूमीबद्दल आदर दाखवायला काचकूच करण्याची अक्कल सगळ्यांच्या डोक्यात आलेली नाही. त्यामुळेच 71व्या स्वातंत्र्यदिनाला एक वेगळा रंग चढला आणि तो रंग होता आसाममधील काही छायाचित्रांचा.

एरवी फडकलेले झेंडे आणि देशभक्तीच्या खोट्या उमाळ्याची सवय लागलेल्या डोळ्यांना या दृश्याने एक नजर दिली. आसाममधील ढुबरी जिल्ह्यातील हे चित्र. सगळीकडे होते तसेच तेथील एका सरकारी शाळेत मंगळवारी झेंडावंदन झाले. फरक एवढाच, की झेंडा फडकवणारे शिक्षक आणि त्याला सलामी देणारे विद्यार्थी, हे दोघेही छातीएवढ्या पाण्यात उभे होते. वेळ होती सकाळी सव्वा सातची.

या शिक्षकाचे नाव आहे मिझानूर रहमान आणि शाळेचे नाव नसकारा प्राथमिक शाळा. त्यांनी सकाळी फेसबुकवर ही छायाचित्रे टाकली आणि संध्याकाळपर्यंत त्याला जवळपास पाऊण लाख लोकांनी शेयर केले. विशेष म्हणजे रहमान यांनी ही छायाचित्रे टाकल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. त्यांच्या भागात वीज नियमित येत नसल्याने त्यांनी थेट संध्याकाळीच फेसबुक उघडले. तेव्हा ही चित्रे एवढी प्रसिद्ध झाल्याचे त्यांना कळाले.

अमुक कर वाढविला म्हणून अमुक पैसे देऊ नका, इतका कर देतो तर या सुविधा का नाहीत अशा कृतक संतापाच्या पोस्टी टाकणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही घटना आहे.

“झेंडावंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला वाटले, की फेसबुकवर टाकण्यासाठी काही छायाचित्रे घ्यावीत. पोहता येणाऱ्या दोन मुलांना झेंड्याजवळ जाऊन सलाम करण्यास आम्ही सांगितले आणि आम्ही छायाचित्रे घेतली,” असे रहमान यांनी बीबीसीला सांगितले. अर्थात स्वांतत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची छायाचित्रे त्यांना शिक्षण विभागाला पाठवावीच लागतात, त्यामुळे तशीही ती त्यांना काढायचीच होती.

या अशा लोकांनीच हा देश बांधून ठेवलाय. हा सामान्य भारत आहे – फतवे आणि आदेशांच्या पलीकडचा भारत! हा अस्सल भारत आहे, सरकारी कागदपत्रे आणि बेगडी क्रांत्यांच्या व मतलबी समतेच्या लढ्याच्या संघर्षापलीकडचा भारत. अन् हे दर्शन घडविले ज्याच्या नावाने उठता-बसता माध्यमे बोटे मोडतात त्या नव्या माध्यमाने – सोशल मीडियाने. देशाचा 71वा स्वांतत्र्यदिन त्या अर्थाने कारणी लागला म्हणायला हरकत नाही.

वर्ल्ड डिजिटल लायब्ररी

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक ज्ञान वारसा प्रकल्पांतर्गत जागतिक ग्रंथालय महाजालावर सुरु झाले आहे. ग्रंथालय प्रेमी असणाऱया माझ्यासारख्या अनेकांना यामुळे मोठी सोय झाली आहे. वर्ल्ड डिजिटल लायब्ररी या नावाचे हे संकेतस्थळ सात भाषांमध्ये उपलब्ध आहे. अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ कॉंग्रेसचे लायब्ररीयन जेम्स एच. बिंलिग्टन यांची ही मूळ कल्पना. व़ॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राशी बोलताना बिलिंग्टन यांनी सांगितले, की वापरायला सोपे आणि विद्यार्थी, सर्वसामान्य लोक आणि विद्वान यांच्यासाठी मोफत असा ज्ञानाचा खजिना मोकळा करावा, हा मुख्य उद्देश होता.
संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर मला स्वतःला हा उद्देश बऱयाच अंशी साध्य झाल्याचे माझे मत आहे. या संकेतस्थळावर सर्व दस्तावेज न्याहाळण्यासाठी स्थळ, विषय, प्रकार अशी वर्गवारी तर आहेच शिवाय कालानुक्रमे न्याहाळण्याचीही सोय आहे. सहज चाळा म्हणून मी दोन दस्तावेज पाहिले. एक महाभारतकालिन भारताचा नकाशा होता. विशेष म्हणजे हा नकाशा पुण्यातच १९ व्या शतकात कधीतरी छापलेला असल्याची माहिती या संकेतस्थळावर मिळते. दुसरा विशेष दस्तावेज अधिक रंजक वाटला. तमिळनाडूतील मदुराई प्रांतात १८३७ च्या सुमारास असलेल्या ७२ जाती जमीतींच्या लोकांची ही चित्रे आहेत. त्यातील मराठा सरदार या नावाने असलेल्या चित्रातील मनुष्याचा पेहराव प्रस्थापित कल्पनांना धक्का देणारा वाटला. (किमान माझ्या तरी.)
एक भारतीय म्हणून मात्र काही गोष्टी मला यात खटकल्या. संकेतस्थळावरील १२०० दस्तावेजांपैकी केवळ २० दस्तावेज भारताशी संबंधित आहेत. भारतासाठी (किंवा दक्षिण आशियासाठी) वेगळा विभाग न करता मात्र त्याचा समावेश मध्य आशियामध्ये करण्यात आला आहे. कालमान आणि श्रेय यांबाबतीतही त्यामुळे भारतावर अन्याय होण्याची शक्यता आहे. उदा. जगातील पहिली कादंबरी म्हणून जपानमधील एक कृती मांडण्यात आली आहे. भाषाविषयक दस्तावेजांच्या विभागात भारतातील एकही कृती नाही.

महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालये एकमेकांशी जोडण्याचा प्रकल्प गेली कित्येक वर्षे सुरु आहे। गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडे या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन परीक्षांची तपासणी मॅन्युअली करणाऱया या महामंडळाकडे त्यासाठी वेळ नसावा. राष्ट्रीय पातळीवर डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने काढलेले संकेतस्थळ आहे. मात्र ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या या संकेतस्थळावरील सर्व लिंक अद्यापही कार्यान्वित झालेल्या नाहीत. त्या कधी होतील हेही सांगता येणार नाही कारण सरकारी संकेतस्थळांबाबत काहीही विधान करता येत नाही. पाहिजे तर मनोहर जोशी यांना विचारा. महाराष्ट्र विधानमंडळाचे सर्व दस्तावेज महाजालावर उपलब्ध करू अशी घोषणा जोशी यांनी मुख्यमंत्री असताना म्हणजे १९९८ साली केली होती. आज ११ वर्षांनंतरही विधिमंडळाचे संकेतस्थळ आलेले नाही. त्यामुळे तूर्तास युनेस्कोने सुरू केलेल्या जागतिक ग्रंथालयाचे स्वागत करायला हरकत नाही