युरेका…युरेका! असू दे इंडिया!

युरेका…युरेका! फॉर्म्युला सापडला…! यशाचा हमखास फॉर्म्युला मिळाला आहे. आता या देशात कुठल्याही क्षेत्रात हमखास काही कामगिरी करणे बिल्कुल अशक्‍य नाही. भरघोस काही करायचं असलं, की फक्त एकच करायचं…चित्रपट काढायचा! सत्यघटनेवर असला तर दुधात साखर. मात्र नसला तरी बिघडत नाही. एक स्टार घ्यायचा, बाकी “चांदण्या’ घ्यायच्या…तो रिलीज करायचा आणि घ्या…आपल्या पदरात प्रत्यक्ष घबाड पडणारच!

आशिया चषक हॉकी स्पर्धेत कोरियाला हरवून भारताने विजय मिळविला. त्यामागे संघाला खरी प्रेरणा प्रशिक्षक किंवा खेळाडूची होती का? तुमची जीभ रेटते कशी हो म्हणायला…प्रशिक्षक काय यापूर्वी घसा खरवडून शिकवत नव्हते? खेळाडू त्यांच्या हॉकीचे पाणी मैदानावर दाखवत नव्हते? होते…मात्र “चक दे इंडिया’ आला आणि या खेळाडूंनी हम भी कुछ कम नहीं, हे प्रत्यक्ष दाखवून देण्याची संधी साधली. त्यामुळे आता भारत मार खात असलेल्या अन्य क्षेत्रांत (अन्‌ त्यांची जंत्री केवढी मोठी आहे!) हेच सूत्र वापरून देशाला प्रगतिपथावर नेणे शक्‍य नाही का?
आता हेच बघा ना! अणु कराराच्या मुद्द्यावरून सरकार आणि डाव्यांची केवढी रस्सीखेच चालू आहे? तडजोडी, वाटाघाटी आणि चर्चा करता-करता अनेक युवा कम्युनिस्ट नेते अकाली प्रौढ आणि अकाली वृद्ध होताहेत. त्यांच्यासाठी एखादा चित्रपट काढता येईल. एक नेता परदेशात करार करायला जातो. त्याच्यावर देशात प्रचंड टीका होते. मात्र तो नेता स्तब्ध असतो. (गंभीर किंवा खंबीर नव्हे!) काही दिवसांनी भारतावर शत्रू आक्रमण करत येतो. त्यावेळी आपला नेता शत्रूला कराराचे बाड फेकून मारतो. शत्रू पळून जातो…अन्‌ भारतात करारासाठी देशभक्तीची लाट उसळते…पार्श्‍वभूमीवर गाणं वाजतंय…”साईन कर इंडिया!’ असा एखादा सिनेमा काढायला हवा. त्यामुळे गेले काही दिवस कुंद झालेले राजकीय वातावरण झटक्‍यात मोकळे होईल नाही…?

जे राजकारणात तेच साहित्याच्या बाबतीतही. एक प्रसिद्ध लेखक गेले काही दिवस पडेल कादंबऱ्या लिहित असल्यामुळे टीकेचा धनी झालाय. त्याला प्रकाशकांनीही आता वाळीत टाकलंय. तितक्‍यात या लेखकाला भेटण्यासाठी काही तरुण मुली येतात. त्या लेखकाला नवीन काही तरी लिहिण्याची गळ घालतात. लेखक महाशयही त्या प्रेमळ विनंतीला मान देतात आणि एक नवीन महाकादंबरी लिहितात. पुढे त्याच कादंबरीला नोबेल पारितोषिक मिळते. चित्रपट संपताना पार्श्‍वभूमीवर गाणं वाजतं…”लिहू दे इंडिया..लिहू दे!’
अशा रीतीने विविध क्षेत्रांमध्ये नवीन काही घडामोड घडवून आणण्यासाठी आता हे हुकमी हत्यार हातात आले आहे. त्यासाठी आपण “चक दे इंडिया’ आणि त्यांच्या “टीम’लाच धन्यवाद द्यायला नको का?

तुमची होते “आग’…आमची होते होरपळ

राम गोपाल वर्मा की आग’ अशी नावापासूनच धग जाणवणाऱ्या चित्रपटाला जाण्याचं काही कारण नव्हतं..तसंच न जाण्याचंही! आपला “लालेट्टा’ म्हणजे मोहनलाल याच्यासाठी त्यातल्या त्यात स्वस्त चित्रपटगृहामध्ये अगदी मोजक्‍या “निमंत्रितां’च्या उपस्थितीत मी हा चित्रपट पाहिला. पाहिला, असं केवळ म्हणायचं. एरवी खरे तर असा चित्रपट पाहून माझ्यासारख्याच्या डोळ्याचे पारणे फिटायला हरकत नव्हती. एकूण चित्रपट पाहून झाल्यानंतर माझं असं मत झालं, की एक विनोदी चित्रपट म्हणून उपरोक्त चित्रपट पहायला हरकत नाही. सात वर्षांपूर्वी “हेराफेरी’ या चित्रपटाच्या यशानंतर हिंदीमध्ये अचानक विनोदपटांची लाट आली. त्यात आताशा बहुतेक विनोदपटांचा ठरीव साचा झाला आहे. त्यादृष्टीने राम गोपाल वर्मा यांनी अथक प्रयत्न करून आणि तब्बल 32 वर्षांच्या अभ्यासानंतर हा एक वेगळा चित्रपट रूजू केला आहे.

बत्तीस वर्षांपूर्वी “कितने आदमी थे…’ करत पडद्यावर धुमाकूळ घालणारा एक विकृत खलनायक भारतात अवतरला. ती भूमिका साकारणारा अभिनेता समर्थ असल्याने खलनायक देशभरात लोकप्रिय झाला. त्यानंतर पडद्यावरील खलनायकाने, म्हणजेच गब्बरसिंगने ठाकूरला पीडले नसेल तेवढे गब्बरसिंगच्या नावावर अनेकांनी आम्हा चित्रपटरसिकांना पीडले आहे. वेष बदलून गब्बर अनेक चित्रपटांत येत राहिला. त्यानंतर टेपरेकॉर्डरच्या जमान्यात कॅसेटच्या रूपाने त्याचा आवाज घुमत राहिला. त्यानतंर टीव्हीच्या जमान्यात जाहिरातींत आणि विनोदाचं सोंग करणारे हास्यास्पद कार्यक्रमांचा क्रमांक आला. आता कुठे “रेडियो मिर्ची’च्या एकसुरी जाहिरीतीत गब्बरचे विडंबन केलेले संवाद ऐकू येण्याचे बंद झाले होते. मात्र त्यात रामगोपाल वर्मा नावाच्या चित्रपटक्षेत्रातील एका “डॉन’चा उदय झाला.
रामूने नंतर चित्रपटांचे असे हप्ते सुरू केले, की हिंदी चित्रपट पाहणे हाच प्रेक्षकांचा गुन्हा वाटावा. बाय द वे, रामूने त्याच्या चित्रपटनिर्मिती कंपनीचे नाव “फॅक्‍टरी’ ऐवजी “गॅंग’ ठेवायला हवे होते. दुर्दैवाने, रामूच्या अंधारलेल्या, इंग्रजी चित्रपटातील फ्रेम्स वापरून केलेल्या “पिक्‍चर्स’ना अनेकांचा तिकिटाश्रय लाभला. त्यामुळे बापाने कौतुकाने आणलेली खेळणी पोरगं ज्या हौसेनं तोडून त्याचा सत्यानाश करतं, त्याच उत्साहाने रामूने जुन्या चित्रपटांचे विचित्रपट काढण्याचा सपाटा लावला. रामूची ही टोळधाड इतरांच्या जीवावर तर उठलीच, त्याचे स्वतःचेही अपत्य या आपत्तीतून सुटले नाहीत.

रामूला चित्रपटाच्या तंत्राची फारशी माहिती नव्हती, तेव्हा त्याने “शिवा’ आणि “रात’ सारखे काही सिनेमे काढले होते. त्यातून चुकून आपलं मनोरंजन होत होतं. मात्र त्याची यत्ता वाढली. मग “शिवा’चीच एक फर्मास हिडीस आवृत्ती साहेबांनी काढली. एखाद्या चित्रपटाचं एवढं सॉलिड भजं इव्हन डेव्हिड धवनही करत नाही. (अगदी रजनीकांतच्या तमिळ “वीरा’चं त्यानं हिंदीत केलेलं “साजन चले ससुराल’सुद्धा त्यामानाने कौतुकास्पद होतं.)एका “रात’च्या विषयावर तर रामूने “भयं’कर चित्रपट काढले. मग त्याच्या चित्रपटांनी घाबरण्याऐवजी तो चित्रपट काढणार म्हटल्यावरच घाबरायला होऊ लागलं. गुन्हेगारी चित्रपटांचा खापरआजोबा “गॉडफादर’ची “फ्रेम बाय फ्रेम’ कॉपी करून गेल्या वर्षी रामूजींनी “सरकार’ नावाचा चित्रपट दिला. हुबेहूब काढल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षणीय झाला. तरीही मार्केटिंगचे हुकुमी हत्यार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरण्याचे कसब त्यांनी तेव्हा दाखविलेच.

अशात रामूने जेव्हा “शोले’चं रिमेक करण्याची घोषणा केली, त्यावेळी ठाकूर, गब्बर आणि रामपूरची ग्रामस्थ मंडळींची राखरांगोळी होणार यात शंका उरली नाही. सांगायला आनंद होतो, की राम गोपाल वर्मा यांनी मायबाप प्रेक्षकांची ही अपेक्षा पूर्ण करण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. मूळ “शोले’तील जी अजरामर (आमच्या जमान्यापुरती) पात्रे आहेत, त्यांची व्यवस्थित कत्तल करण्यात रामूजींनी आपली संपूर्ण प्रतिभा पणास लावली आहे. अगदी “शोले’च्या कलावंतांचे डुप्लिकेट घेऊन तयार केलेला (केवळ अमजद खान उर्फ गब्बरसिंग यांचा अपवाद वगळून) “रामगढ के शोले’ हा चित्रपटही “शोले’च्या विडंबनात “आग’च्या पासंगालाही पुरत नाही.

बब्बन हे रामूजींच्या ‘आग’चे मुख्य इंधन. राम गोपाल वर्मांनी स्वतःचे छायाचित्र काढावे, अशी विकृती त्याच्यात कुटून कुटून भरली आहे. कुठून कुठून सुचतं हो या माणसाला असं? अमिताभ बच्चन या अभिनयाच्या “शहेनशहा’ला अगदी अलगदपणे रामूजींनी राहुल देव किंवा मुकेश ऋषी यांच्या पंगतीत आणून बसविले आहे. यासाठी त्यांचे खास अभिनंदन! “परवाना’मध्ये अत्यंत संयमित खलनायक साकारणारा, “अक्‍स’मध्ये जगावेगळी भुमिका करणारा हाच का तो “मिलेनियम स्टार’…रजनीकांतला लोकं इतके दिवस दक्षिणेतला अमिताभ म्हणायचे…”आग’मधली अमिताभचे चाळे पाहून आता अमिताभला उत्तरेतला मिथुन म्हणू लागतील. अमिताभचे काही संवाद कानावरून जातात…म्हणजे हे संवाद ऐकण्यासाठी का होईना प्रेक्षकांनी परत थियेटरात यावे…काय आजकाल बॉलिवूडची मार्केटिंग कोणत्या थराला जाईल, याचा काही नेम नाही…

कथा, पटकथा, चित्रण, संगीत…अशा विविध घटकांची जबाबदारी रामूजींनी स्वतःवर न ठेवता इतरांनाही त्यात सहभागी करून घेतले आहे, हे त्यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याची चुणूक दाखविते. विशेषतः संवादाच्या बाबतीत त्यांनी “बॉलिवूड’ला “कंटेंपररी’ करण्याची मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे “हमें वो गलती नहीं करनी है, जो अमेरिका ने इराक में की,’ असे ज्ञानवर्धक आणि वास्तववादी संवाद इथे ऐकायला मिळतात. हीच प्रतिभा मूळच्या “शोले’ चित्रपटात असती, तर गब्बरसिंगही म्हणाला नसता का…”रामगढ अफगाणिस्तान नहीं है, जहां रूस की सेना घुस जाय…इ. इ.’ विशेष म्हणजे प्रेक्षकांना झोप येऊ नये म्हणून रामूजींनी अधूनमधून वाद्यकल्लोळाची सोयही केली आहे.

असो…मोहनलालची काही प्रेक्षणीय दृश्‍ये या चित्रपटांत आहेत. अमिताभ आणि रजनीकांत यांचे चाहते त्यांनी केलेल्या कोणत्याही कृतीला उचित ठरविण्यास सज्ज असतात. पहिल्या वर्गातील लोकांनी मला बहुमताने दुसऱ्या वर्गात ढकलले असल्याने त्यांच्यावर सूड घेण्याचा एक वेगळाच आनंद “बब्बन’ पाहताना आला…”शोले’ ही एक कायमस्वरूपी “सूड’कथा आहे ती या अर्थाने! इन्स्पेक्टर नरसिम्हा आणि बब्बन यांच्यातील वैमनस्यापासून सुरू झालेली ही आग ‘अमेरिका हो या कालिगंज…मरता आम आदमी ही है,’ असा मोलाचा संदेश देऊन संपते…ही त्यातल्या त्यात गांभीर्याने घ्यायची गोष्ट.
———–

भागो…मोहन प्यारे!

प्रिय मोहनलाल,
मल्याळम चित्रसृष्टीतील सुपरस्टार आणि प्रियदर्शनच्या भाषेत भारतातला सर्वांत नैसर्गिक अभिनय करणारा अभिनेता, अशी तुझी आतापर्यंत ख्याती ऐकून होतो. तू तीन वेळचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अशीही त्याला एक किनार होती. मात्र मुंबईच्या टोळीयुद्धावर स्वतःची उपजीविका चालविणारे राम गोपाल वर्मा यांच्या “शोले’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये तू काम करणार, ही घोषणा झाली आणि पोटात गोळा आला. ही गोष्ट माहीत झाल्यापासूनच तुझ्याविषयी सहानुभूती वाटायला लागली.

याआधी रामूच्याच “कंपनी’ नामे सिनेमात अधूनमधून बंदुकीच्या गोळ्या सुटत नाहीत, अशा तुकड्यांमध्ये तू झळकला होतास. भलेही ती भूमिका तू (नेहमी च्याच) सहजतेने जिवंत केलीस. पण यावेळी प्रकरण वेगळे होते.
तुझ्या कारकिर्दीत आजवर एकाही रिमेकमध्ये तू काम केलेले नाही, म्हणजे आता नव्हते म्हणावे लागेल. “किलुक्कम,’ “काला पानी’, “मुकुंदेट्टा सुमित्रा विळुक्कुन्नु,’ किंवा “तलवाट्टम,’ “उदयोन’ अशा चित्रपटांमध्ये एकाहून एक सरस भूमिका करणारा तू, तुझ्यावर कोणता सूड घेण्यासाठी रामूने तुला “बळीचा ठाकूर’ केले काय माहीत? अन्‌ तुलाही कोणती दुर्बुद्धी सुचली काय माहीत, तूही ती भूमिका स्वीकारली. ओणमच्या निमित्ताने “एशियानेट’वर तुझी मुलाखत चालू होती. हिंदी चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग असल्याने, त्यातून अधिक “रिस्पॉंस’ मिळत असल्याचे तू त्या मुलाखतीत सांगितले. अशा पडेल चित्रपटांमध्ये फडतूस भूमिका केल्यावर कोणता चांगला प्रेक्षक तुला अनुकूल होणार आहे, हे स्वामी अय्यप्पाच जाणो!

अरे, ती ठाकूरची भूमिका एव्हढी सोपी नव्हतीच. मुळात तू संजीवकुमारच्या तोडीस तोड अभिनय केलाही असतास, मात्र उत्तरेतील “जाणकार’ प्रेक्षकांचे त्याने समाधान झाले असते का? न्यू जर्सी किंवा टेक्‍सासच्या “ऍसेंट’मध्ये बोलणारे हिरो आम्हाला चालतात, पण आपल्याच देशातील मराठी किंवा दक्षिणी ढंगात हिंदी बोललेले चालत नाही आम्हाला. त्यामुळे तू कधीही ठाकूर होऊ शकला नसतास, याबद्दल आमच्या मनात शंका नव्हती.

त्यानंतर रामूने कधीतरी “राम गोपाल वर्मा के शोले’ नावाच्या चित्रपटाचा मुहूर्त केला. त्यावेळी अमिताभ बच्चन याच्या घेतलेल्या पहिल्या दृश्‍याचे छायाचित्र पाहिल्यावरच या “प्रोजेक्‍ट’मध्ये रामू हात पोळून घेणार हे पक्के झाले होते. त्यानंतर चित्रपटाचे नाव “आग’ करण्यात आले आणि या आगीची झळ सर्वांनाच पोचणार, याची खूणगाठ पटली. अमिताभचं काही नाही, तो अशा कित्येक आगींचे रिंगण त्याने पार केले आहे. आपण काय करत आहोत, याचं भान न ठेवता, केवळ कॅमेऱ्यासमोर येण्याचे पैसे घेऊन “डाबर अनारदाना’ पासून “रिड अँड टेलर’पर्यंत; मुलायमसिंहांच्या प्रचारसभांपासून “आयफा ऍवॉर्ड’ समारंभापर्यंत, कुठलाही प्रसंग अथवा जाहिरातची कहाणी “साठा सुफळ’ करण्यात त्याची हयात गेली. तुझं काय?

हिंदी (अन्‌ मराठीही, ते फारसे वेगळे काढणे शक्‍य नाही ) प्रेक्षकांना तुझे नाव आणि क्षमता माहितीही नाही. आता प्रियदर्शनचे चित्रपट पाहून लोकांची हसून हसून पुरेवाट होते. त्यांना काय माहीत, एकेकाळच्या तुझ्याच चित्रपटांचे हे अधिक चकचकीत रिमेकस्‌ आहेत ते? तू केलेल्या करामतीच आज अक्षयकुमार, सुनील शेट्टी आणि प्रियदर्शन कॅंपची अन्य मंडळी करतात व दुनियाभरातली तारीफ मिळवितात. तू तरी इकडच्या प्रेक्षकांपर्यंत येताना काळजी घ्यायला हवी. एकेकाळी रजनीकांतनेही मोठ्या एक्‍स्पोजरसाठी हिंदीत बाष्कळ भूमिका केल्या. त्यानंतर त्याने इथला नाद सोडला. आज तो स्वतःच्या मनाप्रमाणे काम करतो आणि इकडच्या लोकांना त्याच्या तमिळ चित्रपटाचीही दखल घ्यावी लागते.

तुझं काम अधिक अवघड करून ठेवण्यास रामू समर्थ आहेच. त्याने “शोले’चा खून, शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार एकाच वेळी करण्याची अद्‌भूत कामगिरी केलीच आहे. त्यात तुझ्यासारख्या एका चांगल्या अभिनेत्याची झालेली गोची आणि मुखभंग आमच्यासारख्यांना वेदना देतो.

त्यामुळे, आता तुला एकच सांगणे आहे…

अलम्‌ दुनियेला तू माहित झाला नाहीस, तरी चालेल. मल्याळममध्ये मनासार ख्या भूमिका कर…यशस्वी हो..अन्‌ चुकूनही मुंबईला येवू नकोस…
भागो, मोहन प्यारे…
तुझ्या अनेक प्रेक्षकांपैकी एक

मान न मान, तू मेरा सलमान!

नमस्कार,

आवाज : प्रसिद्ध आणि लोकोद्धारक अभिनेते समलान खान यांच्या कारागृह प्रवासाच्या धावत्या वर्णन ऐकणाऱ्यांचे स्वागत आहे. मी, हांजी हांजी खां आणि प्रसिद्ध चाटुकार अखंड तोंडपुजे, आम्ही तुम्हाला या जगहितकारक यात्रेचे इत्थंभूत वर्णन देण्यासाठी सज्ज आहोत. खान यांच्या या लोकविलक्षण त्यागाबद्दलची हरतऱ्हेची माहिती घेण्यासाठी आपल्याला प्रचंड उत्सुकता आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्यासाठीच आपण सध्या खान यांच्या घरासमोरील गल्लीत उभे आहोत. ते बाहेर येऊन कारागृहात प्रवेश करतील, तसतशी ताजी माहिती आम्ही देऊ. त्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही. पाहत रहा आमची वाहिनी. आता घेऊ आपण एक ब्रेक. त्यानंतर पहा आमचा वृत्तांत.

(एक ब्रेक : प्रसिद्ध “खपा बनियान -ये धोने की बात है’ यांच्या मार्फत प्रायोजित.)

चाटुकार ः ब्रेकनंतर आपले पुन्हा थेट प्रक्षेपणात स्वागत. आपण सध्या उभे आहोत समलान खान यांच्या घराबाहेरील एका गल्लीत. या गल्लीपासूनच समलान यांच्या घराच्या मुख्य दरवाजापर्यंत रस्ता जातो. याच रस्त्यावर समलान लहानपणी गोट्या खेळत होता. त्याच्या खेळादरम्यान उडालेल्या गोट्या लागून चेहऱ्यावर जखमा झालेले अनेक जण इथे आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना समलान खान आज “स्टार’ असल्याचा अभिमान आहे. यांतीलच एक आहेत हे वयोवृद्ध मामू. आपण त्यांच्याशीच बोलूया…

आप कोई याद बताएंगे? कोई ऐसी बात जो आप नहीं भूले है?

मामू : हां, जरूर याद है. समलान बचपन से बहुत शरारती था. केंचुले तो वो खेलता ही था…क्रिकेट भी कहता था. बल्ला नहीं थे तो एक-दो बार मेरे दरवाजे की बल्लिंयॉं ही तोड के ले गया. बहुत शरारती था. लेकिन मैंने उसको कभी डांटा नही, क्यों कि वो कहता, चाचा, मैं बडा होने के बाद आपको एक फ्लैट दे दूंगा. और उसने दिया भी…वो स्टार बनने के बाद जुहू में हुसेन भाई से कह के उसने एक फ्लैट मेरे बडे बेटे को दिया.

बघा, म्हणजे समलान हा किती परोपकारी आहे पहा. वयोवृद्ध मामूंना फ्लैट देणारा समलान आता जेलच्या कोठडीत किती कष्ट सहन करतो, हीच आता उत्सुकता आहे.

आताच मिळालेल्या बातमीनुसार, समलान झोपेतून उठला आहे. थोड्या वेळाने तो उठेल. त्यानंतर आंघोळ करून तो कारागृहाकडे रवाना होईल. या प्रत्येक क्षणाचे वृत्त आम्ही तुम्हाला देऊ. कुठेही जाऊ नका. आपण तोपर्यंत घेऊ एक ब्रेक…

(एक ब्रेक : आधीचेच प्रायोजक)

हांजी हांजी खां : मी उभा आहे समलान खान यांच्या बंगल्याच्या बाहेरच्या बाजूस. समलानकडे पाच कुत्रे पाळलेले आहेत. त्यातील दोन तुम्हाला या फ्रेममध्ये दिसत आहेत. याच्याच बाजूला त्यांचे टॉइलेट आणि बाथरूम आहे. सध्या समलान अंघोळ करत आहे…असा अंदाज आहे कारण आतून पाणी वाहण्याचा आवाज येत आहे. थोड्याच वेळात ते बाहेर येतील. त्यानंतर निघतील निदान काही दिवस तरी कारागृहात काढण्यासाठी…

चाटुकार : हांजी हांजी, तुला काय वाटतं…समलानचा गुन्हा त्याला झाली त्या शिक्षेएवढा गंभीर आहे का?

हांजी हांजी खां : चाटुकार, हे पहा समलानला उच्च न्यायालयाने शिक्षा दिली आहे. त्यामुळे आपण त्याबद्दल बोलणे योग्य नाही. चाटुकार, तुला माहितेय…काही वर्षांपूर्वी समलान एका जंगलात तेथील आदिवासींना कपडे आणि केक वाटायला गेला होता. त्यावेळी त्याला जंगलात एक लाकडाचे हरिण दिसले. समलानच्या खेळकर स्वभावानुसार तो त्या लाकडी हरिणाशी खेळू लागला. त्यात ते हरिण तुटले. त्यामुळे त्याला ही शिक्षा झाली नाही. कायदेतज्ज्ञांचे या शिक्षेबाबत वेगवेगळे मत आहे. मात्र, समलानच्या अनेक चित्रपटांत न्यायाधीशाची भूमिका करणारे अभिनेते मैलेश भोट यांच्या मते, ही शिक्षा फारच जास्त आहे. समलानचा स्वभाव, त्याची उदारता आणि सज्जनासारखी वागणूक पाहून त्याला सोडून द्यावे…

चाटुकार ः एक मिनट हांजी हांजी, आताच खबर आली आहे, की समलानची आंघोळ झाली आहे. त्याने पांढरी पॅंट घातली असून, बूट घालण्यासाठी पाय पुढे केला आहे. यावेळी त्याच्या घराच्या गच्चीवर सर्व नातेवाईक जमले होते. त्यांना समलानवर पुष्पवृष्टी करायची होती, मात्र जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे त्यांना ते जमले नाही. समलानने बूट घातले असून, तो तुरुंगात जाण्यापूर्वी घरातले शेवटचे जेवण घेत आहे. आपण त्याच्या मागावरच राहणार असून, कुठेही जाऊ नका…तोपर्यंत घेऊया थोडीशी विश्रांती!

(ब्रेक : प्रायोजक शामदेव मसाले…इसके बिना खाना अधूरा है!)

हांजी हांजी : नमस्कार, ब्रेकनंतर आपले स्वागत आहे. आपण पहातच आहात समलानच्या घराबाहेर किती मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. प्रत्येकाला आपल्या आवडत्या अभिनेत्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत, त्याची एकदातरी झलक पहायची आहे…समलानचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला सहा महिन्यांपूर्वी…आता त्याच्या तुरुंगात जाण्याने किमान एक वर्षभर लोकांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचे दर्शन होणार नाही. त्यामुळे आज त्यांना एकदा तरी समलानला डोळे भरून पहायचे आहे. त्यातीलच एकाशी आपण बोलूया…

आप कभी आये?

मैं तो आज ही यहां आया. अपने सम्मू भाई को जेल जाना है, ये मालूम हुआ तो वैसेईच भाग के आया.

आप क्याआ करते है?

हमारा तो साईकिल रिपेरिंग का दुकान है.

आप को क्याा लगता है, सम्मू भाई को दी गई सजा सही है?

बिलकुल गलत है जी. उनको कुछ सजा होना ही नहीं चाहिये था. अपुन के यहां कितने जानवर लोग मारते है. और यहां तो एक लकडी का हिरण टूट गया. अदालत को मंगता था तो थोडा सा फैन लेने का था. एक्टहर लोगों को जम में भेजनाईच नहीं चाहिये. हम फिर बात करते है.

आताच कळाले आहे, की समलान खान यांचे जेवण झाले आहे. जेवणात त्यांना त्यांचे आवडते मस्का-पाव आणि बकरीचे मटण दिले होते, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांचा जो जुना नोकर आहे, तुगलक, त्याच्याशी मी बोललो. त्याने सांगितले, की जेवण झाल्यानंतर समलानने दोनदा ढेकर दिला आणि एकदाच पाणी पिले.

चाटुकार : आता तुम्ही पडद्यावर पहात आहात, की समलान त्याचा छोट्या पुतण्या-भाच्यांशी भेटत आहे. तुम्हाला माहित आहे, की समलानला छोटी मुलं खूप आवडतात. त्याच्या नातेवाईकांवर त्याचे खूप प्रेम आहे. आता सहा महिने त्याला या मुलांशिवाय काढायचे आहे. त्यामुळे तो खूप इमोशनल झाल्याचे दिसत आहे. पडद्यावर अत्यंत कठोर भूमिका करणारा समलान मनातून अत्यंत हळवा आहे . त्याचे इथे प्रत्यंतर येत आहे. हांजी हांजी : आणि ती घडी आली…तुम्ही पहात आहात…अर्धा बाह्यांचा शर्ट आणि पांढरी पॅंट घातलेला समलान खान त्याच्या गाडीत बसत आहे. चाहत्यांच्या गराड्यातून वाट काढण्याचे त्याला कष्ट पडत आहे, हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे. तरीही किती शांतपणे तो मार्ग काढत आहे…जीवनातील संकटावर त्याने याच शांततेने मार्ग काढला आहे…असंच वाटत आहे जणू…अन्‌ समलानने त्याच्या गाडीच्या काचा खाली केल्या आहेत…काचा वर चढल्या तरी त्याच्या नजरा त्याच्या घरावरच टिकल्या असल्याचे जाणवत आहे…गाडी स्टार्ट झाली आहे…चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढत गाडी पुढे सरकत आहे…मुख्य रस्त्याला लागल्यानंतर गाडी डावीकडे सरकेल आणि त्यानंतर समलान खान सहा महिन्यांसाठी तुरुंगात पोचेल…मात्र तुम्ही दुसरीकडे वर जाऊ नका…मार्गावरील प्रत्येक चौकात आमचे प्रतिनिधी उभे आहेत. ते तुम्हाला खडा न खडा माहिती देतील. कुठेही जाऊ नका. फक्त थोडीशी विश्रांती…

(ब्रेक ः प्रायोजक हिरो गुंडा मोटार सायकल कंपनी)

(याहून अधिक माहिती घेण्यासाठी कृपया कोणतीही वृत्तवाहिनी पाहणे. माझ्याच्याने ते शक्यH नाही. आपण मूर्खपणाची कोणती पातळी गाठू शकतो, याची मी चाचणी घेत होतो. ही माझी हद्द आहे. तुमची?)

आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड

प्रिय बंधु आणि भगिनींनो,
आज आपण माझा “आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड’चा अध्यक्ष या नात्याने जो सत्कार करत आहात, त्याबद्दल मी मनापासून आनंद आणि आभार व्यक्त करतो. खरं तर आपण माझा हा जो गौरव करत आहात, त्यातून माझ्याबद्दल आपल्या मनात असलेला जिव्हाळा अन्‌ आपुलकीच नजरेस पडते. जागतिकीकरणाच्या रेट्यात सर्वत्र चंगळवाद आणि पैशाचीच महती असताना, केवळ जिव्हाळा आणि आपुलकीच्या जोरावर उद्योग करण्याची आणि यशस्वीही होण्याची उमेद मला आपल्यासारख्या सर्वसामान्यांमुळेच मिळाली आहे, हे मी अभिमानाने नमूद करू इच्छितो.

खरं तर एकेकाळी मीही आपल्यासारखाच साधा एक कर्मचारी होतो. महिन्याच्या महिन्याला संसाराचा गाडा रेटताना मेटाकुटीला येण्याचे प्रसंग नेहमीच यायचे. दर महिन्याला पगाराकडे डोळे लावून बसायचे आणि पगार झाला, की निरनिराळी बिले चुकवायची हा माझा शिरस्ता होता. एखाद्या पापभीरू माणसाने खोटा आळ आल्यावर अटकपूर्व जामीन मिळवावा, तसे मी पगारपूर्व बिलांची व्यवस्था करायचो. त्यावेळी दहा तारखेला माझा पगार व्यायचा आणि अकरा तारखेला माझा “मंथ एंड’ सुरू व्हायचा. जगात खर्चाचे मार्ग चोहोदिशांनी खुले होत होते आणि बचतीचे मार्ग खुंटत होते. त्यावेळी या अर्थप्रधान जीवनाला काही पर्याय आहे की नाही, हा प्रश्‍न मला पडला. त्या प्रश्‍नाला मिळालेले उत्तर आज या कंपनीच्या यशाने रूपाने आपल्यासमोर आहे.

या प्रवासाची सुरवात कशी झाली, ते येथे सांगितल्यास अप्रस्तुत ठरणार नाही. असाच एका महिन्यात पगाराची रक्कम बिलांमध्ये खर्ची पडल्यावर मी वाण्याच्या दुकानात गेलो होतो. चहासाठी घरात पावडर होते आणि साखर मात्र संपलेली होती. (जीवनातील गोडवा आधीच संपला होता, आता साखरही संपलेली होती.) दुकानदार उधारीने काही देण्याची शक्‍यता नव्हतीच. मात्र मी गरीब असल्याने माझ्याकडे प्रेम आणि करुणा खूप असल्याचे मी ओळखून होतो. त्यामुळे अत्यंत कळवळून दुकानदाराला म्हणालो, “”मालक, जरा एक किलो साखर हवी होती. माझ्याकडे आता पैसे बिल्कुल नाहीत. पण आपुलकी आणि जिव्हाळा भरपूर आहेत. तर जरा थोडासा जिव्हाळा घेऊन साखर देता का?”

मित्रहो, सांगायला खूप आनंद वाटतो. तो दुकानदार साधा किराणा दुकानदार होता. देशात अद्याप मॉलचे वारे पोचले नव्हते. त्यामुळे सौजन्य शिल्लक असलेल्या त्या दुकानदाराने मान डोलाविली आणि म्हणाला,

“साहेब, आपुलकी देत असाल तर पैशांची काय गरज आहे? अन्‌ जिव्हाळा असल्यानंतर एक काय दोन किलो साखर घ्या ना.”

हीच ती सुरवात होती. केवळ जिव्हाळा आणि आपुलकीच्या जोरावर व्यवहार करता येतो, हे मी ओळखले. त्यानंतर सिटी बस, रेल्वे, मल्टिप्लेक्‍स, हॉटेल अशा सर्व ठिकाणी मी जिव्हाळा व आपुलकीचाच वापर करून व्यवहार केला. त्यातूनच “आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड’चा जन्म झाला. कंपनीने कणाकणाने जिव्हाळा व आपुलकी जोडली व आज ती पैशांऐवजी केवळ जिव्हाळा, स्नेह आणि आपुलकीद्वारे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवनाला नवा आनंद देत आहे, याचा सर्वांनाच आनंद व्हायला हवा.

जरा आमच्या कंपनीच्या धोरणाबद्दल सांगतो. पैसा हा जगातील सर्वच संघर्षाचे मूळ असल्याचे मार्क्‍सने म्हटले आहे. (आपल्या पूर्वसुरींनी व ज्येष्ठांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करायलाच हवे, नाही का?) त्यानुसार आमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही कधीही पैशांमध्ये पगार देत नाही. पैशांमध्ये पगार दिला, की त्यांच्या अपेक्षा खूप वाढतात अन्‌ मानवाच्या जीवनातील सर्व दुःखांचे मूळ अपेक्षांमध्ये आहे, असे भगवान गौतम बुद्धांनी म्हटले आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, कर्मचाऱ्यांना पैशांऐवजी प्रेम आणि जिव्हाळा द्या. आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना सकाळी कामावर आल्यापासून घरी जाईपर्यंत आपुलकीचा वर्षाव होतो. त्यामुळे त्यांची चित्तवृत्ती तर उल्हसित राहतेच, शिवाय कार्यक्षमताही अनेक पटींनी वाढते. एवढेच नाही, तर बाहेरच्या जगातही सर्वत्र केवळ जिव्हाळा आणि आपुलकीचाच व्यवहार करण्याचीही त्यांना सवय लागली आहे. यादृष्टीने पाहिली असता, संपूर्ण जगात आता या गोष्टींचाच प्रसार होत आहे.

जे आमच्या कर्मचाऱ्यांशी, तेच आमच्या ग्राहकांशी. आज “आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड’ इतक्‍या विविध उद्योगांमध्ये आघाडीवर आहे. परंतु कुठेही आम्ही पैशांची तडजोड न करता स्नेह, जिव्हा आणि आपुलकी यांच्याच बळावर प्रगती करत आहोत. भारतातील सरकारी कार्यालयांमध्ये चालणारे अर्थपूर्ण व्यवहार जगप्रसिद्ध आहेत. मात्र तिथेही मी, माझे कर्मचारी आणि ग्राहक केवळ याच बाबींचा उपयोग करतात. बंधु-भगिनींनो, माझं आज आपल्या सर्वांपुढे एकच सांगणे आहे. पैशांचा मोह टाळा. जागतिकीकरण आणि चंगळवाद आपल्या देशासाठी चांगला नाही. केवळ स्नेह, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी याच शाश्‍वत बाबी आहेत. त्यांच्या उपयोगातून आपण नवीन, समाधानी आणि सुखी जग निर्माण करू शकतो. आपण केलेल्या या गौरवाबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो अन्‌ माझे भाषण संपवितो.

मी एक “हॅम्लेट’

टू बी ऑर नॉट टू बी’…हा चिंरतन प्रश्‍न शेक्‍सपिअर नामक नाटककाराच्या “हॅम्लेट’ या नाटकात आहे. केवळ या नाटकात आहे, असे नव्हे तर नाटकाचा नायक असलेला डेन्मार्कचा राजकुमार हॅम्लेट याच्याच तोंडी तो घातला आहे. स्वतःच्या अस्तित्वाबाबत ही प्रश्‍न पडण्याची सवय सर्वच मोठ्या माणसांना असते. तशी ती मलाही आहे. त्यामुळेच मलाही प्रश्‍न पडला आहे. पण तो जगावं की नाही, असा प्रश्‍न नाही. मी अशा किरकोळ प्रश्‍नांचा विचार करत नसतो. मला पडलेला प्रश्‍न अगदी वेगळाच आहे…”अक्षरशः’ वेगळा!

लिहावं की लिहू नये…हाच तो शाश्‍वत प्रश्‍न. हा प्रश्‍न पडण्याची कारणंही आहेत. लिहिलं तर अनेकजण दुखावतील, न लिहिलं तर अनेक दुखणी जागच्या जागी राहतील.लिहिलं तर लिहावं लागंल राम गोपाल वर्माच्या “शोले’वर आणि त्याने केलेल्या या चित्रपटाच्या विटंबनावर. अमिताभ आणि धर्मेद्रचं त्यानं काही केलं असतं, तरी चाललं असतं. पण संजीवकुमारच्या भूमिकेत मोहनलालला उभा करून दोघांचेही “कार्टून’ करण्याची कला केवळ वर्माच जाणे. हात तोडलेला ठाकूर पाहण्याऐवजी आता केवळ बोटे छाटलेला “एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ पाहावा लागेल…तेही दाढीवाला. चार राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा आणि आजपर्यंत एकाही “रिमेक’मध्ये काम केलेला मोहनलाल आता राम गोपालाच्या “काल्यात’ दिसणार.

न लिहावं तर हिमेश रेशमियाची गाणी सगळीच लोक ऐकतात म्हणून मीही ऐकत असावा, अशी लोकांची समजूत व्हायची. सानुनासिक आवाजाद्वारे कानांवर अत्याचार करण्याची किमया एकेकाळी कुमार सानू या अतिलोकप्रिय गायक महाशयांकडे होती. मात्र त्यावेळी किमान मोबाईल नामे संपर्कयंत्रावर आसमंत चिरणाऱ्या आवाजात वाद्यांचा जमेल तेवढा गोंगाट करणारे गाणे वाजविण्याची सोय नव्हती. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यांवर आणि वाहनांमध्ये तरी “सायलेंस झोन’ असायचे. मात्र सानू यांना समोर दिसत असलेली मात्र त्यांचा सूर न लागलेली, “बेसूर’तेची पातळी ओलांडून “भेसूर’ते कडे झुकलेली पट्टी लावण्याचा मान रेशमिया यांच्याकडे जातो. संगीतप्रेमी भारतात रेशमिया यांच्यामुळे संगीत कसे नसावे, याचे नवे वस्तुपाठ दिले जात आहेत.

लिहिलं तर लिहावं लागंल मराठीत दररोज प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांवर आणि न खपल्यामुळे त्यांच्या पडून असलेल्या गठ्ठ्यावर. लोकांना न परवडणाऱ्या किंमतींमध्ये पुस्तकं काढायची आणि ती कोणी घेत नाही म्हणून रडत बसायचं, ही प्रकाशकांची “स्ट्रॅटेजी’ काही औरच. मजकुराच्या दर्जाकडे न पाहता केवळ प्रसिद्ध झालेल्या नावांवर विसंबून पुस्तकं काढण्यात त्यांचा हात कोण धरणार? नव्या पुस्तकांची केवळ पाच हजारांची आवृत्ती काढून, त्याचा प्रकाशन समारंभ करण्याची हातोटी केवळ मराठी प्रकाशकांकडेच कशी काय बुवा? पुस्तकांच्या जाहिरातीही पुणे-मुंबईच्या वृत्तपत्रांमध्ये छापून मराठी वाचकं पुस्तकच वाचत नाहीत, हा “अभ्यासपूर्ण’ निष्कर्ष कोण काढणार?

न लिहावं तर मराठी वृत्तवाहिन्यांच्या गमती जमती कशा कळणार कोणाला. “डोंबिवली फास्ट’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्यावर निशिकांत कामत यांची मुलाखत घेऊन, “आता मराठी सिनेमा जागतिक पातळीवर जायला हवा,’ अशी मुलाखतीची जुनी टेप लावणारा “माझा’ चॅनेल कोणी पाहिला नाही ना? हैदराबादमध्ये घडलेल्या घटनेचे चित्रण आणि बातमी थेट हिंदी भावंड वाहिनीवरून प्रक्षेपित करणारे “24 तास’ मराठीपण जपल्याचे लोकांना कसं कळणार? दिवसभर काय घडलं यापेक्षा दिवसभरात काय घडणार, हे ग्रह-ताऱ्यांच्या गणितावरून उपग्रह वाहिन्या लोकांपर्यंत किती तत्परतेने पोचवितात, हे लिहिल्याशिवाय लोकं जाणणार तरी कसं?

लिहिलं तर लिहावं लागंल भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंड दौऱ्यात मिळालेल्या यशाबद्दल आणि त्यातून निघणाऱ्या निष्कर्षाबद्दल. देशी-परदेशी प्रशिक्षकांच्या हाताखाली खेळताना धुळधाण उडवून घेणारा हा संघ विलायतेतील दमट वातावरणात दमदारपणे खेळतोय ही आनंदाचीच गोष्ट आहे. पण प्रशिक्षक नसतानाच त्याला हा सूर का गवसावा? संघाच्या यशासाठी “कोच’ नकोच, असा गुरुपाठ तर संघ देत नाही ना?

न लिहिलं तर लपून जाईल मॉलमुळे येणारी बाजार संस्कृती आणि त्यामुळे ग्राहकांना “डिमोरलाईज’ करण्याचा दुकानदारांचा हिरावणारा हक्क. मॉल आले तर ग्राहक स्वतःच माल पाहून घेईल. “किती पाहिजे,’ म्हणून पायरी चढायच्या आतच त्याला क्षुल्लक असल्याची जाणीव करून देणाऱ्यांची ती उदात्त भूमिका जगापुढे कशी येणार? मॉलमध्ये हजार-बाराशे रुपयांची नोकरी मिळते, दुकानात सामानाची पोते उचलण्यापासून पुड्या बांधण्यापर्यंत राबवून घेऊन, आठशे-नऊशे रुपयांचा पगार देण्याची सामाजिक दानत असणाऱ्यांची बाजू पुढे कशी येणार? मॉलमध्ये एकावेळेस अनेक वस्तू असतात, दुकानात केवळ एकाच कंपनीच्या वस्तू भरून ठेवून “घ्यायती तर घ्या नाही तर जा,’ असं म्हणण्याची पारंपरिक शैली कशी जपली जाणार…
असं लिहिण्यासारखंही भरपूर आहे, अन्‌ न लिहिण्यासारखंही भरपूर आहे…पण अलिकडे भावना दुखावण्याचं प्रमाण वाढल्यामुळे काय लिहावं अन्‌ काय लिहू नये, या विवंचनेत मी पडलो आहे. त्यामुळे माझा झाला आहे “हॅम्लेट’…लिहावं की लिहू नये, हा माझा संभ्रम आहे. वाचावं की वाचू नये, हा संभ्रम तुम्हाला पडू नये, हीच अपेक्षा आहे.

मोरूचा तुरुंगवास…अन्‌ अज्ञातवासही

प्राथमिक सूचना ः सत्यघटनेवर आधारित

मोरू नेहमीप्रमाणे सकाळी झोपेतून उठला आणि आंघोळ करून तयार झाला. आज त्याला न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेप्रमाणे तुरुंगात जायचे होते. घरच्या लोकांनी त्याला निरोप देण्याची जय्यत तयारी केली होती. सोसायटीतलं एक उनाड कार्टं म्हणून त्याची शहरात ओळख होती. त्याच्या घरच्या लोकांना त्याचा कोण अभिमान! खासकरून सोसायटीचे सेक्रेटरी असलेले त्याचे बाबा तर त्याच्यावरून जीव ओवाळून टाकत असत. इतका की ते स्वतः बाबा असून ते मोरुलाच बाबा म्हणत. त्यामुळे पुढे दादा झाला तरी मोरूला सर्वजण मोरूबाबाच म्हणत.आजपर्यंत मोरूला कधी “आत” जावं लागलं नव्हतं. नाही म्हणायला “डिपार्टमेंट’नं एक दोनदा “राडा’ केल्याबद्दल त्याला उचललं होतं आणि रात्रभर “लॉक अप’मध्येही ठेवलं होते. त्यावेळी “मामू’ लोकांनी त्याची केलेली धुलाई त्याला अजून आठवत होती. एकदा तर त्याला पाकिटमारीबद्दल सात दिवस कस्टडीतही ठेवलं होतं. त्याच्या बाबा, आई आणि बहिणीने त्यावेळी आकाशपाताळ एक करून त्याला ठाण्याबाहेर (आणि माणसांतही) आणलं होतं. आई-बाबांची परवानगी न घेता तेव्हा महाग असलेली कॅडबरी खाण्याबद्दल आणि कॅडबरी विकत घेण्यासाठी बाबांचे पैसे चोरल्याबद्दल त्याला एक दोनदा शिक्षा झाली होती. त्याची चॉकलेटची सवय सुटण्यासाठी त्याला काही दिवस दवाखान्यातही ठेवलं होतं.

त्यानंतर काही दिवस मोरूबाबा सुधारला. शहरातल्या त्याच्यासारख्याच लोकांनी चालविलेल्या नाटकमंडळीत तो काम करत होता. त्याला कामेही मिळत गेली. त्यामुळे तो लोकप्रिय असल्याचे मानण्यात येत असे. असा हा मोरूबाबा आज तुरुंगात खडी फोडायला पहिल्यांदाच जात होता. नाटकमंडळीतले काही दोस्त आणि त्याच्या सोसायटीतील टोळीतील काही मित्र यांच्या सौजन्याने त्याने काही फटाके आणले होते. त्यातील सुतळी बॉंब, रॉकेट वगैरे त्याने बिचाऱ्याने उदार मनाने मित्रांना वाटली आणि एक पिस्तूल तेवढे स्वतःजवळ ठेवले. नेमके त्याच्या मित्रांनी उडविलेल्या फटाक्‍यांनी सोसायटीतल्याच काही लोकांना इजा झाली, काही जणांच्या घरातील पडदे जळाले. त्यांनी दुष्टपणे मोरूला त्यात गोवून न्यायालयात गोवले. न्यायालयानेही फारशी दयाबुद्धी न दाखवता त्याला तुरुंगात धाडण्याचा निर्णय दिला. तो निकाल लागता लागताच मोरूचे बाबा ही कालवश झाले.

तुरुंगाच्या मोहिमेवर निघालेल्या मोरूच्या हातावर त्याच्या बहिणीने साखर ठेवली. बाबांच्या तसविरीजवळ जाऊन त्याने तसविरीला नमस्कार केला. पोलिसांच्या गाडीतून मोरू रवाना झाला तेव्हा त्याच्या जीवलगांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. मोरूच्या जीवनातील इथपर्यंतच्या घटना कायद्याच्या आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने सामान्य आहेत. त्याने गुन्हा केला आणि त्याची शिक्षा त्याला व्हायलाच हवी, याबाबत सर्वांचे एकमत होते. मात्र खरी मजा पुढेच आहे. मोरूला तुरुंगात ठेवले मात्र त्याला कोणत्या तुरुंगात ठेवले, त्याने दरवाजातून कोणता पाय आधी पुढे ठेवला याची कोणीही बातमी दिली नाही. जाताना तुरुंगाच्या रखवालदाराला त्याने बिडी मागितली की नाही, याची चर्चाच झाली नाही. तुरुंगात मोरूला त्याच्यासारख्याच एका सच्छील चारित्र्याच्या सज्जन पुरुषाच्या संगतीत ठेवले होते. त्याबद्दल कोणीही चकार शब्द काढला नाही. तुरुंगात जाताना मोरूने आपल्या चाहत्यांकडे (आणि त्याला पैसे पुरविणाऱ्यांकडे) पाहून हातही हलविला नाही. (त्यामुळे त्यांना हात हलवत परत यावे लागले.) मोरूला मुख्य तुरुंगातून केवळ महनीय व्यक्तींना ठेवण्यात येणाऱ्या “पुण्यनगरीत’ पाठविण्यात आले. त्यावेळी त्याच्यामागे शिकारी कुत्र्यांप्रमाणे एकही वार्ताहर, माध्यम प्रतिनिधी किंवा कॅमेरामन गेला नाही. मोरू ज्या किरकोळ कॅटॅगिरीतला गुन्हेगार होता, त्या कॅटॅगिरीच्या मानाने ही वस्तुस्थिती भयंकर होती.

पुण्यक्षेत्रातल्या तुरुंगात आल्यानंतरही मोरूकडे होणारी अक्षम्य हेळसांड चालूच होती. इथे आल्यानंतर त्याने किती वाजून किती मिनिटांनी कोठडीचे दार उघडले, फरशीवर बसताना त्याच्या तोंडातून कण्हण्याचा आवाज कसा येत होता, याची दखल कोणीही घेत नव्हतं. त्याने काय खाल्लं, पोळीचे किती तुकडे करून त्याने किती घास खाल्ले याचीही गणनाच कोणीच करत नव्हतं. भावी पिढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी ही ऐतिहासिक माहिती देण्याची तसदी घ्यायला कोणीही तयार नव्हतं. हीच ती भारतीय लोकांची मागास मानसिकता.

आता मोरूला याच तुरुंगात काही दिवस काढायचेत. पण इतके दिवस रात्रीच्या रात्री नाटकं करून त्याच्या प्रकृतीवर परिणाम झालेला अन्‌ त्यात हा तुरुंगवास, त्यामुळे त्याचा रक्तदाब वाढला. याची कोणीतरी नोंद घ्यायची? तर तेही नाही. मोरूला तुरुंगातल्याच डॉक्‍टरकडून उपचार चालू आहेत. हे वृत्त बाहेरच्या लोकांना समजायला नको? आता मोरूकडे होणाऱ्या या अमानवी दुर्लक्षामुळे त्याच्या नाजूक जिवाला किती यातना होतायत, याची तुम्ही कल्पना करू शकता. तरीही तुम्हाला म्हणून सांगतो, तो आल्यावर याचा जाब विचारणार नाही. कारण आता तो तुरुंगात महात्मा गांधींच्या साहित्याचे परिविलोकन करतोय. हेही लोकांना कळायलाच हवं. त्याशिवाय त्याचा गुन्हा किती “मामू’ली होता, हे स्पष्ट होणार नाही. तो परत येणार. आतापर्यंत त्याने अनेक खोड्या केल्या. शाळेत, कॉलेजमध्ये (होता तितके दिवस), सोसायटीत…प्रत्येक खोडीनंतर त्याने मनापासून सर्वांची माफी मागितली आणि “जादू की झप्पी’ देऊन सर्वांना खूषही केले. आताही तो असेच करणार आहे. फक्त त्याच्याकडे अगदी ढुंकूनही न पाहणाऱ्या या लोकांकडे पाहून तो म्हणेल, “”हे राम!”

राष्ट्रपती माझ्यासाठी

सेतु हिमाचल पसरलेल्या या देशात दर पाच वर्षांनी येणारा हृदयंगम सोहळ्याचा योग यंदाही आला. देशाच्या राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जागी प्रतिभा पाटील निवडून आल्या आणि भारतात स्त्रीशक्तीची पहाट होत असल्याची सर्वांना जाणीव झाली. बाकी, एका ब्रह्मचाऱ्याने पाच वर्षे राष्ट्रप्रमुखपदी काढल्यानंतर त्याच पदावर एका महिलेची “नेमणूक’ व्हावी, यालाच कदाचित “काव्यात्म न्याय’ म्हणत असावेत. तिरुवळ्ळूवर यांनी याबाबत काही कविता केल्या आहेत का, याची माहिती घ्यावी म्हणतो. कलाम यांनाच त्याबाबत विचारावे लागेल.

कलाम यांनी जाताना आपल्या केवळ दोन सुटकेस नेल्या, अशी एक बातमी कुठंतरी वाचनात आली. देशाच्या राजकारण्यांपेक्षा ही कृती खूपच वेगळी असल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे. मला हे मान्य नाही. या देशातले जवळजवळ सर्व राजकारणी सुटकेसच सोबत नेतात आणि घेऊन जातातही. फरक एवढाच आहे, की कलाम यांनी त्या सुटकेसमध्ये आपले जीवनावश्‍यक सामानच नेले. अन्य राजकारणी मात्र सुटकेसमध्ये काय काय नेतील, हे त्यांना स्वतःला सांगता येणार नाही. निरनिराळ्या न्यायालयांमध्ये चालू असलेल्या “केस’मध्ये या नेत्यांनी दिलेल्या साक्षींवरूनच वरील विधान केले आहे, हे सूज्ञांस सांगायला नको. (पण इतरांना सांगावे लागते, म्हणून लिहिले.)

बाकी कलाम यांना राष्ट्रपती भवनातून एकही वस्तू सोबत न्यावी वाटली नाही, यामागे त्यांच्या मोहत्यागा एवढेच धैर्यही मानलेच पाहिजे. अन्‌ माझं म्हणणं असं, की असं धैर्य आणि निरीच्छपणा अविवाहित राहिल्याशिवाय येणे शक्‍य नाही. कल्पना करा, अन्नामलाई विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तास घेतल्यानंतर कलाम मास्तर घरी आले आहेत. ते पाय धुवून चहा घेतात एवढ्यात मिसेस कलाम त्यांच्याजवळ येऊन म्हणतात, “”काय तुम्ही, “रायसीना हिल्स’च्या प्रासादातून काहीच घेऊन नाही आलात. बुश भारतात आले होते तेव्हा त्यांनी किती भेटवस्तू आणल्या होत्या. त्या तुम्ही तिथेच ठेवल्या. दुसऱ्या नेत्यांना पहा, आपल्या तर आपल्या इतरांच्या भेटवस्तूही ते घरी घेऊन जातात. “डीआरडीओ’त असल्यापासून तुमचं नेहमी असंच. एक गोष्ट घ्याल तर कसम!” वगैरे वगैरे. आता हे भाषण ऐकल्यानंतर माजी राष्ट्रपती काय अन्‌ नुसता पती काय, वैतागणार नाही? तो वस्तूच नेणारच! मात्र कलाम यांना हा त्रास नाही. त्यामुळेच ते केवळ दोन सुटकेस (आपल्याच सामानाच्या) घेऊन घरी जाते झाले.

पाच वर्षांपूर्वी जेवढे सामान घेऊन कलाम आले, तेवढेच सामान घेऊन ते घरी गेले असंही काही जणांनी सांगितलं. (वृत्तवाहिन्यांनी या घटनेचे ज्याप्रकारे कव्हरेज दिलं, त्यात कलाम पाच वर्षांपूर्वी केसांच्या किती बटा घेऊन आले आणि जाताना त्यांच्या डोक्‍यावर बटा होत्या, हे कोणीच कसं सांगितलं नाही या आश्‍चर्यातून मी अजूनही सावरलेलो नाही.) येताना त्यांनी आणलेलेच सामान तर परत नेलं नाही ना, हेही चेक करायला पाहिजे.

कलाम चाचांचं मला एक बरं आवडायचं. ते मुलांना मूलच रहा, असं म्हणत. त्यांना मुलं खूप आवडत आणि मला मूल व्हायला खूप आवडतं. मूल झालं की काय टेंशन नाही…नोकरीची चिंता नाही, नोकरी मिळाली की बॉसची हांजी हांजी नाही…सर्व सव्यापसव्य सांभाळून पगार वाढण्याचीही काळजी नाही…एरवी जाताना कलाम जे बोलले तेही आपल्याला आवडले. जनतेचा सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती जातानाही चांगली प्रतिमा मनात ठेवून गेला.

कलाम यांची प्रतिमा जेवढी उत्कट तेवढीच आता नव्या राष्ट्रपतींची प्रतिभाही “फोकस’चाच विषय ठरणार आहे. त्या महाराष्ट्राच्या आहेत म्हणून मला त्यांच्याबद्दल अगत्य आहे, अशातला भाग नाही. (मी स्वतः कितपत महाराष्ट्रीय आहे, अशी साधार शंका घेणारे कमी नाहीत.) त्यांच्याबद्दल अगत्य असण्याचे कारण वेगळेच आहे. शपथ घेतल्यानंतर त्यांनी जे पहिले भाषण केले, त्यात त्यांनी माझा उल्ल्लेख केल्याबद्दल मला अगदी भरून आलं.

तुम्हाला आढळलं की नाही माझं नाव? काय म्हणता, नाही आढळलं. अहो, असं काय करता…त्या काय म्हणाल्या सांगा बघू…”जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले…’ आता सांगा राव, माझी ओळख पटण्यासाठी तुम्हाला आणखी कोणती खूण सांगू. कलाम भलेही लोकप्रिय राष्ट्रपती असतील, पण माझा जाहीर उल्ल्लेख करणाऱ्या प्रतिभाताई पाटील याच खऱ्या माझ्या राष्ट्रपती आहेत. माझ्यापेक्षा रंजलेला, गांजलेला माणूस या अलम्‌ भारतात आणखी कोण असेल…बाकी सर्व गोष्टी जाऊ द्या…हा ब्लॉग लिहिल्यावर तो वाचून कोणी कॉमेंटही टाकत नाही…

अशा या पामर माणसाला आपलं म्हणणारी व्यक्ती आता देशाच्या सर्वोच्च्चपदी गेली आहे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. प्रतिभाताईंनी तुकारामाचा अभंग म्हटला, हीही तर खरेच आनंदाची गोष्ट आहे. त्यांची माझ्याबद्दलची आपुलकी कायम राहावी, यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन. मी नेहमी रंजला-गांजला राहीन, कारण…तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे,
ठेविले अनंते तैसेचि रहावे
असू द्यावे चित्ती समाधान…

मी एक “एसएमएस्शाह’

मी या जगात आलो तेव्हापासून हे जग सुधारण्याची मला तीव्र तळमळ होती. मात्र काय करणार, एक सामान्य माणूस म्हणून माझ्या हातात काही शस्त्र नव्हते. त्यामुळे “उद्धवा, अजब तुझे सरकार’ असे गात (मनातल्या मनात) मला रहावे लागत असे. मात्र पाच वर्षांपूर्वी या भारतवर्षात वृत्तवाहिन्यांनी “संभवामि युगे युगे’ करत अवतार घेतला आणि समस्त “विनाशायच दुष्कृतां’ होऊ लागले. तरीही काहीतरी उणं असल्याची जाणीव मनाला बोचत होती. त्या विनाशाच्या कामात आपला खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळत नव्हती. त्यामुळे रुखरुख लागून राहिली होती. मात्र दोन वर्षांपूर्वी देशात मोबाईल क्रांती होऊ लागली. या मोबाईल क्रांतीने स्वतःची पिल्ले खाण्याऐवजी वेगळ्या पिल्लांना जन्म दिला. त्यातून संवादाचे पूल उभारले जाऊ लागले. त्यातच आमच्या हाती एक अजब उपकरण आले, त्याचा उपयोग आम्ही कधी शस्त्र तर कधी साधन म्हणून करू लागलो. ते शस्त्र म्हणजे एसएमएस.
या साधनाने मी या जगात एवढी उलथापालथ केली आहे, जगाचा एवढा चेहरामोहरा बदलला आहे, की मला आता लोकांनी “एसएमएस्शाह’ (शहेनशहाच्या धर्तीवर) म्हणायला हरकत नाही.या जगातील विषमता, अज्ञान, अन्याय वगैरे निरनिराळे दुर्गुण पाहून पूर्वी मला चीड यायची. आता मात्र मी मोबाईलच्या काही कळा दाबून जगाची ही अवकळा बदलू शकतो. मी एक एसएमएस करायचा अवकाश, या जगात जे काही उदात्त, मंगल वगैरे व्हायचे असेल ते घडू शकते. देशाच्या राष्ट्रपतीपदी प्रतिभाताई पाटील याच निवडून याव्यात, असे मत मी तीन वाहिन्यांना एसएमएसद्वारे पाठविले होते. आज बघा, त्या निवडून आल्या आहेत. तेही प्रचंड मतांनी. मी एकच एसएमएस केला असता तर त्या साध्या निवडून आल्या असत्या. भारतात अतिवृष्टीचे प्रमाण ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेल्या हवामानातील बदलांमुळेच वाढले आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कमी व्हायला पाहिजे, असे मत मी एका हिंदी वाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमानंतर एसएमएसद्वारे नोंदविले होते. त्याचा परिणाम म्हणून तापमानवाढही कमी झाली आणि त्यामुळे अतिवृष्टीही कमी झाली. माझ्या एसएमएसमुळेच हा क्रांतीकारी परिणाम झाला.
एकदा आम्ही कुटुंबासह भाजी खरेदी करून घरी परतत होतो. त्या दिवशी भोपळा दोन रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे एकदम पाच किलो विकत घेतले होते. रस्त्यातच एका दुकानात अमेरिकी सैनिकांना इराकमधून परत बोलाविण्याबद्दल सिनेटमध्ये चाललेल्या चर्चेची बातमी दाखवत होते. लगेच घरी येताच आधी ती वाहिनी लावली. त्यानंतर केला एक एसएमएस…‘इराकमध्ये अमेरिकी साम्राज्यवादी धोरणांची हद्द झाली असून, अमेरिकी सैन्य परत आलेच पाहिजे.’ गंमत बघा, दुसऱ्याच दिवशी इराकमधील अमेरिकी सैनिकांसाठी निधी वाढविण्यास सिनेटने नकार दिला.
संपूर्ण जंबुद्वीपाच्या (भारताचे प्राचीन नाव हो. “इंडियन सबकॉन्टिनंट’ची एकात्मता दर्शविण्यासाठी हेच नाव पाहिजे) जनतेप्रमाणे क्रिकेट हा माझाही जन्मसिद्ध हक्क आहे. क्रिकेट हा खेळण्यासाठी नसून, आपली तज्ज्ञ मतं व्यक्त करण्यासाठी केलेली सोय आहे, यावरही माझी इतरांपेक्षा अंमळ जास्तच श्रद्धा आहे. त्यामुळे त्याच श्रद्धेचे प्रतिबिंब एसएमएसमधूनही पडायला नको? त्यामुळेच विविध वाहिन्यांवर क्रिकेटची कॉमेंटरी कमी पडेल एवढे एसएमएस मी केले. त्याचा परिणामही भारतीय संघाच्या कामगिरीवर पडलेला दिसला. संघाची तयारी कमी आहे, असा एसएमएस मी संघ वेस्ट इंडिजला जाण्यापूर्वीच केला होता. त्यानंतर विश्‍वचषक स्पर्धेत संघाची झालेली वाताहात सर्वांच्या समोर आहे. या पराभवातूनही संघ सावरेल, असा एसएमएस मी एका वाहिनीला केला होता. त्यानंतर भारतीय संघाने बांगलादेशमध्ये विजय मिळविला, दक्षिण आफ्रिकेतही चांगली कामगिरी केली.
एसएमएस बाबत मी एवढा तज्ज्ञ झाल्यामुळे माझा आत्मविश्‍वास चांगलाच वाढला आहे. मात्र त्याचा मला कधी कधी अवचित फटका बसतो. एक हिंदी वृत्तवाहिनी एका प्रेमप्रकरणाचा “आँखो देखा हाल’ प्रसारीत करत होती. त्यावर प्रथेप्रमाणे प्रतिक्रियांचे एसएमएसही मागविले होते. मीही अशा बाबती मागे राहतो काय? मीही एसएमएस केला. “प्रेमप्रकरण ही काळाची गरज असून, प्रत्येकाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे,’ अशा आशयाचा एसएमएस मी केला होता. कसा माहित नाही, तो एसएमएस जायच्या जागी न जाता वाट चुकला आणि वाहिनीऐवजी एका “वहिनी’च्या मोबाईलवर पोचला. त्यानंतर माझे हाल येथे सांगण्यासारखे नाहीत. मात्र जगाच्या सुधारणेचा वसा घेतलेला असल्याने आणि एसएमएस या माध्यमावर माझी नितांत श्रद्धा असल्याने अशा क्षुल्लक प्रकारांनी विचलीत होणाऱ्यांपैकी मी नाही.
या जगात सर्व तऱ्हेचे परिवर्तन मी एसएमएसच्या माध्यमातून करू शकेन, याचा मला विश्‍वास आहे. तुमच्या गल्लीतील रस्त्यावर खड्डा पडला आहे? राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास नकार दिला आहे? केंद्रातील मंत्रिमंडळातून एखाद्या मंत्र्याला काढावे, असे तुम्हाला वाटते? आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळावा, असे तुम्हाला वाटते? जगात सगळीकडे दहशतवाद आणि अशांतता पसरली असून, केवळ भारतीय संस्कृतीच ही परिस्थिती बदलू शकते, असे तुम्हाला वाटते?आधुनिक विज्ञानाचा अध्यात्माशी आणि शिक्षणाचा अज्ञानाशी मेळ घालायला हवा, असे तुम्हाला वाटते? ईश्‍वर हा एखादा करबुडवा सरकारी कर्मचारी असून, त्याला रिटायर करायला हवे, असे तुम्हाला वाटते? तुम्हाला काहीही वाटत नसलं तरी तुमचे नाव सगळीकडे पोचायला पाहिजे, असे तुम्हाला वाटते?
प्रश्‍न अनेक, उत्तर मात्र एक आणि एकच! एसएमएस!!!
सर्व समस्यांवर रामबाण उपाय. हे विश्‍व घडविणाऱ्या ब्रह्मदेवालाही एवढ्या घडामोडींवर मार्ग काढणारा आणि घडामोड करणारा एसएमएस घडविता आला नाही. आधुनिक विज्ञानाने हे साधन शोधून या जगात सर्व विषयांत तज्ज्ञ असलेल्यांची एक नवी जमात निर्माण केली आहे. त्याबद्दल विज्ञानाचे आभार आणि तुम्हाला काय वाटतं, एसएमएस हे खरंच क्रांतीकारी साधन आहे का. तुमची मतं जरूर एसएमएसने कळवा हं.

वाह ताज!

ताज महल हे जगाचे अद्‌भूत आश्‍चर्य असल्याचे आज आम्हाला समजले. ही बातमी अशा धक्कादायक रितीने आमच्यासमोर आली, की ताज महल भारताचे एक मोठे आकर्षण आहे, हे इतके दिवस माहित असल्याबद्दल आमची आम्हालाच लाज वाटायला लागली. त्यात वोटिंगचा मामला असल्याने तर आमची फारच गोची झाली. काय आहे माहितंय का, आम्हाला स्वतःला कधीही मत नसतं. मनुने जे स्त्रियांच्या बाबतीत सांगितलंय, त्यात आम्ही किंचित फेरफार करून तेच सूत्र घेऊन जगतोय.

काय सांगितलं मनुनं?
स्त्रीने लहानपणी वडिलांची, तरुणपणी पतीची आणि मोठेपणी मुलाच्या आज्ञेत रहावे.

आम्ही काय करतो?

लहानपणी कॉप्या पुरविणाऱ्या शिक्षकांचे, मोठेपणी परमदयाळू साहेबांचे आणि म्हातारपणी…अद्याप ती वेळ आलेली नाही, मात्र आम्हाला माहितेय जगाला काहीतरी शिकविणारी कोणाचीतरी भाषणे ऐकण्यातच आमचे जीवन खर्च व्हायचे! तर, अशा या परिस्थितीत ताजला सात आश्‍चर्यांमध्ये समाविष्ट करण्यासाठी वोटिंगची वेळ आली, अन्‌ आमच्यासमोर धर्मसंकटच उभे राहिले. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी आम्हाला एका ऐतिहासिक वास्तूसाठी साद घालत होते. नाही म्हणायला शाळेत इतिहासाचा वर्ग चालू असताना बाहेरच्या मित्रांनी घातलेली साद ऐकून अनेकदा शिक्षकांनी आमचे कान पिरगाळले. (बळी तो कान पिळी! ही म्हण आम्ही तेव्हाच शिकलो.) ताज जहांगीरने बांधला, की शहाजहांने हेही, देवाशप्पथ सांगतो, आम्हाला माहित नव्हते. घरातली मोरी तुटली ती बांधण्यासाठी सहा महिने झाले बायको शिव्या घालते, आम्ही मरायला कशाला शाहजहांच्या इमारतीची चांभार चौकशी करायला जातो.
मात्र गेल्या आठवड्यात आक्रितच घडले आणि ताजची सगळी जातकुळी आम्हाला टीव्हीवाल्यांनी कळविली. इतके दिवस आम्हाला आपलं माहित होतं, की पिक्‍चरमध्ये गाण्यांमध्ये हिरो-हिरोईनला नाचण्यासाठी ही जागा चांगली असते. तेव्हा आम्हाला ताजची एव्हढी “हिस्टरी’ कळाल्यानंतर वोटिंगचा प्रश्‍न आला. आम्हीही बेलाशक वोटिंग केलं. भारताच्या पर्यटनमंत्र्यांचाच आदेश होता. (आम्ही मात्र त्यांच्या नव्हे; तर आमच्या गृहमंत्र्यांच्या आदेशावरून वोटिंग केलं. कायंय, दिवसभर घरात बसून “न्यूज चॅनेल्स’ त्याच पाहत असतात! त्यामुळे त्यांचं जनरल नॉलेज आमच्यापेक्षा चांगलं आहे, असं आमच्या आळीतील प्रतिष्ठित नागरिकांपासून पेठांमधील दुकानदारांपर्यंत सर्वांचे एकमत आहे.) तर, मोबाईल आणि इंटरनेट मार्फत वोटिंग केल्यानंतर ताज हाच जगातील एकमेव आश्‍चर्य असल्याचं आमचं ठाम मत बनलं. त्यामागची कारणं शोधू जाता आमच्या मेंदूला आलेल्या झिणझिण्यांमधून काढलेले काही निष्कर्ष असेः

n शाहजहांच्या काळात सहा सहा हजारांच्या साड्या घातलेल्या बायांचे “सांगोपांग’ दर्शन घडविणारे टीव्ही, वेशीवर चाललेल्या गंमती सोडून वॉशिंग्टनमध्ये चाललेल्या भानगडी छापणारी वर्तमानपत्रे अशी प्रबोधनात्मक माध्यमे, हवा तो “कॉल’ येण्याऐवजी “अमिताभ के छिंकने का डायलर टोन बिठाना है?’ असे नम्रपणे विचारणाऱ्या मोबाईल कंपन्या असं काहीही नव्हतं. थोडक्‍यात सांगायचं तर शाहजहां हा “पगारी बेरोजगार’ होता. त्यामुळे वेळ घालविण्यासाठी त्याने हे एवढे मोठे बांधकाम केले असण्याची शक्‍यता जास्त आहे.

n बायको मेली म्हणून तिच्या स्मृत्यर्थ शाहजहांने ही इमारत बांधली, हे अर्धसत्य आहे. अहो, मला सांगा, तरुण वयात..अन्‌ तेही एखाद्या राजाच्या…बायकोची कटकट त्याच्यामागून जाते ही त्या राजाला केवढी आनंदाची गोष्ट. या आनंदामुळेच त्याने हर्षवायू होऊन इमारत बांधायला घेतली असेल. तेव्हाच्या इंजिनियर, कंत्राटदार आणि मजुरांनीही “बरीय आपली रोजगार हमी योजना,’ म्हणून त्यात आनंदाने भाग घेतला असावा.

n उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या जन्मी शाहजहांला मोठे कर्ज दिले असावे. त्याची परतफेड करण्यासाठी व या जन्मी अधिकाऱ्यांचे दुकान चालविण्यासाठी शाहजहांला “कबर’ कसावी लागली असेल.

n बांधकाम व्यावसायिकांचे यमुनेवर अतिक्रमण होऊ नये, म्हणूनही त्याने ही अफलातून इमारत बांधली असण्याची शक्‍यता आहे. प्लॅन मंजूर करून घेणे, मोजमाप करणे, वीट-सिमेंटच्या खर्चाची फिकीर न करता बांधकाम करायचेच असेल, तर आतापर्यंतही आम्हीही दोन घरे बांधली असती.

n ऍक्‍चुअली शाहजहांला साखर कारखाना काढायचा होता. त्यासाठी मुमताज महलच्या नावावर एक सहकारी संस्थाही त्याने स्थापन केली होती. मात्र अवधच्या नबाबाचाही एक साखर कारखाना असल्यामुळे आणि त्याच्याच साखरेला उठाव नसल्यामुळे (याबाबतच्या हकीगती त्याने महाराष्ट्रातील आपल्या वकिलांमार्फत इकडच्या स्वारींकडे पाठविल्या होत्या. त्यातील कागदं अजूनही भारत इतिहास संशोधन मंडळाच्या शेजारच्या मिसळीच्या दुकानात क्वचित मिळतात. ज्यादिवशी मिसळ कमी तिखट लागेल, त्यादिवशी नेमकं समजावं, की हा कागद “त्या’ साखरेच्या बखरीतला आहे. असो.) शाहजहांला कारखाना काही थाटता आला नाही. मात्र त्यादरम्यान मुमताजचेच निधन झाले. त्यामुळे नबाबाला आणखी अपशकून करण्यासाठी त्याने तिथे मुमताजची कबरच स्थापन केली.ताजची खरी स्टोरी काही आम्हाला माहित नाही. ती माहित करून घेण्याची इच्छाही नाही. काही लोक तर म्हणतात, की ताजच्या नावावर धंदा करण्यासाठीच ही मोहीम काही जणांनी काढली आहे. पहा रेमो काय म्हणतो.
आम्ही वर सांगितल्याप्रमाणे आम्हाला स्वतःला काही मतच नाही. त्यामुळे खरं काय ते आपण कसं सांगणार? मात्र अंतराळातील सगळ्या ग्रह-गोल आणि आकाशगंगांपेक्षाही दाटीवाटीने वसलेल्या आमच्या देशात, घरातून बाहेर पडून दुकानापर्यंत पोचेपर्यंत वस्तुंच्या किमती वाढणाऱ्या आमच्या देशात, दरसाल दरशेकडाच्या हिशोबाने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या या देशात, काहींना उंची पगार आणि सोयी; तर काहींना न मागता सगळं मिळतानाही “संयम पाळा’ म्हणून तरुणांना शिकविणाऱ्यांच्या या देशात, क्षणाक्षणाला माती, पाणी आणि वायुचे प्रदूषण करून येणाऱ्या पिढीला जगणे अशक्‍य करणाऱ्यांच्या या देशात…अजूनही जीवनावर प्रेम करत जगणाऱ्या सामान्य माणसांचा समावेश जगाच्या आश्‍चर्यामध्ये कधी होणार?
———-

ताज महल

ताज तेरे लिये इक मज़हर-ए-उल्फ़त ही सही तुम को इस वादी-ए-रंगीं से अक़ीदत ही सही
मेरे महबूब कहीं और मिला कर मुझ से!

बज़्म-ए-शाही में ग़रीबों का गुज़र क्या मानी सब्त जिस राह पे हों सतवत-ए-शाही के निशाँ उस पे उल्फ़त भरी रूहों का सफ़र क्या मानी

मेरी महबूब पस-ए-पर्दा-ए-तशीर-ए-वफ़ा तू ने सतवत के निशानों को तो देखा होता मुर्दा शाहों के मक़ाबिर से बहलेवाली अपने तारीक मकानों को तो देखा होता

अनगिनत लोगों ने दुनिया में मुहब्बत की है कौन कहता है कि सादिक़ न थे जज़्बे उन के लेकिन उन के लिये तषीर का सामान नहीं क्यूँ के वो लोग भी अपनी ही तरह मुफ़लिस थे v
ये इमारात-ओ-मक़ाबिर ये फ़सीलें, ये हिसार मुतल-क़ुल्हुक्म शहनशाहों की अज़मत के सुतूँ दामन-ए-दहर पे उस रंग की गुलकारी है जिस में शामिल है तेरे और मेरे अजदाद का ख़ूँ

मेरी महबूब! उन्हें भी तो मुहब्बत होगी जिनकी सन्नाई ने बख़्शी है इसे शक्ल-ए-जमील उन के प्यारों के मक़ाबिर रहे बेनाम-ओ-नमूद आज तक उन पे जलाई न किसी ने क़ंदील

ये चमनज़ार ये जमुना का किनारा ये महल ये मुनक़्क़श दर-ओ-दीवार, ये महराब ये ताक़ इक शहनशाह ने दौलत का सहारा ले कर हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक
मेरे महबूब कहीं और मिला कर मुझसे!

मरहूम शायर साहिर लुधियानवी यांची ही नज़्म. उम्मीद है सबको समझ आयेगी!