प्रश्न लोकशाहीच्या विश्वासार्हतेचा

भारतात आपण अनेक गोष्टी स्वाभाविक मानलेल्या असतात. त्यात विविध पातळींवरील निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा उपयोग हीही एक गोष्ट आहे. अगदी ग्रामपंचायतींच्या पातळीवरही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर आपण आता गृहित धरलेला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या दृष्टीने ते योग्यही आहे. लोकशाहीच्या बाबतीत भारताला तोडीस तोड आणि अन्य सर्व बाबतींत जगात सर्वांनाच वरचढ अशा अमेरिकेत मात्र याच प्रश्नावरून संभ्रम आहे. वॉईस ऑफ अमेरिकेच्या एका वृत्तांकनात नुकतीच या विषयाची चर्चा वाचनात आली.
सात वर्षांपूर्वी अमेरिकेच्या इतिहासात अभूतपूर्व अशा निवडणुकीच्या गोंधळाला सामोरे गेल्यानंतर त्या देशातील (म्हणजे राज्यांच्या संघाने) कागदी मतपत्रिकांऐवजी यंत्रांचा आधार घेण्याचा निर्णय घेतला. आता चार वर्षांनंतर पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला तोंड देताना मात्र अमेरिकेसमोर या मतदान यंत्रांच्याही विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भारत आणि अमेरिकेतील मतदान यंत्रांच्या स्वरूपात काही मूलभूत स्वरूपाचे फरक आहेत. भारतातील मतदार यंत्रांवरील बटन दाबून उमेदवारांची निवड करतात. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने आणि उमेदवारांच्या नावापेक्षा त्यांच्या निवडणूक चिन्हाला अधिक महत्त्व असल्याने ही व्यवस्था सोयीची ठरते. अमेरिकेत मात्र उमेदवारांची संख्या अत्यंत मर्यादीत असल्याने, तसेच मतदार तुलनात्मकदृष्ट्या सुशिक्षित असल्याने मतदानासाठी ‘टच स्क्रीन’ यंत्रे असतात.
नेमक्या या यंत्रांच्याच त्रुटीबद्दल आणि परिणामतः निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबद्दल अमेरिकी तज्ज्ञांनीच शंका घ्यायला सुरवात केली आहे. यंत्रात नोंदल्या जाणाऱया आकड्यांवर कोणीही लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळे यंत्रांनी जाहीर केलेला निकाल अंतिम मानला जातो. या दोषावर वॉशिंग्टन, डिसीच्या यू. एस. पब्लिक इंटरेस्ट रिसर्च ग्रुपचे विश्लेषक गॅरी कालमन यांनी बोट ठेवले आहे. मतगणनेला कोणी आव्हान दिले आणि पुन्हा मतमोजणी घ्यायला सांगितली, तरी शेवटी यंत्र जे सांगेल तेच आपल्याला ऐकावे लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
वॉशिंग्टन येथीलच जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटीचे बेंजामिन गिन्सबर्ग यांनीही या त्रुटीमुळे यंत्रांसोबतच कागदी मतांनाही स्थान देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, “कोणत्याही ठिकाणी संगणक किंवा त्यावर आधारित यंत्रणा आली, की त्याच्याशी छेडछाड करण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे या यंत्रांना कागदी दस्ताऐवजाचा आधार द्यायलाच हवा.” एखाद्या मतदाराने मत टाकले, की त्याची प्रिंट आऊट मिळावी. त्यामुळे पुन्हा मतमोजणी केल्यास फायदा होईल, असे गिन्सबर्ग यांनी मत मांडले आहे.
———
इथे अमेरिकेच्या निवडणुकीबद्दलचा वृत्तांत संपला. मात्र खरा प्रश्न पुढे आहे. आपल्याकडे या यंत्रांचे स्वागत एक मोठी व आधुनिक घडामोड म्हणून झाले. मात्र त्या यंत्रांची कार्यक्षमता, उपयोग आणि त्यांची विश्वासार्हता यांबाबत कोणतीही चर्चा झाल्याचे ऐकिवात नाही. सरकार काही सांगणार आणि लोकांनी तो मुकाट ऐकायचा, हीच आपली परंपरा आहे. त्यामुळेच कुठलाही अभ्यास वा संशोधन न करता रामसेतू मानवनिर्मित नसल्याचा दावा सरकार न्यायालयात करतं आणि १०० कोटींच्या देशात त्यावर कोणी प्रश्नही विचारत नाही. हा या दोन देशांतील फरक आहे.
———-

//www.youtube.com/get_player

चिरंजीव मेगास्टार

आंध्र प्रदेशातील कोणत्याही गावातील कोणतेही थिएटर…प्रचंड मोठे पोस्टर्स आणि कट-आऊटस्‌वर एक चेहरा झळकतोय…तो चेहरा पाहून गावातील लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण थिएटरच्या दिशेने निघालेला…टॉकिजची घंटा वाजते आणि दिवे मालवून थिएटरमध्ये अंधार पसरतो…समोरचा पडदा उजळताच काही क्षणांत प्रत्येक प्रेक्षकाला हवा असलेला चेहरा व त्याचे झळकू लागते…थिएटरमध्ये थिएटरचे छत फाटेल एवढ्या मोठ्या आवाजात टाळ्या, शिट्यांचे आवाज…काही दर्दी रसिक खिशातील आहे नाही तेवढी चिल्लर पडद्याच्या दिशेने उधळतात. पुढचे तीन तास या प्रेक्षकांना त्यांची दुःखे विसरायला लावण्यासाठी चिरंजीवीची एंट्री झालेली असते.

सामान्यतः आंध्र प्रदेशात नेहमी दिसणारे हे चित्र. चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटले की त्यांची लफडी, नखरे अशाच बातम्या (आवडीने) वाचायची आपल्याला सवय असते. तेलुगु सुपरस्टार चिरंजीवी याच्याबद्दल गेल्या आठवड्यात आलेल्या बातम्या याला अपवाद नव्हत्या. त्याच्या मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने माध्यमांनी त्याला मोठी प्रसिद्धी दिली. आपल्याकडच्या लोकांनीही त्याची चविष्टपणे चर्चा केली. कोट्यवधी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेला, मोठ्या मुलीचे थाटामाटात लग्न करून देणारा, निवृत्तीची भाषा बोलणारा आणि आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी चॅरिटी संस्था चालविणारा चिरंजीवी मात्र या संपूर्ण प्रकरणात फुकट बदनाम झाला.

आंध्र प्रदेशात तुम्ही कोणालाही जाऊन विचारा, चिरंजीवी हे नाव काढताच तुम्हाला वेगळी ट्रिटमेंट मिळालीच म्हणून समजा. हैदराबादेत फिरत असताना 1111 या क्रमांकाची मोटार जाताना दिसली तर बेलाशक समजा, की चिरंजीवी चालला आहे. चाहत्यांमध्ये चिरु या नावाने ओळखल्या जाणारा चिरंजीवी हा तेलुगु प्रेक्षकांचा जीव की प्राण. चिरुच्या चित्रपटांसाठी गर्दी झाल्याने काही जणांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कोनिदेला शिव शंकर वरा प्रसाद हे नाव तुम्हाला ओळखीचं वाटतं का? नाही ना? अहो, या नावाचीच व्यक्ती देश-परदेशांत चिरंजीवी या नावाने ओळखली जाते. पश्‍चिम गोदावरी जिल्ह्यातील मुगल्तुर येथे 22 ऑगस्ट 1955 रोजी चिरंजीवीचा जन्म झाला. वडिल वेंकट राव पोलिस अधिकारी असल्याने ते बदलीच्या गावी असत. त्यामुळे आजी-आजोबांकडे चिरु लहानाचा मोठा झाला. बी. कॉम. ची पदवी घेतल्यानंतर अकाऊंटन्सीचा कोर्स करण्यासाठी तो मद्रासला दाखल झाला. “पुनादिराल्लु’ नावाच्या एका सिनेमात काम करण्यासाठी यावेळी त्याला ऑफर आली. त्याने कॉलेजच्या आपल्या प्राचार्यांना आजोबा वारल्याचे खोटेच सांगून सुट्टी घेतली.

या चित्रपटातील पहिल्या दृश्‍यात चिरंजीवीला पाय धुण्याचे काम होते. त्यावेळी त्याने आधीचे दृश्‍य काय होते, अशी विचारणा केली. तेथील दिग्दर्शकांनी त्या दृश्‍याची कल्पना चिरंजीवीला दिली. त्याने मग तेथीलच थोडी धूळ घेऊन पायावर रगडली. त्याची ही कृती सिनेमाटोग्राफर पाहत होता. तो चिरंजीवीकडे आला आणि त्याला म्हणाला, “”एक दिवस तू मोठा स्टार होशील.” तेथूनच चिरंजीवीच्या मनात अभिनेता होण्याची ठिणगी पडली. याच वेळेस तेथील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये त्याने नाव नोंदविले. यावेळी त्याची एका सिनियरशी घनिष्ठ मैत्री झाली. पुढे चालून चिरुप्रमाणेच त्याचा हा मित्रही दक्षिण भारतातील मोठा सुपरस्टार म्हणून नावा रूपाला आला. तो सुपरस्टार म्हणजे आपला रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड!

चिरंजीवीने 1977 मध्ये “प्रणाम खरीदु’ या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. हनुमानाचा भक्त असल्याने त्याने पडद्यावर चिरंजीवी हे नाव घेतले. “मोसगाडू’, “47 रोजुलु’ आदी चित्रपटांमधून मात्र त्याने खलनायक रंगविले. जितेंद्र, जयाप्रदा यांच्या भूमिका असलेला “कैदी’ हा सिनेमा तुम्हाला आठवतो का? हा चित्रपट मुळात “खैदी नं. 786′ या चित्रपटाचा रिमेक होता. याच चित्रपटातून मारधाड करणारा ऍक्‍शन हिरो म्हणून चिरंजीवीने स्वतःची ओळख निर्माण केली. आता टीव्ही चॅनल्स आणि सीडीच्या जमान्यात तेलुगु, तमिळसारख्या भाषांतील अनेक चित्रपट हिंदीत डब करून आपल्यापुढे आणले जात आहेत. मात्र 1980 आणि 90 च्या दशकात चिरंजीवीच्या अनेक सिनेमांचे हिंदीत रिमेक झाले. अनिल कपूरचे अनेक सिनेमे चिरंजीवीच्या चित्रपटांचे रिमेक होते. चिरंजीवीच्या “जमाई मजाका’चा “जमाई राजा’, “घराना मोगुडु’चा “लाडला’, “रौडी एमएलए’चा “लोफर’ असे अनेक रिमेक आपण पाहिले. हे सर्वच चित्रपट हिट झाल्याचं तुम्हाला आठवत असेलच.

हाणामारीच्या चित्रपटांबरोबरच चिरुने त्यावेळी ब्रेक डान्सची वेगळीच आवृत्ती पडद्यावर साकारण्यास सुरवात केली. त्यामुळे त्याच्या चाहते तर वाढलेच, शिवाय त्याची अनेकांनी नक्कलही करण्यास सुरवात केली. 1990 मध्ये चिरंजीवीने “प्रतिबंध” चित्रपटातून हिंदीत प्रवेश केला. त्याला प्रचंड यश मिळाले. रामी रेड्डीचा “स्पॉट नाना’ सर्वांच्या डोळ्यांत भरला तेवढाच चिरुचा जिगरबाज पोलिस इन्स्पेक्‍टर प्रेक्षकांना आवडला. या चित्रपटाच्या यशानंतर लगोलग “आज का गुंडाराज’ आला. चिरंजीवीचा “हिटलर’ (1995) हा सिनेमा आला आणि तेलुगु चित्रपटांमध्ये त्याला मेगास्टार या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर आंध्र प्रदेशात त्याचे स्थान इतर कोणाहीपेक्षा मोठे झाले. यानंतर चिरुच्या यशस्वी चित्रपटांची लाटच तेलुगुत आली आणि एकापाठोपाठ त्याचे चित्रपट तिकिटबारीवर गल्ला करू लागले.

खरं तर तेलुगु चित्रपटसृष्टीला “टॉलिवूड’ची स्वतःची ओळख देण्याचे काम चिरंजीवीने केले होते. त्याच्या पूर्वी एन. टी. रामाराव आणि अक्किनेनी राघवेंद्र राव हे तेलुगु चित्रपटांचे मोठे स्टार होते. मात्र चिरंजीवीला सुपरस्टारपदाचे एकछत्री राज्य लाभले. तेलुगु भाषेत चिरुनामा म्हणजे पत्ता. चिरंजीवीच्या चिरु नावातही टॉलिवूडचा पत्ता लपला आहे. रजनीकांत याच्या प्रमाणेच तोही अध्यात्मात रमणारा माणूस आहे. सुमारे तीस वर्षे चित्रपटसृष्टीत काढूनही कोणत्याही वादात न सापडलेला चिरु लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसला. लोक त्याला “अन्नया’ (मोठा भाऊ) या नावाने ओळखू लागले. त्याच्या या लोकप्रियतेवर गेल्या वर्षी पद्मभूषण किताब देऊन भारत सरकारने शिक्कामोर्तब केले. अथेन्स येथे 2004 साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान “कोका कोला’ कंपनीने चिरंजीवीला खास पाहुणा म्हणून आमंत्रित केले होते.

स्वतःबाबत चिरंजीवी म्हणतो, “”मी मदर तेरेसा बनण्यासाठी किंवा लोकांनी मला आध्यात्मिक म्हणावं, यासाठी काही करत नाही. मला वाटतं म्हणून मी ते करतो. लाखो लोकांचे प्रेम मिळाल्यानंतर, एवढे मोठे स्थान प्राप्त केल्यानंतर एखाद्याच्या आयुष्याला काहीतरी मोठा उद्देश असायलाच पाहिजे.”

चिरंजीवी जेवढा चित्रपटांसाठी ओळखला जातो त्याहून जास्त आंध्र प्रदेशात सामाजिक कार्याबद्दल त्याची ओळख आहे. नऊ वर्षांपूर्वी त्याने “चिंरजीवी चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली. ब्लड बॅंक (रक्तपेढी )आणि आय बॅंक (नेत्रपेढी) चालविण्याचे काम हा ट्रस्ट करतो. आंध्र प्रदेशात या रक्तपेढीने आतापर्यंत 96 हजार लोकांना मदत केली आहे आणि नेत्रपेढीने एक हजार लोकांना मदत केली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हैदराबादमध्ये “चिरंजीवी चॅरिटेबल फाउंडेशन’चे उद्‌घाटन करण्यासाठी तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. कलाम आले होते.

सकल कुक्कुरे यदि स्वर्गे जाय…

कल कुक्कुरे यदि स्वर्गे जाय, तबे कोन ओ हाडा खाय, अशी बंगाली भाषेत एक म्हण आहे. तिचा अर्थ असा, की सगळेच कुत्रे जर स्वर्गात गेले तर या पृथ्वीवरील हाडकं कोण खाणार? आता आपल्या सर्वच भाषांमध्ये जुन्या म्हणींमध्ये असते, तसे याही म्हणीत काही एक तथ्यांश आहे. खरं तर सध्या भूतदयावादी (का भूतवादी?) मंडळींच्या कृपेने कुत्र्यांचे एवढे लाढ चालू आहेत, की ‘हर कुत्ते के दिन दिन होते है’ असं म्हणण्याऐवजी ‘सिर्फ कुत्तों के दिन होते है,’ असं म्हणावसं वाटतं. मात्र आपण या सुदैवी कुत्र्यांना त्यांच्या सुखराज्यात तसेच सोडू आणि याच म्हणीच्या धर्तीवर आणखी काही गोष्टी ताडून पाहता येतील. अगदीच उदाहरण द्यायचे म्हटले तर…

* सगळेच होतकरू तानसेन आपला घसा मोकळा करण्यासाठी टीव्हीच्या पडद्यावर झळकत असतील तर देशभरातील बाथरूमचा उपयोग फक्त स्नान करण्यापुरताच राहणार की
काय?
* शहरात सगळीकडे मॉलच उभे राहणार असतील तर नागरिकांनी राहण्यासाठी काय जाहिरातींच्या होर्डिंग्जच्या खाली जागा भाड्याने घ्यावी की काय?
* बॉलिवूडमधला प्रत्येक उपटसुंभ सुपरस्टार आणि ‘किंग’ होणार असेल तर सहायक अभिनेते काय फक्त निधन पावलेल्या एखाद्या मोठ्या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहायला किंवा ‘शनिवार की रात अमिताभ के साथ’मध्ये बच्चन चालिसा म्हणण्यापुरतेच उरणार की काय?
* सगळेच क्रिकेटपटू जीवाचे रान करून खेळू लागले, खेळांवर लक्ष केंद्रीत करू लागले आणि खेळात जान आणू लागले, तर विविध जाहिरातींसाठी मॉडेल को-ऑर्डिनेटर्स कोणाच्या तोंडाकडे पाहणार?
* देशातील गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रत्येक राजकीय नेता अणु करारावर बोलू लागला, तर ग्रामीण भागांतील पाण्याचा प्रश्न, शेतकऱयांच्या आत्महत्या किंवा विकास कामे यांचा विचका करण्याचे महत्कार्य कोण करणार?
* सगळेच साहित्यिक संमेलनाध्यक्ष होण्याची धडपड करू लागले, तर ‘चिकनच्या ५०१ चविष्ट पाककृती’ किंवा ‘घरच्या घरी चायनीच करा’ असे बेस्टसेलर वाङमय (अन वाङगंमयही!) प्रसविण्याची जबाबदारी कोण घेणार?
* प्रत्येक जाहिरातीत लहान मुलेच जर झळकू लागली, तर पुरुषांनी प्रेक्षणीयतेची भूक काय सास-बहूच्या मालिका पाहून भागवायची काय?
* प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीची शिस्त बाळगण्याचा निश्चय केला, तर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या थोबाडीत मारील अशा कवायती रस्त्यांवर करण्याचा थरार कोण अनुभवणार?
* प्रत्येक महागडी वस्तू हप्त्यांवर अन सुखासुखी मिळू लागली, तर ‘सुखवस्तू’ घराची व्याख्या बदलण्याची जबाबदारी कोण घेणार?
———–
असे अनेक प्रश्न आहेत. दिवसेंदिवस अशा प्रश्नांची यादीही वाढत आहे आणि त्यांची उत्तरेही ऑबवियस होत चालली आहेत. फक्त तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारलाच, तर उत्तर देण्याऐवजी एवढंच म्हणा, ‘सकल कुक्कुरे यदि स्वर्गे जाय…’

वाचनाच्या बेटावरील श्रद्धेचा शोध

पूनम छत्रे यांनी त्यांच्या लेखात मनाला भावलेल्या उताऱ्यांचा हा प्रवाह पुढे नेण्याची जबाबदारी टाकली आणि मला पुन्हा वाचनाच्या दिवसांत जावे लागले. गेली काही वर्षे आपणच लिहावं आणि इतरांनी वाचावं, ही भावना प्रबळ होत गेल्यामुळे वाचनसंस्कृती हळूहळू मागे पडली. फक्त “वाचनामुळे माणूस घडतो’ किंवा “उत्तम संस्कृतीसाठी वाचन आवश्‍यक’ अशा सुसंस्कारी सुभाषितां पुरतेच वाचन मर्यादीत झाले होते. मात्र ज्या काळात वाचन केले त्या वाचनाचे ठसे मनावर अद्याप कायम असल्यामुळे त्याच फडताळात जाऊन शोध घेतला. वाचलेल्या पुस्तकांतून आवडता उतारा द्यायचा, त्यातही मराठी उतारा द्यायचा ही जरा जोखमीचीच बाब. कारण शुद्ध मराठी साहित्याची कास सोडूनही मला आता फारा काळ लोटला आहे. असो.
“रॉबिन्सन क्रुसो’ ही महाकादंबरी (सुमारे 500 पृष्ठे ) वाचून मला आता सतरा वर्षे होत आली. डॅनिएल दे फो याने लिहिलेली ही कादंबरी मानवी आकांक्षी, कर्तृत्व आणि प्रयत्नवादाचे एक महास्तोत्रच आहे. त्याहूनही विश्‍वाच्या पसाऱ्यात मानवाचे परावलंबी अस्तित्व आणि ईश्‍वराची महीमा, यांचीही कहाणी सांगणारी ही कथा आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी आलेल्या या कथेच्या असंख्य आवृत्या अगदी तीन वर्षांपूर्वी आलेल्या “कास्टअवे’ या चित्रपटापर्यंत निघत आल्या आहेत. मूळ इंग्रजीतील ही कादंबरी मी वाचली ती मराठीतूनच. मात्र अस्सल मराठी वाचकांच्या प्रथेप्रमाणे या वाचनाचे प्रायोजकत्व मी शहरातल्या एकमेव नगरपालिका ग्रंथालयाला दिले होते. त्यामुळे अनुवादकाचे नाव किंवा अन्य तपशील बाळगण्याचे प्रयोजन नव्हते. आता ती कादंबरीही मिळत नाहीशी झालेली. त्यामुळे आवडता उतारा द्यायचा म्हटल्यावर संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरवात म्हणतात, तसे आपणच मूळ कादंबरी शोधून उताऱ्याचे भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. (कार्यसिद्धीस गुगुल समर्थ!) त्यामुळे काही उणीवा राहिल्या असल्यास चूकभूल देणे घेणे!
इंग्रज दर्यावर्दी रॉबिन्सन क्रुसो अनेक सागरी सफरींमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या अनुभवांतून गेला असला तरी पुनःपुनः नव्या सफरींसाठी निघण्यास तयार. अशाच एका सफरीदरम्यान वादळात सापडून त्याचे जहाज फुटते आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना जलसमाधी मिळते. फुटलेल्या जहाजाच्या अवशेषासह आणि काही सामानासह क्रुसो एका निर्जन बेटाला लागतो. तेथेच तो 28 वर्षे काढतो आणि स्वतःच्या एकाकी जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न करतो. बेटावरील प्राण्यांशी मैत्री करणे, तेथीलच गवत व वनस्पतींपासून झोपडी तयार करणे, गुहेत राहणे, नरभक्षक आदिवासींशी गाठ पडूनही त्यांच्याबद्दल “जगा व जगू द्या’ची भूमिका घेणे…अशा विविध प्रकारांनी आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न क्रुसो करतो. इतिहासात प्रगतीच्या ज्या काही पायऱ्या मानव चढल्या, त्या सर्वांचे प्र तिकात्मक चित्रण या कादंबरीत येतं. त्यामुळे एका अर्थाने माणसाच्या अस्तित्वाच्या लढाईचीच ती कहाणी होते. मात्र मला त्यात सर्वाधिक भावते अन्‌ सतरा वर्षांनंतरही लक्षात राहते तो क्रुसोच्या ईश्‍वराच्या अस्तित्वाबद्दल बदलत्या भूमिकेचे चित्रण. स्वतःच्या परिस्थितीचे निरीक्षण, त्यातून चिंतन करत असतानाच आपण ईश्‍वराच्या इच्छेनेच या परिस्थितीत सापडलो असल्याचा साक्षात्कार क्रुसोला होतो. हा या कादंबरीतला सर्वांत हृद्य प्रसंग.
———————

माझ्या या निष्कर्षांना खोटं ठरवंल, असं काहीही घडलं नाही, त्यामुळे हे सर्व ईश्‍वरानेच घडविले आहे, ही भावना माझ्या मनात आणखी प्रबळ होऊ लागली-त्यानेच मला या दयनीय परिस्थितीत आणून ठेवले आहे, कारण त्याच्याकडे माझ्यावरच नाही, तर जगातील वस्तुमात्रावर स्वामित्व गाजविण्याची शक्ती आहे. त्यानंतर लगेच विचार आला-ईश्‍वराने माझ्यासोबत असे का केले? मी असे काय केले होते?

त्या प्रश्‍नासरशी माझ्या विवेकबुद्धीने मला टोचले, जणू काही मी एखादे पाखंड केले आहे अशा पद्धतीने आणि मला वाटले की ही विवेकबुद्धी माझ्याशी बोलत आहे, “”मूर्खा! तू विचारतोस की तू काय केले आहेस? अतिशय वाह्यातपणे घालविलेल्या आपल्या आयुष्यावर नजर टाक आणि स्वतःलाच विचार, की तू काय काय केलं नाहीस? विचार स्वतःला की तू याआधीच नष्ट का झाला नाहीस? यरमाऊथ रोडसमध्ये तु का वाहून गेला नाहीस, जहाजावर चाचांनी हल्ला केला तेव्हा लढाईत का मारला गेला नाहीस, आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील जंगली प्राण्यांनी तुला मारून का खाल्ले नाही, अगदी तुझे सगळे सहकारी बुडाले असताना तू येथे वाहून गेला नाहीस? तू स्वतःला विचार “मी असं काय केलंय.’
या विचारांसरशी मी स्तब्ध झालो, एखाद्या मूर्तीसारखा. बोलण्यासाठी माझ्याकडे एकही शब्द नव्हता. निराश आणि विचारमग्न अवस्थेतच मी उठलो आणि माझ्या आश्रयस्थळी परत आलो. झोप आल्यासारखं झाल्याने मी माझ्या भींतीकडे गेलो. पण माझ्या विचारांची गर्दी एवढी झाली होती, की झोपण्याची माझी परिस्थिती नव्हती. त्यामुळे मी खुर्चीत बसलो आणि अंधार पडू लागल्याने दिवा लावायला घेतला. आता पुन्हा माझी तब्येत बिघडण्याच्या शक्‍यतेने मी एवढा घाबरलो होतो, मला आठवलं ब्राझीलचे लोक त्यांच्या सर्व दुखण्यांवर कोणत्याही औषधाऐवजी तंबाखू घेतात. तंबाखूची एक गुंडाळी एका संदुकीत होती. ती वाळलेली होती. काही हिरवी आणि न वाळलेली गुंडाळीही होती. मी संदुकीजवळ गेलो. त्यामागे नियतीचाच हात होता यात संशय नाही कारण त्या संदुकीत मला माझ्या शरीराचंच नव्हे तर आत्म्याच्याही दुखण्याचं औषध सापडले.
मी संदुक उघडली आणि हवी असलेली तंबाखू शोधली आणि मी जपून ठेवलेली काही पुस्तके तिथेच पडली असल्याने मी आधीच उल्लेख केलेले बायबल उचलले. मला आतापर्यंत हे बायबल वाचायला वेळ मिळाला नव्हता म्हणा वा इच्छा नव्हती म्हणा-त्याला बाहेर काढून ते आणि तंबाखु दोन्ही घेऊन मी टेबलजवळ आलो. माझ्या स्वभावाच्या अस्वस्थतेवर तंबाखूचा काही उपयोग होईल का, ती त्यासाठी चांगली आहे का वाईट, यांबाबत मला काहीच माहित नव्हतं. परंतु कोणत्या ना कोणत्या प्रकारे ती परिणाम करेल, याबाबत निर्धार केल्यासारखं मी त्या तंबाखुचे अनेक प्रकारे सेवन केले. मी तंबाखुचे एक पान घेतले आणि तोंडात चघळायला सुरवात केली. तंबाखू हिरवी व कडक होती आणि मला तिची सवयही नव्हती. त्यामुळे खरोखरीच माझ्या मेंदूला गुणगुण्या आल्या. त्यानंतर मी काही पाने घेऊन रममध्ये एक-दोन तास बुडवून ठेवली. आडवं पडल्यानंतर ती रम प्यायचा मी निर्णय घेतला. त्यानंतर अखेर मी एका भांड्यात कोळसे पेटवून त्यावर काही पाने जाळली. अगदी सहन होईल तोपर्यंत त्याचा धूर घेण्यासाठी मी माझे नाक धुराजवळ घेतले.
या सर्व उचापतीदरम्यान, मी बायबल घेऊन वाचण्यास सुरवात केली. पण माझे डोके तंबाखूमुळे असे बधीर झाले होते, की किमान त्या वेळेपुरते तरी वाचणे अशक्‍य झाले होते. फक्त चाळण्यासाठी म्हणून पुस्तक उघडले आणि मला आढळलेले पहिले शब्द होते, “”संकटाच्या वेळेस मला हाक मार, मी तुझी सुटका करेन आणि तू माझे नाव घेशील.” माझ्यासारख्याला हे शब्द अगदी चपखल होते. ते वाचून माझ्या मनावर मोठा परिणाम झाला. मात्र त्यानंतरच्या काळात हा परिणाम अधिक होता. कारण सुटका या शब्दाला काही अर्थ नव्हता, असे मी म्हणेल. माझ्या हताश परिस्थितीत ही शक्‍यता एवढी दूर होती, की माझी स्थिती इस्राएलच्या मुलांसारखी झाली. त्यांच्यासाठी खाण्यासाठी मांस देण्याचे आश्‍वासन मिळाल्यावर त्यांनी विचारले होते, “”या उजाड माळरानात भगवंत टेबल मांडू शकतो?” तसंच मीही विचारायला लागलो, “”भगवंत स्वतः मला येथून सोडविणार का?” त्यानंतर अनेक वर्षे काहीही आशा नजरेच्या टप्प्यात न आल्याने तर ही शंका नेहमीच माझ्या विचारविश्‍वात ठाण मांडून राहिली होती.
तरीही या शब्दांनी माझ्यावर खूप परिणाम केला होता व त्याबद्दलच मी नेहमी चिंतन करत असे. आता खूप उशीर झाला होता, आणि मी म्हटल्याप्रमाणे तंबाखूने एवढी गुंगी आली होती की मला झोप येऊ लागली होती. रात्री काही लागलं तर हाताशी असावा, या हेतूने दिवा जळताच ठेवून मी अंथरुणावर पडलो. मात्र पाठ टेकण्यापूर्वी मी ती गोष्ट केली, जी त्यापूर्वी आयुष्यात कधीही केली नव्हती-मी गुडघे टेकले आणि ईश्‍वराने मला दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची, तसेच संकटकाळात मी हाक मारल्यानंतर मदतीला येण्याची प्रार्थना केली. माझी तोडकीमोडकी आणि अडाण प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर, तंबाखूची पाने बुडवून ठेवलेली रम मी प्यायलो. ती एवढी कडक झाली होती आणि तंबाखूच्या चवीनी भरली होती, की माझ्या घशाखाली ती उतरेना. त्यानंतर लगेच मी झोपण्यासाठी आडवा पडलो. त्यामुळे माझ्या डोक्‍यात आग होत होती, तरीही मला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा सूर्याच्या स्थितीवरूनच दुपारचे तीन तरी वाजले असावेत, असा अंदाज मी केला.
————-
असो. मला वाटते या पोस्टमध्ये जरा जास्तच लांबण लावली. एकूणात मला ही संधी दिल्याबद्दल (म्हणजेच माझ्यावर ही जबाबदारी टाकल्याबद्दल) मी आभारी आहे. आता ही जबाबदारी मी आणखी पुढे देतो.

तंटाभक्तांची तंटमुक्ती

– रामराम म्हादबा, उठलासा नव्हं?

– हां उठलो हाय…काय काम काढलं सकाळच्या पारी?

– काय नाय. काल काय तू लय दंगा केला म्हणं ग्रामसभेत…मी वाईच तालुक्याला गेलो व्हतो. आल्यावर बायलीने सांगितलं…तवा म्हणलं सकाळचं जाऊन समक्षच विचारावं…एक घाव ना दोन तुकडे…काय?

– आरं बाबा, आता मलाच बोल लावा दंगा केलान म्हणून. आरं अख्ख्या गावाला पूस काल काय झालं त्या सभेत. त्या ग्रामसेवकाला न सरपंचाला असा फाडला ना आडवा न उभा…ज्याचं नाव ते. टीव्ही लावू देत नाही XXX

– आरं म्हादबा, असं डोसक्यात काय पाई राख घालून घेतो रे बाबा? आरं त्या टीव्हीची मामलत ती काय अन तू भांडणं काय पाई करतो रं? काय झालं तं सांग बाबा समदं…तवर वहिनी बी चहा आणतील… – हे बग भाऊ, काल गांधी जयंती म्हून आपल्याकडं ग्रामसभा होती, हे तर तुला ठावं होतंच. आपलं काय ठरलं होतं का गावात तंटा करायचा नाय, भांडण करायचा नाय…त्यासाठी तं ही सभा बोलाविली होती..खरं का नाय…आता तुला म्हायत हाय भाऊ, का सरपंच किती डांबरट अन ग्रामसेवक किती आतल्या गाठीचं बेणं हायंत…गावात तीन पिढ्यांपासून लीडरकी हाय आमच्या घराण्याची…गेल्या विलेक्शनला विपरीत घडलं अन हा कावळा खुर्चीत जाऊन बसला. म्या म्हण्लं…जाऊ दे. परत्येक कुत्र्याचे दिस असतात. तं यानं काय केलं का ग्रामसभेचं आवताण मला द्यायला नको? बरं नाय दिलं…तरी बी म्या गेलो…का म्हण्लं गाव आपलं हाय…गावातली शांती आपली हाय….

– आरं म्हाद्या, पर तु तं सांगत होता का पाटलांच्या शांतीवर तू आताशा लाईन मारीत न्हाय म्हणून…

– ती शांती न्हाय रं भाऊ…बायकोशप्पथ लगीन झाल्यापासून म्या कोण्या बी मुलीकडं नजर उचलून पाहत नाही…आन तुला म्हणून सांगतो…आताशा ‘त्या’ शांतीत बी दम रायला नाही…ते जाऊ दे…तं तुला सांगत होतो आपल्या गावच्या शांतीचं म्हणजे बापूंनी सांगितलेल्या शांतीचं…तं ती शांती हवी म्हणून सभेला गेलो…

– आरं सभा तंटा मिटविण्यासाठी…तू गेला शांतीसाठी…अन तिथं करून आला मारामारी…? आरं ह्याला म्हणायचं तरी काय?

– सांगतो…सभेला समदा गाव जमला व्हता…त्यात सरपंचानं मिजास मारायला त्याच्या बायका पोरांना बी बोलाविलं होतं…तं मी विचारलं का हे एवढं लटांबर हितं कशाकरता. आता यात काय चूक हाय काय. तवा बसली ना दातखीळ सरपंचाची. तोंडातून शब्द फुटत नव्हता xxxच्या. तवा तं ग्रामसेवक मंदी पडला. त्याच्याखातर मी बी जरा आवरलो…का की आपन बी गेल्या वख्ताला बायकोला नेलंच व्हतं की तिथं…तं त्यानंतर वग सुरू केला का बेट्यांनी…सभा जमली तंटा मिटविण्यासाठी आन हे बोलू लागले हागणदारीचं…का गावात हागणदारी बंद कराया पायजे…परत्येकाने शौचालये बांधावीत…

-मंग तुला कायची अडचण रं बाबा? हागणदारी तं हागणदारी…तुला कायचा प्रोब्लम?

– प्रोब्लम आरं काय नाही…पण मी म्हन्तो, आन मी त्या दोगांच्या बी तोंडावर सांगितलं का बाबा, हागणदारीचा प्रश्न आमच्या घरात आम्ही संपविला आहे…इथं तुमी शांततेचं बोला…तं दोघं बी जोक् मारू लागले की रं…एक म्हन्ला का हागणदारीत शांतीच असती न्हवं…दुसरा काय म्हन्ला मायतंय का? त्यो म्हन्ला का तुमच्या आख्ख्या फॅमिलीनं हगायचं बंद केलं का? आता आसं कुनी बोलल्यावर तुझं टाळकं सरकणार नाय का? तं माझं बी टकुरं सराकलं…तरीबी मी शांत व्हतो…

– आरं मग भांडण कामून झालं?

– आरं ते समदं आपल्या मास्तरांचं झेंगट हाय…त्यानंच सांगितलं का टीव्हीवर आबांचं प्रवचन चालू हाय अन आबा आपल्याला शांततेचं महत्त्व सांगतायत…तर मंग काय…तुला तं माहितंय…ग्रामसेवकावर लायन मारण्यासाठी सरपंचानं टीव्हीला हात की रे घातला…आता मात्र आपला स्टॅमिना संपला व्हता बरं का! मी मोठ्यांदा आवाज काढून सांगितलं का पयले ही सभा व्हयंल अन त्येच्यानंतरच ज्याला हवा त्यानं टीव्ही बघावा…यात काय खोटी हाय काय?

– नाय….बिल्कुल नाय.

– त्येच…मी त्येच सांगत व्हतो…तं सरपंच अन त्येच्या गुंडांनी म्होरं येऊन मलाच खुन्नस दिली…अन माझ्याम्होरं येवून मला धमकी देऊ लागले…तं मी काय मागं हटणार होतो व्हयं…मी बी त्येंना त्यांच्याच भाषेत दम दिला…ही दमबाजी चालू असतानाच दोन पोरटी टीव्हीकडं गेली अन खटका दाबला…ती सरपंचाचीच कार्टी व्हती वाटतं…XXच्यांनी टीव्ही लावला तं लावला….त्यावर फॉरिनची गाणी लावली…अन ती हालणारी चित्रं…आता मी बी ती चित्रं पाहण्यात गुंतलो अन तितक्यात कुणीतरी ठोसा लावला माझ्या थ्वबाडावर…आसला कळवळला जीव…मंग मी बी काय पाहिलं नाही…हात न पाय…वाटेल तसं फिरविलं दांडपट्ट्यासारखं…ल्हानपणापासून सकाळ संध्याकाळ चार-चार लिटर दूध पिऊन केलेली तब्येत हाय ही…काय मुकाट मार खातो का मी…हे हाण हाणला…मार खावून समदे पळाले असतील हागणदारीत…हा हा हा!

– आरं हां…तो सरपंच पडला हाय तिकडं घरात तळमळत…तुझ्या नावानं शंख करतोय…अन ग्रामसेवक रात्रीपासून गेला हाय पळून…पोलिसांत फिर्याद देतो म्हून बोंबलत होता…

– बोंबलू दे भाऊ…सरकार म्हन्तं तंटामुक्त व्हा…आता तंटा करण्याऱयांनाच गावातून हाकलल्याबिगर गावात शांती कशी राहणार? आता बघ हे बोंबल्ये दवाखान्यात हायेत तवर गावात कशी शांती ऱहाते….बघच तू…चल, तंवर आपण आदर्श कार्यकर्ता पुरस्कारासाठी अर्ज देवून येवू…!

पाण्यात न गेलेले पैसे

देवा, याही देशात पाऊस पाड
देवा, याही शहरात पाऊस पाड…

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी देवाला उद्देशून ही कविता लिहिली. त्यामागे त्यांचे जे काय हेतू असायचे ते असोत. (जर्मनमध्ये तिचं भाषांतर व्हावं, असा हेतू निश्चितच नसावा.) मात्र हीच कविता सध्या मी दिवस रात्र आलापत आहे. मेघराजांची अशी आराधना एखाद्या जातीवंत बेडकानंही केली नसेल. अर्थात तळमळीतील ही उणीव आवाजाने भरून निघते, हा भाग अलाहिदा.
तर, पर्जन्यराजाचा हा असा धावा करण्यामागे माझा काय स्वार्थ असावा, असं वाटलं ना?. शहरातच राहत असल्याने भरपूर पाऊस होऊन चांगले पीक काढावे, असा मी शेतकरीही नाही. पावसाच्या प्रत्येक थेंबासरशी कवितेचे पाट वाहू घालण्याएवढी काव्यप्रतिभाही आता राहिली नाही. खरं तर, पावसाला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. मात्र तरीही पाऊस पडावा, यासाठी मी अगदी चातकासारखी वाट पाहत आहे. कारण…
कारण…माझे जर्कीन उर्फ जॅकेट उर्फ् सामान ठेवायची पिशवी उर्फ….बरंच काही! चार महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या या सर्वऋतूसमभाव चीजेसाठी मला हवाय पाऊस. एकदा या शहरात चांगला दणदणीत पाऊस पडू दे, त्यात न भिजण्यासाठी या प्रावरणाचा उपयोग करू दे…मग तीन वर्षे दुष्काळ पडला तरी चिंता नाही, (एक्चुअली कोरडा दुष्काळ असो किंवा ओला दुष्काळ…मी कोणत्याच गोष्टीची चिंता करत नाही. याबाबतीत महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि माझं एकमत आहे.) एवढीच माझी आता महत्त्वाकांक्षा आहे.
काय आहे, गेली दोन वर्षे महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टीची परंपरा चालू आहे. त्या दोन संकटांशी झगडता झगडता तनू भागलेल्या जुन्या जर्कीनने यंदा कॉलर टाकली आणि त्याच्या रिप्लेसमेंटची तरतूद करण्याची जबाबदारी आली. आता हा योजनाबाह्य खर्च अंगावर पडल्यावर त्यासाठी हालचाली करणंही आलंच. आधीच खरेदीची काडीचीही अक्कल नसल्याची पंचक्रोशीत ख्याती! त्यात पावसाळ्याचा हंगाम बघून विक्रेत्यांनी केलेली सुगीची बेगमी. मग काय विचारता?
म्या पामराने कसाबसा छातीचा कोट करून जून महिन्यात एक जंगी जर्कीन विकत घेतले. आठशेपासून सुरू झालेली बोली खाली आणत पाचशे रुपयांत विक्रेत्याला पटविले आणि काखोटीला मारून ते गाठोडं आणलं. तरीही मनात धाकधूक होतीच. त्यामुळे आधी नव्या वस्तूचं खासगी प्रदर्शनही सुरू झालं. त्यात सर्वांनी ‘छान छान, चांगलं आहे’ असे शेरे मारल्यावर आमचे गंगेत घोडे न्हाले. आता हा पाऊस आणि हे जर्किन…पहिल्या पावसाच्या मेघगर्जनने मोराने पिसारा फिरवून नाचावे, तसा आनंद झाला.
हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता, हे मला लवकरच कळाले. (दोन अतिपरिचित वाक्यांचे कॉम्बिनेशन करण्याची खुमखुमी बऱयाच दिवसांपासून होती. त्याची आज संधी मिळाली.) खरं सांगायचं तर अपेक्षांवर पाणी फिरले असं म्हणायचंही संधी दिली नाही. जून महिन्यापासून आकाशात ढग जमतायत, वातावरण कुंद होतंय, पण…पावसाचे थेंब काही पृथ्वीपर्यंत येत नाहीत. पावसापासून बचाव करण्यासाठी जर्किन घालून फिरावं आणि घरी परतताना जर्किनमुळे घामाघूम होऊन, ओल्या अंगाने परतावं हेच आता नशिबी आलंय.
हे जर्किन नावाचं प्रकरण अंगावर घेतल्यानंतर पाऊस गायब झाल्यामुळे पाचशे रुपये पाण्यात गेल्याचं दुःख मला दिवसरात्र खायला लागलं. त्याची नुकसानभरपाई करण्यासाठी या जर्किनचा अधिकात अधिक उपयोग करून घ्यायचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागला. (व्यवस्थापनशास्त्रातील मॅक्झिमाईजिंगची संकल्पना हीच ना?) त्याचा पहिला प्रयोग जर्किनच्या दोन्ही बाजूंच्या खिशांवर झाला. मोबाईल, ऑफिसचे कार्ड, पासबुक…अशा चीजवस्तू वाहण्यासाठी हे दोन्ही खिसे अगदी चपखल कामी आले. त्यामुळे वेगळी एखादी बॅग ऑफिसला नेण्याची गरज नाहिशी झाली. मात्र त्याचा एक परिणाम असा झाला, की जर्किनचे दोन्ही खिसे पाण्याने भरलेल्या पखालीसारखे आकाराने फुगु लागले. त्यामुळे आजबाजूच्या लोकांच्या नजरा वेगळ्या अर्थाने जर्किनवर खिळू लागल्या.
त्यानंतर हीच उपयोगाची क्लृप्ती थोडी ताण देऊन वाढविण्याचा मार्ग पत्करला. जर्किनचा विस्तार तसा ऐसपैस असल्याने याबाबतीत फारसा विचार करावा लागला नाही. पूर्वीच्या काळी धोतराचा ज्याप्रमाणे शरीराचा खालचा भाग झाकण्यापासून अंथरूण-पांघरूण होण्याएवढा सर्वप्रकारे उपयोग होत असे, त्याप्रमाणे या जर्किनचा उपयोग होऊ लागला. छातीपर्यंत चेन ओढून घेऊन सदऱयाचे तुटलेले बटन झाकणे, बसमध्ये मळलेल्या सीटची धूळ टाकण्यासाठी असे जर्किनवर प्रयोग सुरू झाले. अगदी अलिकडे तर रेल्वेच्या बर्थवर झोपण्यासाठी अंथरण्यापर्यंत या वस्तुच्या उपयोगाचे क्षितिज रुंदावले आहे. त्यामुळे डेल कार्नेजीसारखं मीही ‘हाऊ टू यूझ जर्किन इन १०० वेज इन इव्हरी वेदर’ या किंवा तत्सम नावाने एखादे पुस्तक लिहावे असा विचार करतोय. (या प्रस्तावित पुस्तकासाठीची काही टिपणे जर्किनच्या डाव्या खिशात ठेवली आहेत. )
हे एवढे प्रात्यक्षिक करूनही त्यातून मिळतं ते एकप्रकारचं कोरडं समाधानच! एवढे होऊनही माझा आशावाद मला अद्याप सोडून गेलेला नाही. हवामान विभागाच्या अंदाजावर कोणाचाही नसेल एवढा माझा विश्वास आहे. आज ना उद्या शहरात पाऊस पडेल, आज ना उद्या पावसापासून बचावल्याच्या आनंदाचा शिडकावा तरी मिळेलच, याची आशा अद्याप माझ्या मनात शिल्लक आहेच. त्यासाठीच…केवळ त्यासाठीच पाऊस पडावा, यासाठी मी देवाचा धावा करतोय!
————–

कण्णगीचे सौभाग्य अन करुणानिधींचे दुर्भाग्य! !

गेला सुमारे महिनाभर झाला तमिळनाडू आणि खासकरून त्या राज्याचे मुख्यमंत्री मुथ्थुवेल करुणानिधी चर्चेत आहेत. अर्थात ही चर्चा त्यांना किंवा अन्य कोणालाही फारशी भूषणावह ठरावी, अशी नाही. मात्र करुणानिधी यांचा वैचारिक आणि राजकीय प्रवास ज्यांना माहित आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट फारशी नवी नाही. इंग्रजी माध्यमांतील खबरांवर पोसलेल्या आणि तमिळ वगळता अन्य माध्यमांनीही यात करुणानिधी यांच्याबद्दल वेगळवेगळ्या बातम्या देण्यात कसूर ठेवली नाही. मात्र देवाच्या नावाने बोटे मोडणारे करुणानिधी स्वतः अंधश्रद्धाळू असून, आपली पिवळी शाल घेतल्याशिवाय घराबाहेरही पडत नाहीत, अशी एखादी माहिती कोणी दिली असेल तर शप्पथ! मात्र कशी देणार? त्यासाठी तेथील माहिती असायला हवी ना?

असो. मात्र करुणानिधींच्या या बडबडीमुळे त्यांचे काही चांगले कामही दुर्लक्षिले जातात. या संपूर्ण काळात मला आठवत होते सुमारे वर्षभरापूर्वी तमिळनाडूत सत्तांतरानंतर घडलेले एक सांस्कृतिक नाटक. एखाद्या देशात, राज्यात आपल्या आवडत्या अथवा कर्तृत्ववान व्यक्तीचा गौरव करणे ही सामान्य बाब आहे. ही व्यक्ती कोणती असावी, याचेही निकष सामान्यतः ठरलेले आहेत. राजकीय नेत्यांचे पुतळे सत्तांतरानंतर रस्त्यावरील धुळीत मिळाल्याची चित्रेही दिसतात. मात्र एखाद्या साहित्यकृतीतील पात्राचा पुतळा एखाद्या शहराने मानाने उभारावा, त्याला अस्मितेचे प्रतिक बनवावे आणि हा पुतळा हलविल्यानंतर त्याच्या पुनर्स्थापनेसाठी सत्तांतराचा कौल द्यावा, ही जगाच्या इतिहासात क्वचितच घडणारी घटना. ती घडली तमिळनाडूत. कण्णगीच्या पुतळ्याच्या निमित्ताने!

जैन आचार्य व कवी इलंगो अटिगळ याने लिहिलेल्या “सिलप्पदीकारम्‌’ या महाकाव्याची कण्णगी ही नायिका. तमिळ साहित्यात गेली सुमारे हजार एक वर्षे हे महाकाव्य अभिजात कृती म्हणून मान्य पावले आहे. त्यातील कण्णगीला स्त्रीशक्तीची प्रतिनिधी, देवी, न्याय मागणाऱ्यांची एक प्रतिमा असे स्थान आहे. तिच्या याच रुपातील एक पुतळा तमिळनाडू सरकारने तयार करवून, चेन्नईतील “मरीना बीच’वर स्थापित केला. सुमारे चार दशके मानाने उभा असलेला हा पुतळा पाच वर्षांपूर्वी जयललिता यांच्या सरकारने रातोरात हलविला. अन्‌ त्यानंतर तिच्या पुनर्स्थापनेसाठी सुरू झालेल्या मागण्यांची परिणती गेल्या वर्षी करुणानिधी सरकारने हा पुतळा पुन्हा “मरीना’वर बसविण्यात झाली. एका राजकीय लढ्याचा विषय ठरलेली कोण ही कण्णगी आणि तिचे स्थान काय?
या प्रश्‍नांच्या उत्तरासाठी आपल्याला “सिलप्पदीकारम’चा कथाभाग लक्षात घ्यावा लागेल. कण्णगी, तिचा पती कोवलन आणि त्याची प्रेयसी माधवी ही यातील मुख्य पात्रे. कण्णगी व तिचा पती ही दोघेही संपन्न व्यापाऱ्यांची मुले. कावेरीपूम्पट्टीनम या गावात त्यांचा सुखाचा संसार चालू असतो. अशातच कोवलनची गाठ माधवी या नृत्यांगनेशी पडते व तो तिच्या प्रेमात वाहवत जातो. त्यात सर्व संपत्ती गमावल्यावर दरिद्र कोवलनचा माधवी उपहास करते, अन्‌ पश्‍चात्तापदग्ध कोवलन कन्नगीकडे परततो. त्यानंतर दोघेही शहर सोडण्याचा निर्णय घेऊन, मदुराईच्या दिशेने निघतात. या वेळी त्यांच्याकडे असते फक्त कण्णगीची रत्नांनी भरलेली तोडयांची जोडी! कोवलन व कण्णगी मदुराईत येतात. त्या वेळी तिथे पांड्य राजा नेडुनचेळियन याचे राज्य असते. तेथे पैशांची जमवाजमव करण्यासाठी कण्णगीचे एक तोडे बाजारात विकण्यासाठी कोवलन घेऊन जातो. त्याच वेळेस राणीच्या तोड्याची चोरी केल्याचा आरोप ठेवून त्याला पहारेकरी अटक करतात. तडकाफडकी सुनावणी करून राजा चोरी केल्याबद्दल कोवलनचा शिरच्छेद करण्याची आज्ञा देतो. त्याची लगेच अंमलबजावणीही होते.
हे ऐकून कण्णगी दरबारात धाव घेते. राजाला जाब विचारते. राणीच्या तोड्यात मोती भरलेले असताना, स्वतःचे तोडे मोडून त्यात भरलेली रत्ने दाखवते. राजाशी वादविवाद करून न्यायनिवाड्यात त्याची चूक झाल्याचे सिद्ध करते. हे ऐकताच अन्यायाची जाणीव होऊन राजा व राणी प्राणत्याग करतात. तरीही कण्णगीचे समाधान होत नाही. ती मदुराई शहराला शाप देते अन्‌ तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने शहर जळून खाक होते. यानंतर शहराच्या ग्रामदेवतेच्या कृपेने तिला मोक्ष मिळतो, अशी या महाकाव्याची कथा आहे. स्त्रीचे पावित्र्य, निष्ठा यांसाठी दक्षिण भारतात कण्णगी प्रसिद्ध आहे. मोक्ष मिळविण्यापूर्वी ती पोलची पर्वतांकडे गेली होती. या भागांतील आदिवासी देवीस्वरूपात “कण्णगी अम्मन’ची पूजा करतात. येथील “मुदुवन’ आदिवासी स्वतःला कन्नगीसोबत आलेल्यांचे वंशज मानतात. श्रीलंकेतही तिची पूजा होते. तेथे सिंहली बौद्ध लोक “पतिनी’ या नावाने; तर तमिळ हिंदू “कण्णगी अम्मन’ नावाने तिची पूजा करतात.
एका हातात तोडा घेऊन, दुसऱ्या हाताचे बोट राजाकडे करणाऱ्या कण्णगीचा पुतळा चेन्नईकर अभिमानाने मिरवित. त्यांच्यासाठी तो तमिळ अस्मितेचे प्रतिक होता. द्रमुक पक्ष पहिल्यांदा सत्तेवर आला, तेव्हा दुसरी जागतिक तमिळ परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी जानेवारी 1968 मध्ये हा पुतळा उभारण्यात आला. सी. अन्नादुराई हे मुख्यमंत्री व करुणानिधी तेव्हा सार्वजिक बांधकाम मंत्री होते. कवि, लेखक, पटकथा लेखक व समीक्षक असलेल्या करुणानिधी यांना “कलैञर’ (कलामर्मज्ञ) असे म्हटले जाते. “सिलप्पदिकारम’मधील अनेक वचने ते भाषणांत वापरतात आणि या महाकाव्यावर आधारित “पुम्पुहार’ या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती. त्यांच्याच पुढाकाराने हा पुतळा “मरीना’वर बसविण्यात आला.
डिसेंबर 2001च्या एका मध्यरात्री जयललिता यांच्या आदेशावरून हा पुतळा हलविण्यात आला. एगमोरमधील एका संग्रहालयात त्याला हलविण्यात आले. त्याचे निश्‍चित कारण अद्याप माहित नाही. ती जागा सपाट करून त्यावर रस्ता तयार करण्यात आला. “वास्तुशास्त्रा’च्या दृष्टीने तो अशुभ असल्याचे ज्योतिषाने सांगितल्याने जयललितांनी हा आदेश दिल्याचे सांगण्यात येते. यावर मोठा गदारोळ झाला. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत रंगीत टीव्ही, दोन रुपये किलो तांदूळ अशा मुद्यांबरोबरच कण्णगीची पुनर्स्थापना करण्याचेही आश्‍वासन करुणानिधी यांनी दिले. तेरा मे रोजी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर तीन जून रोजी त्यांनी या पुतळ्याची खरोखरच पुनर्स्थापना केली. करुणानिधी यांच्या या निर्णयाचे राजकीय नेत्यांबरोबरच कवी, विद्वान आणि साहित्यिकांनी स्वागत केले. त्यावेळी पेनसिल्व्हानिया विद्यापीठाचे प्राध्यापक एरिक मिलर यांनी ‘हिंदू’मध्ये लेख लिहून या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणतात,”” संपत्ती नसतानाही अथवा कुटुंबीयांचे पाठबळ नसतानाही एखादी स्त्री न्याय मागू शकते, तो मिळवू शकते हे कण्णगी दर्शविते. ती खरोखरच न्याय मागणाऱ्या सामान्यांची प्रतिनिधी आहे.” न्यायदानातील चुकीमुळे पतीचा जीव गेल्यामुळे आकांत करणारी कण्णगी “मरीना बीच’वरून विनाकारण हलविल्यानंतर काही करू शकली नाही. एरवी कित्येक क्षुल्लक पुतळ्यांवरून राजकारण होणाऱ्या समाजात कुठल्याशा काव्यातील एका पात्राच्या पुतळ्यासाठी कोण दाद मागणार? मात्र तमिळ साहित्य जगत आणि करुणानिधी यांच्यासारख्या कलाप्रेमी राजकारण्यामुळे पाच वर्षांनंतर तिला तिचे स्थान परत मिळाले. हे कण्णगीचे सौभाग्यच! मात्र त्याच करुणानिधी यांना वावादुक विधाने करून स्वतःची प्रतिमा काळवंडून घेण्याची दुर्बुद्धी सुचावी हे त्यांचे दुर्दैव!
—————